स्मरणाआडचे कवी-११ (विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक)

स्मरणाआडचे कवीविनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक

                त्या कवीचे वर्णन आजच्या भाषेत कुण्या तथाकथित संस्कृतिरक्षकाने केले असते तर त्या वर्णनासाठी 'वाया गेलेला' एवढे दोनच शब्द पुरेसे ठरले असते. पण याच 'वाया गेलेल्या' कवीने अनेकानेक चांगल्या कविता मराठीला दिल्या. 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ' ही उक्ती आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी उच्चारलेली असते. सुभाषिताचे मोल पावलेली ही कवितेची ओळ याच 'वाया गेलेल्या' कवीच्या प्रतिभेतून जन्मली!
विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक असे या कवीचे नाव.  'मराठीतील राष्ट्रीय कवितेचे पहिले व श्रेष्ठ उद्गाते' असाही त्यांचा गौरव केला जातो.

          गेल्याच्या गेल्या पिढीतील ज्येष्ठ कवी आणि काव्यसमीक्षक भवानीशंकर पंडित यांनी 'कविता विनायकाची' या शीर्षकांतर्गत विनायकांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केलेले आहे. या पुस्तकात विनायकांविषयी पंडित यानी म्हटले आहे - विनायकांचा जन्म व स्कूल फायनलपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे धुळ्यालाच झाले. एक असा व्यवसाय त्यांनी केला नाही. आधी पोलिस खात्यात, पुढे मिशनमध्ये मास्तर म्हणून आणि शेवटी जहागीरदारांकडील कारभारी या नात्याने त्यांनी व्यवसायांतर केले. पोलिस खात्यात असताना काही किटाळ आले, त्या वेळी त्यांना फरारी व्हावे लागले. बहुधा तेथेच त्यांना साऱया संसाराची धुळधाण करणारी वेश्या व वारुणी ही व्यसने जडली. तात्पर्य, त्यांचे सारे आयुष्य खानदेशातच अस्थिरतेत व व्यसनविवशतेत व्यतीत गेले. (फरारी असतानाचा काळ त्यांनी धार व देवास येथे काढला असे म्हणतात. ).

        'वाया गेलेला' हे जे शब्द वर वापरले, ते याच दोन व्यसनांच्या पार्श्वभूमीवर... परंतु मला असे वाटते की,   अशा शेलक्या शब्दांत कुण्याही कवीची संभावना केली जाऊ नये. शेवटी, त्या कवीच्या तथाकथित 'चरित्रा'पेक्षा त्याची कविता ही खूप महत्त्वाची असते. या दोन व्यसनांत गुरफटलेल्या विनायकांच्याच हातून अशा काही कविता लिहून झालेल्या आहेत की, त्यामुळेच त्यांना 'मराठीतील राष्ट्रीय कवितेचे पहिले व श्रेष्ठ उद्गाते' असे म्हटले जात असे. त्यामुळे कवीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याच्या फंदात न पडता त्याच्या कवितेकडे पाहावे. त्याची कविता अनुभवावी. तिचा आनंद घ्यावा.
        
         दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांनी एकदा 'नवनीत'च्या धर्तीवर अर्वाचीन कवितांचे 'नवनीत' तयार करण्याच्या उद्देशाने आधुनिक कविता व कवींची चरित्रे जमविण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्यांनी रीतीप्रमाणे विनायकांकडेही सचरित्र कवितांची मागणी केली होती. त्यावर विनायकांनी दत्त यांना उत्तर पाठविले होते, ते असे - ''माझे चरित्र इतके विचित्र आहे की, कोणी (ऐकू नये) ऐकिल्यास माझी कविता तो वाचणारच नाही. तरी चरित्र हवे असल्यास कविता पाठविता येत नाहीत! ''
      
           कालांतराने पुढे हा काव्यसंग्रह चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाने 'अर्वाचीन कविता' या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध झाला. पण त्यात विनायकांची कविता प्रसिद्ध झाली नाही व चरित्र तर नाहीच नाही! आणि दुःखाच गोष्ट ही की, हे पुस्तक प्रसिद्ध झालेले पाहायला स्वतः दत्तही या जगात तोवर राहिलेले नव्हते...

            विनायकांचा जन्म १५ सप्टेंबर १८७२ रोजी धुळ्यात झाला.  अलीबागजवळील नागाव हे त्यांचे मूळ गाव होते. विनायकांचे थोरले बंधू बळवंतराव ऊर्फ बाळाभाऊ हेही कविता करीत असत. 'रमाकांत नागावकर' या टोपणनावाने त्यांच्या कविता त्या काळी प्रकाशित होत असत. शालेय वयातच विनायकांना काव्यरचनेचा छंद जडला. Green's Fairy Tales या पुस्तकातील शंभराच्या आसपास गोष्टींचे काव्यबद्ध भाषांतर त्यांनी शाळेत असतानाच केले होते! याबरोबरच Gray या कवीच्या Elegy या काव्याचेही मराठीत भाषांतर त्यांनी केले होते. मात्र, आजघडीला यातील काहीही उपलब्ध नाही!  विनायकांचा काव्यरचनेचा झपाटा विलक्षण असे. जलद गतीने ते काव्य रचत असल्याने शीघ्रकवी म्हणूनच ते ओळखले जात.

       विनायकांच्या सांसारिक आयु्ष्याविषयी लिहिताना पंडित यांनी म्हटले आहे -... विनायकाचे दोन हाताचे चार हात होऊन तो संसारपाशात अडकला खरा; परंतु त्याचे गृह्यवर्तन अत्यंत बेफिकिरीचे असे. सरस्वतीबाईंचे (त्यांची पत्नी) अंगी नवऱयास आपलेसे करून घेण्याची करामत नव्हती म्हणून म्हणा किंवा विनायकास आपले मन रंगविण्याइतके काव्य आपल्या पत्नीत आढळले नाही म्हणून म्हणा, एवढी गोष्ट खरी की, खरे संसारसुख उभयतांनाही लाभले नाही. सदर गोष्टीची कार्य़कारणपरंपरा कोणी कशीही लावो, प्रस्तुत लेखकाची (पंडित यांची) अशी समजूत आहे की, काव्यरसापुढे विनायकाला इतर सर्व रस अगदी तुच्छ वाटत असत व म्हणूनच तो काव्याखेरीज बाकीच्या ऐहिक सुखांविषयी निरासक्त असे. इसवीसन १९०६ साली त्यांनी धरणगाव मुक्कामाहून खामगाव येथील शंकर पांडुरंग जोशी नावाच्या गृहस्थाला एक खासगी लिहिलेले पत्र उपलब्ध झालेले आहे. या पत्रावरून वरील म्हणण्यास चांगलाच दुजोरा मिळतो. ते पत्र असे :

राजश्री शंकर पांडुरंग जोशी,

आशीर्वाद विशेष, आपण मला भेटलांत आणि कवितेविषयी आस्था प्रगट केली. फार आनंदाची गोष्ट आहे. मात्र येवढी गोष्ट लक्षांत असू द्या की, कविता म्हणजे फकीरी आहे. तिच्या नादाला लागल्यावर तुम्हांस ऐहिक वैभवावर पाणीच सोडावे लागेल, किंवा त्याचा तुम्हाला आपोआपच वीट येईल.
चांगल्या कवितेचे वाचन असूं द्या, रसिकांचा सहवास घडवून आणा, आणि एखाद्या सद्गुरूचा कृपाप्रसाद संपादन करा. तुम्ही राहता त्या रहाळात शेवडे नावाचे सद्गृहस्थ आहेत. तुम्हांस सुमार्ग दाखवितील. त्यांची-माझी प्रत्यक्ष भेट नाही. तथापि, माझ्या कनिष्ठ बंधूंच्या सांगण्यावरून त्यांच्या पात्रतेबद्दल माझा पूर्ण भरवंसा आहे
- विनायक

हे पत्र ४ जानेवारी १९०६ रोजी लिहिलेले आहे.

           विनायकांचे टोपणनाव बाबूराव होते. विनायकांचा काळ कुठे आणि कसा व्यतीत होत असे, हे सांगताना पंडित यांनी म्हटले आहे -  त्यांची स्नेहीमंडळी त्यांना बाबूराव याच नावाने संबोधत असत. मात्र, विनायकाचे स्नेही 'अमूकच' होते, असे नक्की सांगता येणार नाही. ज्यांच्यात तो बराच काळ घालवी, त्यांना स्नेही म्हटले तर ते सर्व चंगीभंगी, व्यसनाधीन व धनाढ्य असे लोक होते. शाळेतील मित्र हे तर स्नेही होतेच़; पण विशेषतः लक्षात ठेवावयाची गोष्ट ही की, तो ज्यांच्याशी बोलेल त्याला

         'विनायक' आपला 'मित्र' आहे, असे म्हणावयास बिलकूल शंका वाटत नसे. याचे कारण तो वाणीने रसाळ व मनाने मोकळा असे. आनंद ही त्याची सहजवृत्ती होती. दुर्मुखलेला तो कधीच दिसला नाही. अशा प्रकारे विनायक जगन्मित्र होता. तरी त्याचे जिवाभावाचे स्नेही म्हणजे दोनच. एक धुळ्याचे प्रसिद्ध वकील शंकर श्रीकृष्ण देव व दुसरे 'काव्यरत्नावली'कार नारायण नरसिंह फडणीस. कवी तर सगळेच त्याचे मित्र असत. पण खरे बोलावयाचे म्हणजे कवीपेक्षा रसिक-वाचकच त्याला फार आवडत असत. तो नेहमी म्हणे - 'आम्ही कविता करण्यास समर्थ आहोत, तुम्ही फक्त वाचावयास तयार व्हा! '
        
          कविता कऱण्यास समर्थ असलेल्या विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयकविता, वीररसयुक्त कविता, वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता (हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यावरील कविता) ....        

मराठीला खणखणीत कविता देणाऱया या कवीचा  मृत्यू पुण्यात ३० मार्च १९०९ रोजी झाला. पत्नीच्या मांडीवर त्यांनी प्राण सोडला.  
        
           पंडित यांनी त्यांच्या मृत्यूचे वर्णन (अति)नाट्यमयरीत्या केलेले आहे.

         पंडित यांनी म्हटले आहे - विनायकाचे देहावसान होण्यापूर्वी बरोबर एकच दिवस सरस्वतीबाई येथे (पुण्यात) येऊन पोहोचल्या. उभयतांची दृष्टादृष्ट होताच विनायक एखाद्या अर्भकाप्रमाणे रडू लागला! हृदय फोडणाराच प्रसंग तो! त्या प्रसंगाचे यथातथ्य वर्णन करण्याचे सामर्थ्य या लेखणीत नाही. त्याला चिताऱयाचीच लेखणी पाहिजे. लग्नापासून आजतागाईत जिला सुखाचा वारा लागू दिला नाही, प्रेमाचा फुकाचा गोड शब्द ऐकू दिला नाही, आर्त आवडीने सुखाचा घास खाऊ दिला नाही, चिरगूट-पांघरूण लेऊ दिले नाही, त्या साध्वीला
या अशा वेळी समोर उभे राहिलेले पाहताच कोणाही अधमाधम नरपशूचे अंतःकरण फुटले पाहिजे़; मग विनायकासारख्या भावनाप्रधान कवीचे हृदय पश्चात्तापाच्या तीव्र वेदनांनी जळू लागले, यात विशेष नवल ते कोणते...?

        विनायकांना जाऊन आता शंभर वर्षे उलटून गेली आहेत! आणि 'पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ' ही त्यांची ओळ अमर होऊन आजही आपल्याला भेटत आहे!

* * *

विनायकांच्या दोन कविता

.................................................
महाराष्ट्र-लक्ष्मी
.................................................
महाराष्ट्र-लक्ष्मी मातें जगीं धन्य वाटे,
यशोगीत तीचें गातां मनीं हर्ष दाटे. ।। ध्रू ।।

पुनःपुन्हा परचक्राने ताडिली बिचारी,
दीर्घकाल खचली होती पारतंत्र्यभारी,
द्वादशाब्द दुष्काळाने जाहली भिकारी,
संकटांत तीच म्हणोनी करी उंच माथें. ।।१।।

मावळांत वास, न ठावें जया बाह्य वारें,
नेमधर्म ज्यांचे लोकीं कृषीकर्म सारें,
विळा कोयतीच जयांची काय ती हत्यारें,
तेच वीर बनलें समयीं मावळे मराठे. ।।२।।

नये नीट धरितां ज्याला लेखणी करांनी,
कृपादृष्टी संपत्तीची न ज्याचे ठिकाणीं,
परी यवनसत्तेची जो करी धूळधाणी,
कोण तया शिवरायाच्या पावला यशातें? ।।३।।

साधुसंत झाले, असती, तयांची न वाण,
मात्र रामदासा लाधे समर्थाभिधान,
जो मनीं स्वदेशहिताचे धरोनी निशाण,
ध्वजा कौपिनाची मिरवी भारतांत थाटें ।।४।।

कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणां जगांत,
ढिली कांस ज्यांची म्हणुनी हांसती, हंसोत,
तयांनीच करणी केली प्रसंगी अचाट,
खोल गढे परसत्ता ती ढासळली लाथें ।।५।।

पूर्व दिव्य ज्यांचें, त्यांना रम्य भाविकाळ,
बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ,
कासया वाहावी चिंता मनीं मग जहाल,
रात्र सरे तेव्हां उगवे दिनही पूर्ववाटे.

................................................
अवंतिके
................................................
प्रिय अवंतिके! नयनहृदयरंजिके! ।।ध्रु।।

तूं जीवन, तूं भूषण, परमार्थाचे साधन
आहे मज तुजवांचून, सर्व जग फिके! ।।१।।

तूं दैवत, तूं देवी, परमसुखाची ठेवी,
यास्तव तव पद सेवी, सौख्यदायिके! ।।२।।

तूं मजला खानपान, तूंच शयन, तूं आसन,
तूं नसतां, सिंहासन नको लाडके! ।।३।।

रूप तुझें दिनरजनीं, वसते हृदयी, नयनीं,
दिसतें स्वप्नीं, शयनीं, एकसारखे! ।।४।।

रूप तुझे निरखावें, तव वचनामृत प्यावें,
तव गुण गावे, घ्यावे, लालसा सखे! ।।५।।

रात्रीं सरितातीरीं, संसारी, व्यवहारीं,
तव चरणी घरदारीं, लागलो निकें! ।।६।।

छंदीं तव मन जडले, प्रिय तें ज्या आवडलें,
तें मज मार्गीं नडलें, शत्रुसारखे! ।।७।।

मज निंदो, निंदी जन, धरिले मीं तुझे चरण,
होवो झालें त्रिभुवन, त्यांत पारखें! ।।८।।