स्मरणाआडचे कवी - १७ (बाबा मोहोड)

स्मरणाआडचे कवी -बाबा मोहोड

आज माझ्यापुढे आहे 'पायवाट' हा काव्यसंग्रह. कवी आहेत बाबा मोहोड. अमरावती जिल्ह्यातील माधान हे त्यांचे गाव.
'पायवाट' याच कवितेपासून आपल्या काव्यलेखनाला खऱया अर्थाने सुरवात झाली, असे मोहोड यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्याच शीर्षकाने त्यांचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होणे, हेही साहजिक होय.   फेब्रुवारी १९५७ मध्ये तो प्रसिद्ध झाला आहे.

'पायवाट'मधील मोहोड यांची कविता विलक्षण प्रासादिक, माधुरीने रसरसलेली आहे. प्रेम, निसर्ग हे विषय तर आहेतच; पण 'होइल जेव्हा स्फोट अणूचा... ' अशी एक स्फोटक कविताही या संग्रहात आहे.

माधान हे तसे वऱहाडातील दुर्लक्षित खेडे.   तिथेच मोहोड यांचा जन्म, बालपण, प्राथमिक शिक्षण वगैरे झाले. घरची शेती होती. त्यामुळे फार शिक्षण देण्याकडे आई-वडिलांचा कल नव्हता.
शालेय वयातच; पण शाळेच्या आवाराबाहेर मोहोड यांना कवितेचा लळा लागला.

हा 'लळा' कसा लागला, ते त्यांच्याच शब्दांत :
''माझे शिक्षणही खेड्यात झाले. एक मात्र होते. मी शाळेत हुशार विद्यार्थी होतो. माझा नेहमी पहिला नंबर असे; पण कविता सोडून. कवितेचे व माझे शाळेच्या आवारात कधीच जमले नाही. तिच्यासाठी मी अनेकदा शिक्षकांचा मार खाल्ला. तरीपण इतके मला आठवते की, शाळेत जे जे काही मी चांगले शिकत होतो, तशा प्रकारचे आपणही काहीतरी लिहावे, असे नेहमी मला वाटत असे. मला वाटते - या वाटण्याच्या पोटीच माझी कविता साकार झाली असावी.
माझ्या पहिल्यावहिल्या कवितांच्या जन्मकथा गमतीदार आहेत. वृत्त-छंदांचे नियम मला माहीत नव्हते. तेव्हा गोंधळी लोक जे पोवाडे खेड्यांतून गात असत, त्याच चालीवर आणि त्याच दर्जाचे काव्य मी लिहीत असे. मात्र, लिहिण्याची प्रेरणा इतकी जोरदार होती की, अनेकदा मी झोपेत कविता लिहीत असे. लिहिलेल्या कविता आपणच लिहिल्या, हे माझे मलाही खरे वाटत नसे. त्या वेळी तर माझ्या आई-वडिलांना माझी एक प्रकारे चिंता निर्माण झाली होती. ही काहीतरी 'बाहेरची बाधा' आहे, असात्या बिचाऱया भोळ्या आणि अशिक्षित जिवांचा समज झाला होता. त्या वेळी माझे वय जेमतेम १४-१५ वर्षांचे होते. पुढे माझ्या जीवनात योगायोगाने एका शहरी आणि सुशिक्षित व्यक्तीचा समावेश झाला. माझ्या काव्यलेखनाला त्यांच्याकडून बरेच उत्तेजन मिळाले.
अशा प्रकारे जवळजवळ ५-६ वर्षे माझे नवीन कविता लिहिणे व जुन्या फाडून टाकणे सुरू होते. ५१-५२ पासूनच्या माझ्या कविता बऱया वाटू लागल्या म्हणून संग्रही ठेवल्या....
माझ्या कवितेमागे माझ्या काही जीवननिष्ठा आहेत. ज्या समाजात आणि परिस्थितीत मी जन्मलो, त्या सर्वांच्या सेवेत आपण मिणमिण जळणाऱया पणतीचे जीवन जगावे, ही माझी आकांक्षा. ते जीवन जगत असताना अनेकदा भावनांना धक्के बसतात आणि मग त्याच कंपित भावनांचे रूपांतर कवितेत होते. माझी कविता जुनी आहे की नवी आहे, हे अजून मला कळले नाही. ते कळून घेण्याच्या प्रयत्नांतही मी कधी पडलो नाही. पण माझ्या भावनांशी आणि जीवनाशी इमान राखणारी ती माझी एक जीवनसखी आहे, असा तिच्याबद्दलचा विश्वास नेहमीसाठीच मला वाटत राहिला आहे... ''

मोहोड यांना या संग्रहातून कुसुमावती देशपांडे,  वि. भि. कोलते, भवानीशंकर पंडित अशा नामवंतांनी दाद दिली आहे. गेल्याच्या गेल्या पिढीतील पंडित हे एक असे कवी होते की, त्यांनी नवोदितांची दखल आवर्जून घेतली. आपल्या वडीलधारेपणाच्या नात्यातून या नव्या कवींना प्रोत्साहन मिळेल असे लिहिले. मोहोड यांची कविताही त्याला अपवाद नव्हती.

मोहोड यांच्या कवितेचे मर्म पंडित यांनी असे उगगडून दाखविले आहे :  ''मोहोड यांच्या कवितेचा चेहरामोहरा प्रचलित पद्धतीशी जुळतामिळता आहे. परंतु तिची बोलचाल सर्वस्वी तिचीच आहे. मळलेल्या मागाने मागोवा घेत जाण्याचा तिचा स्वभाव नाही. तिची पायवाट वेगळी आणि निराळी आहे. तिच्या वागण्यांत नागर आणि ग्रामीण जीवनातील सुंदर अतएव स्वीकरणीय आचारांचा मोठा मनोहर मिलाफ झाला आहे. त्यांच्या रंगदार आणि ढंगदार सूक्ष्म छटा त्यांच्या कवितांत सर्वत्र उमटल्या आहेत. त्या भडक नाहीत, उजळ आहेत. कारण त्या रेखाटणाराचा हात हळुवार आहे आणि म्हणूनच त्यांचे दर्शन प्रसन्नकारक झाले आहे. मोहोड ग्रामीण खरे आणि तेथल्या जीवनाचे संस्कार त्यांच्या मनावर व लेखनावर आहेत, हेही खरे. परंतु त्यांचे लेखन उबलेले किंवा उबगलेले नाही. त्यांत पाणोठ्यावरला अथवा वावरातला ठराविक ग्राम्य प्रणय, तो करण्यात धन्यता मानणारा नाटकी घरधनी व त्याची विटकी कारभारीण,   त्याच्या मागे मागे बागडणारा तोच मोत्या आणि तीच पवळी व उंच वाढलेल्या भरघोस पिकांची ती कंटाळवाणी वर्णने यांचा पूर्णतया अभाव आहे. त्याचप्रमाणे तिच्यात मुद्दाम खेडवळ बोली वापरण्याची वेडगळ टूमही नाही. भाव हाच तिने प्रमाण मानला आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तिच्या हालचाली होत आहेत. म्हणूनच ती जातिवंत व जिवंत वाटत आहे.''

पंडित यांनी मोहोड यांच्या कवितेचे मर्म अगदी नेमकेपणाने सांगितले आहे. 'पायवाट' वाचताना या गोष्टीचा नेटका प्रत्यय येतो.

................................................

मोहोड यांच्या दोन कविता

..............................
पायवाट
..............................

थकलेली पायवाट
पाचोळ्यांत विसावली
आभाळाच्या भाळावर
यामिनीस नीज आली

चांदण्याचे निःश्वसित
ओथंबले तृणावर
आणि रातराणीवर
फुले चंदेरी बहार

करी वठला पिंपळ
वाऱयासवे हातवारे
आणावया आकाशीचे
धरेवर निळे तारे

पाचोळ्याच्या शय्येवर
तेड सांडती काजवे
थकलेली पायवाट
ढाळी स्वप्नांत आसवे

'वक्षावर उठलेले
पथिकांच्या पाउलांचे
व्रण कधी प्रभुराया
आहेत हे मिटायाचे? '

उभी तिच्या देवापुढे
थकलेली पायवाट
इतक्यात प्रभातीचे
शिंग वाजवी कुक्कट

स्वप्नभंग होई तिचा
प्रभा फाके गगनात
पथिकांची रीघ लागे
दूर दूर क्षितिजात

थकलेली पायवाट
उसासते पाचोळ्यांत
पथिकांच्या पाउलांचे
व्रण उठती उरात

(१७ ऑगस्ट१९५३)

..............................
हाय आज पण -
..............................

रस्त्यावरुनी याच एकदा
गेलो होतो आपण हासत
ढगात लपली संध्या तेव्हा
पाहत होती लाजत-मुरकत

म्लान उन्हाच्या पिवळ्या रेषा
कलल्या होत्या मावळतीवर
अधांतरी रेंगाळत होते
दोन जिवांचे हळवे काहुर

थवे धुळीचे रस्त्यावरचे
चुकले होते अपुल्या वाटा
बाभुळिच्या जिव्हारी होता
सलत नागडा-उघडा काटा

संध्या घेउन पाय उराशी
पसरत होती पंख धरेवर
पायवाट अन खोलामधुनी
येत सारखी होती वर वर
 
हाय आज पण... मीच एकटा
मीच एकटा या रस्त्यावर
समोर माझ्या उजाड मोहळ
उराद माझ्या दाहक हुरहुर!

(३१  डिसेंबर १९५३)