तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!

माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे.

तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे.

मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते.

तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते.

परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला. सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा, भेटवस्तूंचा नुसता पाऊस पाडला.

मैत्रिणीच्या लेकीने सकाळी हळूच आईच्या हातात आदल्या दिवशी मोठ्या गुप्तपणे तयार केलेले शुभेच्छापत्र दिले.

एवढीशी पोर आणि इतक्या अगत्याने, आर्जवाने आपल्यासाठी शुभेच्छापत्र तयार करते म्हटल्यावर मैत्रिणीला भरून आले. प्रेमाने तिने
लेकीला जवळ घेतले. तिच्या गालाचे पापे घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. पण तोवर तिच्या चुळबुळ्या कन्येने तिथून धूम ठोकली होती.

लेक पसार झाल्यावर आईने कौतुकाने शुभेच्छापत्र उघडले. आत काय चित्र काढले असेल याविषयी तिलाही उत्सुकता होतीच की!

मोठ्या उत्सुकतेने मैत्रिणीने शुभेच्छापत्राकडे कटाक्ष टाकला आणि त्यावर काढलेल्या चित्राकडे डोळे फाडून बघतच राहिली!

शुभेच्छापत्रावर तिच्या लेकीने एक मांजर व तीन झुरळे काढली होती!!

मैत्रीण दिवसभर विचार करत होती. आपल्या लेकीला मांजर खूप आवडते हे तिला चांगले ठाऊक होते. पण झुरळे??? लहान मुलांच्या आवडीविषयी काहीही सांगता येत नाही. त्यांना कधी काय आवडेल ह्याचा नेम नाही. आपल्या लेकीला तिने एक-दोनदा त्याविषयी विचारले, पण ती उत्तर द्यायला एका ठिकाणी स्वस्थ बसेल तर ना!

सायंकाळी मैत्रिणीला भेटायला, शुभेच्छा द्यायला घरी इतर नातेवाईक आले होते. तेही हे शुभेच्छापत्र बघून गोंधळले. शेवटी मैत्रिणीच्या भावाने उलगडा केला. त्याची स्वतःची लेक टी. व्ही. वरच्या एका कार्टून शो ची फॅन आहे. त्यामुळे त्याला ही माहिती होती. त्या कार्टून मध्ये तीन झुरळे आहेत. त्यांच्या करामती लहान मुलांना खूप आवडतात म्हणे! माझ्या मैत्रिणीच्या लेकीलाही हा कार्टून शो खूप खूप आवडतो.

आपल्या आवडत्या, प्रिय कार्टून हिरोजची चित्रे काढून तिने आपल्या आईसाठी वाढदिवसाचे शुभेच्छापत्र तयार केले होते. तिची आपल्या आईसाठी ही निरागस प्रेमाची भेट होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला जशी आपण आपल्याला आवडणारी वस्तू भेट देतो, त्याचप्रमाणे तिने आईला तिची आवडती झुरळे चित्रस्वरूपात भेट दिली होती. एका निरागस, स्वच्छंद मनाची ती प्रेमळ अभिव्यक्ती होती.

सुदैवाने माझ्या मैत्रिणीला व तिच्या कुटुंबियांना त्या शुभेच्छापत्रामागील अनमोल भावना व विचार जाणता आले.

आपल्या आजूबाजूला लहान मुले अनेकदा आपल्याला न उमगणाऱ्या कित्येक गोष्टी करत असतात. त्यांच्या आईवडीलांना त्यांचे उपद्व्याप बऱ्याच वेळा 'झेपत' नाहीत! पण जरा खोलवर डोकावले तर त्या उपद्व्यापांतूनही ती काहीतरी सांगत असतात! आपण फक्त कान देऊन ऐकायला हवे!!  

--- अरुंधती कुलकर्णी

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. १