मुक्कामः किल्ले रायगड

स्कूटरवरून पुणे-कोल्हापूर-रत्नागिरी-पनवेल-पुणे असा प्रवास करून नुकताच परतलो होतो. रायगडला जाऊन तीन-चार दिवस राहावे असा विचार त्या फेरीत रायगडवारी केली होती तेव्हा मनात रुजला होता. पुण्याला परतल्यावर दिनकर आणि वसंता या दोघांना गाठून तो तडीस न्यायचा बेत होता.

आधी दिनकरला गाठले. तो जरा भाबडा होता. इतिहास म्हटले की त्याला स्फुरण चढे (मलाही चढे, खोटे का बोला? ते वयच तसे होते). त्या मानाने वसंता विचारी आणि प्रौढ होता.

मी दुचाकी फेरी आटपल्यावर तळेगांवला दोन दिवस राहून आलो होतो. तळेगांवला गेल्यावर नेहमीप्रमाणे अप्पा दांडेकरांना भेटलो. त्या भेटीत त्यांना मी 'रायगडला जाऊन येण्याचे म्हणतो आहे' असे सांगितल्यावर दांडेकरी खवचटपणे "अरे, तोंडाने म्हणण्याऐवजी पायाने जाशील तर ते खरे" असे अप्पा वदते झाले. अर्थातच मला काही ओरखडा उठला नाही. एका कोंकणस्थाचा खवचटपणा दुसऱ्याला बाधत नाही.

त्या भेटीत अप्पांनी मला निकोलाओ मनुचीचे पुस्तक वाचायला दिले. आणि त्यांच्या रायगड परिक्रमेची कहाणी सांगितली.

दिनकरला भेटल्यावर "चार दिवसांखाली राहिलो तर तो रायगडचा अपमान ठरेल" असे अप्पांनी सांगितल्याचे त्याला सांगितले. लगेच तो भारावून "नाही, नाही, चार दिवस रहायचेच. चार दिवसही काढता येत नसतील तर या जगण्याला काय अर्थ आहे" असा पेटला. त्या पेटलेल्या अग्निबाणाला वसंतावर सोडून मी घरी परतलो.

दोनच दिवसांत अगदी तपशीलवार बेत ठरला. इतका तपशीलवार की तिथे स्वयंपाक करायची तयारीही आम्ही केली. खिचडी करण्यासाठी डाळ-तांदुळाची जाडशी पुरचुंडी घेतली. मोहरी, हळद, तिखट, जिरे, मसाला यांच्या पुड्या बांधून घेतल्या. एका बाटलीत गोडेतेल घेतले आणि तिला बूच लावून मेण वितळवून ते बूच सील केले. त्याकाळी Dewar नावाच्या व्हिस्कीच्या बाटल्यांची सिंगलपेग आवृत्ती शोकेसमध्ये ठेवायला म्हणून वापरली जाई. तशा बाटल्यांचा एक संच पिताजींना कुणीतरी कधीतरी भेट दिला होता आणि तो रिकामाही झाला होता. पण किंमती वस्तूचे वेष्टणही जपून ठेवण्याच्या कोंकणस्थी परंपरेमुळे त्या छोट्याछोट्या बाटल्या घरी व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. चार दिवसांत मिळून आठ वेळा तरी चूल पेटवावी लागेल म्हणून तशा आठ बाटल्यांमध्ये रॉकेल भरून घेतले आणि त्यांचे बुचेही मेणाने सील करून टाकली. खिचडी करण्यासाठी म्हणून एका ऍल्युमिनियमसदृश धातूचे जाडसे पातेले घेतले.

याखेरीज अंथरुणे-पांघरुणे, कपडे, साबण, खोबरेल तेल (तेव्हा केसांना खोबरेल लावायची प्रथा होती आणि डोक्यावर केसही होते), उदबत्त्या (ही कल्पना दिनकरची) इत्यादी वस्तूही घेतल्या.

आणि तिसऱ्या दिवशी स्वारगेटहून दुपारी बाराला सुटणाऱ्या पाचाड यष्टीत आम्ही तीन शिलेदार आठाठ आण्यांच्या रिझर्वेशनांसहित दाखल झालो.

तेव्हा ताम्हिणी घाट नव्हता. वरंध्याच्या घाटातून जावे लागे. त्या घाटातून राजगड नि तोरणा लख्ख दिसतात. रायगड ओळखायला जरा कष्ट पडतात. आधल्या दिवाळीतच मी नि दिनकर राजगडावर चार दिवस मुक्काम ठोकून आलो होतो (त्याबद्दल लौकरच). त्या जोरावर आम्ही वसंतालाच नव्हे तर यष्टीतल्या बहिऱ्या नसणाऱ्या सगळ्या प्रवाशांना राजगड कुठे आहे याचे दिशासूचन केले. आम्ही राजगडला चार दिवस राहून आलो आहोत आणि रायगडला चार दिवस रहायला चाललो आहोत म्हटल्यावर सहप्रवाशांमधली एक षोडषा जरा कुतूहलाने आमच्याकडे पाहू लागली. मी खुषावलो. दिनकरने विवेकानंदांसारखे ब्रह्मचारी राहणार असल्याचे जाहीर केले होते (आता हा अमेरिकेत स्थायिक झाला असून त्याला एक बायको आणि एक मुलगी आहे). त्यामुळे त्याच्यापासून धोका नव्हता. आणि वसंताला कोंकणस्थांपासून सावध रहायची सवय होती (म्हणून तर तो माझ्या गळाला लागत नसे; दिनकरला मध्ये घालावे लागे). षोडषा सरळसरळ कोंकणस्थ (दिसत) होती. फक्त तिच्यासोबत तिची आई होती. त्यामुळे मी कल्पनापतंग फार उडवला नाही. षोडषा (आणि तिची आई) महाडास उतरले. गेल्या तीसेक वर्षांत परत काही गाठ पडली नाही कुठे. असो.

संध्याकाळच्या बेताला (हो, पुणे-पाचाड प्रवासाला तेव्हा चोख पाच तास लागत) आम्ही पाचाडला पोहोचलो. गंतव्य स्थान अगदी नजिक दिसत असले तरी ते फसवे असू शकते हा शोध आम्हां तिघांना त्याच वर्षीच्या राजमाची मोहिमेत (त्याबद्दलही लौकरच) लागला होता. त्यामुळे झपाट्याने पाय उचलला नि अंधार पडायच्या आत किल्ला गाठला.

मूळ बेत होता की बाजारपेठेतल्या कुठल्यातरी दुकानात पथारी पसरावी. पण किल्ल्यावर गेल्यानंतर जाणवले की जिल्हा परिषदेचे गेस्ट हाउस (किंबहुना, त्याचे आवार) हे जास्त सोयीचे पडेल. कारण गेस्ट हाऊस सोडून बाकीच्या किल्ला लवकरच 'डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही' या श्रेणीतल्या काळोखात बुडाला. बाजारपेठेत मुक्काम करण्याची कल्पना खूप रोमँटिक होती. अर्थातच, प्रॅक्टिकल नव्हती. मुकाट्याने गेस्ट हाऊसच्या बाहेरच्या बाजूला पथाऱ्या पसरल्या. गेस्ट हाऊसच्या खानसाम्याकडून पोळी-भाजी-भात-आमटी असे जेवण माफक (म्हणजे आम्ही आणलेल्या पैशांच्या तुलनेत) दरात मिळते म्हणताना स्वयंपाकाचा रोमँटिक बेतही रद्द झाला. सगळा शिधा पुण्यास परतला.

दुसऱ्या दिवसापासून कसेकसे नि कुठेकुठे हिंडायचे याचा बेत आखत आम्ही झोपी गेलो.

ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी लौकरच उजाडले. गेस्ट हाऊसच्या पश्चिमेकडे जनतेच्या सोयीसाठी पत्र्यांचे शौचकूप आणि अंघोळीसाठी पाच फूट उंचीवर तोटी असलेला नळ (गरिबांचा शॉवर) अशी व्यवस्था होती. तिथे न्हाते-धुते होऊन गेस्ट हाऊसच्या खानसाम्याच्या कृपेने कांदेपोहे उदरस्थ केले नि पूर्व दिशा पकडली. लवकरच ऊन रणरणू लागले. आम्ही टोप्यांनिशी आलो होतो, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही.

रायगड रोपवे आदी बांडगुळे तेव्हा किल्ल्याला चिकटलेली नव्हती. त्यामुळे महादरवाजा, गंगासागर तलाव, गेस्ट हाऊस हा परिसर सोडला तर इतरत्र निवांतपणा होता. आम्ही हिंडत हिंडत तीनशे वर्षांपूर्वी तिथे काय काय घडले असेल याचा विचार करीत मूक झालो होतो. रायगड तेव्हा तरी असा अंगावर यायचा.

आता रायगडावर उन्हाळ्यात गेलात तर तुमच्या पिनकोड विभागातला (कधीकधी तुमच्या गल्लीतला) कुणीतरी भेटतोच असे म्हणतात. खरेखोटे ठावे नाही कारण गेल्या पंचवीस वर्षांत रायगडास गेलो नाही.

तेरा वर्षांपूर्वी पाचाडपर्यंत जाऊन आलो, पण त्याबद्दल 'आठवणीतले प्रवास चारचाकी वाहनांतले' हे जेव्हा लिहीन तेव्हा.

दुपारी जेवायला परत गेस्ट हाऊसला आलो आणि जेवण झाल्यावर तिथल्या ओसरीत (आम्ही आमच्या पथाऱ्या त्या ओसरीत सावलीला हलवल्या होत्या) लवंडलो. संध्याकाळ होत आली तशी राणीमहालातल्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन लांब होणाऱ्या सावल्या निरखीत बसलो.

दिवसभर पायपीट अशी फार झालेली नव्हती, अंगबिंग काही दुखत नव्हते. त्यामुळे रात्री झोप लागायला जरा वेळ लागला. त्या वेळात उद्या कुठली दिशा धरायची याबद्दल माफक चर्चा झाली. शेवटी कुठलीही एक दिशा न धरता अख्ख्या गडाला आपल्या मनानेच फेरी मारावी असे ठरले.

दुसऱ्या दिवशी एक मुंबईची पार्टी गेस्ट हाऊसला दाखल झाली. त्यात एक पन्नाशीचे गृहस्थ, त्यांची पत्नी, आणि त्याच वयोगटातील अजून दोघेतिघे असा सरंजाम होता. हे गृहस्थ सोडता बाकीच्या मंडळींना गड चढण्याचे श्रमच त्यांच्या वार्षिक श्रमांच्या कोट्यापेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे ते सगळे गेस्ट हाऊसच्या खोल्या सोडून काही जेवणाखेरीज बाहेर पडले नाहीत. पण हे काका आम्ही निरुद्देश गडावर हिंडताना मांजराच्या पिलासारखे सदैव पायात तडमडत होते. भेटल्यावर माफक काही बोलून त्यांच्यापासून वेगळी दिशा धरली तरी परत समोरून येऊन भेटायचे हे विशेष. दुपारी जेवेपर्यंत ते असेच घोटाळत राहिले. जेवून आंचवल्यावर मात्र आम्ही तिघे तीन दिशांना पांगलो आणि ठरवून ठेवल्याप्रमाणे राणीमहालात जमलो. 'ऑल क्लिअर' असल्याची खात्री झाल्यावर परत भर उन्हात भटकंतीला सुरुवात केली. काका बहुधा वामकुक्षी करीत असावेत वा तिघांपैकी कुणाच्या मागे जावे याचा निर्णय न झाल्याने गंगासागराच्या तिठ्यावर त्रिशंकू अवस्थेत उभे असावेत.

पण संध्याकाळी त्यांनी आम्हांला गाठलेच. आम्ही सूर्यास्तानंतर महाराजांच्या महालाच्या चौथऱ्यावर बसलो होतो तिथे हे अवतरले. 'आजकालच्या' कॉलेजकुमारांबद्दल भरघोस मतप्रदर्शन करून झाल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांची थोरवी गायला सुरुवात केली. आमचा काही आक्षेप असायचे कारणच नव्हते. पण त्यांनी च्युईंग-गमनेही हार मानावी एवढे आम्हांला ताणले. "आता हा महालच बघा. याचे जोते चांगले उंच आहे. पण एवढेही उंच नाही की त्यावरून माणूस चुकून पडला तर गंभीर इजा होईल. लांबचा माणूस तर दिसावा, पण इजा तर होऊ नये. कसे? " हा प्रश्न आम्हांला उद्देशून होता हे कळायला जरा वेळ लागला. पण मग रात्रीच्या जेवणवेळेपर्यंत त्यांच्या 'कसे? ' ने आमचा पिच्छा पुरवला.

रात्री आम्ही चांदण्यात (बुद्ध पौर्णिमा एकदोन तिथींवर आली होती) हिंडायला जायचा बेत केला होता. तो तडीस न्यायची भीती वाटू लागली. पण शेवटी परत गनिमी काव्याने हात दिला. तिघे तीन दिशांना पांगलो आणि दरबारात एकत्र आलो. दिनूने उदबत्त्यांचा जुडगा आणला होता. त्या पेटवून सिंहासनाच्या जागेपुढे खोचल्या आणि आम्ही मांड्या घालून शांत बसून राहिलो. चंद्रप्रकाश, उदबत्त्या आणि शांतता.

जेव्हा "ह्या! सालं काय भिकार आयुष्य, वाया गेलं नुसतं" अशी स्ववैतागवाणी उच्चारायची तीव्र इच्छा होते तेव्हा ती रात्र आठवली की स्वतःशीच चपापायला होते.

दुसऱ्या दिवशी काका नि कबिला परतला. आम्ही हिरकणी बुरुजावर गेलो होतो तेव्हा हे शुभवर्तमान घडल्याचे परतल्यानंतर कळले. आम्ही खुषीत येऊन गेस्ट हाऊसच्या आचाऱ्याला शिरा करायला लावला. तो आचारीही त्या कबिल्याला वैतागला होता (त्यांचे नखरेच फार होते म्हणे. भाजीत मीठ, तिखट, मसाला, तेल हे कमी आहे की जास्त आहे याबद्दल त्या चौघापाचजणांमध्येच सात मते होती. शिवाय 'भाजी शिजलीच नाही' आणि 'शिजून पार पिठले झाले', 'भात म्हणजे कच्चा तांदूळच आहे' आणि 'शिजून शिजून भाताची खळ झालीये, पोस्टात तरी नेऊन द्या' अशी मतांतरे वेगळीच). आम्ही गोडाचा शिरा पोटभर खाल्ला आणि परत ओसरीला दुपारची सावली धरली.

संध्याकाळी आम्ही खाली उतरून पाचाडला चक्कर मारून आलो. परतीचे वेध लागले होते, आणि पुण्यासाठी एस्टी किती वाजता सुटते याबद्दल गडावर भरपूर मते होती. एस्टी सकाळी असते एवढेच त्यातून कळत होते. येताना आम्ही नीटशी चौकशी केली नव्हती.

पाचाडला पोचल्यावर कळाले की एस्टी सकाळी सहाला सुटते. थोडक्यात, रात्री मुक्कामाला पाचाडला येणे सोयीचे पडले असते. अन्यथा पहाटे चारला उठून अंधारात गड उतरावा लागला असता.

त्या रात्री आम्ही चंद्रप्रकाशात अख्ख्या गडाला रमतगमत प्रदक्षिणा घातली आणि पार मध्यरात्रीनंतर येऊन निजलो. सकाळी उठल्यावर 'आता आज संध्याकाळी निघायचे' या विचारांनी थोडी हुरहूर लागली.

टकमक टोकावरून छत्री निजामपूर न्याहाळावे म्हणून त्या दिशेला चालू लागलो. दिनू आणि वसंता मागून येत होते. पुण्याला गेल्यावर वसंताला त्याच्या गावी , म्हणजे ओतूरला जायचे होते. छत्री निजामपूरचे एकंदर विहंगम दृष्य पाहून आम्ही सगळेच भारावलो. पहिल्यांदा पाहत होतो असे नव्हते, पण भारावलो एवढे खरे.

"एक दिवस उशीरा जा गावाला", मी म्हणालो.

"बरं", वसंता म्हणाला.

मुक्काम एका दिवसाने वाढला. एव्हाना गड दोनचार वेळेस पायाखाली घालून झाला होता. त्यामुळे चोरदरवाजा गाठून त्यात तास-दोनतास बैस, बाजारपेठेत आपसांत पळण्याची शर्यत लाव असे उद्योग करीत आम्ही दोन दिवस सुखात काढले आणि संध्याकाळी गड उतरून पाचाडास दाखल झालो.

पाचाड हे त्या वेळी अगदीच खेडे होते. एस्टीच्या शेडशेजारी एक छोटेसे दुकान होते. त्या मालकाने आम्हांला रात्रीचे साधे जेवण पुरवण्याचे मान्य केले. आम्ही एस्टीच्या शेडमध्येच मुक्काम करणार होतो. एस्टी मुक्कामी असे, पण त्या दिवशी ती महाडास गेली होती काही दुरुस्तीसाठी. ती सकाळी येऊन मग लगेच सुटणार असे कळले. तिथून चढणारे आम्ही तिघेच होतो बहुधा, त्यामुळे जागा मिळण्याचा असा प्रश्न नव्हता.

अंधार पडल्यावर अख्खे खेडेच गुडूप झाले. एस्टी शेडसमोर एक पिवळा बल्ब तेवढा होता. 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे गाणे चुकीच्या मनःस्थितीत ऐकले तर जसे व्याकुळ व्हायला होते तसे वाटू लागले. तेवढ्यात दुकानदाराने जेवण तयार असल्याची हाक मारली आणि आम्ही गेलो. सोडे घातलेली वांग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी! त्या दिवशीच्या जेवणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, उद्गारचिन्हावरून समजून घ्यावे.

जेवून परत एस्टी शेडमध्ये आलो. काँक्रीटची भिंतीला लागून लांबलचक बैठक, दोनेक फुटाची. त्यावर एकाच्या पायाखाली फूटभर अंतरावर दुसऱ्याचे डोके अशी माळ लावली आणि आडवे झालो. गप्पा मारीत असताना मध्येच एकदम दिनू ओरडला. त्याच्या छातीवर काहीतरी पडले होते. बॅटरी माझ्याकडे होती. ती लावून बघितले तर तो एक विंचू होता.

पायातली चप्पल हातात घेतली आणि चपळाईने त्याला आधी छातीवरून उडवला. मग ठेचला.

पण तिथे झोपणे धोक्याचे होते हे कळले. आता काय करणार? एस्टी मुक्कामी असती तर त्यात शिरून झोपलो असतो.

शेडमधून बाहेर आलो तर अख्खे गाव झोपलेले. वाजलेले जेमतेम नऊ-साडेनऊ. हताशपणे इकडेतिकडे पाहत बसलो. जरा वेळाने एक स्वारी झुलत डुलत येताना दिसली. आमच्या जवळ पोहोचण्याआधीच त्या झुलण्या-डुलण्याचे कारण आमच्या नाकांना कळले होते. त्याला विचारावे की नाही याबद्दल आम्ही द्विधा मनःस्थितीत होतो. अखेर विचारले. नाहीतरी न विचारून काय साधणार होते?

त्याने आम्हांला 'धरमसालेत जावा' असा सल्ला दिला. तो आम्हांला चारपाच वेळेस ऐकल्यावर समजला. 'धरमसाला' कुठे आहे याबद्दल त्याने 'हे विश्वची माझे घर' म्हणताना करावा तसा सबगोलंकारी हात फिरवला आणि तो एका दिशेकडे रोखला. मुकाट बॅटरीच्या प्रकाशात तिकडे निघालो. काहीच गावले नाही. मग दुसरी पायवाट पकडली. त्यावर एक मोठेसे इमारतवजा काहीतरी होते, पण ते म्हणजे खाली फरशी आणि वरती पत्रे एवढेच. बाजूला भिंतीच नाहीत.

जागा भलीथोरली होती. किमान चाळीस फूट बाय चाळीस फूट तरी असावी.

फक्त पत्रे (आणि तेही उंचावर) लावलेली जागा म्हणजे स्मशान तर नव्हे, हा पहिला प्रश्न पडला. कोंकणात पाऊस अमाप, म्हणून पत्रे आणि आग पेटायला हवा पाहिजे म्हणून भिंती नाहीत. पण नाही, ते स्मशान नव्हते. मध्ये चितेसाठी असे काही नव्हते.

नंतर कळाले की फरशी आणि पत्रे करण्यातच बजेट संपले, म्हणून आहे त्या रचनेलाच 'धरमसाला' म्हणायचे गावकऱ्यांनी ठरवले.

त्यातल्यात्यात मध्यावर आम्ही तिघांनी पथाऱ्या पसरल्या. मी, मग दिनू आणि मग वसंता. कुजबूज करत हळूहळू झोपेच्या आधीन झालो. पहाटे जरा गारवा पसरला. आम्ही चादरी पांघरल्या. माझ्या एका बाजूला दिनू होता. मागच्या बाजूलाही कुणीतरी चादरीत माझ्या पाठीला पाठ लावून पसरलेले जाणवले. ही काय भुताटकी म्हणून परत ओरडणे-बॅटरी कार्यक्रम झाला. ते एक कुत्रे होते. गारव्यामुळे चादरीच्या उबेला आलेले.

सकाळी उठून तयार झालो. एस्टी वेळेवर आली नि वेळेवर सुटली. दुपारी बाराच्या सुमारास स्वारगेटला उतरलो.

पैशांची मोजदाद केली. आमच्या अपेक्षेपेक्षा कमी खर्च झाला होता. दरडोई तीसचाळीस रुपये शिल्लक होते. घरी रिक्षाने जाण्याचे पैसे सोडून. त्याचे काय करायचे?

असे ठरले की टिळक रस्त्यावरच्या 'कावरे'मध्ये जाऊन आईस्क्रीम खावे.

तेव्हा 'कावरे'मध्ये आईस्क्रीम तीन रुपयांना सिंगल स्कूप आणि पाच रुपयांना डबल असा रेट होता. आम्ही एकेका चवीचा एकेक स्कूप असे करून प्रत्येकी दहाबारा स्कूप हाणले. जेवण तसेही झालेले नव्हतेच. आता जेवायची गरज उरली नाही.

फक्त एक भानगड झाली. दिनू आणि वसंताच्या सायकली माझ्या घरी होत्या. माझे घर होते चतुःशृंगीजवळ. 'चतुःशृंगी' वा 'युनिव्हर्सिटी रोड' असे सांगून रिक्षात बसायचे नि घरी पोहोचायचे. पण दहाबारा स्कूप खाऊन निर्जीव झालेल्या आमच्या जिभांना हे दोन्ही शब्द उच्चारणे जड जाऊ लागले. शेवटी डोक्यात प्रकाश पडला की 'सेनापती बापट रोड' हे जोडाक्षरविरहित नावदेखिल आपल्याला घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसे आहे. पोहोचलो.

किल्ल्यावर जाऊन मनसोक्त मुक्काम असे त्यानंतर कधीच घडले नाहीत. मुक्काम करावा असे निवांत किल्लेही नाहीत आणि असलेच तर पोटासाठी धावाधाव करताना निवांतपणा नाही.

तेव्हा का होईना, हातून तसे घडले याबद्दल आनंद मानावा झाले.