मनातलं तालिबान

'आजकालचे मुलं-मुली' ह्या विषयावर माझ्यामध्ये आणि आईमध्ये 'संवाद' सुरू होता. पूर्वीच्या पिढीने, खास करून स्त्रियांनी सोसलेले हाल आई मला सांगत होती. त्याच्या विरुद्ध सध्याच्या पिढीमध्ये झालेली विचारांची क्रांती ह्यावर मी तिला शाळा शिकवत होतो.
"आजकाल असं नसतं आई, आई बाबा म्हणतील त्याच्याशीच लग्न करायचं, हा जमाना गेला. प्रत्येकजण आपला साथीदार निवडायला मोकळा आहे." मी सांगत होतो.
"तुम्हाला समजतंय ना सगळं मग बराय. आमचं काय, आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय. तुम्हाला हवं होतं ते सगळं वेळच्या वेळेस मिळत गेलं त्यामुळे तुम्ही आमच्या सारखा विचार नाहीच करू शकणार. वडिलांना उलटं काही विचारायची टाप नव्हती तेव्हा आमच्यात. त्यांच्या डोक्यावर चार पोरींचं ओझं, त्यामुळे लवकरात लवकर पोरींना सासरी पाठवणं महत्त्वाचं होतं. येईल त्या स्थळाला जास्ती विचारपूस न करता आम्ही लग्न करून मोकळे झालो. प्रेम विवाह वगैरे तर स्वप्नात पण विचार नाही केला. आम्हाला काय माहीत पुढे आयुष्यात असलं वाढून ठेवलंय ..."
पुढच्या काही मिनिटांमध्ये आई बरंच काही सांगून गेली. तिनं सोसलेले चटके मलासुद्धा जाणवत होते.
त्या पिढीमध्ये अनेक स्त्रियांनी प्रचंड हाल सोसलेले आहेत. नवऱ्यानं बायकोला मारणं, किंवा दारू पिऊन घरी धिंगाणा घालणं अश्या अनेक गोष्टी त्यात आल्या. पुरुषी अहंकाराचा किंवा स्त्रियांच्या कमकुवतपणाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. काही घरात आजही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र असल्या गोष्टींचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. आजची स्त्री पूर्वीपेक्षा अधिक कणखर झाली आहे. अनेक कायदे तिच्याबाजुने झाले आहेत. त्यामुळे आज ती असल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते.
अत्यंत प्रतिष्ठा आणि सन्मानाने जगणाऱ्या स्त्रिया आज आपण समाजात बघतो. बऱ्याच स्त्रिया नोकरीनिमित्त परगावी किंवा बाहेरील देशात राहत आहेत. घरूनसुद्धा त्यांना तितकाच योग्य पाठिंबा मिळतो आहे. मिडिया मधून ह्या विषयावर जागृती होत आहे. अनेक संस्था ह्यासाठी प्रयत्न करत आहेत.
समाजातील प्रत्येक घटक (शहरातील सुशिक्षित घटक म्हणूयात हवंतर) वैचारिकदृष्ट्या एक पायरी पुढे सरकला असं म्हणायला हरकत नाही.

परंतु आजसुद्धा आपल्याच घरांमधील काही गोष्टी विशेष लक्ष वेधून घेतात आणि विचार करायला भाग पाडतात. आपण स्वत:ला पुढारलेले म्हणून घेतोय खरं पण खरंच आपण तितकेसे पुढारलेले आहोत का ?
मुलीने कपाळावर टिकली लावणे, हातात बांगडी घालणे, विवाहित स्त्रीने गळ्यात मंगळसूत्र घालणे, फारसे फ़ॅन्सी कपडे घालू नये. नवऱ्याला चार लोकांच्यात "अहो - जावो" करावे ! रात्री घरी येण्यास शक्यतो उशीर करू नये !
ज्या ज्या घरात आज एक स्त्री आहे, त्या घरांमध्ये यापैकी एकतरी गोष्ट नक्की बघायला मिळते. ह्याचं कारण म्हणजे, बहुतांश लोकांच्या डोक्यावर असल्या 'छोट्या' विचारांचा अजूनही घट्ट पगडा आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सुशिक्षित तरुण पिढीसुद्धा मागे नाही.
ही बंधने का आणि कशासाठी ? असल्या अपेक्षा असण्यामागे काय कारणं आहेत ?

इतर लोकांनी वाकड्या नजरेने बघू नये म्हणून का ? इतर लोक काय विचार करतील त्याच्यापायी आपणच स्वत:वर निर्बंध घालून घ्यायचे ?
मग आपल्यात आणि तालिबानींमध्ये मध्ये काय फरक राहिला ?
समाजातील इतर घटक वाईट नजरेनं बघतील म्हणून मग तिकडच्या स्त्रीने बुरखा घालून वावरावं. वयाच्या आठव्या वर्षानंतर तिनी रक्ताचं नातं असणाऱ्याखेरीज इतर कोणत्याही पुरुषाशी बोलू नये.
स्त्रीने उंच टाचा असलेली चप्पल घालू नये, कारण त्या चपलांच्या आवाजाने तिच्याकडे इतर लोकांचे लक्ष जाईल.

इतके शिकून आणि प्रगत होऊन आपण सुद्धा ह्याच विचित्र विचार प्रवाहाचा एक आयाम होतोय का ?
आपण थोडेसे पुढारलेले, म्हणून बुरख्याच्या ऐवजी तिनी वर सांगितल्यात त्या गोष्टी कराव्यात हा आपला हट्ट !
"असं नाही केलं तर काय" असं विचारल्यावर मात्र सर्वांचा अहंकार का मध्ये येतोय ? का आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाहीओत ? विशेष म्हणजे घरातल्या ह्या एक प्रकारच्या 'तालिबानी'  विचार धारणेमध्ये घरातील स्त्रीसुद्धा समाविष्ट असावी ?
शहरात किंवा सुशिक्षित समाजात ही परिस्थिती आहे, खेडेगावांमध्ये काय परिस्थिती असेल ह्यावर सध्यातरी विचार करायला नको !

डोळ्याला लावलेली झापडं आपण कधी काढणार आहोत ? ह्या गोष्टींचा विचार करण्यात आपण का कमी पडत आहोत ?
मनामध्ये असणाऱ्या ह्या 'तालिबानी' रूपाचे समूळ उच्चाटन आपण कधी करणार आहोत ?