सागरकिनारी - मन हे पुकारी

नायक :
सागरकिनारी - मन हे पुकारी
नाहीस तू, तर माझे - कोणीच नाही

नायिका :
सागरकिनारी - मन हे पुकारी
नाहीस तू, तर माझे - कोणीच नाही
।ध्रु।

नायक :
जाग्या दिशा ह्या - जागे पवन हे
जागताच प्रीती - जागे गगन हे
नायिका :
पळभरहि मानससृष्टी - निजलीच नाही ।१।
सागरकिनारी ...

नायिका :
रश्मी-पऱ्यांचे - नर्तन जळावरी
हरवलेय मी जणू - सरिताच सागरी
नायक :
हरवलीस केवळ तू गं - एकटीच नाही ।२।
सागरकिनारी ...

टीपा :

१. ह्या दोन ओळींच्या भाषांतरात भरपूर स्वातंत्र्य घेतलेले आहे.(आणि हो पवन अनेकवचनात तर गगन एकवचनात आहे )

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच! साधारणपणे गागालगागा - गागालगागा   अशी काही लय आहे. पण मध्ये मोकळी जागा असल्याने काही गागा ऐवजी गालगा असे स्वातंत्र्य घेतले आहे. अर्थात मूळ गाण्यच्या चालीत भाषांतर जसेच्या तसे म्हणता येते. (म्हणजे चालीत बसवण्यासाठी मुद्दाम जाग्ताच, जळाव्री, हरव्लेय, साग्री, हरव्लीस, एक्टीच असे करायची गरज पडत नाही)(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

 विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा.  कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करू नका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... ईच नाही  असे जमवा.