सोनेरी संध्याकाळ

पंचतारांकित हॉटेलमधला आपल्या ७५ व्या वाढदिवसाच्या समारंभानंतर मालुताई घरी परतल्या. उंची कपड्यात मिरवण्याखेरीज त्यांना दुसरं काहीच करायचं नव्हतं. तरी देखील त्यांना थकल्यासारखं वाटत होतं. आपण का थकलो त्यांचं त्यांनाच कळेना. त्यांना हॉलमध्येही चालावं लागलं नाही. जरूर नसताना मुलांनी त्यांच्यासाठी व्हीलचेअर आणली होती. त्यात बसून कंटाळा आला की त्या उठून उभ्या राहायच्या. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांना त्यांना व्हीलचेअरवरून स्वत:चं स्वत: उठून उभं राहताना नि चालताना पाह्यलं की आश्चर्य वाटायचं. मग मालुताईंच्या लक्षात आलं की आपल्याला उंची कपड्यांचं वजन अंगावर वागवायचे आणि फोटो काढताना ओठावर हसू आणण्याचे श्रम पडलेत. त्या स्वत:शीच हसल्या. सुख दुखतंय आपल्याला, त्यांच्या मनात आलं. 
तसं पाह्यलं तर त्यांच्या लग्नालाही यंदा पन्नास वर्ष झाली. पण हे त्यांच्याशिवाय घरातल्या कोणालाच ठाऊक नाही. ठाऊक नाही म्हणण्यापेक्षा लक्षात आलं नाही असंच म्हणायला पाहिजे. कसं लक्षात येणार ? गोपाळरावांना जाऊन वीस वर्षं झाली. एवढा खंड पडल्यावर इतर कोणाच्या लक्षात राहणं कठीणच. मालुताईंना मात्र गोपाळरावांच्या उमेदीच्या काळातले व त्या नंतरचे दिवस पराकोटीच्या विरोधाभासामुळे चांगलेच लक्षात राह्यले.  
कॉलेजात टेनिस कोर्टावर गोपाळरावांशी झालेल्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं नि नंतर त्याची परिणती लग्नात झाली. माप ओलांडून मालुताईंनी मुंबईत प्राइम लोकेशनवर असलेल्या घरात प्रवेश केला. तो फ्लॅट होता. लोकेशनच्या मानाने खूप मोठा म्हणण्यासारखा. अर्थात तो त्यांच्या इंदूरच्या वाड्याइतका मोठा नव्हता. त्यात गोपाळरावांबरोबर त्यांचे वडील आणि वडीलबंधूंचं कुटुंबही राहायचं. त्यांना दोन मुलं होती. मालूताईंचा लग्नाचा पहिला वाढदिवस त्यांनी दोघांनीच पंचतारांकित हॉटेलात कॅंडल लाइट डिनर घेऊन साजरा केला होता. आत्तासारखा डीजे आणून त्याचा सार्वजनिक समारंभ करण्याची पद्धत त्या काळी  नव्हती. 
पण नंतर मुलं झाली नि व्यवहारी जगाचे काटे टोचू लागले. त्यावेळी त्यांचं अविभक्त कुटुंब होतं. गोपाळरावांचे उत्पन्न अनिश्चित नि तुटपुंजे पण त्यांचे मोठे भाऊ खोऱ्याने पैसा ओढत. त्यांचा स्वभाव गोपाळरावांच्या बरोब्बर विरुद्ध होता. घरखर्च बहुतांशी भावाच्या पैशांवर, व गोपाळरावांच्या वडिलांच्या पेन्शनवर चाले. वडील होते तोपर्यंत कशाची ददात नव्हती. तरीही घरचा कारभार हिशोबीपणाने चाले. सासूबाई जिवंत नसल्यामुळे मोठ्या जावेच्या हातात घरातली सत्ता होती. मुलांचे लाड करण्यात उघड उघड डावं उजवं होई. सुरवाती सुरवातीला मुलं मालुताईंकडे तक्रार करत. मालुताईंचा चेहरा उतरे. दाद तरी कशी मागणार असं त्यांना वाटे. पुढे पुढे आपण हट्ट केला की आईचा चेहरा उतरतो हे मोठ्या मुलाच्या लक्षात आलं. त्यांनी हट्ट करणं बंद केलं. त्याला पाहून दुसऱ्या मुलांनीही तसंच वागायला सुरवात केली. त्यांनी मालुताई आणखीनच कष्टी व्हायच्या. मालुताईंच्या मनाला जखमा होत होत्या नि मुलं दिवसेंदिवस समजूतदार होत होती. 
गोपाळराव पेश्याने सल्लागार होते. कर सल्लागार. तसं पाह्यलं तर धो धो पैसा मिळवून देणारी लाइन. पण गोपाळरावांची तत्त्वं आड यायची. करबुडवा सल्ला देणार नाही. सरकारला फसवणार नाही. मी योग्य तीच फी मागेन त्यामुळे तेवढी फी मिळाली तरच मी काम करीन. एखाद्याला खरच परवडत नसेल तर फुकट सल्ला देऊन त्याची केस लढवेन इ. इ. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचं व सखोल ज्ञानाचं सगळीकडे खूप कौतुक होतं. पण त्याचं म्हणावं तसं पैशात रूपांतर होत नव्हतं.   
वडिलांच्या पश्चात काही पैसा आणि राहतं घर गोपाळरावांना मिळालं. त्यांच्या मोठ्या भावाने दुसरीकडे जास्त पॉश वस्तीत मोठ्ठं घर घेतलं. आता आपले दिवस पालटतील असं मालुताईंना वाटलं. भरीला त्यांनी लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून पूजापाठादि दैवी उपायही केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गोपाळरावांचा या सगळ्यावर विश्वास नव्हता. त्यांना या अरिष्टांचं मूळ आपल्या तडजोड न करणाऱ्या अव्यवहारी स्वभावात आहे हे माहीत होते. पण त्यांनी बायकोला कधी दुखावलं नाही. अर्थात त्यांना बदलताही आलं नाही. 
घर चालवायला जेवढा पैसा खर्च होत होता तेवढ्या प्रमाणात आवक नव्हती. मालुताई अगदी मेटाकुटीला यायच्या. मध्येच कुठल्यातरी कामात गोपाळरावांना वाहवा मिळायची व मालुताईंना वास्तवाचा थोडा वेळ विसर पडायचा. पुन्हा येरे माझ्या मागल्या ! 
मुलांची महागडी शालेय शिक्षणं पुरी करण्यासाठी जुन्या सामानाची, घरातल्या चांदीच्या भांड्याकुंड्यांची, शिसवी फर्निचरची वीकटीक होऊ लागली. घर खूप मोठं असल्यामुळे नि मुंबईसारख्या शहरात जागेची टंचाई असल्यामुळे एक भाग भाड्यानेही दिला होता. एक वेळ अशी आली की राहतं घर विकून उपनगरात कुठेतरी लहानशा भाड्याच्या घरात राहावं असा प्रस्ताव गोपाळरावांनी मांडला. पण मालुताईंनी त्याला साफ मोडता घातला. त्यांना मुंबईसारख्या शहरातले मोठ्ठे घर फार मौल्यवान वाटत होते. आज ना उद्या दिवस बदलतील असा त्यांना विश्वास होता. उलट आपल्याला घरच्यांनी लग्नात घातलेले दागिने मोडायचा पर्याय सुचवला. सर्व स्वाभिमान बाजूला ठेवून गोपाळरावानी अनिच्छेनेच त्याला होकार दिला.    
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येणारा क्षण त्यांच्या मोठ्या मुलाच्या आयुष्यातही आला.  उच्चशिक्षणाची दिशा ठरवण्याचा. त्यांनी अगोदरच भरपूर पैसा मिळवून देणारे शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं. पण त्याला हवं असलेलं शिक्षण परवडणारं नाही असं जेव्हा मालुताईंनी नि गोपाळरावांनी त्याला आडून आडून सांगितलं त्यावेळी नोकरी करून घेता येण्यासारखं शिक्षण घेण्याखेरीज पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं नि त्यांनी निर्णय घेतला; सकाळी कॉलेज नि त्यानंतर दिवसभर नोकरी. त्याला आपल्यामुळे फार मोठी तडजोड करावी लागत्ये हे दोघांनाही माहीत होतं. पुढे बराच काळ त्याचा हिरमुसला चेहरा डोळ्यासमोर येऊन दोघांनाही अपराधी वाटायचं. कधीकधी दमून भागून रात्री उशीरा घरी आल्यावर त्याच्या चिडक्या बोलण्यातूनही ते जाणवायचं. त्याचा रोख गोपाळरावांकडे असायचा. ते गप्प राहायचे पण मालुताईंना फार वाईट वाटायचं.       
हळूहळू परिस्थिती सावरू लागली. मालूताईंच्या पुढचा रोजचा आज मी काय करून घालू हा प्रश्न सुटला. नोकरी करता करता मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्यांनी धंद्यातले बारकावे शिकून घेतले नि अर्धवेळ धंदा सुरू केला.  त्यात जम बसल्यावर त्यांनी नोकरी सोडून दिली. धाकट्या भावंडांची शिक्षणं त्यांच्या मनाप्रमाणे व्यवस्थित चालू राहिली. त्यांना कुठलीही तडजोड करावी लागली नाही.  
पाचसहा वर्षं लोटली. आर्थिक सुबत्ता आली. मोठ्या मुलाचा स्वभावही निवळला. सर्वांची लग्नं झाली. धाकटा मुलगा बायकोला घेऊन परदेशात स्थायिक झाला. मुलीने प्रेमविवाह केला पण डोळे उघडे ठेवून. ती सुस्थळी पडली. मालुताईंचं नशीब तिच्या वाट्याला आलं नाही. मालुताईंना आनंद वाटला. एकदा गप्पा रंगात आल्या असताना मालूताई अभावितपणे तसं बोलून गेल्या. गोपाळराव जवळच होते. लक्षात आल्यावर मालुताईंनी डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाह्यलं. त्याच क्षणी गोपाळरावांचंही त्यांच्याकडे लक्ष गेलं नि त्या ओशाळल्या.  वास्तविक दुसऱ्या मुलाशी ठरलेले लग्न मोडून तिनी आपल्याला हव्या त्या मुलाशी लग्न केलं होतं. तरीही गोपाळराव खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले होते नि त्यांनीच तो नकार मुलाच्या घरी कळवला होता. ते काही बोलले नाहीत. पण आपण नवऱ्याला दुखावायला नको होतं असं त्यांना वाटलं. तो प्रसंग आठवला की मालुताई अस्वस्थ व्हायच्या. 
मोठा मुलगा समजूतदारपणे वागत होता. पण  गोपाळराव केव्हाच सायडिंगला पडल्यासारखे झाले होते. त्यांचं धूम्रपान वाढत चाललं. ते कुणाशी फारसं बोलत नसत. त्यांचं मत कोणी विचारत नव्हतं. त्यांनाही पैशासाठी कुणापुढे हात पसरायला संकोच वाटे. मालुताईच समजून उमजून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करीत. सिगरेट संपत आल्या की ते विड्या ओढत. एकदा मुलीने ते पाह्यलं नि मोठ्या भावाच्या कानावर घातलं. त्याला बरं वाटलं नाही. त्यांनी गोपाळरावाना सरळ सांगितलं, विड्या ओढायच्या नाहीत. तुम्हाला लागतील तितकी सिगरेटची पाकिटं मिळतील. त्यांनी मालुताईंना लक्ष ठेवायला सांगितलं नि त्यासाठी त्यांना तो पैसे देऊन ठेवू लागला. मग मालुताई सिगरेट संपत आल्यावर स्वत: नवीन पाकिटांची व्यवस्था करायच्या. 
सर्व काही स्थिरस्थावर होत असल्याचं गोपाळरावांना जाणवत होतं. मुलांच्या वागणुकीत बदल होत होता. सर्वजण त्यांना जपत होते. त्यांना लागेल असं चुकूनही कोणी बोलत नसे. 
आयुष्याची सोनेरी संध्याकाळ म्हणता येईल इतकं घरातलं वातावरण चांगलं होतं. गोपाळराव मात्र त्यात अलिप्तपणे वावरत. त्यांना आपण परक्या वातावरणात आहोत असं वाटे. एकदा मालुताईंनी त्यांना त्याबद्दल छेडलं असता, स्वत:शीच बोलल्यासारखं ते म्हणाले, "माणूस स्वखुशीने मरायला तयार होत असावा. त्याला भोवतालाचं जग आपलं नाही, काहीतरी वेगळं आहे असं वाटायला लागतं ना तेव्हा." 
दम्याचा जोराचा हल्ला झाल्यावर त्यांना हॉस्पिटलात नेण्यात आलं. मालुताई सोबतीला राहायच्या. जमेल तितका वेळ मुलं येऊन जात. खर्चाला, शुश्रूषेला कुणी काही कमी पडू देत नव्हतं. पण गोपाळरावांना उपचार फारसे लागू पडत नव्हते. बोलणंही अगदी मोजकं असे. मालुताई त्यांचा हात हातात घेऊन बसत. त्या सतत काही ना काही बोलत राहत. गोपाळराव फक्त मान हालवत. त्यांना गोपाळरावांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना दिसे. नशिबाने साथ दिली नाही त्याला आपण काय करणार म्हणून मालुताई त्यांना समजवायच्या.   
अशातच एक दिवस गोपाळरावांचा वाढदिवस आला. त्या दिवशी त्यांना खूप बरं वाटत होतं. मालुताईंना आनंद झाला. सुनेने त्यांच्यासाठी खास डबा पाठवला. त्यात गोपाळरावांची आवडती शेवयांची खीर होती. आजारपणात त्यांचा आहार जेमतेमच होता तरी गोपाळरावांनी आवर्जून चांगली चार चमचे खीर खाल्ली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. निजण्यापूर्वी मालुताईंना ते म्हणाले, तू आज एक पिक्चर पाहून ये. मी आता खूप बरा आहे. मालूताईंना तिथून हालावेसे वाटत नव्हते. पण गोपाळरावांनी आग्रहच धरला नी वर आल्यावर मला त्याची स्टोरी सांग म्हणून सूचनाही केली. 
अनिच्छेनेच त्या दिवशी मालुताई सिनेमाला गेल्या. स्टोरी नीट सांगता यावी म्हणून पिक्चर एन्जॉयही केला. संध्याकाळच्या सुमारास घरी आल्या. सुनेने केलेला डबा घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जाणार होत्या. त्यांनी बेल वाजवली पण दार उघडायला कोणी आलं नाही. आत फोन वाजत असल्याचं त्यांना ऐकू आलं. बराच वेळ वाजून फोन बंद झाला. तेव्हा घरात कोणी नसावं असं त्यांना वाटलं. त्या आपल्या जवळच्या  किल्लीने कुलूप उघडू लागल्या. पुन्हा फोन वाजला. दरवाजा उघडून मालुताई घाईघाईने फोनजवळ पोचल्या. तोपर्यंत फोन बंद झाला. महत्त्वाचं असेल तर पुन्हा फोन वाजेलच असा विचार करून त्या वळल्या नी पुन्हा फोन वाजला. "नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार" त्यांच्या मनात आलं. पण महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलमधून हे मनात आल्यावर त्या चरकल्या. भीतभीतच त्यांनी फोन उचलला नी हॅलो म्हटलं. पलीकडून चिडक्या स्वरात त्यांचा धाकटा दीर बोलत होता, "कुठे होतात इतका वेळ? आता बॉडी ताब्यात घ्यायला या लवकर". काय बोलावं मालुताईंना सुचेना. "म्हणजे?" असं विचारीपर्यंत फोन बंदही झाला होता. मालुताई सुन्न झाल्या. त्यांनी फोन खाली ठेवला. मुलगा, सून कुठे आहेत त्यांच्या लक्षात येईना. काही झालं तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब जायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. इतक्यात पुन्हा फोन वाजला. त्यांना वाटलं पुन्हा धाकट्या दिराचाच आहे. त्याला काय सांगायचं यासाठी त्यांनी शब्द गोळा केले नी फोन उचलला. तो मुलाचा होता. मुलगा रडवेल्या आवाजात म्हणाला, "आई, बाबा गेले. तू आत्ताच आलीस का?" मालुताई दु:खानी नि शरमेने अर्धमेल्या झाल्या होत्या. त्या काही बोलणार इतक्यात मुलगा पुन्हा म्हणाला, "तू इथे येऊ नकोस. आम्ही बाबांना घरी आणतो आहोत". 
बेल वाजली नि मालुताईंनी स्ट्रेचरवरून आणलेल्या मृत पतीसाठी दार उघडलं. गोपाळरावांना हॉलमध्ये ठेवलं. धाकट्या दिराकडे पाहायचा त्यांना धीर झाला नाही. मालुताईंना हुंदके आवरत नव्हते. मुलगा आणि सून रडत रडत त्यांचं सांत्वन करत होते.             
जवळपास राहणारे नातेवाईक आणि मुलगी, जावई आल्यावर गोपाळरावांना उचलण्यात आलं. अखेरचा निरोप घेताना मालुताई म्हणत होत्या, "तुम्ही नका हो जाऊ माला सोडून. माझी काही तक्रार नाही". धाकट्या दिराने खालच्या मानेने त्यांना आधार देऊन बाजूला नेलं. त्याला सर्व कळलं होतं नि फोनवर चिडून बोलल्याबद्दल अपराधी वाटत होतं.  
समाचाराला येणारांची मात्र रीघ लागली. मालुताई सोडल्या तर सर्वांना गोपाळरावांचा लोकसंग्रह पाहून आश्चर्य वाटत होतं. मालुताई मात्र जवळजवळ प्रत्येकाला ओळखत होत्या. गोपाळरावांनी प्रत्येकाबद्दल त्यांना काही ना काही सांगितलेलं असायचं. पुढे रीतसर सगळे धार्मिक विधी यथायोग्य पार पडले. कावळाही  पिंड ठेवल्याठेवल्या शिवला.  मालुताईंची थोडी निराशाच झाली. त्यांना वाटलं होतं आपल्या काळजीमुळे गोपाळरावांचा आत्मा कावळ्याला पिंडाच्या आसपास येऊ देणार नाही. मग मुलांपैकी कुणीतरी हुंदके देत आश्वासन देईल आणि गोपाळराव बाजूला होतील नि मग कावळा शिवेल. पण दिवंगत गोपाळरावांना आपल्यापेक्षा आपली मुलंच त्यांच्या आईला जास्त सुखात ठेवतील असं वाटलं असावं नि ते कावळ्याच्या आड आले नसावेत.    
गोपाळरावांचे दिवस आटोपले नी सर्व व्यवहार पुन्हा नेहमींसारखे सुरू झाले. मालुताईंच्या आयुष्यात मात्र मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचा वेळ जाता जाईनासा झाला. घरात त्यांना द्यायला कोणापाशीच वेळ नव्हता. मधून मधून मुलगी भेटायला येई तेव्हढेच त्यांना बरे वाटे. पण त्यातही अलीकडे अलीकडे औपचारिकता येऊ लागली होती. नाही म्हणायला कल्याणला राहणारी मालुताईंची भाची मधूमधून, तिला मंत्रालयात काम असलं की त्यांना भेटायला यायची नी त्यांच्या मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. भाचीचा नवरा सुहास एक सरळमार्गी सरकारी अधिकारी होता. सर्वसामान्य परिस्थितीतून वर आला होता. भाचीला तो फारसा पसंत नव्हता पण आईवडिलांपुढे तिचं काही चाललं नाही. गोपाळराव नि मालुताई, दोघांना त्याचं फार कौतुक होतं. 
एकदा बोलता बोलता मालुताई सुहासरावांना म्हणाल्या, "ह्यांना सक्सेसच नाही मिळालं हो आयुष्यात. तुमचं मी पाहत्ये. सगळं कसं पद्धतशीर चाललंय. मुलंही व्यवस्थित मार्गाला लागल्येत. अर्थात आमचीही मुलं वाया गेली नाहीत म्हणा. पण त्यांच्या प्रगतीत आमचा काहीच वाटा नाही. त्यामुळे ते मुलांपासूनही लांब पडल्यासारखे झाले होते. त्याचंच वाईट वाटतंय." मालुताई गोपाळरावांचं अपयश ते आपलंही अपयश समजत होत्या. 
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर मुलांनी मालुताईंना विचारलं, "कार्यक्रम आवडला का?" "छान झाला" मालुताई तोंडभरून बोलल्या. 
"फक्त बाबांची कमी होती नाही का?" मुलगा आपणहून म्हणाला. 
मालुताईंना बरं वाटलं. जिवंतपणी उपेक्षा केली तरी मुलगा वडलांना विसरला नव्हता. 
"ते असते तर यावर्षी आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करता आला असता." मालुताई सहज म्हणून बोलून गेल्या. 
"काय पन्नास वर्ष झाली असती तुमच्या लग्नाला?" मुलांनी आश्चर्याने विचारलं.
मालुताईनी मानेनेच हो म्हटलं. 
"ठरलं तर मग" मुलगा उत्साहाने म्हणाला. 
"काय?" मालुताईनी व सुनेने एकदम विचारलं. 
"तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचा" मुलांनी जाहीर केलं. 
"अरे पण हे नसताना?" 
"त्याला काय झालं? आपल्या सगळ्यांच्या मनात तर ते आहेत ना? वर आपण त्यांच्या जागी त्यांचा फोटो ठेवू." मुलगा म्हणाला. आणि पुढे काहीतरी आठवून स्वत:शीच बोलल्यासारखं म्हणाला, "पुअर फेलो. मी त्यांच्याशी फार रूडली वागलो."   
मालुताईंनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाह्यलं.  
काही दिवसांनी त्याच हॉटेलमध्ये एक लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. मालुताईंच्या बाजूला दिवंगत गोपाळरावांच्या जागी त्यांचा फुलसाइज फोटो ठेवण्यात आला.  
कार्यक्रम संपल्यावर मालुताई मुलाजवळ गेल्या नि त्याच्या दंडाला पकडून त्या म्हणाल्या, "फार छान केलंस बघ तू." 
आईच्या खांद्यावर हात ठेवत मुलगा म्हणाला, "तुला आवडलं ना? दरवर्षी आपण तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करू." 
"दरवर्षी नको. आता यापुढचा वाढदिवस आमच्या दोघांचा फोटोंनी ठेवावा लागेल त्यावेळी कर" मालुताई म्हणाल्या.  
तो वाढदिवस अजून यायचाय !