ओला कचरा- समस्या आणि उत्तर-१

कचऱ्याची समस्या या विषयावर उदंड बोलले आणि लिहिले जाते. पुणे महानगरपालिकेने ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करण्यासाठी केलेली तथाकथित सक्ती आणि तिचा सामान्य नागरिकांनी उडवलेला फज्जा, ओला कचरा जागेवरच जिरवणारा प्रकल्प उभारणाऱ्या सहकारी गृहसंस्थांना महानगरपालिकेने देऊ केलेली करसवलत आणि ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी तात्पुरते केलेली काही नाटके आणि ती सवलत मिळाल्यावर निर्लज्जपणाने त्या प्रकल्पांकडे केलेले दुर्लक्ष.... एकंदर सगळे शिरस्त्याप्रमाणेच चालले आहे म्हणायला हरकत नाही. हे झाले फक्त पुण्याचे. इतरत्रही गावांतही प्रवेश करतानाच असह्य दुर्गंधीचे कचराडेपो, गावागावांत ओसंडून वाहाणाऱ्या कचराकुंड्या, माशा, डास यांचा उपद्रव, आसपास फिरणारी भटकी कुत्री हे सामान्य चित्र दिसते. यावर स्थानिक प्रशासनाला शिव्या घालत नाकावर रुमाल धरून हा त्रास सहन करणारा नागरिक स्वतःच्या घरातला कचरा बाकी बिनदिक्कत रस्त्यावर फेकायलाही कचरत नाही. या सामाजिक अनास्थेच्या सुमारसद्दीत अपवादानेच आपल्या घरातला, कार्यालयातला, सहकारी गृहसंस्थांमधला आणि कारखान्यातलासुद्धा संपूर्ण ओला कचरा त्या त्या जागी जिरवून आपापल्या परीने पर्यावरणाच्या संवर्धनाला हात लावणारे काही लोक दिसतात. अशा कचरा व्यवस्थापनातून उत्तम खताची निर्मिती करून त्यावर आपल्या परसातली, गच्चीतली बाग फुलवणारे लोकही दिसतात. पण हे प्रमाण नियम सिद्ध व्हावा इतके अपवादात्मक आहे. बाकी जनता 'हे आपल्याशी संबंध नसलेले काहीतरी आहे... ' अशा बेफिकीर मग्रूरीत असलेली दिसते.

या कचराव्यवस्थापनातील नेमके तथ्य काय आहे? ओला कचरा म्हणजे काय , तो जागेवर जिरवणे म्हणजे काय, त्यातून खत निर्मिती कशी होते आणि त्यावर परसबागा, फुलबागा कशा फुलू शकतात आणि काही मर्यादित प्रमाणात का होईना, रोजगारनिर्मिती कशी होऊ शकते यावर प्रकाश टाकावा म्हणून हा लेखनप्रपंच. घन कचऱ्याचे सेंद्रीय व असेंद्रीय असे ढोबळ वर्गीकरण करता येईल. असेंद्रीय कचऱ्यात काच, धातू व प्लास्टिक या सहजासहजी विघटन न होणाऱ्या पदार्थांचा समावेश आहे. हे सोडून बाकी सगळे - म्हणजे ज्याचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होते ते पदार्थ- उदा. कागद, सुती कापड,भाजीपाल्याची टरफले व देठे, उरलेले शिळे अन्न, अंड्यांची टरफले हा सगळा सेद्रीय कचरा आहे. निसर्गात विविध प्रकारचे जीवाणू या कचऱ्याचा अन्न म्हणून वापर करतात आणि त्यापासून उर्जा मिळवतात. या कचऱ्याचे संपूर्ण विघटन झाले की बहुतेक वेळा पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. निसर्गात ही प्रक्रिया अत्यंत संथपणे पण सतत सुरू असते. या अर्थाने हे विघटन करणारे जीवाणू आपल्याला केवढी मदत करत असतात ते पहा! या विघटनातला एक मधला टप्पा म्हणजे अर्धवट विघटन पावलेले पण पूर्ण कुजलेले सेंद्रीय पदार्थ ( ज्याला स्थूलमानाने ह्यूमस असे म्हणता येईल.) या ह्यूमसचे जमीनीतील प्रमाण वाढले की जमीनीची सुपीकता ही वाढते. घनदाट अरण्यातील वृक्षवेलींचा पालापाचोळा, प्राण्यांची, कीटकांची मृत शरीरे, आणि त्यांची विष्ठा यांचे वर्षानुवर्षे होणारे विघटन यामुळे अरण्यातील जमीनी अधिकाधिक सुपीक बनवत जातात. तथापि, मोठ्या शहरातील दाट लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण इतके प्रचंड आहे, की त्यापुढे निसर्गाची ही पुनर्निर्माण करणारी व्यवस्था अपुरी पडते, कोलमडूनच जाते. अशा कचऱ्याचे ढीग साठत गेले की या जीवाणूंना विघटनासाठी लागणारा ऑक्सीजन त्या ढीगांमध्ये खोलवर उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सीजनच्या अभावामध्ये काम करणारे जीवाणू (अनएरोबिक ऑरगॅनिझम्स) वाढीस लागतात. हे ही जीवाणू विघटनाचे कार्य करतात खरे, पण ते या सेंद्रीय कचऱ्याचे पूर्ण विघटन करू शकत नाहीत. व या अर्धवट कुजलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त पदार्थांची निर्मिती होते. ( उदा. हायड्रोजन सल्फाईड). मग माशा, कीडे, डास हे दुष्टचक्र सुरू होते.

हे झाले या प्रश्नाचे स्वरुप. आता उत्तराकडे. मुळात घन कचऱ्याची निर्मिती कशी कमी करता येईल, याचा जरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक विचार केला, तरी हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल. या साठी प्रसिद्ध अशी 'आर' ची त्रिसूत्री - रिड्यूस, रियूज, रिसायकल - समजून घेणे आवश्यक आहे. कागदाचे साधे उदाहरण घेऊ. पाठकोरे कागद वापरणे हे काही अनाकलनीय कारणामुळे कमी प्रतिष्ठेचे समजले जाते. अगदी स्वतःचा इ-मेल पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक जरी कुणाला द्यायचा असेल, तरी नवाकोरा, मोठा कागद घेणारे लोक पदोपदी दिसतात. वापरला जाणारा प्रत्येक नवीन कागद हा कुठेतरी, कुणीतरी, कुठल्यातरी वृक्षावर घातलेला घाव असतो, ही जाणीव प्रत्येकापर्यंत जाणे गरजेचे आहे. कागदाचा कमीत कमी वापर करणे, शक्य तितका पुनर्वापर करणे, प्लास्टीकचा वापर जाणीवपूर्वक टाळणे असे अनेक मार्ग सातत्याने प्रसारमाध्यमांतून सुचवले जात असतात. जाणीवपूर्वक आपली जीवनशैली पर्यावरणरक्षणाशी सुसंगत करणे हा यातला कळीचा मुद्दा आहे. कचऱ्याची निर्मिती कमी करणे हा कचरा व्यवस्थापनातला पहिला आणि महत्वाचा भाग झाला. नुसता कागदच नव्हे, तर जे जे विघटनशील आहे, त्याची नासाडी कमी कणे गरजेचे आहे. या संदर्भात वाया जाणारे अन्न याबाबत चार शब्द लिहिणे आवश्यक आहे. नुसतीच लग्नाकार्यात नव्हे, तर रोजच्या जेवणातही अन्न वाया घालवणे हा अत्यंत गंभीर सामाजिक गुन्हा आहे अशी जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. खानावळीत वाट्यानवाट्या भाज्या, उसळी, आमट्या आणि कोशिंबिरी पानात टाकून उठणारे लोक, पोळीचा मधलाच भाग खाणारे लोक, कांदा, लिंबू वगैरे गरज नसताना मागून घेणारे व ते पानात टाकणारे लोक हे सामाजिक गुन्हेगार आहेत अशी भावना विकसित झाली पाहिजे.

(या बाबतीत शिक्षणासाठी होस्टेलल्या राहिलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव जाणून घेण्यासारखा आहे. होस्टेलला राहाणे आणि मेसला जेवणे यांमुळे अन्नाबद्दलचा आदर वाढीस लागतो असा स्वानुभव आहे!) कागदाचा प्रत्येक कपटा निसर्गावर एक लहानसे ओझे टाकतो. विल्हेवाट करण्याचे ओझे. असे किती ओझे निसर्ग सहन करू शकेल? निसर्ग क्षमाशील आहे, पण तोही सर्वशक्तिमान नाही. निसर्गालाही मर्यादा आहेत. या मर्यादा तर आपण आधीच ओलांडल्या आहेत. त्यामुळे आपण कचरा करत जावा आणि निसर्गाने त्याची विल्हेवाट लावत राहावी, ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे. जी गोष्ट कागदाची, तिच इतर सेंद्रीय पदार्थांची. म्हणून जिथे जिथे शक्य आहे, तिथे सेंद्रीय पदार्थांचा पुनर्वापर करण्याची प्रवृत्ती एक सामाजिक जाणीव म्हणून वाढीस लागली पाहिजे. जेंव्हा हे अगदीच अशक्य असेल, तेंव्हा हे पदार्थ योग्य पद्धतीने निसर्गात कसे मुरवता येतील, हे पाहिले पाहिजे. शेतीमध्ये तयार होणारे टाकाऊ सेंद्रीय पदार्थ कुजवून त्यापासून सेंद्रीय खत- कांपोस्ट- तयार करण्याची कला शतकानुशतकापासून शेतकऱ्यांना ठाऊक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने विशेषतः काही निवडक जीवाणू आणि बुरशी यांचा वापर करून ही क्रिया अधिक वेगाने व अधिक फायदेशीर रित्या करता येते. यालाच आता व्हर्मीकांपोस्टिंगचे - गांडूळखताचे - नवीन परिमाण मिळाले आहे. गांडुळखत म्हणजे काय आणि गांडुळांचा वापर करून सेंद्रीय कचऱ्याचे विघटन कसे करता येईल ते पुढच्या भागात पाहू.