लागलास तू मला - आवडायला

लागलास तू मला - आवडायला
स्वप्न लागले जणू - सत्य व्हायला
रात्र रात्र मग कुठे - नीज यायला
लागलास तू जसा - आवडायला ।ध्रु।

कानगोष्ट गावभर - पसरु लागली
लपत मी फिरे, असो - ऊन/सावली
लोहशृंखला जणू - पडत पावली
नुपुर लागले परी - छुमछुमायला ।१।
लागलास तू जसा - आवडायला

गुपित नयनयुग्म हे - खोलु लागले
मन्मन तव चिंतनी - डोलु लागले
मूकपण पहा कसे - बोलु लागले
अधर गीत लागले - गुणगुणायला ।२।
लागलास तू जसा - आवडायला

पर्याय :

१. ह्या कडव्याचे भाषांतर स्वैर आहे. खालील पर्याय अधिक मूळ गाण्याप्रमाणे आहे -
गुपितभेद लोचनां - होउ लागले
मन्मनास डोलता - येउ लागले
मूकतेस बोलता - येउ लागले
अधर गीत लागले - गुणगुणायला ।२।
लागलास तू जसा - आवडायला


टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल :  भाषांतराची चाल मूळ गाण्याप्रमाणे नाही. भाषांतराचे वृत्त : गालगालगालगा - गालगालगा असे आहे. तरीही मूळ चालीतला स्वरक्रम ह्या भाषांतरासही थोडे फार पुढे मागे करून सहज लावता येतो. असा प्रयोग आपण मागेही एकदा येतसे माझी प्रिया येथे पाहिलेला आठवत असेलच  .

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. (ह्यावेळी भाषांतर अगदी काटेकोर न करता भावार्थाने केलेले आहे.) कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...आयला असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.