स्मरणाआडचे कवी- १५ (गंगाधर रामचंद्र मोगरे )

स्मरणाआडचे कवी -गंगाधर रामचंद्र मोगरे

"मोगऱ्याची फुले' असे सुगंधी विशेषण ज्यांच्या कवितांना लाभले, ते कविवर्य गंगाधर रामचंद्र मोगरे (२१ जानेवारी १८५७  ते ११ जानेवारी १९१५) यांची भेट आपण आज या सदरातून घेऊ या.
मोगरे हे लोकमान्य टिळकांचे समकालीन होते. लोकमान्यांहून एक वर्षाने लहान. साहजिकच तत्कालीन देशभक्तिपर वातावरणाचे प्रतिबिंब मोगरे यांच्या काव्यात मोठ्या प्रमाणावर आहे. एवढेच काय "व्हिक्टोरिया' राणीवरही त्यांनी काव्य रचले होते! मराठी भाषेची दुर्दशाही एका कवितेतून त्यांनी मोठा बहारदार रीतीने व्यक्त केला आहे. काळ कोणताही असो, मराठी भाषेची "दुरवस्था' प्रत्येक कवीला दिसलेली, जाणवलेली आहे आणि ती त्या त्या कवीने मोठ्या पोडतिडकीने आपापल्या कवितांमधूनन मांडली आहे. मराठी भाषेवरील या कविता त्या अर्थाने "सार्वकालिक' आहेत, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही!!

"मराठीतील उपहासकाव्याचे जनक' हा मानही मोगरे यांच्याकडे जातो. मोगरे यांचे जन्मगाव ठाणे जिल्ह्यातील शिरगाव. मोगरे हे त्यांच्या काळातील महत्त्वाचे कवी होते. "मासिक मनोरंजन', "इंदुप्रकाश', "विविधज्ञानविस्तार' आदी तत्कालीन नियतकालिकांमधून त्यांची कविता विपुल प्रमाणात प्रसिद्ध होत असे. "मोगऱ्याची फुले' या शीर्षकांतर्गत त्यांच्या कवितांचे पाच भाग प्रसिद्ध आहेत. १९०२, १९०४, १९१७, १९१९ आणि १९२०
या वर्षी ते टप्प्याटप्प्याने प्रकाशित झाले होते. "महाराष्ट्र जनविलाप' (१८८४) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. मोगरे यांच्या बहुतांश कविता ही उपहासकाव्ये, विलापकाव्ये, स्फुटकाव्ये, कथाकाव्ये अशा स्वरूपाची आहे. त्यांचे विलापकाव्य हे अर्थातच इंग्रजी विलापकाव्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेले आहे. "मेथाजींची मजलस', "पदवीचा पाडवा', "अभिनव धर्मस्थापना' ही त्यांची उपहासकाव्ये त्या काळी गाजली होती.

मोगरे हे मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात सेवेस होते. साहजिकच ग्रंथांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचे वाचन दांडगे आणि चौफेर होते. या नोकरीमुळे त्यांच्या कवित्वशक्तीला पोषक वातावरण मिळाले.
"आधुनिक मराठी कविता' या ग्रंथात भवानीशंकर पंडित यांनी मोगरे यांच्या काव्यकर्तृत्वाची माहिती नेमकेपणाने दिली आहे. पंडित यांनी म्हटले आहे, "विलापिका व विडंबन हे काव्यप्रकार मोगरे यांनी इंग्रजीकडून घेतले आहेत. ड्रायडन, पोप व ग्रे हे त्यांचे आवडते कवी दिसतात. विडंबनासाठी त्यांनी ड्रायडन व ग्रे यांचा मागोवा घेतला आहे आणि विलापिका व राखीव रचना यांबाबत ग्रे हा त्यांचा गुरू आहे. त्यांनी भिन्न भिन्न कार्यक्षेत्रांतील बहुतेक पुढाऱ्यांच्या मृत्यूवर आदरदर्शक विलापिका रचल्या आहेत. त्या सोज्वळ असल्या तरी सर्वच सुंदर नाहीत. त्यात ठराविक असा तोच तोपणा आहे व एकंदरीने उत्कटता कमी आहे. वस्तुतः मृत्यूविषयक कवितांत गूढ व हृदयंगम विचार हवेत आणि गूढ व उदात्तरम्य तत्त्वज्ञान हवे. त्यामुळे मन पवित्र वातावरणात विलीन होऊन मृत्यूविषयी निर्भय व्हावयास हवे; परंतु मोगऱ्यांच्या विलापिकांत हा गुण नाही. ''
मोगरे यांच्या विलापिका वाचल्यानंतर पंडित यांनी किती नेमके समीक्षण केले आहे, याचा प्रत्यय येतो.

"अभिनव धर्मस्थापना', "पदवीचा पाडवा', "मेथाजींची मजलस' या विलापिकांविषयीचे निरीक्षणही पंडित यांनी नोंदविले आहे. पंडित यांनी म्हटले आहे की, ""... यांपैकी पहिल्यात (अभिनव धर्मस्थापना) व तिसऱ्यात (मेथाजींची मजलस) अनुक्रमे मुंबईचे सुधारक व पुण्याचे सनातनी आणि मुंबईचे मवाळ व पुण्याचे जहाल यांची स्वभावचित्रे रंगविली आहेत. "मेथाजीची मजलस' या नावावरून त्या काळचे राजकीय पुढारी सर फिरोजशहा मेथा यांचा बोध होतो. आता काळ बदलल्यामुळे आणि आजच्या पिढीला (पंडित यांचे हे पुस्तक 1952 साली प्रसिद्ध झालेले आहे. त्यांनी उल्लेखिलेली ही "आजची पिढी' ही त्या काळची आहे. मात्र, खरोखरीच आजची जी पिढी आहे, तिला तर या "मजलसी'चा बोध होणे केवळ अशक्यप्राय! ) तत्कालीन राजकारणाची कल्पना नसल्यामुळे या काव्याची गोडी पूर्वीसारखी उरलेली नाही. त्याचे महत्त्व केवळ प्रासंगिक होते. "पदवीच्या पाडव्यात' भोलानाथ सुखात्मे नावाचा एक अर्धवट बावळट गृहस्थ पदवीस हपापलेला दाखवला आहे. आणि तो तिच्या मागे लागून स्वतःचा फजितवडा कसा करून घेतो त्या प्रसंगाचे हास्यचित्र रेखाटले आहे. (इथे मात्र आजच्या पिढीने पदवीचे हे सूत्र गंमत म्हणून स्वतःशी अजमावून पाहावे! ) उपहासात खरोखर "ध्वनी' हवा. त्याचा मोगऱ्यांच्या काव्यात अभाव आहे. सामाजिक व्यंगे दाखविण्याकडे आणि विषयीभूत व्यक्तीचे दोष उघड करण्याकडे उपहासगर्भ काव्याचा सदुपयोग होतो. हा काव्यप्रकार हाताळण्यामागे मोगऱ्यांचा हेतू तोच होता. ''
मोगरे यांच्या कथाकाव्याबद्दल पंडित यांनी लिहिले आहे, ""मोगऱ्यांची "अभिनव कादंबरी' व "वृंदा' ही कथाकाव्ये सरस व सुंदर आहेत. त्यांनी प्रासंगिक कविता बरीच लिहिली आहे; परंतु तिला आज महत्त्व राहिलेले नाही. त्यांचे "विजयिनीविजयाष्टक' हे काव्य असेच प्रासंगिक आहे. ते "विक्टोरिया' राणीच्या हीरकजयंतीनिमित्त रचले होते. मात्र, "विक्टोरिया'चे "विजयिनी' हे हिंदूकरण चिंत्य आहे. (पंडित यांची ही शेरेबाजी किती नेटकी आहे पाहा! )

पंडित यांनी पुढे म्हटले आहे. ""मोगऱ्यांचा देशाभिमान व भाषाभिमान प्रखर होता. "सह्याद्री' व "शिकंदराची स्वारी' यांत त्यांचा देशाभिमान दिसून येतो. भाषाभिमानाचे त्यांचे पुढील उद्गार (पाहा ः मी या लेखाच्या शेवटी सादर केलेली मोगरे यांची कविता) आजच्या परिस्थितीतही प्रोत्साहक वाटतात (हे "उद्गार' आजच्याही परिस्थितीत नक्कीच प्रोत्साहक वाटतील. मराठीची सतत चालत आलेली ही "दुर्दशा' कधी संपणार आहे कोण जाणे! ). भाषेच्या प्रश्नाला आता तर राजकीय स्वरूप आले आहे. '' (यातील "आता' म्हणजे 1952 चा काळ बरं का! पण आपणही अगदी ठामपणे म्हणू शकतोच की नाही, भाषेच्या प्रश्नाला "आता' राजकीय स्वरूप आले आहे!! ) एकूण, कवी हा किती द्रष्टा असतो, पाहा. (एखाद्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडते म्हणून कवीला "द्रष्टे'पण येते, असे कोण म्हणाले बरे ते? )

मोगऱ्यांवरील लेखाच्या शेवटाकडे जाताना पंडित म्हणतात, ""मोगऱ्यांच्या कवितेत गूढ मनोभाव, आंतरिक खळबळ व विचारांची गुंतागुंत यांचे दर्शन होत नाही. त्यांच्या वाणीत प्रसाद आहे आणि त्यांची शब्दरचना नादवती व अर्थवती आहे. परंतु तिच्यात ध्वनियुक्ततेची उणीव आहे. त्यांचे विचार सरळ, भाषा साधी व रचना टापटिपीची आहे. त्यांची भाषा क्लिष्ट नाही. शब्दांची रचना तर इतकी साधी आहे की, कुठे कुठे ती "पद्यबद्ध गद्य' आहे सफाईदार रचना करून व निर्दोष भाषा लिहून मोगऱ्यांनी मराठी कवितेला डौलदार बनवले आहे.
"साधी प्रसन्न, सुमधुर तव भाषेची अनन्य ती शैली
गंगाधरा! विराजे धवलगिरीतुल्य कीर्तीच्या शैली
असे त्यांच्या शैलीबद्दल चंद्रशेखरांनी जे आलंकारिक उद्गार काढले आहेत, ते अगदी यथार्थ आहेत. ''

अगदी. मोगरे यांच्या कवितेच्या शैलीबद्दल चंद्रशेखर यांनी काढलेले हे काव्यबद्ध उद्गार खरोखरीच यथार्थ आहेत.

....................................................
मराठी भाषेविषयीची मोगरे यांची कविता
....................................................

अस्तित्वावर तुमच्या भाषेच्या जो चहूंकडुनी घाला
पडला संप्रति आहे कोण तुम्हांविण निवारिता त्याला?

हिंदी म्हणते माझा सर्वांवरी मी चालवीन पगडा
आमरणांत तिथे तों उर्दू म्हणते करीन मी झगडा

मी लाडकी नृपाची, हो मज सांगेल कोण माघारी?
ऐसें म्हणुनी दारें बसली अडवून इंग्रजी सारी

हिंदीसम मृदुमधुरा, उर्दूसमही नसेल ही नटवी
वैचित्र्यांतही मागे बंगालीला जरी न ती हटवी

मुग्धा गुजराथीसम, कर्णाटीसम कलावती नाही,
न म्हणोत तेलगूसम भाषाशास्त्रज्ञ हीस ललिताही

बसले साहित्याची बळकावून मीच संपदा सर्व
येई न इंग्रजीसम हाही जरी वाहतां हिला गर्व;

हिचे परंतु सात्त्विक, शुद्ध, महोदात्त पाहुनी शील
वाणी हिच्या पदावर निज मस्तक कोणती न घाशील?

तुमच्या जन्ममहीची मालवतां हीच जीवनज्योती,
राहील जीव धरुनी केंवी महाराष्ट्रभूमिका हो ती?

नाही हिला नृपाश्रय म्हणुनी नका ही म्हणूं दशा आली
काय सहाशे वर्षे वाढ हिची त्याविना नसे झाली?

हा न धनाचा महिमा, भक्तीचा खेळ होय हा सगळा
वाढविली ही भजकीं, अन्यांच्या ही कधी पडे न गळां

त्यांनी अनन्यभावें प्रेमाचा शुद्ध चारुनी चारा
दोहुनी ह्या सुरभीला वर्षविल्या दिव्य वाक्सुधाधारा