ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले. त्यातून तिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. दुर्गम भागात तिने शिक्षिका म्हणून नोकरीला सुरवात केली. लहान वयात लग्न झालेले, तशाच लहान वयात तिला मातृत्व लाभले. तिच्या लहानग्या मुलाला दुर्गम भागात औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू आला. विशीतल्या जोडप्याला अशा प्रसंगाने खचवून टाकले असते, पण अत्यंत सकारात्मक भूमिकेमुळे ती आणि तिचा नवरा या घटनेनंतर चोवीस तासांत आपापल्या कामावर रुजू झाले. नंतर तिच्या नवर्यावर अत्यंत अवघड अशी दुखणी आली. या सगळ्यांतून ती जिद्द आणि श्रद्धा यांच्या बळावर तरून गेली. ईश्वरावर तिची अढळ श्रद्धा होती. कर्मकांडेही ती करायची, पण तिच्या नवर्याच्या निधनानंतर पुढच्या पिढीने दिवस वगैरे काही विधी करायचे नाहीत असे ठरवल्यानंतर तिने त्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही. उलट त्या पैशांतून काही गरीब विद्यार्थ्यांना जेवण, शाळांना पुस्तकांची भेट असे बरेच काही तिने केले. नंतर नंतर कर्मकांडांमधील फोलपणा तिच्या ध्यानात आला आणि तसे मोकळेपणाने मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही तिने दाखवली.
एक उत्तम शिक्षिका म्हणून तिने अनेक सन्मान आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. संस्कृतवर तिचे प्रभुत्व होते आणि तो विषय शिकवण्याची तिच्याजवळ हातोटी होती. दहावीला तिच्याकडून संस्कृत शिकलेल्या आणि संस्कृतमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही शेकड्यांत मोजावी लागेल. शिक्षणक्षेत्रात काम करत असतानाच तिने सहकारी बँकेचे संचालकपद स्वीकारले आणि त्या क्षेत्रात एक निस्पृह आणि प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती म्हणून नाव कमावले. शिक्षण आणि सहकार या दोन्ही तशा बदनाम क्षेत्रांत काम करुनही तिचे मन कधी कडवटले नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता तिने अनेक मुलांना अन्नाला लावले, अनेकांवर चांगले संस्कार केले, अनेकांना मदत केली.
एप्रिल महिन्यात तिला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. तिची भूक कमी झाली आणि तिला थकवा जाणवू लागला. तिची पाठदुखी दिवसेंदिवस वाढतच गेली. सर्व प्राथमिक तपासण्यांत काही निष्पन्न झाले नाही. पुण्यात कबीरबाग येथे सांधेदुखीवर आसने आणि व्यायाम असे उपचार दिले जातात. ते उपचार तिने एकदोन दिवस घेतले असतील, नसतील तोच तिच्या पायांमधील शक्ती कमीकमी होत गेली. शेवटी शेवटी तर तिला पायाची बोटेही हलवता येईनाशी झाली. पायांत संवेदना होत्या, पण पाय लुळे पडले. हे सांध्यांशी, हाडांशी संबंधीत दुखणे असावे, असे वाटल्याने तिला संचेती हॉस्पेटलमध्ये दाखल केले. तेथे तिच्या असंख्य तपासण्या झाल्या. एमाराय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी.... शेवटी तिच्या पाठीचे मणके वयोमानाप्रमाणे झिजले आहेत, त्यांतील काही मणक्यांवर कसलीशी वाढ झाली आहे आणि शस्त्रक्रिया केल्याशिवाय काही नक्की काय झाले आहे ते कळणार नाही असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत पडले. तिच्या पायाच्या नसांवर दाब पडल्याने तिच्या पायांमधील शक्ती गेली आहे असे डॉक्टरांना वाटत होते. त्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेत तिच्या मणक्यांचे 'डीकॉंप्रेशन' केले आणि मणक्यांना आधार म्हणून धातूची एक पट्टी काही खिळ्यांच्या सहाय्याने तिच्या पाठीत बसवली. ती पाठीच्या मणक्यावर जी काही गाठ होती ती 'नॉन हॉजकिन्स लिंफोमा' ची होती असे बायॉप्सीमध्ये कळाले. दरम्यान तिच्या पायांच्या हालचालींत काहीच फरक पडला नव्हता. तिचे पंगूपण तसेच होते. एरवी अत्यंत उत्साही आणि सतत कामात असणार्या या स्त्रीला असे पडून राहाणे किती त्रासदायक झाले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. तिच्या जखमेचे टाके सुकले असतील, नसतील इतक्यात तिच्यावर उपचार करण्यासाठी काही कर्करोगावरील उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हे कॅन्सर स्पेशालिस्ट रुबी हॉल क्लिनिकमधील होते. बरेच नावाजलेले, पेशंटसचा अखंड ओघ असणारे हे तज्ज्ञ. त्यांनीही बर्याच तपासण्या केल्या आणि या लिंफोमावर अत्यंत तातडीने रेडिएशन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ती जखम अर्धवट सुकलेली असतानाच तिला पाच सत्रांत रेडिएशनचे उपचार देण्यात आले. त्यामुळे ती जखम थोडीशी चिघळली पण ते नॉर्मल आहे, आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सगळे ठीक होईल असे या कॅन्सर स्पेशालिस्टनी सांगितले.
काही दिवसांसाठी या स्त्रीला घरी सोडण्यात आले. पण तसे करतानाच आता या कॅन्सरवर केमोथेरपी घेणे आवश्यक आहे असे सांगून एका आठवड्यानंतर पुन्हा इस्पितळात दाखल होण्यास सांगण्यात आले. या एका आठवड्यात ही स्त्री घरी आपल्यावर योग्य उपचार होत आहेत, आणि आपण लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या पायावर उभे राहू या समजात अत्यंत आनंदात होती. दरम्यान तिला देण्यात येणारी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तिने अतिशय मनापासून स्वीकारली. विविध प्रकारचे व्यायाम ती अगदी मन लावून करत राहिली. त्याबरोबर तिचा जप, स्तोत्रे आणि एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा यामुळे तिचे मनोबल उत्तम प्रकारे टिकून राहिले होते. येणार्याजाणार्याला ती 'आता लवकरच मी माझ्या पायावर उभी राहणार' असे हसून सांगत असे. आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची आपल्याला अजिबात भीती वाटली नाही कारण भुलीच्या औषधांचा परिणाम होईपर्यंत सतत माझ्या तोंडात 'माझ्या' देवाचे नाव होते असे ती सांगत असे.
एका आठवड्यानंतर तिला परत संचेती हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीसाठी दाखल केले. सतत चोवीस तास काही ना काही औषधे तिच्या शरीरात शिरेवाटे देण्यात आली. नंतरचेही तीनचार दिवस बरे गेले. मग अचानक तिची प्रकृती खूपच खालावली. खाणेपिणे बंद झाले. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला, धाप लागली, रक्तदाब खूपच खाली आला आणि रक्तातल्या पेशींचे प्रमाण धोकादायक रीत्या ढासळले. त्या दरम्यान घेतलेल्या रक्याच्या नमुन्यात प्लेटलेटसची संख्या ३००० पर्यंत कमी होती. अर्थात हे रक्तविश्लेषणाचे रिपोर्टस रुग्णाच्या नातेवाईकांपर्यंत कधी पोचलेच नाहीत हा भाग वेगळा. मग धावाधाव झाली. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिच्यावर औषधांचा भडिमार झाला. बारा -चौदा तासांत सुमारे लाखभर रुपयांची औषधे तिच्या शरीरात सोडली गेली. श्वास घेताना ती तडफडू लागली. तोंडावरचा ऑक्सिजन मास्क हाताने बाजूला करून 'मी दमून गेले आहे' असे तिने मला खोल आवाजात सांगितले. ' शी इज क्रिटिकल बट नॉट (यट) ऑन हर डेथ बेड' असे डॉक्टरांनी सांगितले. 'वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट' हे अजरामर वाक्य तर होतेच.तर पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कार्डियाक अरेस्टने तिचे हृदय बंद पडले. ते पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नानंतर ते अडखळत, अनियमितपणे सुरू झाले. त्यातच तिला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. हे तिचे अगदी अख्रेरचे क्षण आहेत हे ध्यानात आल्यावर 'डॉक्टर, प्लीज डोंट डू एनीथिंग. लेट हर गो' असे म्हणून मी आयसीयूच्या बाहेर पडलो. पाचेक मिनिटांत डेथ सर्टिफिकेटमधला तपशील विचरण्यासाठी आयसीयूमधल्या नर्सने माझ्या खांद्यावर टकटक केली.
औषधांनी , इंजेक्शनसनी सुजलेला तिचा देह, ऑक्सिजन मास्कने व्रण पडलेला तिचा निस्तेज चेहरा... हे सगळे सुन्न मनाने विद्युतदाहिनीत सरकवताना माझ्या मनात दुःख अधिक होते की राग हे आज सांगणे कठीण आहे. दु:खाचे विश्लेषण होऊच शकत नाही. रागाचे तसे नाही. हा राग फक्त डॉक्टरांच्यावर नव्हता. कसाईपणा हा त्यांचा धर्म आहे, आणि त्यांनी त्या धर्माचे पालन केले इतकेच. यातला थोडा राग त्या निधन पावलेल्या स्त्रीवरही होता. इतका संपूर्ण विश्वास कुणावरही असणे बरे नव्हे, हे तिला कळायला पाहिजे होते. डॉक्टरच्या दृष्टीने पेशंटचे शरीर ही एक प्रयोगशाळा असते आणि विविध प्रयोग 'करून बघण्या'पलीकडे त्यांनाही फार करता येत नाही, हे तिला कळायला हवे होते. त्यांचा तर्कही सामान्यांपेक्षा थोडा जाणता असला तरी तो निव्वळ तर्कच आहे, हे तिने ओळखायला पाहिजे होते. पेशंटवर उपचार, त्यांना बरे करणे ही डॉक्टरांची प्राथमिकता असते असा तिचा समज होता. ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते.
थोडा राग तिचा ज्याच्यावर संपूर्ण आणि अचल विश्वास होता त्या परमेश्वरावरही होता. 'तो' आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपले सगळे बरे होणार हा विश्वास 'त्याने' तिला दिला होता. या भाबड्या विश्वासाने कदाचित तिचे शेवटचे काही दिवस सुखाचे गेलेही असतील, पण अगदी अखेरच्या क्षणी मृत्यूच्या कराल जबड्यात जाताना हा परमेश्वरही आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!
इस्पितळातून परत आणलेल्या सामानातील तिची जपाची माळ, देवतांच्या छोट्या तसबीरी, आरत्यांची, स्तोत्रांची लहानशी पुस्तके या सगळ्या गोष्टी एकेक करून बाजूला ठेवत असताना माझे मन पूर्ण निर्विकार झाले होते. 'अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले' या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.