एकदा हसून जा कधीतरी
..शर्करा बनून जा कधीतरी
प्रीत ही तुला कधी कळेल का?
..विस्तवामधून जा कधीतरी
आस्तिकास सांत्वना मिळेल का?
ईश्वरा,..असून जा कधीतरी!
चेहरे खरे तुला बघायचे..?
..वेष पालटून जा कधीतरी
स्वप्न सांगते " अरे,.. खरेच रे"
वास्तवा,.. भुलून जा कधीतरी
टाकतोस केर जो इथेतिथे,
साफही करून जा.. कधीतरी
कैक जीव टांगणीस लागले,
हे ऋणा,.. फिटून जा कधीतरी!
काय तीच मिळमिळीत भाषणे!
..वादळी ठरून जा कधीतरी!
वाहणे कितीक काळ आणखी?
सागरा,.. दिसून जा कधीतरी
ऐकतोस का मुकाट नेहमी?
वादही करुन जा कधीतरी
पाहशील दिव्य रत्न-माणके!
खोल तू अजून जा कधीतरी
-मानस६