स्मरणाआडचे कवी-१० (चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)

स्मरणाआडचे कवी - चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (१८७१ ते १९३७) यांची ओळख प्रामुख्याने आहे ती 'गोदागौरव' या कवितेमुळे. कवी चंद्रशेखर एवढ्याच नावाने ते काव्यविश्वात परिचित आहेत. चंद्रशेखर म्हटले की 'गोदागौरव' आणि 'गोदागौरव' म्हटले की चद्रशेखर असे समीकरणच जुन्या-जाणत्या कवींच्या-रसिकांच्या मनात असे.
चंद्रशेखर यांचे जवळपास सगळेच आयुष्य गेले ते गुजरातेत. बडोद्यात. तेथेच ते राजकवी होते. (रवींद्र पिंगे यांनी चंद्रशेखर यांच्यावर लिहिलेला हृदयंगम लेख मागे वाचनाता आला होता. तो आता, या घडीला, हाताशी नाही. त्यातील तपशीलही नीटसे आठवत नाहीत... शोध सुरू आहे. मिळाली की, त्यातील काही मजकूर इथे देण्याचा विचार आहे. अर्थातच साभार! )
चंद्रशेखर हे रविकिरण मंडळातील कवींच्या समकालीन होते. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे आणि चंद्रशेखर यांचा गाढ स्नेह होता. या दोघांच्या स्नेहाचे दर्शन घाटे यांच्या आत्मचरित्रातून (दिवस असे होते) खूपच जिव्हाळ्याने प्रकट झालेले आहे. जिज्ञासूंनी हा ग्रंथराज मिळवून आवर्जून वाचावा. (घाटे घराणे आणि कवितेविषयी थोडेसे : वि. द. घाटे यांनी कविता केली की नाही, ठाऊक नाही. पण अल्पाक्षरी ललित लेखनात त्यांचा 'हात धरणारे' खूपच थोडे ललित लेखक झाले असावेत. घाटे यांचे वडील दत्त हेही त्या काळातील, म्हणजे कविवर्य रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्या काळातील, नाणावलेले कवी होते. वि. द. घाटे यांच्या कन्या ज्येष्ठ कवयित्री प्रा. अनुराधा पोतदार या साहित्यमर्मज्ञांना ठाऊक आहेतच. प्रा. पोतदार यांचे चिरंजीव प्रियदर्शन पोतदार हेही वेगळ्या वाटेवरचे कवी आहेत. 'लाटांच्या आसपास' हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहानंतरही त्यांचा आणखी एक संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तूर्तास त्याचे नाव काही आठवत नाही. असो. सांगायचे काय तर,  दत्त-वि. द. घाटे-अनुराधा पोतदार-प्रियदर्शन पोतदार अशा चार पिढ्यांमधून साहित्याची गंगा वाहत आलेली आहे. वि. द. घाटे वगळता अन्य तिघे कवितेसाठीच ओळखले जातात, हा त्यातही विशेष).... तर मुद्दा हा की,  घाटे आणि चंद्रशेखर यांचा प्रगाढ स्नेह होता.
जन्मभूमी ही माणसाला स्वर्गाहूनही प्रिय असते, असे संस्कृत वचन आहे. याच जन्मभूमीचे नितांतसुंदर वर्णन असलेली चंद्रशेखर यांची कविता म्हणजे वर उल्लेख केलेली 'गोदागौरव'. काळाच्या ओघात कवी जन्मस्थानाला पारखा होतो... पण स्मरणचित्रे काही पुसली जात नाहीत... उलट अधिकाधिक ठळक होतात...गतस्मृतींचे हेच चित्र 'गोदागौरव'मध्ये चंद्रशेखर यांनी रेखाटले आहे. चंद्रशेखर यांच्या एकंदर कवितेचा काळ आहे १८९४ ते १९३१ पर्यंतचा. चंद्रशेखर यांची कविता रचनाबंधाच्या दृष्टीने जुन्या घाटाची आहे. गंभीर आहे. 'चंद्रिका' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. कविवर्यांच्या नावावरूनच या संग्रहाला नाव दिलेले असावे, असे दिसते. १९३२ मध्ये प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह आता अतिदुर्मिळ या प्रकारातच मोडत असावा. या संग्रहाचा मी खूप शोध घेतला... पण कुठेही मिळू शकला नाही. परिणामी, ज्या कवितेमुळे चंद्रशेखर ओळखले जातात, ती कविता - 'गोदागौरव' - मी येथे सादर करू शकलो नाही. (पण आज ना उद्या शोध घेऊन ती मी इथे नक्कीच सादर करीन).
..........................................

कवी चंद्रशेखर यांचा कविता
..............

समरमहिमा

आली तटस्थ झाली, थरके अधरोष्ठ, आंसवें गळती ।
रणदेवताही झाली त्या वीरस्त्रीसमोर विरघळती ।।१।।

'बाई' तिला म्हणे ती, पदराने टिपुनी नयनवारीतें ।
'सांगू काय तुला मी आले कामास कारभारी ते! ।।२।।

पंचाननापरी गे परचक्रावरी तुटोनी तो पडला ।
असहाय! काय करितो? लढला, लढला, थकोनियां पडला! ।।३।।

पडला गे पडला तो वीर रणी धूलिमाजी पडलाहे ।
कज्जलमिश्रित अश्रू हीच तया तूं तिलांजली वाहे ।।४।।

विद्युत्प्राय सभोती चमकत असता सुतीव्र तरवारी ।
त्यांतुनी अचल उभा तो, पर्वतगर्व स्वनिश्चयें हारी ।। ५।।

जे संग्रामधुरंधर रिपुसंहारार्थ करिती घोर रण ।
त्या वीरांते यावे, तैसे सन्मान्य यास ये मरण ।।६।।

तद्वेश केशरी तो, झालाहे चिवट मेणकापडसा ।
चढुनी पुटे रुधिराची नुमजे होता तयास रंग कसा ।।७।।

जेथे देह तयाचा गळला, तेथे तयास तुटवोनी ।
राऊत बहू पडले, शतावधी अरिशिरांस उडवोनी ।। ८।।

अपुल्या प्रिय देशास्तव वीर जसा पाहिजे रणी लढला ।
लढला तसाच तोही, पाहुनी शतशें रिपू स्वयें पडला ।।९।।

गृंध्रादिक आकाशी घिरट्या जे घालिती प्रभाती ते ।
त्वप्रियजनदेहावरी करितिल उदईक मेजवानीते ।।१०।।

हे वीरवल्लभे तूं संतत करशील शोक बहू त्याचा
कवी गातील तयाचा महिमा तत्प्राणहारिं समराचा ।। ११।।