येतसे माझी प्रिया

पुष्पवृष्टी कर वसंता, येतसे माझी प्रिया
                      येतसे माझी प्रिया
रागदारी गा समीरा, येतसे माझी प्रिया
                      येतसे माझी प्रिया ।ध्रु।

रक्तिमा कुसुमांतला मेंदी बनो गोऱ्या करी
मेघ येवो उतरुनी, काजळ भरो नेत्रांतरी
चांदण्या सजवोत वेणी, येतसे माझी प्रिया
                      येतसे माझी प्रिया ।१।

पट प्रभेचा पसर सृष्टी, आज तू अवनीवरी
लाजुनी परतू नये ती मत्प्रिया अति लाजरी
चित्तरंजन कर जरासे, येतसे माझी प्रिया
                    येतसे माझी प्रिया ।२।

प्रेमशय्या सजविली ही तरुण कलिकांनी पहा
ज्ञात होते त्यांजला की प्रेमऋतु येणार हा
रंग पसरू द्या क्षितीवर, येतसे माझी प्रिया
                      येतसे माझी प्रिया ।३।

चाल : गालगागा गालगागा गालगागा गालगा
         गालगागा गालगा
(उदा. कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला - थांबला तो संपला)
मूळ गाणे दादऱ्यात आहे. मात्र हे भाषांतर झपतालात किंवा रूपकात गाता येईल, तरीही त्यासाठी मूळ गाण्याचाच स्वरक्रम तसाच्या तसा वापरता येईल. कदाचित किंचित फरक करावा लागेल.  (मिश्र शिवरंजनी?)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. ह्यावेळेला कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )