जाणिवांच्या पार...

(बऱ्याच दिवसात काही नवीन लिखाण केलं नसल्याचं शल्य मनात होतं. त्यात माझ्याच काही जुन्या कविता वाचल्या, तेव्हा असं जाणवलं, की कवी म्हणून, 'जुना मी' जास्त चांगला होतो. 'नवा मी' कविता लिहितो खरा, पण त्या बऱ्याचशा माझ्या नसल्यासारख्या, अनुभवरहित! ह्या विचाराने, मनातल्या मनात, जुना मी आणि नवा मी ह्यांचा संवाद सुरू झाला, तीच ही कविता. ह्या संवादाच्या निमित्ताने,  मला माझ्यातला जुना मी ह्या संवादाच्या शेवटी भेटल्यासारखा वाटतो.)

मोकळ्या रानातल्या कविता तुझ्या,
आणि मी घनगर्द दुःखांचा धनी।
ओळ माझ्याही मनी येतेच, पण
वाढतो अंधार, ती येता क्षणी ।

तू जुनासा, वृत्त-छंदी डुंबसी,
आणि मी उधळू पहातो मुक्तके,
वेगळे संदर्भ माझे अन् तुझे,
तू कवी, मी फक्त कवितेचे धुके।

वेदना होत्या तुलाही, पण तुझे-
-दुःख अव्यक्तात सारे राहिले,
टोचला काटा जरासा अन् मला,
दुःख त्याचे भळभळूनी वाहिले ।

आज मी बघतो तुला जेव्हा कधी
भाससी मजला सख्या दूरस्थसा,
मी जरी लिहितो कधी, काहीतरी,
राहतो मी आतुनी अस्वस्थसा ।

भेट रे, मज कडकडूनी भेट रे!
दे मला सारे तुझे सर्वस्व तू ।
वेगळे झालो कधी? मी नेणतो,
पण सख्या, माझे खरे अस्तित्व तू ।

----------------------------

'जाणिवांचे सार' ही कविता सख्या,
भक्त आपण, मी जुना,वा तू नवा ।
जाणिवांच्या पारही कविता उरे,
जाय विरुनी जेथ सारी वाहवा ॥

                                            - चैतन्य दीक्षित.