वृत्त गझलेचे उचलले, अन् गझल झाली!

प्रोफ़ेसरांच्या गझलेतले काव्य आम्ही रिचवले, अन् हझल झाली...

हझल

वृत्त गझलेचे उचलले, अन् गझल झाली!
अर्थ शेरांचा बिघडला, अन् हझल झाली!!

केवढ्या सहजीच आली चाल हाताशी;
काफिया नुसता मिळवला, अन् हझल झाली!

चिंतनाची बात नाही, मौत प्रतिभेची!
कळफलक नुसता बडवला, अन् हझल झाली!!

दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!
मीच केली मम स्तुती हो, अन् हझल झाली!!

ते गझलसम्राट अन् मी एक हा कवडा!
मी गझल त्यांची फाडिली, अन् हझल झाली!!

खर्चिली मी खेचण्यासाठीच ही शाई
कंड मी माझी शमवली, अन् हझल झाली!

अडकली कोठेच नाही आमुची गाडी.......
काव्य हे फुकटी मिळाले, अन्  हझल झाली!

काय 'चैत्या' ही तुझी का रीत लिहिण्याची?
चौर्य अंगांगी मुरवले, अन् हझल झाली!!

-------प्रा. हझला भरपूरकर
दररोजी (हझला) पाडूया महाविद्यालय.