लालबाग-परळ... -२-

फटाफट एकेक खाती बंद करत जाणारा खेतानशेट.. त्याची बावळट, शेमळट मुद्रा, पण क्रूर, नीच वृत्ती.. त्याचा आणखीनच नीच जावई..नाडली जाणारी कामगार मंडळी.. वाढत जाणारी लाचारी, चोऱ्या, लबाडी.. खरंच काही चांगलं, भलं उरलंच नाही का? तोतरा स्पीडब्रेकर नि त्याची सेना.. मर्कटसेनाच ती .. त्यांचे दारू पिणे, बंदुका चालवणे,शिवीगाळ करणे, त्या गरीब माणसाला खुर्चीला बांधून जो काही अनन्वित छळ केला, मारहाण,चावणे.. शीः .. पोटात ढवळून आले.. हे कमी म्हणून की काय, त्याला गोळ्या घालताना त्यांचे हिडिस हासणे.. आणि गोळ्या घालणे काय ते, एका गोळीत जीव गेला तरी वीस-तीस गोळ्या मारणे..प्रत्येक वेळी गोळी लागते तिथे उसळणारे रक्ताचे कारंजे..अरे, किती, किती दाखवाल? सूचक, प्रतीकात्मक काहीच नाही?

तेच प्रेमाच्या बाबतीत..नुसते हिसकावणे,ओरबाडणे, फसवणूक, व्यभिचार..आणि त्याला लाचार मान्यता, प्रत्यक्ष आईचीही!! नरूवर गोळ्या झाडल्या जातानाही नुसताच आक्रोश.. राग का नाही? हवा तिथे राग नाहीच.. आणि नको तिथे भीकमाग्या राग..आणखी ती सोज्वळ सई ताम्हणकर कशाला या असल्या चित्रपटात? म्हणजे उष्ट्या, चिवडलेल्या ताटात, कोंबडीच्या हाडकांत रसगुल्ला..कशाला घ्यावा तिने असला रोल?

अरे, वास्तव, वास्तव काय एवढेच आहे?आणखी काहीही दाखवण्यासारखे नाही?तुमच्याकडे त्यावर काही उत्तर नाही? भाष्य नाही? . आणि नाही, तर मग नुसते नागडेपण का दाखवता? ते काही कुणाला नवीन नाही...असे स्टन होउन,निःशब्द घरी परतलो. ते रक्त पाहिल्यावर खाण्या-पिण्याची इच्छाच नाही उरली.. डोळ्यासमोरची हिडिस दृश्ये जात नव्हती.. तीननंतर डोळे मिटले, दमून... काल दिवसभर कपाळात सूक्ष्मशी दूख होती, दमणूक होतीच.. सकाळी उठून बागेत फेरी मारली.. मोगरा डवरलेला पाहिला. .सुगंध नाकातून मनात भरला.. तेव्हां कुठे बरं वाटलं.......