वागलो इतका न काटेकोर मी!

वागलो इतका न काटेकोर मी!
त्यामुळे जगलो असा बिनघोर मी!!

वेष साधूचा न मी केला कधी;
त्यामुळे ठरलो अखेरी चोर मी!

काय शंकेचीच आहे पाल मी?
वाटतो दुनियेस शंकेखोर मी!

व्हायची तुलना न माझी अन् तुझी;
जेवढा तू थोर तितका पोर मी!

टाक तू विश्वास, दे भारे शिरी...
व्हायचो नाही कधी शिरजोर मी!

लागल्या माझ्याच पागोळ्या पडू....
पावसाची सर जणू घनघोर मी!

वीज तू आहेस आकाशातली!
अन् धरेवरचा असे मनमोर मी!!

मी ठरवतो ईद आहे की, नसे;
होय, चंद्राचीच आहे कोर मी!

वाटला गेलो जगाला केवढा!
राहिलो आता पहा चतकोर मी!!

चीड येते, राग येतो या जगा...
काय आहे एवढा चिडखोर मी?

माजती तंटेबखेडे चौंकडे...
सांग इतका काय तंटेखोर मी?

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१