समज गैरसमज

           बऱ्याच वेळा कोणत्याही  क्षेत्रातील एक महान व्यक्ती दुसऱ्या तितक्याच महान व्यक्तीविषयी अकारण गैरसमज पसरवण्यास कारणीभूत ठरते. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सारेगमप च्या एका भागात अशीच मल्लिनाथी करताना सी . रामचंद्र तथा अण्णा यांच्याविषयी त्याना " अनारकली" चित्रपटातील " ये जिंदगी उसीकी है "  या गाण्यास चाल सुचत नव्हती त्यावेळी दुसरे तेवढेच दिग्गज संगीतकार रोशन तेथे आले असता त्यानी त्याना बोलता बोलता ती चाल बनवून दिली असा उल्लेख केला. त्यावर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला कारण स्वतः अण्णासाहेबांनी "माझ्या जीवनाची सरगम " या पुस्तकात आपल्याला ही चाल "शारदा" या गो. ब. देवल यांच्या नाटकातील  " मूर्तिमंत भीती  उभी"  या पदाच्या चालीवरून सुचली असे लिहिले आहे. खरी हकीकत मात्र अगदी वेगळीच आहे असे श्री. इसाक मुजावर यांनी आपल्या हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ  या पुस्तकात नमूद केले आहे‌ . इसाक मुजावर हे सिनेजगतातील  जाणकार पत्रकार  समजले  जातात.
      त्यानी लिहिल्याप्रमाणे  प्रत्यक्षात या दोनही चाली अगदीच वेगळ्या आहेत त्यामुळे पुस्तकातील हा उल्लेख वाचून नाट्यसंगीताचे काही जाणकार अण्णांकडे गेले व त्याना विचारू लागले , " आपण शारदा नाटक पाहिले आहे का आणि हे गीत ऐकले आहे का ? " यावर अण्णांनी सरळ सरळ " मी नाटक पाहिले नाही पण माझे वडील त्या नाटकातील हे गाणे गात असत ते मी त्यांच्या तोंडून ऐकले आहे " असे उत्तर दिले.तेव्हां जाणकारांनी अण्णांना म्हटले  " तसे असेल तर ती  चाल तुम्हाला कळलीच  नाही  असे म्हणावे लागेल." व त्यांनी ते गाणे खरे कसे आहे ते अण्णांना  म्हणून दाखवले यावर  अण्णांनीही कबूल केले की  " मूर्तिमंत भीती उभी " या गाण्याची  चाल व "जिंदगी ---" या गाण्याची चाल यात बराच  फरक आहे. असे होण्याचे कारण असे होते की अण्णांचे वडील हे केवळ हौशी गायक(आजच्या भाषेत  बाथरूम  सिंगर)  होते व त्यांना फारशी गोड गळ्याची देणगी नव्हती त्यामुळे आपल्याला जमेल त्या पद्धतीने ते नाटकातील पदे गात असत व त्यांनी तश्या पद्धतीने म्हटलेल्या चालीवरून अण्णांना ही चाल स्फुरली होती. म्हणूनच मूळ नाट्यपदाच्या चालीहून ती वेगळीच होती.
      के. एल. सेहगल या सुराच्या बादशहा विषयी बऱ्याच जणांचा असा समज होता (आणि त्यात बरेच तथ्यही होते)की ते मद्याच्या आहारी गेलेले होते इतके की त्याना मद्य घेतल्याशिवाय गाणे गाताच येत नसे व ही समजूत दृढ व्हायला कारणीभूत झाली प्रख्यात संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी मारलेली बढाई . त्यांनी "शाहजहां " या चित्रपटासाठी सेहेगल यांचेकडून मद्य न पिता गाणी म्हणून घेतली व तसा तो एकमेव चित्रपट होता अशी   बढाई ते मारत शिवाय सेहेगल यांना मद्य पिण्यापासून निवृत्त करायला आपणच कारणीभूत ठरलो असेही ते सांगत.
       कुंदनलाल सेहेगल यांनाही लोकांची आपल्याविषयी असलेली ही (गैर) समजूत माहीत होती. पण त्याचबरोबर  आपल्या  गायनप्रभुत्वाविषयी   सार्थ आत्मविश्वासही होता. म्हणूनच " भक्त सूरदास " या ज्ञानदत्त यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील " नैनहीनको राह दिखा प्रभु" या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या प्रसंगी त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या त्यावेळचे प्रसिद्ध खलनायक के. एन. सिंग (उदा : आवारामधील जग्गा डाकू) या त्यांच्या   नातेवाइक कलावंतास त्यांच्या  तोंडाचा वास घेण्यास सांगितले व के. एन. सिंग यांनी तसे केले व सहगल यानी मद्यप्राशन केले नाही असा निर्वाळा दिला. त्यानंतर त्या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले व ते अगदी व्यवस्थित पार पडले अशी आठवण खुद्द के. एन‌. सिंग यांनी सांगितल्याचे  इसाक मुजावर यांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या व भक्त सूरदास चित्रपट ज्या   रणजित स्टुडिओत चित्रित केला गेला त्याच्या  एक संचालिका  गोहर मामाजीवाला यांनी खूष हो ऊन सेहेगल यांना त्याबद्दल शिवास रीगलची एक बाटली बक्षीस देऊन घरी जाऊन तिचा आस्वाद घेण्यास सांगितले पण सेहेगल यांनी घरी जाण्याची वाट का पहायची म्हणून   तिथेच ती सर्वांसमवेत संपवून टाकली असेही त्या आठवणीत नमूद केले आहे