ओला कचरा- समस्या आणि उत्तर-२

'गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे वाक्य वाचून आणि विसरून बरीच वर्षे झाली. गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. पुढे गांडुळांचा ओला कचऱ्याच्या विघटनासाठी वापर या विषयाबाबत कुतुहल वाटल्याने त्याचा थोडासा अभ्यास केला. त्यातूनच गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे, हे ज्ञानकण प्राप्त झाले.

गांडूळ हा उत्क्रांतीच्या पायऱ्यांवरचा अगदी अप्रगत असा प्राणी आहे. इतका मागासलेला, की त्याच्यात नर आणि मादी असे लैंगिक विभाजनही झालेले नाही. गांडुळे ही उभयलिंगी असतात. तरीही त्यांचे पुनरुत्पादन हे दोन गांडुळांच्या मीलनानंतरच होते. गांडुळांची अंडी साधारणतः एका मोहरीच्या दाण्याइतकी असतत. त्यांचा आकार लिंबाच्या आकारासारखा असतो. या अंड्यांना 'ककून्स' असे म्हणतात. या ककून्समधून दोन ते तीन महिन्यात गांडुळांची पिले बाहेर पडतात. गांडुळांना फुफ्फुसे नसतात. त्यांचे श्वसन हे त्यांच्या त्वचेमार्फत होते. त्यामुळे जगण्यासाठी गांडुळांची त्वचा ही सतत ओलसर असावी लागते. उष्ण, कोरडे हवामान आणि थेट, प्रखर सूर्यप्रकाश गांडुळे सहन करू शकत नाहीत. गांडुळांना डोळेही नसतात, त्यामुळे ती काही पाहू शकत नाहीत.अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ हे गांडुळांचे मुख्य अन्न.जिवंत वनस्पतींची मुळे वगैरे कुरतडण्याइतपत त्यांच्या जबड्यांत जीव नसतो, त्यामुळे सजीव वनस्पतींना ती काही अपाय करू शकत नाहीत. थोडक्यात, आपली जी समस्या आहे, ते गांडुळांचे जीवन आहे. ओलावा, कुजणारा कचरा, थोडीशी माती , आणि थेट सूर्यप्रकाशापासून व भक्ष्यक प्राण्यांपासून (मुंग्या, बेडूक, सरडे इ. ) संरक्षण इतके मिळाले की निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या आदिम प्रेरणेने गांडुळे झपाट्याने वाढतात. अशी परिस्थिती असणाऱ्या जमिनीत (उदाहरणार्थ पानमळ्यात) गांडुळांची प्रचंड वेगाने वाढ होते. गांडूळांच्या अनेक जातींपैकी आयसेनिया फेटिडा अर्थात रेडवर्म ही सर्वपरिचित जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र सरपटणारी लालसर रंगाची गांडुळे दिसतात, ती हीच. याशिवाय युड्रिलस युजिनी नावाची जांभळ्या रंगाची आणि रेडवर्मसपेक्षा आकाराने थोडी मोठी गांडुळांची जातही गांडुळखत प्रकल्पासाठी वापरली जाते. काही मिलिमिटर लांबीच्या गांडुळांपासून एक मीटर लांबीच्या राक्षसी आकारापर्यंतची गांडुळे निसर्गात पहायला मिळतात.

हे इतके सगळे लिहिण्याचे कारण गांडुळे ही किती निरुपद्रवी आहेत हे ध्यानात यावे हे आहे. अर्थात वळवळणाऱ्या गांडुळांना, विशेषतः जर ती संख्येने खूपच असतील तर, पाहून मनात भीती आणि किळस उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. गांडुळे अंध असल्याने त्यांची ही आंधळी हालचाल अधिकच भयावह वाटते. पण बहुतेक सर्व प्राण्यांप्रमाणे माणूस गांडूळाला जितका घाबरतो, त्याच्या कित्येक पटीने गांडुळे माणसांना घाबरतात. अर्थात गांडुळे माणसाला बघूच शकत नसल्याने हे त्यांचे 'घाबरणे' हे सांकेतिक आहे. गांडुळांना माणसांपासूनच धोका अधिक आहे, असे हे म्हणण्याचा हेतू. पण एकदा ही भीती किंवा किळस आपल्या मनातून काढून टाकली ( एका कचरा व्यवस्थापन संस्थेचा सल्लागार म्हणून काम करताना मला हजारो गांडुळे बघावी, प्रसंगी हाताळावी लागली आणि ही भीती माझ्या मनातून गेली) की मग गांडूळ खत प्रकल्प उभा करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे अगदी सोपे आहे. गांडूळ खत प्रकल्प उभा करण्यासाठी सावलीची, आडोशाची गरज असते असे तज्ज्ञ सांगतात, पण वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापन करायचे असेल तर याची गरज नाही. मी माझ्या घरातील सर्व ओला कचरा माझ्या गच्चीवर केलेल्या छोट्याशा बागेत मुरवतो. या बागेत काही प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून मी त्यात काही गांडुळे सोडली. मग त्यावर घरातला ओला कचरा त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायला सुरुवात केली. काही महिन्यांतच या गांडुळांनी हा ओला कचरा फस्त केला. मग अशा पोत्यांमध्ये मी काही फुलझाडे लावली. आता ही फुलझाडे मस्त बहरून आली आहेत. या पोत्यातल्या झाडांना एक आड एक दिवशी, उन्हाळ्यात रोज, पाणी घातले की झाले. बाकी काही फारसे करावे लागत नाही. निवडुंगाप्रमाणे किंवा कोरफडीप्रमाणे गांडूळ खत प्रकल्प हा 'थ्रायव्हिंग ऑन निग्लेक्ट' अशा प्रकारे वाढतो.

गांडुळखताचा प्रकल्प करताना काही पथ्ये पाळावे लागतात. वर लिहिल्याप्रमाणे जमीनीत पुरेसा ओलावा नसेल तर गांडुळे मरून जातात. याउलट जमीन अगदी पाणथळ झाली तरी गांडुळे (बुडून) मरतात. त्यामुळे जमीनीत / मातीत हवा तितकाच ओलावा ठेवणे आवश्यक आहे. अर्थात सरावाने हे ओलाव्याचे प्रमाण किती हे लक्षात येऊ लागते. गांडुळांच्या तोंडात दात नसतात, म्हणून गांडुळांना अन्न म्हणून वापरायचा कचरा शक्य तितका बारीक केलेला असावा. (कचरा जितका बारीक केलेला तितका त्याचा 'सरफेस एरिया' अधिक, त्यामुळे तितका त्याच्या विघटनाचा वेग जास्त, हेही वैज्ञानिक सत्य या वेळी ध्यानात यावे. ) गांडुळांची कचरा विघटन करण्याची शक्ती ही काही जादुई नसते. त्यामुळे जमिनीत जेवढी गांडुळे असतील त्या हिशेबानेच जमीनीत कचरा टाकावा. वाजवीपेक्षा अधिक कचरा टाकल्यास तो अनेरॉबिक रीतीने कुजायला सुरवात होते; आणि मग दुर्गंधी, माशा, डास असे प्रश्न निर्माण होतात. ओला कचरा निर्मूलनाच्या गांडूळ खत पद्धतीत दुर्गंधी येत असेल तर काहीतरी चुकते आहे, असे मानावे. काच, प्लॅस्टिक, धातूचे तुकडे हे पदार्थ या प्रकल्पात अर्थातच टाकू नयेत. कीडनाशके, कीटकनाशके, इतर विषारी पदार्थ हे गांडूळांनाही मारक ठरतात.

आता दुसरा प्रश्न असा की ही गांडुळे कुठून आणावीत? जिवंत गांडुळे किंवा गांडुळांपासून तयार केलेले खत (व्हर्मीकापोस्ट) हे बऱ्याच ठिकाणी उपलब्द्ध असते. गांडुळ खत तयार करण्याला उत्तेजन मिळावे म्हणून बऱ्याच शासकीय योजनाही आहेत. गांडुळ खत हे बारीक, काळसर रंगाचे आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंधी न येणारे असते. योग्य रीतीने तयार केलेल्या

गांडुळ खतात गांडुळांची अंडी असतातच. त्यामुळे अशा प्रकारचे खत वापरले की आपोआपच त्या ठिकाणी गांडुळांची निर्मिती होते. एरवीही शेतातल्या मातीत गांडुळे असतातच, पण आपला हेतू हा कचरा निर्मूलन हा आहे, त्यामुळे त्यासाठी सुरवातीला गांडुळांचे हे 'विरजण' घातलेले बरे. हे गांडुळ खत पाचदहा रुपये किलो या दराने मिळते. हे सगळे सुरू करावे ते बाकी पावसाचा भर जरा ओसरू लागला की.

आता एक कळीचा मुद्दा असा की हे सगळे कशासाठी करायचे? मला याची दोन उत्तरे सुचतात. एक थोडे तात्विक स्वरुपाचे आहे. कचऱ्याची निर्मिती, त्याचे विघटन, त्यातून तयार होणारी मूलद्रव्ये, या मूलद्रव्यांपासून होणारी सजीव नवनिर्मिती, त्यापासून परत तयार होणारा कचरा असे हे चक्र शतकानुशतके चाललेले आहे. या चक्राचा तोल बिघडवला तो माणसाने. माणसाने शेती करायला सुरवात केली, माणसाने जंगले तोडली, माणसाने कागद, कापड यांची निर्मिती केली, माणसाने भाजीपाला पिकवला, माणसाने पशुपक्षी माणसाळवले, माणसाने अन्न शिजवायला प्रारंभ केला, माणसाने औद्योगिक क्रांती केली. या तथाकथित प्रगतीतून प्रचंड प्रमाणावर कचरा निर्माण होऊ लागला. मग या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे माणसाचे कर्तव्यच नाही का? 'बिहेविंग टुवर्डस अदर्स ऍज यू वुड लाईक देम टु बिहेव टुवर्डस यू' ही 'गुड मॅनर्स' ची व्याख्या इथे लागू करायची तर सुसंकृत असण्याचे किमान लक्षण म्हणून आपण करून ठेवलेला पसारा आपणच आवरणे इतके तरी आपण केलेच पाहिजे. दुसरे कारण थोडेसे वैयक्तिक छंदाचे आहे. ओल्या कचऱ्यातून निर्माण केलेल्या छोट्याश्या बागेने मला अपार आनंद दिला आहे. गांडूळ खत हे वनस्पतींना आवश्यक अशा सर्व मूलद्रव्यांनी युक्त असे असते. त्यामुळे गांडूळ खतावर अगदी निरोगी फुलझाडे वाढवता येतात. जरा अधिक कष्ट घेण्याची तयारी असेल आणि जागा आणि पाणी (आणि मुख्य म्हणजे वेळ) यांची कमतरता नसेल तर माफक भाजीपालाही या खतावर वाढवता येतो. एका घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर एखादे कढीलिंबाचे झाड, चार मिरच्यांची रोपे, दोनपाच टोमॅटोची झाडे, एखादे गवती चहाचे बेट असले बरेच काही वाढवता येते. सकाळच्या पारी या झाडांना पाणी घालणे आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून या लहानशा बागेतून फेरफटका मारणे हा, ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी अपार आनंदाचा झरा आहे.

मोठ्या प्रमाणावर गांडुळखत निर्माण करायचे असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या चित्राप्रमाणे बांधीव खड्डे किंवा वाफे बांधावे लागतात. हा एक स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो, पण अर्थातच प्रस्तुत लेखाचा उद्देश त्या व्यवसायाविषयी माहिती देणे असा नाही.

खाली दिलेली चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. आयसेनिया फेटिडा जातीची गांडुळे, गांडूळ खत प्रकल्प आणि गांडूळांची ककून्स असा या चित्रांचा क्रम आहे.