स्मरणाआडचे कवी-२ (श्रीनिवास कृष्ण पाटणकर)

कवी द्रष्टा असतो, असे म्हणतात. त्याला फार पुढचे दिसते व तो ते कवितेत मांडतो, असेही म्हणतात... श्रीनिवास कृष्ण पाटणकर या कवीला अशीच दूरदृष्टी होती की काय कुणास ठाऊक! अवघे बावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीला "प्राजक्ताची फुले' फारच आवडायची. त्यांच्या अनेक कवितांमधून या फुलाचा उल्लेख आढळतो. प्राजक्ताचे फूल तसे अल्पजीवीच. एखाद्या हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे. पाटणकरांचेही अगदी तसेच झाले. उमलत्या वयातच त्यांना कुठल्याशा आजाराने हलकासा स्पर्श केला आणि हे "प्राजक्ताचे फूल' अकालीच गळून पडले. पाटणकरांचा जन्म ११ नोव्हेंबर १९१५ रोजी सोलापुरात त्यांचा जन्म झाला व १९ ऑक्टोबर १९३६ रोजी ते या जगातून निघूनही गेले. त्यांच्या आयुष्याची मैफल ही अशी केवळ जेमतेम २१ वर्षांची. त्यातही त्यांची कविता फुलली, उमलली ती १९३३  ते १९३५ अशी दोन वर्षांतच... पण त्यांच्या कवितेचा सुवास कविता आवडणाऱ्यांच्या मनात अजून दरवळत आहे आणि दरवळतच राहील.

पाटणकर हयात असते तर आज ते ९५ वर्षांचे असते. आणखी पाच वर्षांनी कुणी काव्यप्रेमी एकत्र येऊन त्यांची जन्मशताब्दीही साजरी करतीलही, कदाचित्...! आजवर पाटणकरांचे कुठे स्मारक झाल्याचे ऐकिवात नाही. "प्राजक्ताची फुले' हा त्यांच्या समग्र कवितांचा छोटेखानी संग्रह हेच त्यांचे स्मारक! होय स्मारकच! कारण त्यांचा हा कवितासंग्रह त्यांच्या मरणानंतर काही महिन्यांनी, १९३७ साली, प्रसिद्ध झाला आहे. त्यांचे मित्र दा. पां. रानडे यांनी पुस्तकरूपाने पाटणकरांच्या या कविता रसिकांपर्यंत पोहोचविल्या होत्या.

आज हा कवितासंग्रह सहजासहजी उपलब्ध होणे खूपच अवघड. जवळपास अतिदुर्मिळच म्हणा ना!
पाटणकरांची कविता कमालीची प्रासादिक, शब्दसौष्ठवयुक्त, गेय अशी आहे.  १८ते २० या वयात सुचलेली ही कविता अर्थातच प्रामुख्याने "प्रेम' याच विषयावर आहे. उमलत्या वयातील इतकी तरल, हळुवार, नाजूक, उत्कट व भावपूर्ण प्रेमकविता वाचावी, तर पाटणकरांची. तारुण्यसुलभ उत्कंठेचे चित्रण तर या कवितांमध्ये आहेच; पण अधूनमधून निराशेचाही सूरही ही कविता काढते.

पाटणकरांचे यथार्थ वर्णन करायचे झाल्यास त्यांच्याच कवितेतील एका कडव्याने करता येईल...

बोलीने, चालीने सावध शुद्ध
आर्जवी नजर, कधी न क्रुद्ध
मनाचा हळवी, कोमल देही
मलूल व्हायचा उत्साहानेही!

अगदी असेच होते पाटणकर! उत्साहानेही मलूल होणारे!

पुण्यात कॉलेजात असताना अखेरच्या काळात त्यांना अधूनमधून सारखे उदास, निराश वाटत असे. पुढे पुढे त्यांची ही निराशा वाढली. ते एकलकोंडे बनले व प्रकृतीवर परिणाम होऊन वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पाटणकर हे गांभीर्याने कविता लिहिणारे कवी होते; त्यांचा पिंड मुख्यतः प्रेमकवितेचाच असला, तरी पण काही विनोदी कविता, एखाद-दुसरे प्रहसनही त्यांनी लिहिलेले आहे. "प्राजक्ताची फुले'त ते वाचायला मिळते. विनोदी कविता म्हणून "बातमीदार' आणि "फोटोसाठी अधीर झालेल्या लेखिकेप्रत' या त्यांच्या दोन कवितांचा विशेष उल्लेख करता येईल. "बातमीदार' ही कविता तर एकदम बहारदार आहे! पाटणकरांच्या कवितेचा आकृतिबंध सर्वार्थाने वेगळा आहे. "चंद्रकला' हे वृत्त त्यांच्या विशेष आवडीचे असावे, असे त्यांच्या एकंदर कवितांवरून दिसून येते. अनेक कविता याच वृत्तात आहेत.

कोण जाणे ते कशाला तोडताना केवडे
पर्वताच्या पायथ्याला देह हा खाली पडे

ही पाटणकरांची गझलेसारखी रचना कवितेच्या अनेक चाहत्यांना माहीत असावी. कविवर्य सुरेश भट यांना पाटणकरांची ही कविता फार आवडत असे. ते एकदा म्हणाले होते, ""पाटणकरांना अजून आयुष्य लाभले असते आणि या रचनेसारख्या कविता त्यांनी रचल्या असत्या तर मराठी गझलेचा इतिहास काही निराळाच घडला असता. ''
""मराठी मातीत मराठी गझल रुजविण्यासाठी पुढे मला एवढे कष्ट पडले नसते! '', अशी नर्मविनोदी पुष्टीही भटसाहेबांनी पुढे जोडली होती... पाटणकरांची वृत्तांवरील हुकमत, आशयाची संपन्नता, समृद्धता, साध्याच गोष्टीकडे पाहण्याची पूर्णतः वेगळी दृष्टी या बाबी लक्षात घेता भटसाहेबांचे हे म्हणणे गझलेच्या जाणकाराला नक्कीच पटेल.

"प्राजक्ताची फुले'ला कवी यशवंत यांची रसग्रहणात्मक प्रस्तावना आहे. पाटणकर यांचे गुरू, विख्यात साहित्यिक श्री. म. माटे यांनीही पाटणकरांविषयीच्या भावना या कवितासंग्रहात व्यक्त केलेल्या आहेत. माट्यांसारख्या कलासक्त, गुणग्राहक साहित्यिकाला पाटणकरांविषयी किती जिव्हाळा, प्रेम होते, त्याचे दर्शन माटे यांच्या पुस्तकातील लेखातून घडते.

प्राजक्ताच्या फुलांची अनिवार आवड, ओढ असल्यामुळेच त्याचे कितीतरी उल्लेख पाटणकरांच्या कवितांमधून आढळतात. असे म्हणतात की, प्राजक्त हा स्वर्गातील तरू! ते खरे असेल तर आणि पाटणकरांचे एकंदरीत काव्य वाचल्यानंतर काही प्रश्न मनात उभे राहतात... पाटणकरांना याच फुलांची ओढ का वाटत असावी? या फुलाप्रमाणेच त्यांचेही आयुष्य अल्पजीवी का ठरले? त्यांना अधूनमधून बराच काळ निराश, उदास वाटायचे ते का? आपले जीवित अल्प काळासाठीच आहे, याची जाणीव त्यांना झाली होती का?... असे प्रश्नच प्रश्न... अशा प्रश्नांना उत्तरे कुठे असतात? असतीलच तर त्यांच्या कवितांमध्ये दडलेल्या अर्थांमधून ती मिळूही शकतील... पण ती शोधायला वेगवान जगाला एवढा वेळ आहे कुठे?

- प्रदीप कुलकर्णी

* * * * * * * * * * * * * * * * * ** * * * * * * * ** * * * * * * * ** * * *

श्रीनिवास कृष्ण पाटणकर यांच्या तीन कविता

"चंद्रकला' या वृत्तातील कविता ("प्राजक्ताची फुले'मध्ये या वृत्तातील अनेक कविता आहेत)

तू तुझिया दारी             आणि मी अमुच्या दारात
घालविला वेळ             कितीतरी काहितरी गात
तुझीच मैत्रीण              कोणशी अमुच्या शेजारी
आजच का आले           तिचे पण प्रेम तुला भारी
पुन्हा पुन्हा येशी            उगीचच काय निमित्ताने
चालविली कसली            हेरणी कातर चित्ताने
बावरतो हृदयी                 पाहता तुजला येताना
आणि कसे होते               जवळुनी हासत जाताना
हसऱ्या नयनांत               भाव मज दिसला वरवरता
खिन्नपणा कसला             भासते कसली कमतरता
जातायेताना                     वाटते बोलावे काही
परी या जगतात              कशाची सोय मुळी नाही
असुनी मोकळ्या या        भासती बंद दिशा चारी
अरसिक या जगती         मानवी रीत नडे सारी
.......................................................

... आणि हीच ती बहारदार कविता ः बातमीदार
........................................................

जाणार आता आत मी;
काढीन काही बातमी
चल सोड रस्ता की करू?
एका गड्याचे सात मी?

पण हे पाहा भाऊ किती,
मज रोजची असते भीती
त्याची न कोणाला क्षिती
लावी कपाळी हात मी

लागे पाहावी मंडई
चाखीत भेंडी, डिंगरी
पायास माझ्या भिंगरी
अन् हिंडतो गावात मी

अन् ओठ कोठे हालती
की कानगोष्टी चालती?
ठेवीत तेथे पाळती
आहेच अंधारात मी

अन् भेटणाऱ्याच्या मनी
हा हात माझा पोचतो
सह्याद्री किंवा विंध्य तो
खंबायची आखात मी

पुरतात माझे चोचले
जे जे मनी मी योजिले
आहेत मागे मोजिले
एका नटीचे दात मी

परी आज कोरी ही वही
म्हणशील त्याला मी सही
दे हात किंवा लाथही
देई परंतु बातमी
........................................................
.... ही आणखी एक सुरेख रचना. गझलेसारखी! हिच्यातील शब्दसौष्ठव पाहा, गेयता, प्रासादिकता, गोटीबंदपणा पाहा... आणि आशय तर पाहाच पाहा!!
........................................................

कोण जाणे ते कशाला तोडताना केवडे
पर्वताच्या पायथ्याला देह हा खाली पडे

आतला संकोचलेला जीव झाला मोकळा
अन् कुणाला पाहवेना भंगल्या देहाकडे

भोवती एकेक आले भिल्ल या रानातले
ओळखाया देह माझा अन् रचाया लाकडे

नायकाचा शब्द आला ""हाच तो वेडा पाहा
ओळखीचे पूर्ण माझ्या खड्ग याचे वाकडे''

एक बोले ""मित्र माझा खूण मैत्रीची पाहा
कस्तुरीचा गंध याला हे मृगाचे कातडे

खेळते होते जयाचे आर्जवी डोळे निळे
आज ते मंदावलेले लागले कोणाकडे''

कोणशी आली म्हणाली, ""आणि बाई तोच हा
ते पाहा तेजाळ याच्या रत्नमालेचे खडे''

केस माझे वेश माझा आणि माझी कुंडले
हे कुणाला ते कुणाला ओळखीचे सापडे

दूर थोडी विस्मृतीला सारुनी आता तरी
अंतरीची प्रीत माझी ओळखाया ये गडे

........................................................