अगा जे घडलेचि नाही

विश्वास पाटलांचे 'नॉट गॉन विथ दी विंड' हे पुस्तक वाचत होतो. त्यात 'पिंजरा'च्या निर्मितीदरम्यान घडलेल्या काही विलक्षण गोष्टींचे उल्लेख आहेत. या कथेवर शांतारामबापू चित्रपट बनवणार हे ठरल्यावर त्यात नायिकेचे काम संध्याबाई करणार हेही ठरल्यासारखेच होते. शांतारामबापूंच्या सहकाऱ्यांना बाकी हे फारसे पसंत नव्हते. (ही पसंत नसण्यासारखीच गोष्ट आहे. तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी , ब्रह्मचारी मास्तरला एका क्षणात मोहात पाडणारी चंद्रकला कशी मादक, मोहक, मांसल हवी. बाईंमध्ये ते 'इट्ट' मुळातच नाही. त्यातून 'पिंजरा' पर्यंत बाई बऱ्यापैकी जून व थोराड दिसू लागल्या होत्या. त्यामुळे अशा निबर बाईची उघडी पोटरी आणि गुडघा बघून मास्तरांच्या आदर्शाचे इमले ढासळावेत, हे काही पटत नाही. असो. ) शांतारामबापूंचा बरा मूड बघून कुणीतरी बापूंना संध्याबाईऐवजी जयश्री गडकर या भूमिकेसाठी अधिक योग्य आहेत असे सुचवले. त्यावर बापू हसून म्हणाले, "अरे, हा चित्रपटच मी संध्यासाठी बनवतो आहे. " झाले, विषय संपला.
ध्येयवादी मास्तरच्या भूमिकेसाठीही पहिली निवड अरुण सरनाईकांची होती. पण त्या काळात बापूंचे आणि सरनाईकांचे संबंध बिघडलेले होते. म्हणून ही भूमिका डॉ. लागूंकडे आली. हे सगळे वाचून मनात येते, डॉक्टरांच्या जागी अरुण सरनाईक आणि संध्याबाईंच्या जागी  जयश्री गडकर  असत्या तर काय झाले असते? जे झाले ते न होता, जे झाले नाही ते झाले असते, तर काय झाले असते?
अशीच काहीशी कथा 'पिंजरा'च्या हिंदी आवृत्तीबाबतही आहे. खरे खोटे कोण जाणे, पण 'पिंजरा' मधील मास्तरचा रोल मिळावा म्हणून दिलीपकुमार चक्क दोनदा शांतारामबापूंना भेटून गेला म्हणे. दिलीपकुमार जर ही भूमिका करणार असेल तर नायिकेच्या कामासाठी वहिदा रेहमानला राजी करता येईल असे काही लोकांचे त्या काळात मत होते. बापूंनी हिंदीत केलेला 'पिंजडा' कधी आला आणि कधी गेला कुणाला कळालेसुद्धा नाही. पण दिलीपकुमार - वहिदा रेहमानने हा 'पिंजडा' केला असता तर काय झाले असते?
दिलीपकुमारवरून आठवले.  'प्यासा'  तला  विजय  आणि  'संगम'  मधला  गोपाल  या दोन्ही  दिलीपकुमारने  नाकारलेल्या भूमिका.  ' प्यासा' चे गुरुदत्तने  सोने केले, पण जांभळट ओठाचा भावशून्य राजेंद्रकुमार बघणे ही 'संगम' बघण्यामधली सर्वात मोठी शिक्षा आहे.  ती भूमिका दिलीपकुमारने केली असती तर काय झाले असते?
'मधुमती'च्या वेळची गोष्ट. त्या काळात दिलीपकुमार नायक म्हटल्यावर पार्श्वगायक महंमद रफी किंवा तलत महमूद हे ठरल्यासारखेच होते. 'मधुमती' मधली मुकेशच्या आवाजातली  एकूण एक गाणी खरे तर तलतच्या आवाजात रेकॉर्ड व्हायची होती. पण त्या काळात मुकेशला जरा वाईट दिवस आले होते. तलतला हे कळाल्यावर त्याने उमद्या मनाने स्वतःहून त्या गाण्यांसाठी मुकेशची शिफारस केली. पुढे 'मधुमती' च्या गाण्यांनी इतिहास घडवला. पण 'सुहाना सफर' आणि  'दिल तडप तडप के' ही गाणी तलतच्या आवाजात ऐकायला कशी वाटली असती?  (विशेष  म्हणजे 'मधुमती' मधले दिलीपकुमारच्या तोंडी असलेले एकमेव दुःख/ विरहगीत 'टूटे हुए ख्वाबोंने' हे महंमद रफीच्या पदरात पडले आहे! ) 'कितना हसीं है मौसम' हे गाणेही तलत रेकॉर्डिंगला येऊ न शकल्यामुळे अण्णा चितळकरांनी स्वतः गायिले आहे. हे गाणे ऐकताना ते तलतला डोळ्यांसमोर ठेऊन बांधलेले आहे, हे उघडपणे कळतेच. (पूर्वीच्या गाण्यांमध्ये असे कळत असे.)  हे गाणेही जर तलतने गायिले असते तर काय झाले असते? लताबाई रेकॉर्डिंगला येऊ न शकल्यामुळे मदनमोहन यांनी 'नैना बरसे' त्या दिवशी स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले . पुढे ते लताबाईंच्या आवाजातही रेकॉर्ड केले आणि 'वह कौन थी? ' मध्ये शेवटी लताबाईंच्या आवाजातलेच गाणे ठेवले आहे. पण मदनमोहन यांच्या आवाजातले ते गाणे ऐकून असे वाटते की जर हेच गाणे चित्रपटात ठेवले असते तर काय झाले असते? ( 'दस्तक' मधल्या 'माई री' प्रमाणे)
तलत महमूद असा अनेक वेळा कमनशिबी ठरला. 'कितनी हसीन रात' हे त्याच्या आवाजात रेकॉर्ड होऊनही प्रत्यक्षात चित्रपटात ऐनवेळी त्याच्या जागेवर महेंद्रकपूरने गायलेले गाणे आले. 'चल उड जा रे पंछी' हेही तलतच्या आवाजात रेकॉर्ड झाले होते, पण ते रफीच्या आवाजात रेकॉर्ड करून चित्रपटात घेतले गेले. तलतच्या सुदैवाचे (मला माहिती असणारे ) एकमेव उदाहरण म्हणजे 'जहांआरा' मधली सगळी गाणी. 'जहांआरा' च्या आसपास तलतचा आवाज संपत आला होता. पण या चित्रपटातील नायकाला फक्त तलतचा आवाजच न्याय देऊ शकेल या भूमिकेवर संगीतकार मदनमोहन अडून बसले. या गाण्यांचे तलतने काय केले हे सांगण्याची गरज नाही. पण निर्माता-दिग्दर्शक यांच्या आग्रहापुढे झुकून मदनमोहन यांनी ही गाणी महंमद रफीच्या आवाजात रेकॉर्ड केली असती तर काय झाले असते?
'देवदास' या बिमल रॉय यांच्या चित्रपटाबाबतही असेच सांगता येईल. 'देवदास' पूर्ण झाल्यावर बिमल रॉय यांनी एकदा खाजगीत बोलताना 'मला माझा देवदास हवा तसा मिळाला, पण पारो आणि चंद्रमुखीच्या बाबतीत मात्र मला तडजोड करावी लागली' असे म्हटले होते. बिमलदांना पारो म्हणून मीनाकुमारी आणि चंद्रमुखी म्हणून नर्गिस हवी होती. या ना त्या कारणाने हे झाले नाही. (कदाचित ते बरेच झाले.  वैजयंतीमालाने  चंद्रमुखी  अजरामर केली आहे.  'जिसे तू कबूल कर ले' हे नर्गिसवर पिक्चराईज झाले असते तर...? नको, ती कल्पनाही करणे नको! ) हीच नर्गिस 'मुघल-ए-आझम' च्या नायिकेसाठेची पहिली निवड होती (नर्गिसचे अनारकलीच्या स्क्रीन टेस्टच्या वेळी घेतलेले अनारकलीच्या गेट अप मधील छायाचित्र उपलब्ध आहे) हे एक आणि याच नर्गिसच्या 'मदर इंडिया' मधील भूमिकेसाठी सुलोचनाबाईंचे नाव जवळजवळ नक्की झाले होते हे दुसरे - आज हे सगळे ऐकायला कसे वाटते?
'तीसरी कसम' मधली हीराबाईची भूमिका करायला मीनाकुमारीला केवळ हीरो राजकपूर आहे म्हणून म्हणून कमाल अमरोहींनी मनाई केली होती. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनि तर सिमी गरेवालची हीराबाई म्हणून पहिली निवड केली होती. ( आणि तिचे फोटो बघून शम्मी कपूर 'अरे, ये तुम्हारी हीरॉईन है? अरे ये तो... ' असे काहीसे तिच्या शरीरसंपदेला उद्देशून भयंकर बोलला होता!) वहिदा रेहमान ही उत्तम नृत्यांगना आहे, त्यामुळे नौटंकीचं काम करणारी, काहीसं गावरान, उत्तान नाचणारी हीराबाई म्हणून ती शोभणार नाही असं दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना वाटलं होतं. बासुदांच्याच 'अनुभव' मध्ये संजीवकुमारच्या जागी प्राणला घेऊन एका दिवसाचं शूटिंगही झालेलं होतं. प्रकाश मेहरांच्या 'जंजीर' मध्ये तर अमिताभच्या वाट्याला राजकुमार, देव आनंद यांनी नाकारलेली भूमिका आली. (हे बेष्ट आहे. 'जानी, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.. ) अमिताभला घेऊन नऊ दहा रिळे शूटिंग केल्यावर 'मेला' मध्ये अमिताभच्या जागेवर संजय खान आला. (हा 'मेला' आणि त्यातला संजय खान आज कुणाला आठवतही नाही. 'मेला'नंतर दोन वर्षांनी 'मेला' चे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनीच 'जंजीर' केला) ....
या सगळ्या 'न झालेल्या कहाण्यांची' विश्वासार्हता हा भाग तूर्त सोडून देऊ. पण 'गंगाधरपंताचे पानिपत' या गोष्टीत उल्लेख केल्यासारखी जर एखादी चवथी मिती असेल, आणि या चवथ्या मितीत हे सगळे न झालेले झाले असेल, तर ते बघायला, ऐकायला किती मजा येईल!