लालबाग-परळ...-१-

परवा घाईघाईत पोचलो, लालबाग-परळ बघण्यासाठी.. रविवार असल्याने भरपूर प्रेक्षक होते..मला काही मजा नाही आली सिनेमा बघून..खरे तर,आतापर्यंत वाचनात आलेले चाळीतले जीवन किती गोड रंगवले गेले आहे.पण पुलंच्या चाळीची संपन्नता इथे कुठेच नाही दिसली‌.सगळा नुसता गलिच्छपणा आणि गचाळपणाच दाखवलाय.माझी लीलामावशी रहायची ती दादरची खांडके चाळ, कुणाल राहतो ती परळ मधली चाळ.. किती छान होत्या त्या! मग सुरू झाले ते केवळ ओंगळवाणेपण...गरीबी वेगळी नि दारिद्र्य वेगळे ना! गरीबीतही स्वच्छ घरात, स्वच्छ चारित्र्याने राहता येतं की..वस्तूंच्या असण्या-नसण्याशी आयुष्याच्या संपन्नतेचा काय संबंध? पण मला  वाटतं,इथे या सिनेमात सौंदर्य, संपन्नता यांना कुठे जागाच नव्हती. सायकलवाला, मटनवाला यांच्याशी झालेली किरकोळ भांडणं थेट मारहाणीपर्यंतच पोचली.लगेच तोंडं,नाकाडं फोडणे, रक्तपात सुरू.. मग सरळ दादाकडेच धाव.. मग सोटे,बंदुका..ते हाताळणारे कोवळे हात.. दारुच्या बाटल्या रिचवणारी कोवळी पोरं.. शेजारची सावर्डेकर मामी नि मोहन यांच्यावर लक्ष ठेवणारी पोरं.. ती ही कोवळीच..दुकानात बसून धुरींच्या मुलीला गटवणारा नि फसवणारा मारवाड्याचा तरुण मुलगा.. त्याच्या जाळ्यात फसणाऱ्या मुली कोवळ्याच.. मात्र जपायची ती कोवळीक जपली गेली नाही कुठेच!!