स्मरणाआडचे कवी - १८ (कवी शिरीष)

स्मरणाआडचे कवीः कवी शिरीष

गेल्या वेळप्रमाणेच याही पंधरवड्यात पुन्हा एकदा एका विदर्भकवीचीच ओळख करून देत आहे. कवी शिरीष हे त्यांचे टोपणनाव. त्यांचे खरे नाव शोध घेऊनही समजू शकले नाही. 'पुनर्जन्म' हा त्यांचा काव्यसंग्रह माझ्यापुढे असून, नागपूरच्या जयश्री प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे. या संग्रहाला कवी शिरीष यांनी स्वतःच 'माझी कविता' या शीर्षकांतर्गत मनोगत लिहिलेले आहे. शिरीष यांच्या अनेक कविता राष्ट्रभक्तिपर आहेत. राष्ट्रभक्तिपर कवितांचे काही विषय पाहता कवी शिरीष हे उजव्या विचारसरणीचे असावेत, असा अंदाज करता येतो.

शिरीष यांनी त्यांचे आवडते कवी कुसुमाग्रज यांना 'पुनर्जन्म' अर्पण केला आहे. यापूर्वी त्यांचा 'सरोजिनी' (१९५१) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. आपल्यातील कवीचा प्रवास कसकसा झाला, हे 'पुनर्जन्म'(१९६३) मधून त्यांनी सांगितले आहे.

हा काव्यप्रवास त्यांच्याच शब्दांत :

''स्वतःच्या कवितेबद्दल स्वतःच लिहिणे शिष्टाचारास धरून आहे की नाही, हे मला काही निश्चित सांगता येणार नाही. पण ते कठीण काम आहे, याची मला जाणीव होत आहे. सन १९४६ ते १९५० या लहानशा काळात मी अभिरुची, यशवंत, वाङमयशोभा, वसंत, प्रसाद, चित्रमयजगत, माधुरी, युगवाणी, विकास, गुरुदेव, विश्वास, साहित्य इत्यादी नियतकालिकांतून काही कविता प्रसिद्ध केल्या असल्या तरी मी काही प्रसिद्धीच्या प्रकाशात तळपून गेलेला कवी नाही, हे मला पुरेपूर ठाऊक आहे आणि य़ानंतर मी कवितालेखन जरी बंद केले नसले तरी माझ्या कविता नियतकालिकांतून प्रसिद्ध करण्याच्या वाटेस मात्र मी गेलो नाही, ही गोष्ट खरी आहे. असे का झाले, ते माझे मलाच कळलेले नाही एवढे खरे की, यानंतर युगवाणी, राष्ट्रशक्ती, जीवनविकास आणि मुलांचे मासिकही अशा नियतकालिकांमधून मी एका हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या कविता गेल्या एका तपात प्रसिद्ध केल्या आहेत! आणि तरीही कविता लिहिण्याचे माझे 'व्यसन' सुटलेले नाही!

''डिसेंबर १९५१ मध्ये माझा 'सरोजिनी' हा प्रकाशित-अप्रकाशित कवितांचा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर आज सुमारे एका तपानंतर 'पुनर्जन्म' हा माझा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे.... अपवाद म्हणून मी दीडवेळा नागपूर नभोवाणीवर काव्यवाचन केले. छोट्या-मोठ्या कविसंमेलनांत मी जवळजळ कधीही हजेरी लावली नाही आणि अशा प्रकारे कसा ना कसा मी कवींच्या जगापासून अनेक योजने दूरच राहिलो आहे आणि तरीही "आम्ही एके काळी काव्य लिहिण्याची चूक केली; आता आम्ही कविता लिहीत नाही' अशा विश्वामित्री आविर्भावाने कवितेकडे पाहणाऱ्या वाट चुकलेल्या कवींपैकी मी एक नाही, तसेच "मी कविता लिहितो', म्हणजे अभिमानास्पद, पराक्रमी, अद्वितीय असे मी काही करतो, अशीही माझी कवितेबद्दल भूमिका नाही. एवढे मात्र खरे की, मुद्दाम कविता रचावयास कधीही बसलो नाही आणि मी बसमध्ये, आगगाडीत, आरामखुर्चीत अगर हिरवळीत वा वाळलेल्या गवताच्या माळावर पडल्या पडल्या जेव्हा कविता लिहिल्या, (सोबत दिलेली कविता कवी शिरीष यांनी टॅक्सीत लिहिलेली आहे! ), तेव्हा एकामागोमाग आलेले शब्द कागदावर टिपताना अक्षरांची जुळवाजुळव, शब्दांची फेरफार आणि खोडाखोड, ट ला ट आणि री ला री जुळविण्याचा खटाटोपही कधी केला नाही. ''

''वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी मी काही कविता लिहिल्या होत्या व त्यातील एक शालापत्रकांत आलीही असावी, असे मला पुसटसे वाटते. बाराव्या वर्षी लिहिलेली एक ओबडधोबड कविता (झरणी कुठे ती लपली? ) मी "सरोजिनी' या काव्यसंग्रहात समाविष्टही केली आहे; पण माझ्या आईच्या मते मी जेव्हा बोबडे बोलू लागलो, तेव्हाच काव्यकल्पनांनी माझ्या शब्दांना पंख दिले. एका हिवाळी सकाळी फाटकाला लोंबणाऱ्या दवबिंदूंना मी "लंगित दिवे' म्हटल्याचे ती सांगत असे. तसेच पौर्णिमेला गोल चंद्र आणि त्योच मन प्रसन्न करणारे चांदणे बघून मला "चंदलाच्या' लग्नाची कल्पना सुचली होती

""आनी चंदलाच्या आइनी आमाला
बोलवीलं का गोद खावयाला...?
आइ, जेवाया ताय गं आछेल...?
लद् दु, जिलबी की छान गोद खील? ''

''... मला माझ्या कवितेची जाणीव झाली तेव्हा ती आत्मजा अगर मनोजा वाटली नाही, तर तिच्या ओढीने मी वेगळ्याच प्रकारे आकर्षिला गेलो. मी तिला "गे भ्रूविलासिनी चपल चंद्रिके कविते', अशी आगळीच साद घातली. आणि जिच्यासवे मी "वसंतिका सृष्टीत गुंगलो' आणि "श्रावणिंच्या हिरवळिंत वावरलो' ती कविता "शारदीय ज्योत्स्नामृत सरतांच' माझ्या "आसुसल्या अंतरास शून्यांत सोडुनी दूर नील व्योमांत' गेली, तिला मी निर्धारपूर्वक बजावले -

असलीस जरी तू चंचल विद्युल्लेखा
उद्दाम तारका अथवा अवखळ उल्का
उत्तान मनीषा-पंख पसरुनी खास
घेईल भरारी मन्मानस मेघांत
आलिंगन करण्या तुजला शान्त निवान्त! ''
....

कवीच्याच शब्दांत त्याचा हा काव्यप्रवास (काही भाग संपादित करून) मी इथे मुद्दामच दिला... कारण, प्रत्यक्ष कवीने आपला काव्यप्रवास लिखित स्वरूपात नमूद करून ठेवण्याच्या घटना मराठीत तशा खूप कमी आहेत. या दुर्मिळ घटनेची नोंद मला इथे घ्यावीशी वाटली. कवी आपल्या काव्यप्रवासाकडे कसा पाहतो, कवितेविषयीचे आत्मपरीक्षण कसा करतो, आपल्या काव्यलेखनाची मुळे त्याला कशी गवसतात, हे काव्यरसिकाला कळावे, एवढाच हेतू!

... आणि कवीच्या शब्दांतच त्याचा काव्यप्रवास उपलब्ध असेल तर मध्यस्थाने फार काही न बोलता थेट कवी आणि वाचक यांचीच भेट घालून देणे केव्हाही उत्तम!

..............................................................................

कवी शिरीष यांची  कविता

.......................................
दोन गोल अन दोन वर्तुळीं
.......................................

काळ्या फेनाच्या वलयांनी सजली काळी गंगा
मत्स्यगंध, हृत्छंद बंध अन ढवळित अंगा अंगा
सिंहकटीची नागमोड ही लवचिक नागिण बनते
दोन गोल अन दोन वर्तुळीं विश्वची अवघे हलते

मीनाक्षीच्या प्रत्यंचेवर मृगनयनांतिल बाण -
मन्मनासी तो असह्य होतो प्रत्यंचेचा ताण!
कण्वाचा हा आश्रममृग, गे, हंतव्य न, मी स्मरतो
माझे 'मी पण',   मेनकात्मजे, रेषांमधी विस्मरतो
तिरक्या रेषा, लवचिक रेषा घुसळित अंगा, रंगा
दोन गोल अन दोन मंडलीं खळते जीवनगंगा

मृद्गंधाने कस्तुरीतले सौरभ पुलकित होतें
दवबिंदूंच्या मृदू स्पर्शाने थरथर हिरवे पातें
केतकीतले सुवर्ण-कांचन क्षणांत वितळुनी जाते
अंतरांतल्या थंड मुशींतून पिवळे धन साखळते

गुलाबाच्या पाकळ्यांत
डाळिंबाचे श्वेत दाणे
अर्धावृत पाठीवर
नागिणीचे वेडगाणे

गालावरच्या खळीत लपतो चंद्रकलेचा भुंगा
लचक तनूची लचक मारिते मनिंच्या ढवळुनी रंगा
मस्त्यगंध, हृत्छंद बंध अन ढवळित अंगा अंगा
दोन गोल अन दोन वर्तुळीं खळते जीवनगंगा

- खडकी (टॅक्सीत) २३. २. १९६१