ती इवली खिडकी....!!!!!

त्या चौघीजणी म्हणाल्या, -'आम्ही तुला 'काचापाणी' शिकवतो. लगेच ढिगभर बांगड्यांच्या काचा आणल्या. त्या तळहातात घेऊन खाली उसळायच्या नि ऐकमेकाला धक्का न लावता. एक-एक तुकडे काढायचे. एखाद तुकडा दुसऱ्याला लागून हलला की डाव गेला. हा खेळ एकटं जरी खेळण्यासारखा जाणवला तरी जरा वेळानं खूप कंटाळवाणं वाटतं. जर स्पर्धक असला की, कोणताही खेळ खेळण्यात एक आगळी खूमारी जाणवतेच-जाणवते. नि इथं तर या सहाजणींच्या सहवासात माझं मन खुलत होतं. मी पण या खेळात भाग घेतला. खिडकीचे गज चांगलेच रूंद होते. म्हणून हात आत-बाहेर यायला, काहीच अडचण नव्हती. आम्ही पाचीजणी खेळात बऱ्यापैकी रमलो. बिच्चारे....!!! सुग्रीव-वाली त्या चौघींच्या खांद्यावरून उड्या मारून आत पाहण्यात उगीच बेजार झालेले. या चौघी त्या दोघांना चांगलीच धक्काबुक्की करत होते. बरीच झकपक त्यांची आपसात सुरू होती. अखेरी सुग्रीव-वाली हरले. नि रस्त्यापल्याड भला मोठ्ठा दगड पाहून त्यावर गालाला हात टेकवून जोडीने बसले. मला तर त्या द्दश्याची भारीच मौज जाणवून गेली.  मग जरा वेळाने काचापाणी खेळायचा कंटाळा आला. म्हणून 'चकास' खेळायला घेतला. तर यात वादविवादच जास्त व्हायला लागले. मी तर त्यांच्या खेळात त्यांचा सोबती खेळगडी म्हणून कच्चा लिंबू-टिंबूच अधिक शोभली. 'बिट्ट्या'खेळायला. त्या मोकळ्या पसरायला. नि झेलायला ऐसपैस जागा हवी म्हणून हा खेळ पण रद्द झाला. मग मी माझा'नाव-गाव-वस्तू-प्राणी-फळ-फूल' हा खेळ मी शिकवला. पण मीच जिंकली. चक्क...!!! चौघीजणी हरल्या. मग मला यात पण काही मजा वाटेना. त्या चौघीजणी खिडकीत माझ्याकडे पाठ करून. रस्त्याला तोंड करून ये-जा करणाऱ्या गाड्या नि माणसं पाहत रमल्या. मी पण त्या चौघीमधनं जी सांद दिसेल. तितक्याच सांदीतनं रस्त्यावरचा नजारा खट्टू मनानं पाहत होती.  इतक्यात या प्रसंगाचा फायदा घेऊ या म्हणून सुग्रीव-वाली टा-ण क-ण उडी मारून खिडकीजवळ आले. चौघीजणी  खिडकीतनं खाली उतरल्या. नि आता कुठंशी त्या खिडकीचा ऐसपैस  ताबा सुग्रीव-वालीला मिळाला. हे दोघं आल्यानं, माझ्या उगाच कंटाळलेल्या मनाला उभारी आली. यांच्याकडं कोणते खेळ आहेत. त्यांना विचारावं, म्हणून मी गडबडीत टाणकण उडी मारून उठले खरी-पण कुठं मी उंचावर बसले. ते विसरले ते विसरले, पण खाली उडी मारायचा अंदाज चुकवला. नि झोळीत कोलांटी खाऊन दुमडून पडली. माझं मी सावरत हसत उठून बसली. बाहेर सुग्रीव-वालीला तर हसू आवरत नव्हतं. पण मी रागवीन नि खेळणार नाही. म्हणून त्यांनी हसू आवरलं. मग सारं काही आलबेल झालं.                                                                                                                                                                                                                  मग त्यांनी आपल्या खिशातनं रंगबिरंगी काचेच्या गोट्या ढिगानं खिडकीलगत ओतल्या. मी त्या अनेकरंगी गोट्यांच्या दुनियेकडे आššššš...... वासून पाहतच राहीली. प्रत्येक रंगाची गोटी आपल्यापाशी हवीचऱ्हवी हा इरादा मनी पक्का व्हायला लागला.  हि घेऊ की, ती घेऊ असं करत माझ्या मुठीत बऱ्याच गोट्या जमल्या. सुग्रीव-वालीला मी विचारलं की, यातल्या माझ्या आवडीच्या किती गोट्या स्वतःच्या होतील. दोघंही एकदम म्हणाले-प्रत्येक गोटीच्या बदली. तू सकाळी काढलेली चित्रं आम्हाला दे. -त्या गोट्याकरता मी चित्र द्यायला तयार झाली. पण चित्रं मोजून-मोजून फक्त पाचच निघाली. खरं तर ती चित्रं रंजाकरता काढली होती. मी काढलेल्या चित्रांना ती रेघोट्या म्हणायची. पण आपल्या खोलीत मोठ्या आवडीनी लावायची. पण आता गोट्याकरता मी कसलाही विचार करायला तयार नव्हती. फक्त पाचच गोट्या मला मिळाल्या. त्यापैकी एक मोठी नि चार लहान घेतल्या. त्या पाहून अलिबाबाचा खजिना मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. त्या रंगीत गोट्या पाहत मी माझ्यातच रमली. त्या चौघीजणी झाडाखाली उगाच एकमेकाच्या काड्या करत पळापळी करत होत्या. तर सुग्रीव-वाली एकदा त्या चौघींकडं पाहत. नि एकदा माझ्याकडं पाहत होते. आम्ही पाचीजणी आपल्याच दुनियेत मग्न होतो. त्या दोघांची दखल घ्यायचं काही कामच नव्हतं. त्यामुळे ते दोघंही खिडकीजवळ अस्वस्थ चुळबुळ करत उभे होते.

बराच अवधी मी गोट्यातच रमली होती. किती वेळ गेला याचा अतापता पण लागला नाही. पण जरा वेळाने सुग्रीव-वाली म्हणाले, की-आम्ही'विट्टी-दांडू' खेळतोय. तुला आमच्यासोबत खेळायचं आहे का? त्यासाठी तुला पेठदारातनं बाहेर यावं लागेल. हा खेळ खिडकीत बसून खेळता येत नाही. -त्या दोघांनी आपला आवाज मोकळा केला. मग मीही प्रत्येक शब्दावर जोर देऊन, म्हणाले, '-बरं..!! बरं..!! माहीत आहे. देवाने दिलीय अक्कल मलाही..!! कोणता खेळ कुठं खेळायचा याची जाण आहे. कळलं का..?? ' मग ती दोघं पण गप्प बसली. इतक्यात चौघीही आम्ही पण खेळणार म्हणून दोघांच्या मागं लागल्या. त्यांच्यापासनं सुटकारा हवा म्हणून चक्क..!! दोघं पण पार दूर पळून गेले. इतक्या दूर गेले, की खिडकीतनं माझ्या नजरेत काहीपण येईना. मग माझा जीव काही त्या इवल्या खिडकीच्या आत रमेनासा झाला.  काचापाणी खेळण्यापासनं ते आता विटी-दांडू खेळण्याचा इरादा होईपर्यंत मी अनेकवेळा पेठदारापर्यंत जाऊन परेशान झाली. नि खट्टू मनाने परत यायची. आताही मी तावातावानं जोरात पाय आपटत पेठदारापर्यंत गेले. तिथनं आत नजर टाकली. पण कुणी जागरूक असल्याचं चिन्ह काही दिसलं नाही. आता अज्ज्याबाबाला हाक देऊन. हलवून पेठदार उघडायला सांगून बाहेर पसार झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून अज्ज्याबाबाकडं पावलं वळली. पण अज्ज्याबाबा हाक द्याय्च्या आधीच उठून बसला. हे पाहून हायसं वाटलं. अज्ज्याबाबा म्हणाला-'बिट्टू! कधीचं तू असं पेठदारापर्यंत ये-जा करतेस. तुला बाहेर सोडायचं नाही. असा आबीचा हिटलरी हुकूम आहे. म्हणून तुला काही पेठदार उघडून दिलं नाही. नाही तर एक डूलकी झाल्यापासनं मी जागाच आहे. उगी डोळे झापून निवांत आडवा पडून होतो. '-नि मग एकदमच दोघांनी पण आत ओवरीत आबीची काय हालचाल आहे. ते पाहिलं..!! एकाच वेळी ही क्रिया घडली. म्हणून दोघांनाही हसू आलं. स्वतःच्या जबाबदारीवर अज्ज्याबाबानी पेठदार उघडलं. तसंही दार उघडायची वेळ झालीच होती. नि तरीही आत अगदी निवांत आबी निजलेली होती. कसलीही हलचल नव्हती. म्हणून अज्ज्याबाबा नि माझं फावलं. मग मी अज्ज्याबाबाकडं पाहत-पाहत पेठदारातनं बाहेर पसार झाले. माझ्या झग्याच्या एका खिशात पाच गोट्या होत्या. पळण्याच्या नादात त्या मांडीला लागत आहेत याचं पण भान राहीलं नाही. पळतच रस्त्यानं दूरवर पत्रपेटीपर्यंत पोचले. पण माझे कोणतेच सोबती नजरेत आले नाही. पण अज्ज्याबाबाची नात अशी रस्त्यानी पळतेय. म्हणून बऱ्याच नजरा माझ्याकडं वळल्या. ते जाणवंलं नि मग हळूहळू पावलं टाकत वाड्याकडं खट्टू मनानी येत होती. इतक्यात ध-म्म-क-नššš..... माझ्या पाठीवर थापा मारत. सहाही जण माझ्याभोवताल जमा झाले. तेंव्हा कुठंशी माझा जीव खूलला. बऱ्याच तासांनी असं एकत्र यायचा योग आला होता. म्हणून आनंदानी आम्ही ऐकमेकाच्या हातावर हात मारत टाळ्या पिटून. नाच-नाच नाचत खुप उड्या मारून घेतल्या. नि मग दम लागला. तेंव्हा धापा टाकतच रस्त्याकडेला फुफाट्यातच फस्सकल मारली. झगा पण मग फुफाट्यानी चांगलाच रंगला. नि आबीच्या हिटलरीची झलक नजरेसमोरनं तरळून गेली. पण त्या फुफाट्याच्या फाफटपसाऱ्याच्या स्पर्शापुढं ती हिटलरी झलक आता अतिच सौम्य जाणवली. नि निवांतपणे त्या कंपूसोबत हाššहाššहीššहीššहूššहूšš....... च्या हसण्या-खेळण्याच्या दुनियेत....!!!! त्या फुफाट्यात बस्सकण मांडली. अशी ही फुफाट्यात रंगलेली मैफल जीवाला भारीच सुखवत होती.                                                                                                                                                                                                                    मी कशी खेळणार हे पाहयला म्हणून हरणा-चंदना-शारकी-भूरकी माझ्याबाजूनी उभ्या राहील्या. वालीने माझ्या हातात दांडू दिला.  तो भक्कम दांडू पाहूनच माझा जीव हबकलाच. तर काही अंतरावर समोरच्या खड्ड्यात नोकदार विट्टी ठेवली होती. नि सुग्रीव या खेळातलं बरंच काही समजून सांगत होता. हंšššš... हंšššš..... म्हणत होती, खरी-पण हे हंऱ्हंऱ्हंऱ्हं.....!!!!! सूर माझ्या डोक्यावरून वाहून गेले. नि वरच्यावर हवेतच विरले. पाच-सहा वेळा प्रयत्न केला. की-दांडूनी विट्टी उडवण्याचा....!!!!! पण सारे वार हवेत गेले. नाहीतर फुफाट्यात गेले. नि उगीच माझा वार करण्याच्या नादात तावातावानी व्यायाम तर झालाच. पण चांगलीच घामानी चिंब भिजून गेली. पण तरीही काही विट्टी काही उंच उडून त्याला टोला काही बसेना. पण जिद्दीनी अजून जरा प्रयत्न केल्यावर विट्टी बऱ्यापैकी उंच तर गेलीच. पण लांबवर जाऊन पडली. या खेळातले छक्के-पंजे मी काही जाणून नव्हती. म्हणून सुग्रीव जे सांगत होता. त्यावर माझा विश्वासही बसत नव्हता. ती लांबवर पडलेली विट्टी शोधायला म्हणून सारीच निघून गेली. नि हातात दांडू घेऊन मी एकटीच त्यांना पाहत उभी राहीली. जरा वेळानी सर्व आली खरी....!!!! पण मागल्या मागं पसार झाली. असं का पसार झाली. म्हणून पाहीलं तर रंजा येत होती. रानाकडनं गाई घेऊन रंजा येतांना दिसली. खांद्यावर घोंगडं नि आडवी काठी टाकलेली. मागं उडणारा फुफाटा....!!! अश्या वेषात रंजा पेठदारातनं आत गेली. रंजाच्या धाकामुळं आता कुणीपण माझ्याकडे खेळायला येणार नव्हतंच. म्हणून मग मी पण जणू काय बाहेर काहीच पराक्रम केलाच नाही. अश्या आवेशात रंजामागं मी पण आत आली. रंजानं माझ्याकडे एक वक्र बेरकी नजर मारली. त्यातच सारं काही तिचं सारं बोलणं आलं. आत पाहिलं की-आबी की आबी डाळींबाखाली घाँगडीवर बसली होती. आजी अंगणात होती. तर अज्ज्याबाबा चुलीपाशी खुडबूडत होता. तोवर मी रांजणातलं गारेगार खरपूस वासाचं पाणी घेऊन स्वच्छ हात-पाय-तोंड धूऊन. झगा बदलून. आबीजवळ येऊन बसली. रंजापण तोंडाला पाणी मारून आली. इतक्यात अज्ज्याबाबा चहा-ज्वारीचे निखाऱ्यावर भाजलेले खमंग पापड-भाजलेल्या शेंगा घेऊन आला. उड्या मारून-मारून माझ्याही पोटात कावळ्यांचं संमेलन रंगलं होतं. म्हणून मी पण गप्प खायच्या मागं लागली. पोटातलं संमेलन शांत झालं, तसं मी तिथनं उठले. आता अंधारून आलं होतं. अज्ज्याबाबानी तुळशीजवळ पणती लावली होती. त्या मंद फिक्या प्रकाशात चौघंही गप्पा करण्यात परत रमले.                                                                                                                                                                                                                     मी मघाशी पेठदारात ठेवलेला दांडू घेऊन. त्या इवल्या खिडकीत ठेवला. आजची त्या खिडकीजवळची सारी मौज आठवून मन खुललं. त्या इवल्या खिडकीला एक मानाचा कडक सलाम ठोकला. इतकं जीवापार मनात घर करणाऱ्या आठवणी दिल्या, म्हणून मी तिचे आभार मानले. परत अशी मौज करायला कधी येणार काहीच ठाऊक नव्हतं. लगेच मी बाहेर आली. नि रंजाच्या मांडीवर डोकं ठेऊन. घोगडीवर लोळत. तिच्या रानगप्पा ऐकत होते. वर चांदण्यानी आकाश गच्च खुललं होतं. वरचा चांदणी रंग खाली पसरत आला. नि मनही खुललं होतं. अल्हाद झालं होतं. रंजाच्या रानगप्पासोबत त्या इवल्या खिडकीजवळच्या माझ्या बादशाही दुनियेत मी कधीच पोचली होती. नि आबीमुळे मला इतकं जीवाला सुखावणारं आजोळ मिळाला. चिरेबंदी वाड्यात राहायला मिळालं. याचा आनंद शब्दापल्याडचा आहे. आजोळात रंजा-अज्ज्याबाबा-आजी-आबीसह जो काही अल्प काळ मला मिळाला. त्यासंबधाचे विणकाम करून हृद्याच्या तळाशी जपलंय. म्हणून माझ्यासारखा आनंददायी प्राणी या जगात नाही. तेच मला हवं होतं. नि तेच मला मिळालं पण....!!!! (समाप्त)