५७. बोध

अस्पर्शित या लेखाविषयी एका साधकानं मेलवर दोन सुरेख प्रश्न पाठवलेत, त्याची उत्तरं तुम्हा सर्वांना उपयोगी होतील म्हणून हा लेख.

मन या मानवी जीवनातल्या कमालीचं महत्त्व असणाऱ्या विषयावर अनेक दिग्गजांचं अनंत लेखन झालं असेल पण अत्यंत कौशल्यानं मनाच्या साऱ्या साम्राज्याला शह दिलाय, अत्यंत मन:पूर्वक वाचा.

________________________________________

१) आपण (निराकार जाणीव) जी कधीही बोलत नाही आणि मन जे सतत बोलत असतं त्यात फरक कसा करावा?

२) स्थिरत्व, अव्यक्तता आणि मौन या गोष्टी मनामार्फत (मेंदूमार्फत) रुजवाव्या लागतील का? यात मनाचं विभाजन होऊन एक मन दुसऱ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न तर करत नाही? जर मानाचं असं विभाजन होत असेल तर ते कसं टाळावं? कारण मी जर कधी बोलतच नाही आणि नेहमी मनच बोलतंय तर मनच मनाला समजावण्याचा प्रयत्न करतंय का?

कृपया मार्गदर्शन करावे

_________________________ 

= १) मन आणि आपण यातला साधा फरक म्हणजे बोलणं आणि ऐकणं. मन फक्त बोलू शकतं, ऐकू शकत नाही; आपण (स्वरूपानं मौन असलो तरी) ऐकू शकतो आणि मनाच्या माध्यमातून बोलूही शकतो.

तुम्ही मनाचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करा, ज्या क्षणी मन बोलतंय हे तुमच्या लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही मनापासून वेगळे झालेले असाल.

जसं शरीराशी आपलं तादात्म्य हालचालीमुळे आहे, म्हणजे शरीर चालतं आणि आपल्याला वाटतं आपणच चालतोय, तसं मनाशी तादात्म्य हरघडी होणाऱ्या संवादामुळे आहे, मन बोलतं आणि आपल्याला वाटतं आपणच बोलतोय.

ऐकणारा नसेल तर बोलणं कसं ऐकू येईल? या ऐकणाऱ्याचं (आपलं) बोलणाऱ्याशी (मनाशी) असं काही तादात्म्य झालंय की ऐकणारा स्वत:ला विसरलाय.

तुम्ही स्वत: बोलताना देखील स्वत:चं बोलणं ऐकायचा सराव करा कारण बोलणं हा प्रकट झालेला संवाद आहे आणि विचार हे अप्रकट असलेलं बोलणं आहे पण प्रत्येक संवादात ऐकणारा हजर हवाच, या ऐकणाऱ्याचं तुम्हाला भान येईल आणि त्या भानासरशी तुम्हाला आपलं मनापासूनचं वेगळेपण जाणवेल.

________________________

माझं लेखन तुम्हाला मनापासून वेगळं करेल. आता या क्षणी बघा, तुमच्या समोर स्क्रीन आहे, मन आत वाचतंय, शब्द उमटतायत आणि ज्याला बोध होतोय ते तुम्ही आहात, या ट्रायोची दखल घ्या, हे लेखन सरळ तुम्हाला स्वत:प्रत आणेल.

कुणी जर प्रत्येक वाक्यावर विचार करायला लागलं, प्रत्येक वाक्याची शहानिशा करायला लागलं तर मग तो माझं लेखन वाचत नाहीये, तो त्याचे विचार मध्ये आणून अर्थ काढायचा प्रयत्न करतोय, यात त्याची स्मृती त्याचं अवधान वेधेल, त्याला स्वत:चा विसर पडेल, आता बोध अशक्य आहे. मग असा कुणी निष्कारण तपशिलात व्यग्र होईल, गुगल सर्च करेल, इतके साधे सोपे शब्द असताना डिक्शनरी उघडून शब्दाचे अर्थ लावायला लागेल आणि मग त्याला मी काय म्हणतोय ते समजणार नाही. अनेकांचे विधायक प्रतिसाद बघून तो व्यथित होईल आणि मग एकतर तिरकस प्रतिसाद देईल किंवा मग शब्दच्छल करत बसेल.

__________________________

२) >स्थिरत्व, अव्यक्तता आणि मौन या गोष्टी मनामार्फत (मेंदूमार्फत) रुजवाव्या लागतील का?

= नाही, रुजवणं आणि उलगडा यात जामिनासमानाचा फरक आहे आणि तोच फरक सांख्ययोग आणि कोणत्याही क्रियायोगात आहे.

ओशोंचं एक महान वाक्य आहे, ‘समझकी कमी साधनासे पूरी करनी पडती है’.

याचा अर्थ आपण मूर्ख आहोत असा नाही तर अजून उलगडा होत नाहीये, पुन्हा एकदा शांतपणे वाचायला हवं. पण लोकांची मानसिकता मजेशीर आहे, त्यांना वाटतं आपल्याला समजत नाही म्हणजे आपल्याकडे बुद्धिमत्ता कमीये, सांगणारा ग्रेट आहे, तो पूर्वजन्मीचं सुकृत घेऊन आलाय. ही दुसऱ्याला ग्रेट मानण्याची मानसिकता सुप्त अवस्थेतली जेलसी असते मग कुणी तरी नुसती हूल उठवायचा अवकाश की सांगणारा अहंकारी आहे असं ठरवून मोकळं व्हायचं की विषय संपला! पुन्हा आपली साधना,  नामस्मरण आणि तीर्थयात्रा सुरू! या मानसिकतेनं बोध दुर्लभ होतो. माझ्याकडे काहीही विशेष नाही, खरं तर तुम्हाला जे माहितीये तेच मी सांगतोय आणि त्यातनं तुम्हाला स्वत:चं झालेलं विस्मरण दूर करतोय.

>यात मनाचं विभाजन होऊन एक मन दुसऱ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न तर करत नाही? जर मानाचं असं विभाजन होत असेल तर ते कसं टाळावं? कारण मी जर कधी बोलतच नाही आणि नेहमी मनच बोलतंय तर मनच मनाला समजावण्याचा प्रयत्न करतंय का?

= तुमची खात्री पटत नाहीये म्हणून तुम्हाला मनाचा एक भाग दुसऱ्याला पटवून देतोय असं वाटतंय.

आणि त्याही पेक्षा मजा म्हणजे तुम्ही तुमच्या बोधावर मनाची मोहोर मागताय! तुम्हाला बोध झालाय की नाही हे तुम्ही मनाच्या इशाऱ्यावर ठरवताय.

ट्राय टू अंडरस्टँड धिस, जर वेळ भास आहे हा मला उलगडा झाला तर मी कुणाला कशाला जुमानीन? आय वोंट बॉदर इव्हन इफ आय हॅव टू फेस  आईन्स्टाईन ऑर स्टिफन हॉकिंग्ज!

माझा बोध एका बाजूला आणि ओशोंची सगळी रत्नजडित घड्याळं एका बाजूला, काय फरक पडतो? माझा बोध माझं आचरण होतो, मी जगण्यासाठी वेळ हा रेफरन्सच ठेवत नाही तर काय मूल्य आहे रत्नजडित घड्याळाच? मी जाणीवेनं जगायला लागतो, अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला लागतो.

जीजस म्हणतो ‘देअर वील बी नो टाइम इन माय किंगडम ऑफ गॉड’

वेळ  भास आहे हे समजल्यावर व्हाय शूड आय वेट फॉर योर किंगडम ऑफ गॉड? तुमच्या लक्षात आलं? वाक्य दिसायला साजरं आहे पण ही इज अगेन मेकिंग टाइम रिलेवंट फॉर द किंगडम टू कम! 

डोंट टेल मी मॅन, आय एम ऑलरेडी इन द किंगडम ऑफ गॉड! वेळ भास आहे या बोधानं येणारं स्वास्थ्यच किंगडम ऑफ गॉड आहे. 

‘इज’च्या ऐवजी ‘वील’ आला की पुन्हा वाट पाहणं आलं, कशाला हवं ‘संभवामी युगेयुगे’? कशाला हवा दिलासा? कुणाच्या कृपावर्षावानं कुणी सिद्ध होईल ही आशा वृथा आहे, तुम्हाला स्वत:ची जवाबदारी स्वत:वर घ्यावी लागते. यू वील वेट फॉर द गोदो अँड ही वोंट कम. एकतर समजलं किंवा नाही समजलं, मध्ये काही नाहीये.

______________________________________

>जर मानाचं असं विभाजन होत असेल तर ते कसं टाळावं? कारण मी जर कधी बोलतच नाही आणि नेहमी मनच बोलतंय तर मनच मनाला समजावण्याचा प्रयत्न करतंय का?

= तुम्हाला बोध होत नाहीये त्यामुळे मन तुमचं विभाजन करतंय, हे विभाजन भासमय आहे कारण निराकार एक आहे, कोणत्याही प्रकटीकरणानं जर तो विभक्त होत नाही तर साध्या विचारानं कसा होईल?

माझ्या लेखनाचं जर काही कर्तृत्व असेल तर ते इतकंच की विभाजन करणाऱ्या तलवारीनं, शब्द आणि विचारांनी, मी तुम्हाला एकसंध करतोय. बोध ही एकमेव जादू माझ्याकडे आहे आणि तिचा भेद जगातली कोणतीही तलवार करू शकत नाही.

मन मनाला समजावू शकत नाही कारण प्रत्येक विचार विरोधी विचाराला जन्म देतो.

ओशो म्हणतात ‘मैं शब्दोंका इस्तेमाल इसलीये करता हूं ताकी तुम शांत हो जाओ’ ओशो अनंत विषयांवर अनंत बोलले, त्यांची प्रशंसा करणारे करोडो आहेत आणि माझ्या आकलनाचं श्रेय निर्विवादपणे त्यांना आहे; पण शब्दांची दुनिया मोहमयी आहे आणि त्यातून नेमकं सार शोधणारा दुर्लभ आहे त्यामुळे एका लेखात फारफार तर सहाशे शब्द लिहून मी सोहळा संपन्न करतो.

अध्यात्म कदाचित मी त्यांच्या पेक्षाही सोपं केलंय;  आश्रम नाही, मरून रोब नाही, संन्यास नाही, इतकंच काय आपण एकमेकांना बघूही शकत नाही, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी! आणि मी तुम्हाला बोध देण्याचा प्रयत्न करतोय, निव्वळ बोधानं तुम्ही शांत व्हाल हा माझा विश्वास आहे.

तुम्ही माझा बोध आत्मसात करा, मन तुम्हाला विचलित करू शकणार नाही.

संजय

मेल : दुवा क्र. १