''प्रश्न ''

'' प्रश्न''
का नको त्याला मला मोठे म्हणावे लागले?
फ़ासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले
त्यागण्याला राजवैभव सिद्ध व्हावे लागले,
का असे त्या गौतमाला बुद्ध व्हावे लागले?
तो जरी नव्हताच दोषी कोणत्या खटल्यातला,
हाय ! येसूला क्रुसावरतीच जावे लागले
लीन होती खास मीरा कृष्ण भक्तीतच सदा
का तिला कडवे विषाचे घोट प्यावे लागले?
जो न होता शिष्य त्यांचा,द्रोणही नव्हते गुरु
अंगठ्याला एकलव्या,का मुकावे लागले?
हा मला ही प्रश्न आता भेडसावू लागतो
का तुकोबालाच वैकुंठास जावे लागले?
आज ते ’आंबेडकर’ म्हणती जरी मानव खरा
काल त्याला चंदनासम का झिजावे लागले?
बाब इतुकी आजही ’कैलास’का सलते मनी?
त्यागण्या हिंसा तुला हिंसक बनावे लागले.
डॉ.कैलास गायकवाड