प्रवास

 प्रवास

आयुष्याच्या दाराला कुलुप घालून आत्मा पुढच्या प्रवासाला निघाला. नुकत्याच सोडलेल्या निश्चेष्ट शरीराकडे त्याने परत एकदा मागे वळून पाहिले. वास्तविक पाहणे, बोलणे, ऐकणे अशा ऐंद्रिय जाणिवांच्या पलिकडे तो पोचला होता. पण पाण्यात पोहून बाहेर आल्यावरही काही काळ पाण्याचे थेंब अंगाला चिकटून राहतात, आणि हळुहळू निथळत ओघळून जातात किंवा तसेच वाळून जातात तशाच पद्धतीने काही शारीर जाणिवा आणि सवयी अजूनही आत्म्याला चिकटून होत्या. कदाचित जाणीव आणि नेणीव यांच्यामधला हा प्रदेश असावा.

प्रवासातले पुढचे सारे टप्पे, मुक्कामाची ठिकाणे आत्म्याला पूर्णपणे ज्ञात होती. पुन्हा एकदा तीच चित्रगुप्ताची न्यायसभा, पापपुण्याचा ताळेबंद. नुकत्याच संपलेल्या आयुष्यात जे घडले त्यातले पाप आणि पुण्य वेगळे काढणे नक्कीच कठीण. वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारे शहाणपण मागे जाऊन वापरता आले असते तर... तर कदाचित जमेची बाजू भक्कम करता आली असती. पण ते तेव्हाही शक्य नव्हते आणि आता तर नक्कीच नव्हते. या साऱ्याच खेळाचा पट मांडून नियती फासे टाकत राहिली आणि आपण सोंगटीप्रमाणे सरकत राहिलो. पण मग चित्रगुप्ताच्या न्यायनिवाड्याला तरी काय अर्थ उरतो?

वाटेत उलट्या दिशेने पृथ्वीकडे प्रवास करणारे अनेक आत्मे त्याला दिसले. काही जन्म घेण्यासाठी उत्सुक दिसले. कदाचित हा त्यांचा पहिलाच मानवजन्म असावा.   काही आत्मे अनिच्छेनेच खाली जाताना जाणवले. निदान या जन्मात तरी आपण नक्कीच वेगळे काहीतरी करणार असा विश्वास त्यातले काही बाळगून होते. पण गतजन्मीची स्मृती न राहू देण्याची काळजी नियती घेत असते हे ते विसरले होते.

हळुहळू शारीर जाणीवा मंद होत चालल्या होत्या पण त्याचबरोबर नेणीवेच्या पातळीवर काही नवे, आनंददायक, आश्वासक आत झिरपू लागले होते. त्यातून सुखदुःखासारख्या परावलंबी भावना न जाणवता केवळ एक असीम शांतता उलगडत जात चालली होती. कालमापनाचे परिमाणही आता पूर्णपणे वेगळे होते त्यामुळे किती क्षण, किती प्रहर उलटून गेले हे कळत नव्हते पण आता ते कळण्याची आवश्यकताही नव्हती.

असाच काही अज्ञात काळ लोटला आणि त्याने चित्रगुप्ताच्या दरबारात प्रवेश केला. त्याच्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला होता आणि आता त्याच्याच निवाड्याचा तोच आरोपी आणि तोच साक्षीदार असणार होता.

-अनील बोकील