४९. समाधी

समाधी या अफलातून डायमेन्शनवर मी आज लिहिणार आहे. हा लेख तुमचे सर्व आध्यात्मिक गैरसमज दूर करेल आणि तुम्ही जर शांतपणे, अत्यंत मन:पूर्वक वाचला तर तुम्हाला त्या स्थितीचा अनुभवही देईल.

पहिली गोष्ट, समाधी ही व्यक्तिगत बाब नाही ती अस्तित्वागत आणि सर्वकालीन स्थिती आहे. आपण जेव्हा अमका समाधी अवस्थेला पोहोचला तमक्याला समाधी अवस्था प्राप्त झाली असं म्हणतो तेव्हा समाधी ही वैयक्तिक घटना आहे असं वाटतं पण ते तसं नाही. कुणीही आणि केव्हाही त्या स्थितीचा अनुभव घेऊ शकतं आणि त्या स्थितीत राहू शकतं. खरं तर समाधी ही गुरुत्वाकर्षणासारखी स्थिती आहे आणि ती हर क्षणी प्रत्येकाला आकर्षित करतेय, आपण दैनंदिन विवंचनात गुंतल्यानं आणि त्या स्थितीची दखल न घेतल्यानं ती जाणवू शकत नाही इतकंच.

दुसरी महत्त्वाची गोष्ट, समाधी ही प्रत्येक सजीव आणि निर्जीवाची देखील आंतरिक स्थिती आहे. हे जरा लक्षात घेण्यासारखं आहे म्हणून थोडं विस्तृत लिहितो..

ओशोंनी म्हटलंय ‘एन्लाईटन्मेंट इज द स्टफ विथ वीच द एक्झिसटन्स इज मेड’ याचा अर्थ समाधीनंच सर्व अस्तित्व बनलंय म्हणजे ती स्थिती केवळ अंतर्बाह्य व्यापून आहे असं नाही तर प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू समाधीचंच ‘रूपांतरण’ आहे.  ही अफलातून गोष्ट लक्षात घ्या, समाधी आपल्या आतबाहेर आणि सर्वत्र तर आहेच पण आपण स्वतःला कुणीही समजत असलो तरी खुद्द आपणच ‘समाधी आहोत’, ती सर्वकालीन समस्थिती आहोत!
_______________________________

हा फार नजाकतीचा विषय आहे, बघा समजतंय का, नाही समजलं तर पुन्हा वाचा, समजेल.

समाधीही अस्तित्वाची एक स्थिर आणि अविचल स्थिती आहे आणि तिची अनेक परिमाणं आहेत, त्यातलं शांतता हे एक सर्वज्ञात परिमाण आहे.

नाऊ ट्राय टू अंडरस्टॅंड, धिस इज इंटरेस्टिंग.

प्रत्येक ध्वनी हे शांततेचं रूपांतरण आहे कारण ध्वनी शांततेतच निर्माण होतो आणि शांततेतच विरून जातो. कोणताही ध्वनी निर्माण होतो किंवा आपण कोणताही ध्वनी निर्माण करतो तेव्हा आपण काय करतो किंवा नक्की काय होतं? आपण शांतता ‘हालवण्याचा’ प्रयत्न करतो, कोणताही ध्वनी शांततेत कंपनं निर्माण करतो. आपण शांततेला ध्वनीचं रूप देण्याचा प्रयत्न करतो. एका अर्थानं शांतता ही सार्वभौम आहे आणि एका अर्थानं ती फक्त ‘ध्वनीचा अभाव’ आहे, इट इज ‘नथिंगनेस’, त्यामुळे शांतता हालणं असंभव आहे. शांतताही एक निरवस्तु आहे, ती सर्वव्यापी आणि अनिर्बध स्थिती आहे, शांतता हालवायला तुम्हाला शांततेच्या बाहेर जायला हवं पण ते असंभव आहे. हाऊ कॅन वन ट्रान्सेंड द सायलेंस? तिच्यात जे सामावलंय ते हालेल पण खुद्द शांतता कशी हालेल?

हे असंही मांडता येईल, शांतता हा नथिंगनेस आहे, आभाव आहे या आभावाचं रूप कसं बदलू शकेल? विज्ञानाच्या म्हणण्या प्रमाणे एका वस्तुचं दुसऱ्या वस्तूत रूपांतर होऊ शकेल पण जी वस्तूच नाही तिच्यात कसा बदल होईल? 

शांतता हे समाधी या अविचल स्थितीचंच रूप असल्यानं ती हालणं अशक्य आहे किंवा ती अनिर्बध व्यापकत्व असल्यानं ध्वनी निर्माण होईल आणि विरून जाईल; त्या अविचल सनातन व्यापकत्वावर त्याचा सकृद्दर्शनी परिणाम झाला असं वाटलं तरी काहीही परिणाम होणार नाही.

मग अशा स्थितीतही ध्वनीचा शांततेवर परिणाम झाल्यासारखा वाटतो, तो कशानं? तर ध्वनी निर्माण झाल्यावर आपण ध्वनीकडे उन्मुख होतो आणि ज्या क्षणी आपण ध्वनीकडे उन्मुख होतो त्या क्षणी आपल्याला स्वतः:चा विसर पडतो, आपण स्वतः: अविचल आहोत, आपल्यावर कसलाही परिणाम होत नाही याचं आपल्याला विस्मरण होतं आणि ध्वनीचा शब्द, शब्दाचा अर्थ आणि मग त्यातून मागच्या स्मृती, पुढची चित्रं, भावना, विवंचना असा कल्लोळ सुरू होऊन मग ‘आता काही तरी उपाय करायला हवा’ असं मनानं तुम्हाला पटवलं की शरीर सक्रिय होतं आणि मग आपल्याला वाटतं आपण निघालो! शांततेला स्वतः:चं इतकं विस्मरण होतं की तिला वाटतं आपण देह आहोत, नश्वर आहोत, प्राक्तनानं बद्ध आहोत आणि संसारात सापडलोत आता काही तरी उपाय करायला हवा! मग आपलं सभोवतालच्या घटनांशी इतकं तादात्म्य होतं की आपल्याला वाटतं आपणच हालतोय!

आपण कधीही हालत नाही, आपलं फक्त लक्ष वेधलं जातं, हे लक्ष वेधलं जाणं आपल्याला स्वतः:चं विस्मरण घडवतं, आपण समाधी आहोत, आपण ती शांतता आहोत याचा विसर पडतो, हे लक्षात आलं की तुमचं काम झालं!

___________________________________________

जाणीवेची तीन परिमाणं आहेत आणि जाणीवेमुळेच आपलं लक्ष वेधलं जातं ही अत्यंत प्रार्थमिक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. निराकाराचं आकारात रूपांतर करणारी एकमेव प्रक्रिया जाणीव आहे. हे रूपांतरण म्हटलं तर वास्तविक आहे पण ते कालबद्ध असल्यानं स्वप्नवत आहे, आज आहे, उद्या नाही किंवा आता होतं, आता नाही, जागेपणी आहे, झोपेत नाही!

निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व जग हा ‘जाणीवेत चाललेला खेळ आहे’! म्हणजे सूर्य ही अत्यंत व्यापक वस्तू घ्या, जोपर्यंत सूर्याची जाणीव होत नाही तोपर्यंत (तो सदैव असला तरी) आपल्यासाठी नसल्यासारखाच असतो. तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती घ्या जोपर्यंत त्या व्यक्तीचा आपल्या जाणीवेच्या कक्षेत प्रवेश होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती नसल्यासारखीच असते. थोडक्यात जाणीवेमुळे जग सार्थक आहे.

हीच गोष्ट अशीही मांडता येईल, जोपर्यंत जाणीवेतली घटना किंवा वस्तू आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेत नाही तोपर्यंत आपल्यावर तिचा परिणाम होऊ शकत नाही. आपल्या अगदी डोळ्यासमोर जरी अपघात झाला आणि त्यात आपलं कुणीही हितसंबंधी नसलं तर ती घटना आपल्यासाठी फक्त घटनाच राहते याचं कारण घटनेची जाणीव आपलं 'संपूर्ण लक्ष' वेधून घेऊ शकत नाही. या उलट एखाद्या झोका खेळणाऱ्या मुलावर संपूर्ण लक्ष केंद्रित झालेली आई झोक्यानं जरासा आडवा हेलकावा घेतला तरी शहारून उठते, याचं कारण माया, भावना, सहृदयता वगैरे जरी म्हटलं असलं तरी खरं कारण  जाणीवेनं आपल्या मूळ स्थितीचं, समाधीचं केलेलं ते परिवर्तन असतं! अविचल स्थिती विचलित झालेली असते.

जाणीवेची तीन परिमाणं अशी आहेत:

एक, शरीर; शरीर ही एक संवेदना आहे, जाणीव आहे. तुम्ही शरीराचा एकसंध वेध घ्या, ‘संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे’ हा तुमचा अनुभव करा, ती वस्तुस्थिती आहे. आपण वेगवेगळ्या शारीरिक संवेदनांकडे वेगवेगळ्या वेळी लक्ष दिल्यानं शरीराच्या एकसंध जाणीवेचा आपल्याला बोध होत नाही.

भूक, तहान, उत्सर्ग, स्पर्श, गंध, दृष्टी, श्रवण, स्वाद, शारीरिक वेदना असे आपण शरीर या एकसंध जाणीवेचे वेगवेगळे भाग केल्यानं शरीराचा आवाका मोठा वाटतो. तुम्ही शरीर हीच एक जाणीव आहे हा बोध सघन करा. तुम्ही स्त्री आहात की पुरुष यानी काही फरक पडत नाही. तुम्हाला जर आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे हा तुमचा अनुभव व्हायला हवा. ज्या क्षणी संपूर्ण शरीराची तुम्हाला एकसंध जाणीव होईल त्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत!

कोणत्याही योगासनात जेव्हा ते आसन पूर्ण स्थितीला जातं (पर्फेक्ट पोस्चर) त्यावेळी जी शांतता अनुभवाला येते ती आपण स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे असते. ज्या शरीराच्या जाणीवेनं आपलं लक्ष वेधून घेतलं होतं ती जाणीव परत आपल्याकडे, त्या समाधी अवस्थेकडे आलेली असते. ही अवस्था थोडा वेळ टिकते की मग पुन्हा विचार सुरू होतात आणि आपलं लक्ष तिकडे वेधल्यानं आपल्याला स्वतःचा विसर पडतो.

दुसरी जाणीव आहे दृश्य, मग ती वस्तू असो की व्यक्ती की घटना. आपली नजर सदैव सभोवतालच्या दृश्यांकडे लागलेली असते. निराकार हे समाधीचं दुसरं परिमाण आहे, म्हणजे जगातला प्रत्येक ध्वनी जसा शांततेतून प्रकट होतो तसा प्रत्येक आकार हा निराकारातून प्रकट होतो.

हीच गोष्ट अशीही मांडता येईल की प्रत्येक आकार हा निराकाराचाच बनलेला आहे त्यामुळे कोणत्याही आकाराच्या आत कुणीही नाही! हे तुम्हाला मंजूर न होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण स्वतःला व्यक्ती समजतो. तुम्ही जर नीट बघितलं तर व्यक्ती हा ‘देहाची जाणीव आणि आपली स्वतः विषयीची कल्पना’ मिळून झालेला एकत्रित परिणाम आहे. पण प्रत्येक जण स्वतः:ला आणि दुसऱ्याला व्यक्तीच समजतो आणि त्याच धारणेतून आपण संपूर्ण आयुष्य जगतो त्यामुळे कुणाच्याही आत कुणीही नाही हे आपल्याला काही केल्या मंजूर होत नाही.

स्वतःला व्यक्ती समजण्यात सगळ्यात मोठा भाग आपण करत असलेल्या कृत्याचा, आपल्या मालकी हक्काच्या वस्तूंचा आणि आपण जोडलेल्या आणि मानलेल्या नात्यांचा असतो. आपण सतत वापरत असलेल्या वस्तु म्हणजे आपलं घर, वाहन, उपकरणं यांचे आपल्या मनात आकार निर्माण झालेले असतात आणि त्यांच्या स्वामित्वामुळे आपण त्यांचे वापरकर्ते न वाटता मालक वाटतो म्हणून आपण स्वतःला व्यक्ती समजतो. सदैव आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींशी आपण अनेकानेक वर्ष वेगवेगळ्या स्मृतीतून जोडले गेलेलो असतो त्यातून जवाबदारी, कर्तव्य, पराधीनता अशा मानसिकता तयार होतात आणि मग या सर्वांच्या केंद्रस्थानी आपण स्वतः:ला कल्पून व्यक्ती ठरत असतो आणि सभोवतालचे सगळे लोक आपला हा समज सघन करत असतात.

सदैव कार्यरत असल्यानं कार्य शरीर आणि मन या पातळीवर घडत असूनही आपल्याला आपणच काम करतोय असं वाटतं.

घटनांचं देखील असंच आहे, घडलेल्या घटनांवरून आपण आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी, नशीबवान किंवा कमनशिबी, कर्तृत्ववान किंवा कर्तृत्वशून्य व्यक्ती ठरवलेलं असतं. वास्तविकात घटनेला असंख्य परिमाणं असतात आणि तीच घटना त्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपआपल्या दृष्टीनं इंटरप्रिट केलेली असते पण घटनांच्या या इंटरप्रिटेशनमुळे आपण व्यक्ती झालेलो असतो.

या व्यक्तित्वामुळे, म्हणजे व्यक्ती म्हणून आणि व्यक्तित्वातूनच सदैव जगल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण आकारबद्ध आहोत आणि आपल्याला आपल्या निराकार स्थितीचा पूर्णपणे विसर पडत असतो.  

तिसरी जाणीव आहे ध्वनी, ध्वनी म्हणजे शब्द, आवाज, शरीरांतर्गत किंवा बाह्य संवाद किंवा कोणतीही श्राव्य जाणीव.

ध्वनी ही अत्यंत लक्षवेधी जाणीव आहे. कुणी अपमानास्पद बोललं किंवा आपल्या धारणे विरुद्ध लिहिलं, भविष्यकालीन चिंतेचा नुसता विचार उमटला किंवा मनानं आपल्याला कोणत्याही कारणानं न्यून आहोत असं म्हटलं तरी आपलं संपूर्ण लक्ष त्या ध्वनीची जाणीव वेधून घेते. आपण विश्व व्यापून स्थित असलेली शांतता आहोत याचं आपल्याला विस्मरण होतं, आपण भावनिक कल्लोळात सापडून संपूर्ण स्वास्थ्य गमावून बसतो!

संवाद ही आपली प्रत्येक क्षणाची गरज आहे, बोलताना आपण इतके इन्वॉल्व होतो की मन या उपकरणातून आपण बोलतोय असं न वाटता आपणच बोलतोय असं वाटायला लागतं, म्हणजे शरीर चालतांना आपल्याला आपणच चालतोय जसं वाटतं तसं होतं, आपल्या अविचल स्थितीचं विस्मरण होतं. शांतता आणि ध्वनी यातला बॅलन्स हरवतो, शांततेला आपणच बोलतोय असा भास होतो! आपल्याला स्वतःचं विस्मरण होतं! मनाच्या संवादानी आपली संपूर्ण चित्तदशा व्यापल्यानी आपण ध्वनीरूप होतो, आपण निरव शांतता आहोत, आपल्यावर ध्वनीचा कोणताही परिणाम होत नाही याचं आपल्याला विस्मरण होतं!

समाधीला निसर्गदत्त महाराजांनी 'शुद्ध जाणीव' म्हटलंय, काय कारण असेल त्याचं? समाधी ही जाणीवेनि कोणतंही रूप धारण करण्यापूर्वीची स्थिती आहे, निराकार ही शुद्ध जाणीव आहे. आध्यात्मिक दृष्टीनं जाणीव तीनच रूपं घेऊ शकते, एकः शारीरिक संवेदना, दोनः दृष्य, किंवा तीन: ध्वनी. आपण जाणीवेनं कोणतंही रूप घेण्यापूर्वीची स्थिती आहोत, याला समाधी म्हटलंय!

मी लिहिलेली एकेक गोष्ट पुन्हा पुन्हा वाचा तुम्ही स्वतःप्रत याल, तुम्ही समाधी या शांत, सर्वकालीन आणि अविचल स्थितीशी, तुमच्या स्वरूपाशी कनेक्ट व्हाल, ट्राय!

संजय

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १

 मेल : दुवा क्र. २