असाही असतो 'अभिमान'?

आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे!

एका कुटुंबातील हा खराखुरा घडलेला किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण!
तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत. घरातली माउली कुरकूर करत का होईना, आल्यागेल्याचे करायची. मुळात त्या गृहस्वामिनीची शरीरयष्टी अतिशय कृश... अंगात रक्त कमी, कायम जाणवणारा अशक्तपणा आणि डोकी वर काढणारे आजार! घरी सासरच्या नातेवाईकांचा भला थोरला उठारेटा. कोणाला नाही म्हणायचे नाही असा रिवाज. नवरा देईल त्या पैशांत घरखर्च चालवायचा. शिवाय सारे काम गप्प बसून करायचे. कारण घरी बायकांनी आवाज चढवून बोलायचीही पद्धत नव्हती. आणि ती कधी नवऱ्याला सांगायला गेली की तिच्या बाईपणाचा, कमी शिक्षणाचा सार्वजनिक उद्धार व्हायचा! घरीच राहायचे आणि त्यातच अभिमान बाळगायचा अशीच विचारसरणी. तिला घरकामात मदत म्हणून तिच्या परकरी पोरीचा व पुतणीचाच काय तो आधार! घरातली मुले, पुरुष कामावरून घरी परत आल्यावर निव्वळ आराम करणार, पत्ते कुटणार किंवा टी. व्ही. बघणार आणि ह्या मायलेकी दिवसभर कळश्या-घागरींतून पाणी भरणे, घरातील धुणी-भांडी करणे, दहा-बारा लोकांचा ताजा स्वयंपाक, झाडू-पोछा यातच मग्न!   
एकदा सर्व कुटुंब गावी सुट्टीला गेले आणि येताना घरातल्या धाकट्याच्या हट्टापायी गावाकडून एक भले थोरले अल्सेशियन कुत्र्याचे पिल्लू घेऊन आले पाळायला. आता त्या टिचकीभर जागेत एवढ्या महाकाय कुत्र्याला पाळणे म्हणजे त्या कुत्र्यावर अन्याय होता. पण कोण समजावून सांगणार त्यांना? बिचारे पिल्लू कधी घराबाहेरच्या वीतभर जागेत अंग खुरमडून पडून राहायचे तर कधी घरातल्या चिंचोळ्या कोपऱ्यात बसलेले असायचे. त्याला मोकळेपणाने हालचालही करायची चोरी! नशीब एवढेच की घरातील पुरुष मंडळी त्या कुत्र्याच्या देखभालीचे काम जातीने करायची. त्याच्यापुरती भाकरी बनविण्यापलीकडे गृहस्वामिनीला त्या कुत्र्याचे विशेष काही करावे लागले नाही. पिल्लू दिवसेंदिवस मोठे होत होते, त्याची भूक आणि आकार दोन्ही वाढत होते. त्याला व्यायामाची सक्त गरज होती. मग रोज सकाळ- सायंकाळ घरातील मुले त्या पिल्लाला घेऊन पळायला जात आणि रात्रीसुद्धा त्याला लांबचा फेरफटका घडवून आणत.
असेच काही महिने गेले. मे महिन्याची सुट्टी लागली. सालाबादप्रमाणे सारे कुटुंब सुट्टीसाठी गावाकडे रवाना झाले. पण त्या कुत्र्याला काही एस. टी. मधून घेऊन जाणे शक्य नव्हते. मग कुत्रे आणि घरमालक गावी न जाता तिथेच राहिले. घरमालकांना रोज नोकरीसाठी घराबाहेर जावे लागे. त्या वेळेत कुत्र्याकडे बघणारे कोणीच नसे. बिचाऱ्या कुत्र्याला अश्या एकटेपणाची सवय नव्हती. तेही दिवसभर आपल्या खेळगड्यांच्या आठवणीने रडत असे. तर मग घरमालकांनी त्यावर नामी उपाय शोधला. त्यांनी एका बाईलाच घरी आणून ठेवले. हो, हो, ठेवलेच! कारण ती बाई तिथे दिवसाचे चोवीस तास मुक्कामाला असे. वयही फार नव्हते तिचे. जेमतेम तिशीतली असेल. त्या दोघांचे बंद दाराआड काय चालायचे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक... पण रोज दोघे जोडीने त्या कुत्र्याला रात्रीचे फिरवायला घेऊन जायचे.... अगदी सार्वजनिक रित्या त्यांचे गुटर्रगू चालायचे. झाले! आजूबाजूच्या संसारी कुटुंबांच्यात एकच खल सुरू झाला. कुजबूज वाढली आणि पोटदुखीही वाढली. लोकांना संस्कृती व संस्कारांचे उमाळे येऊ लागले. कोणाला त्या घरच्या बाईविषयी कणव वाटू लागली. त्यातच कोणीतरी बातमी आणली... ती नवी बाई म्हणे ''त्या'' भागातली आहे... कोणाच्या कोणीतरी तिला त्या रंगीत माडीवर पाहिले आहे.... आतातर संस्कृतीरक्षकांच्या हाती आयते कोलीतच सापडले. शिवाय त्यांच्या मुलाबाळांचा, त्यांच्या कोवळ्या कोवळ्या मनांवर होणाऱ्या संस्कारांचा विचारही त्यांनाच करायचा होता ना! मग काय, मीटिंगा झाल्या, बायकांची वेगळी, पुरुषांची वेगळी! कोणी काय बोलायचे ते ठरले. शिष्टमंडळ तयार झाले. अर्थातच आघाडी पुरुषांनीच घ्यायचे ठरले.... कारण अश्या विषयावर एका पुरुषाशी ''बायामाणसांनी'' कसे बाई बोलायचे?
ठरल्याप्रमाणे त्या श्वानप्रेमी घरमालकाला लोकांनी एकदा एकटे गाठले. सुरुवातीला त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न झाला. पण हा गडी तर फार गुर्मीचा निघाला. ''तुम्हाला काय करायचंय.... मी काय पण वाट्टेल ते करेन माझ्या घरात! '' अश्या भाषेत बोलू लागला. त्याला प्रेमळ धमक्या देऊनही तो बधत नाही म्हटल्यावर मग शिष्टमंडळाने आपले पुढील अस्त्र काढले. त्या गड्याला पोलिसांत त्या बाईविषयी तक्रार केली जाईल अशी धमकी दिली. कारण त्यांच्याकडे ती 'धंदेवाली' असल्याची खात्रीशीर माहिती होती. (आता ही माहिती त्यांनाच कशी, कोठे आणि कोणी दिली हे मात्र विचारू नका, राव! ) घरमालकाची झाली पंचाईत! ह्या प्रकरणाला जास्त हवा लागू देणे त्याला परवडणार नव्हते. घरचा प्रश्न नव्हता, पण त्याचा एक जवळचा नातेवाईक राजकारणातला उदयोन्मुख नेता होऊ बघत होता. (जो आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेतृत्वापैकी गणला जातो! ) त्यामुळे अशी ''घराण्याची'' बदनामी होणे परवडणारे नव्हते. मग काय, दोनच दिवसात त्या बाईचा गाशा गुंडाळला गेला. समस्त काळजीवाहू हितचिंतकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.  
कालांतराने त्या गृहस्थाचे कुटुंब गावाहून सुट्टी संपवून परत आले. घरातील कुत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचा वनवास संपला होता. कारण गेले कित्येक दिवस मालकाने त्याच्याकडे धड लक्षच दिले नव्हते! एव्हाना हितचिंतक नारीमंडळ एकत्र खलबते करून त्या गृहस्वामिनीच्या ''समाचार'' भेटीला कधी जावे, नवऱ्याचे प्रताप तिच्या कानी कितपत घालावेत ह्या विचारात होते. पण कोणाला तरी फारच घाई झाली असावी. कारण आल्यापासून दोनच दिवसांच्या आत कोणीतरी तिला तिखटमीठ लावून सारी खबर पुरविली होती. आता सर्वजण श्वास रोधून स्फोटाची वाट पाहत होते. पण मजाच झाली! स्फोट झालाच नाही. सर्व काही गपगुमान... बायकांना आश्चर्यच वाटले! त्यांची आता पुढे काय करावे याविषयी खलबते चालू होती तेव्हा तिथे ती गृहस्वामिनी प्रकटली... ‌ सुरुवातीला बायका जरा गडबडल्या, पण मग त्यातल्या एकीने धिटाईने तिला काय काय घडले त्याचा पाढाच वाचून दाखवला.... आता अपेक्षा होती ती तिच्या प्रतिक्रियेची. किमानपक्षी थोडीफार शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप, भांडाभांडी तरी! पण त्यातले काहीच न करता ती महान स्त्री उठली आणि जायला निघाली. 
निघताना मागे वळून सर्व बायकांना ऐकू जाईल अश्या आवाजात (कधी नव्हे ते! ) ती जोरात म्हणाली, ''आमची मानसं पुरुष हायेत म्हटलं! '' 
बाई मोठ्या तोऱ्यात आपल्या घराकडे परतली. 
 उरलेल्या बायका गपगार, एकमेकींच्या तोंडाकडे टकामका बघत राहिल्या.  इतक्या किरकोळ, अशक्त, कायम आवाज खाली गेलेल्या स्त्रीकडून आपल्या नवऱ्याच्या ''कृष्णकृत्या''ची अश्या प्रकारे ठणठणीतपणे बाजू घेतली जाईल हे त्यांच्या गावीच नसावे! 
तिचा स्वतःच्या नवऱ्याच्या ''पुरुष''पणातील अभिमान(! ) त्या निमित्ताने सर्वांना आपल्याच आजूबाजूला असलेल्या एका समांतर दुनियेची सफर घडवून गेला.  
-- अरुंधती.