फर्ग्युसनचे दिवस !

         नुकताच दहावीचा निकाल लागला आहे आणि आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली आहे की इतक्याजणांसाठी चांगली महाविद्यालये त्यामानाने कमीच उपलब्ध आहेत.या पार्श्वभूमीवर मला फर्ग्युसनला मिळालेला प्रवेश म्हणजे आगगाडीने सहज बोगद्यात शिरावे इतका सहज झाला ,त्यात कुठल्याच प्रकारचा त्रास वा अडचण असते असे वाटले नाही.
      अगोदर आमच्या खेड्यातून एकदम पुण्यासारख्या शहरात आणि एकदम फर्ग्युसनसारख्या नावाजलेल्या कॉलेजात प्रवेश घेणे ही एक स्वप्नवत् गोष्ट होती. कारण आपण कॉलेजची पायरी चढू की नाही याविषयी मी शेवटपर्यंत साशंक होतो.पण एकदम पहिल्या तीस क्र्मांकातच आल्यामुळे मला महाविद्यालयात घालणे पालकांच्या दृष्टीने आवश्यक ठरले. आमच्या पुण्यातील एका नातेवाइकांची फर्ग्युसनमधील प्रा.माईणकर यांचा परिचय असल्यामुळे त्यांच्याच घरी अर्ज भरून (तो अर्जाचा नमुनाही त्यांनीच कार्यालयातून मागवून घेतला होता.) पुरेसे पैसे नसूनही  बाकीचे पैसे नंतर पाठवून देण्यास सांगून त्यांनी लगेच माझा प्रवेश निश्चितही केला. त्यावेळी चांगल्या विद्यार्थ्याची कदर असावी.
          महाविद्यालयाचा पहिला दिवस अविस्मरणीय होता.त्यादिवशी प्राचार्य डॉ. कोगेकर नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर स्वागतपर व उपदेशपर भाषण देणार होते व त्यासाठी स्थळ होते ऍम्फी थिएटर. सकाळी १०॥ वाजता ते होणार होते मी व माझे वडील आम्ही दोघे   नियत वेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात पोचलो.यापूर्वी एकदा महाविद्यालयाच्या आवारात आम्ही आलो असलो तरी त्यावेळी तडक प्रा.माइणकरांच्या बंगल्यात गेल्यामुळे ते भव्य आवार तसे आम्ही प्रथमच पहात होतो त्यामुळे हे ऍम्फी थिएटर कोठे आहे याविषयी आम्हास कल्पना नव्हती पण आवारात शिरल्यावर एका विद्यार्थ्यास विचारल्यावर त्याने तिकडे बोट दाखवले.आवारात पामचे बरेच वृक्ष होते.प्रवेशद्वारातून आत शिरून थोडे अंतर चालून गेल्यावर प्रथम डावीकडे कार्यालय असणारी इमारत होती.व उजव्या बाजूस एक उंच इमारत होती त्यातच ऍम्फी थिएटर होते.आम्ही आत शिरलो तेव्हा नुकतेच प्राचार्य स.वा.कोगेकर यांचे भाषण चालू झाले होते.
       ऍंफी थिऎटर बरीच मोठी इमारत होती व अजूनही आहेच.  ऍम्फी थिएटरव्यतिरिक्त त्यामध्ये आणखी दोन वर्गाच्या खोल्याही होत्या.त्याना  A1,A2 अशी नावे होती.  A1 म्हणजे मुख्य थिएटर जेथे प्राचार्यांचे भाषण चालू होते. ही इमारत व आवारातील बऱ्याच इमारती दगडीच होत्या खेड्य़ातील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे व .प्राचार्यांचे भाषण फर्ड्या इंग्लिशमध्ये असल्याने बरेचसे मला कळत नव्हते पण सर्व नवागत विद्यार्थ्यांना उपदेशवजा भाषण होते एवढे समजत होते.ऍम्फी थिएटरच्या आतील बाजूने गिलावा नसल्यामुळे भव्य असले तरी फार आनंददायक वाटले नाही. त्या इमारतीच्या डाव्या बाजूस वाचनालयाची मोठी इमारत होती . कार्यालयाची इमारत डाव्या बाजूस. अश्या या तीन इमारतींच्या मधील मोकळ्या जागेत छोटीशी बाग होती त्यात बरीच पामची झाडे होती. चौथ्या बाजूने जाणारा रस्ता वसतीगृहाकडे जात होता.वाचनालयाच्यामागे कॅन्टीन व एक छोटी इमारत होती.त्यापुढे गेल्यावर छोटीशी जिमखाना खोली होती.
           एकूण आवार खूपच मोठे होते.आवारातच प्राध्यापकांचीही घरे होती. प्रा.माईणकर वसतीगृहप्रमुख होते. बाकी आवारात रहाणारे प्राध्यापक डॉ.वाडेकर, वगैरे कधीकधी दिसत.त्यावेळी बरेच प्राध्यापक धोतर नेसून आवारात वावरत आणि काहीजण अगदी वर्गावरही धोतर नेसून येत त्यापैकी संस्कृतचे प्राध्यापक वाडेकर हे एक होते.प्राचार्य कोगेकरही आवारात धोतर नेसून फिरत.
       त्यावेळी प्रथम वर्षाची परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्याची पहिलीच वेळ होती.त्यापूर्वी ही परीक्षा महाविद्यालयातर्फेच घेतली जाई.त्या वर्षाला F.Y.(first year) म्हणत व ते Rest Year असेच मानले जाई. विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या या वर्षास पदवीपूर्व (Pre-Degree) असे नाव ठेवण्यात आले त्यामुळे आमची परीक्षा P.D.Sc.अशी ओळखण्यात येणार होती.काही ठिकाणी (मराठवाड्यात) तिला P.U.C.Sc.(Pre University course) अशी संज्ञा होती.
    एस.एस.सीला मी संस्कृत हा विषय घेतला होता व त्यात बरेच चांगले गुण मिळवले होते त्यामुळे आताही परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे म्हणून शिवाय प्रा.माईणकर संस्कृतचे प्राध्यापक असल्याने  मी ऐच्छिक विषय म्हणून संस्कृत घेतले.त्याला पर्याय जर्मन किंवा फ्रेंच असा होता.शिवाय इंजिनियरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे तो विषय असल्याने ऐच्छिक विषयात इकॉनॉमिक्सचाही समावेश होता.मी संस्कृत घेऊन सुरवातीच्या काही वर्गास हजरही राहिलो.त्या वर्गात सगळे आर्ट्सचेच विद्यार्थी असत माझ्यासारखा एकादा दुसराच..प्रा.वाडेकर तो विषय शिकवीत. ते छानच शिकवीत ,मला त्यात रसही होता.पण योग्य मार्गदर्शन नसले की काय होते,तेच माझ्या बाबतीत झाले.
       वसतीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळी चर्चा सुरू होती की जर्मन विषय प्रा.घारपुरे फार छान शिकवतात शिवाय ती एक वेगळी भाषा पुढे अभियांत्रिकी शाखेस जाणाऱ्या  विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयात मार्क अगदी ९०-९५ टक्केसुद्धा पडतात.मला त्यावेळी त्याच गोष्टीचे अधिक आकर्षण वाटले किंवा भूलच पडली म्हणायला हवे.
      मेंढरांच्या कळपात असल्यागत मी त्या सगळ्यांच्याबरोबर जर्मन घ्यायचे ठरवले व  संस्कृत ऐवजी जर्मन अश्या विषयातील बदलासाठी अर्ज देऊन टाकला.आणि लगेच तो बदल मिळणारच अश्या समजुतीने त्या विषयाच्या वर्गासही मी जाऊ लागलो.माझ्यासारखेच या लाटेत इतके विद्यार्थी सापडले होते की ऍंफी थिएटरचा हॉलदेखील आमच्या त्या वर्गास पुरेनासा झाला.अर्थातच महाविद्यालयास असा असमतोल राखणे योग्य वाटले नाही कारण काही ऐच्छिक विषयाला विद्यार्थीच नाहीत अशी परिस्थिती झाली आणि शिवाय इतका मोठा वर्ग हाताळणे हेही प्रा.घारपुरे यांना अवघड होते.अगोदरच नेहमीच्या वर्गातच १४०-५० विद्यार्थी असत.माझ्या ई तुकडीत माझा क्रमांक १३९ होता असे वाटते. म्हणजे जर्मनच्या वर्गात २५० तरी विद्यार्थी झाले असावेत त्यामुळे महाविद्यालयाने ज्यानी प्रवेश घेतानाच जर्मनसाठी अग्रक्रम दिला होता त्यानाच तो विषय घेण्यात येईल असा निर्णय घेतला.त्यामुळे आता माझी परिस्थिती 'ना घरका न घाटका' अशी झाली.
      आता तरी मी पुन्हा माझी पहिली निवड कायम ठेऊन संस्कृतला प्राधान्य दिले असते तर काही बिघडले नसते. खरे तर मी विषय बदलण्याचा अर्ज देण्यापूर्वीच माईणकरांना भेटलो असतो व त्यांचा सल्ला घेतला असता तर असे झालेच नसते.त्यांचा माझा परिचय प्रवेश घेताना झालाच होता  व ते अतिशय प्रेमळ गृहस्थ होते.पण माझ्या अतिशय लाजाळू वृत्तीमुळे मी तसे केले नाही इतकेच काय पुन्हाही निर्णय घेण्यासाठी त्यांचा सल्ला घेण्याचे टाळले व पुढे अभियांत्रिकीला आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र उपयोगी आहे म्हणून तेच घेऊया ,असे ठरवून विषय बदलून मी अर्थशास्त्र मिळावे म्हणून अर्ज दिला व तो मंजूरही झाला.त्यासाठी मराठी माध्यम घेता होते तरी मी इंग्रजी माध्यमच निवडले.त्यामुळे मी अर्थशास्त्र हा विषय कॉमर्स शाखेस जाणारे विद्यार्थीही शिकत नसतील इतक्या वेळा म्हणजे चक्क तीन वेळा शिकलो. कारण दुसऱ्या वर्षास तो अभियांत्रिकीला जाणाऱ्यांसाठी आवश्यक म्हणून व परत अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षासही एक विषय म्हणून. आणि इतके करून प्रत्यक्ष अर्थप्राप्तीबाबतीत  मात्र अज्ञच राहिलो.
     प्राचार्य कोगेकरांच्या भाषणाव्यतिरिक्त पहिल्या दिवशी काहीच वर्ग झाले नाहीत.  मी प्रा.माईणकरांच्या घरून प्रवेश अर्ज भरल्यामुळे नेहमीच्या पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत माझे नाव नसल्याने वसतीगृहात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांची जी वेगळी  F तुकडी होती त्यात माझे नावच नव्हते.व शेवटी ते E तुकडीत आले.
        २०जून या  तारखेस नियमाप्रमाणे कॉलेज सुरू झाले तरी शनिवार होता त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून २२ तारखेपासून सुरू होतील या कल्पनेने मी २१ तारखेस कॉलेजकडे फिरकलोच नाही.वडिलांच्या बरोबर कोठे कोठे फिरत राहिलो.२२ तारखेस कॉलेजमध्ये गेलो व पोर्चकडे नजर टाकली तर  टाइमटेबल लावलेल्या नोटिसबोर्डसमोर मधमाश्याच्या पोळ्यात माश्यांनी गर्दी करावी तशी विद्यार्थ्यांची गर्दी दिसली.त्यामुळे’'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'’अशी परिस्थिती झाली.शेवटी जरा धाडस करून त्यात घुसलो तर टाइमटेबलचा गोंधळ काही समजेना कारण माझ्या ई तुकडीचे वर्ग सकाळी १०॥ ला सुरू होत होते तर एफ तुकडीचे म्हणजे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे मात्र १२ वा.सुरू होत होते.हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल्स सकाळी असत.त्यामुळे त्यांचे थेअरी वर्ग बाराला सुरू होत होते.हे काही माझ्या प्रथम लक्षात आले नाही.हॉस्टेलची मुले सकाळी प्रॅक्टिकलला जाऊन आली व त्याना १२ वा.लेक्चर असल्याने ती आरामात होती आणि त्यामुळे  मीही तसाच आरामात राहिल्यामुळे २२ तारखेच्या पहिल्या तासाला मला उशीरच झाला.
         दुसऱ्या तासासाठी आत शिरल्यावर  वसतीगृहात रहाणाऱ्या आपल्या मित्रांना भेटायला येणारा एक  विद्यार्थी माझ्या ओळखीचा झाला होता तो दिसला, त्याच्या बाकावर जाऊन बसलो आमच्या  वर्गाची रचना एकाद्या रंगमंदिरासारखी होती.अगदी खालच्या पातळीवर प्राध्यापकांना उभे रहाण्यासाठी व्यासपीठ त्याला लागून भिंतीवर फळा. असा फळा आमच्या शालेय जीवनात मी कधी पाहिला नव्हता.तो काचेचा होता  व त्याचा पार्श्वभाग हिरव्या रंगाचा असून त्यातील अर्ध्या भागावर आलेखाच्या कागदावर असाव्यात तश्या उभ्या आडव्या रेषा.आकृत्या काढण्यास त्या उपयोगी.फळ्याच्या वर ट्यूब लाइट त्याचा प्रकाश बरोबर फळ्यावर पडायचा. प्राध्यापकांच्या समोर भले मोठे टेबल. या गोष्टींचे आता काही नवल वाटत नाही पण औंधासारख्या खेड्यातून या वातावरणात गेलेल्या माझ्यासारख्या मुलास हा सगळा प्रकार स्वप्नवत् वाटावा यात नवल नाही.रंगमंदिरात असाव्या तश्या अनेक पायऱ्या प्राध्यापकांच्या समोरील भागास असून प्रत्येक पायरीवर बाकांची एक ओळ.एका वर्गात १५० विद्यार्थी सहज बसू शकत.आणि खालच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या प्राध्यापकाचा आवाज अगदी सहज शेवटच्या ओळीतील विद्यार्थ्यास ऐकू येई.त्याचे श्रेय वर्गाच्या रचनेस द्यावे की प्राध्यापकांच्या आवाजास समजत नाही.त्यावेळी शेवटच्या रांगेत प्रवेश करण्यासही एक दार असे व उशीरा येणारे विद्यार्थी त्यातून प्रवेश करत त्यामुळे प्रा.खांडेकर हे इंग्रजीचे प्राध्यापक वर्गात आल्याबरोबर "last man please shut the door" असा हुकूम सोडत व तो त्याला बरोबर ऐकू येऊन तो ते दार बंद करी. 
         त्यादिवशी जूनचा महिना असल्यामुळे दुपारी ढग आले होते त्यामुळे अंधारच पडला होता.त्यामुळे फळ्यावरील व वर्गातील सगळे ट्यूबलाइट्स लावलेले होते.मी आत शिरून बसल्यावर एक खाकी वेषधारी युवक आत आला.त्याने आत येऊन फळा स्वच्छ केला व डस्टर टेबलावर ठेऊन तो बाहेर पडला व घंटा होताच प्राध्यापक प्रा.कोल्हटकर आत शिरले ते कसे शिकवतात याची व आपल्याला काही समजते का याचीही उत्सुकता होतीच . तास बॉयॉलॉजीचा होता . तो वर्ग P9 या वर्गखोलीत होता.फर्गसन महाविद्यालयात बऱ्याच वेगवेगळ्या इमारती होत्या.कार्यालयाच्या इमारतीस M (main Building) व त्यातील खोल्यांना  M1,M2, फिजिक्स विभागातील खोल्यांना  P1,P2 केमिस्ट्री विभागाच्या खोल्यांना C1,C2 अश्या संज्ञा होत्या आमचे बरेच वर्ग  फिजिक्सच्या इमारतीत भरत. केमिस्ट्रीचे वर्ग त्याच विभागात , इंग्रजीचा एक वर्ग कार्यालयीन इमारतीत ,तर एक P9 मध्ये, मराठी,इकॉनॉमिक्स व मॅथेमॅटिक्सचे वर्ग ऍम्फिथिऎटरमधील वर्गात भरत.
        शाळेत असताना एकाच वर्गात बसण्याची संवय असल्यामुळे प्रत्येक तास वेगवेगळ्या खोलीत असण्याची कल्पना डोक्यात घुसायला थोडा वेळ लागलाच.म्हणजे A1 मधला पहिला मराठीचा तास संपला की P9 मधल्या दुसऱ्या तासासाठी तेथे जाऊन उभे रहायचे व तेथे क्लास चालू असेल तर आरडाओरडा करून तेथील प्राध्यापकाला गोंधळात टाकायचे व घंटा वाजली की आत घुसायचे.या कसरतीसाठी दोन तासांच्या मध्ये पाच मिनिटांचा वेळ दिलेला असे.म्हणजे १०॥ चा तास ११-१५ ला संपला तर पुढचा तास ११-२० ला सुरू होणार.सुरवातीस वर्गात शिरून पुढचा बाक पकडण्याची धडपड असे पण मग पुढे शक्यतो मागचा बाकच बरा असे वाटू लागले.
         .फिजिक्सला प्रथम वर्षास प्रा.ई.एस.जोग होते.त्यांची हेल काढून बोलण्याची पद्धत मजेशीर होती.त्याच विषयाच्या काही भागासाठी प्रा.डी.एस.जोग होते त्यानी फिजिक्सचे आमच्या दृष्टीने अतिशय प्रचंड आकाराचे पुस्तक लिहिलेले होते. ते वर्गात धोतर, कोट व टोपी अश्या वेषात येत.त्याच विषयासाठी आम्हाला अगदी तरुण प्राध्यापक जेव्हां आले त्यावेळी त्यानी आपल्या व्यक्तिमत्वाने व शिकवण्याच्या पद्धतीने सर्वांवर छाप टाकली ते म्हणजे प्रा.राम ताकवले ते पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
       केमिस्ट्रीचे प्राध्यापक प्रा.घाणेकर व प्रा डोळे होते.डोळे यांनीही त्या विषयाचे पुस्तक लिहिलेले होते.मॅथेमॅटिक्सला पहिल्या वर्षी प्रा कवलगीकर हे ऑलजिब्रा शिकवत.त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांढरा शर्ट,पांढरी पॅंट व त्यावर पांढराच कोट घालत व नाकातल्या नाकात बोलत. कॅलक्युलस शिकवणारे प्रा.एन.आर.कुलकर्णी अतिशय सहजतेने विषय शिकवत व त्यांचे विषयातील प्रभुत्व सहज जाणवे.प्रा.महाजनी सॉलिड जॉमेट्री शिकवत. ते रॅंग्लर होते व त्यानीही त्या विषयावर पुस्तक लिहिले होते काही दिवस रॅंग्लर प्रा.चंद्रात्रेही आम्हाला शिकवत होते.खरे तर फर्गसन कॉलेज ज्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे होते त्याच संस्थेचे विलिंग्डन महाविद्यालय सांगलीस आहे त्याचे ते प्राचार्य होते पण संस्थेतील मतभेदामुळे त्याना आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून यावे लागले तेही अगदी वर्ष सरतेवेळी त्यामुळे त्यानी आमचे फार कमी वर्ग घेतले. प्रा.डी.एस. जोगही असेच विलिंग्डनवरूनच आले्ले असल्यामुळे त्यांनीही आमचे फार कमी वर्ग घेतले.को ऑर्डिनेट जॉमेट्री प्रा.ए.बी.शहा शिकवत.(प्रा.अ.भि.शहा हेच होते का माहीत नाही)
   मराठी हा विषय प्रा.पटवर्धन शिकवत.त्यावेळी मराठीची डॉ.रा.श्री.जोग,प्रा.पारसनीस अशी दादा मंडळी आमच्या कॉलेजला होती पण ती कदाचित आर्ट्सच्या वर्गांना शिकवत असतील.प्रा.पटवर्धनही शिकवीत चांगले, पण कधी कधी त्यांच्या बोलण्यास कुचेष्टेचा वास येई.मराठीसाठी एक वेच्यांचे पुस्तक होते व पुरवणीवाचन म्हणून व्यंकटेश माडगूळकरांचे माणदेशी माणसं होते ते मी दहा वेळा तरी वाचले असेल.इंग्रजीस प्रा.खांडेकर होते ते गद्य शिकवत तर प्रा,कामत पद्य म्हणजे Golden Treasury.प्रा.खांडेकरांचे शेवटच्या बाकावरील मुलास उद्देशून म्हटलेले वाक्य व पद्य वेच्यातील सरोजिनी नायडू यांच्या My father do not rest या धड्याची अजून आठवण होते. तर  Golden Treasury मधील  La Belle Dame Sans Merci ही कविता विचित्र नावामुळे लक्षात राहिली.इंग्लिशला प्रा.प्रधान सरांचा वर्ग आवडे शिवाय त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे व आचरणातील साधेपणामुळे त्यांच्याविषयी आदरही होता.शिवाय ते शिकवतही छान.ते नेहमी खादीचे कपडे घालत व शिकवतानाही त्यांच्या विचारप्रणालीचे दर्शन घडवीत.
    इंग्रजीविषयी एक मजेशीर गोष्ट आठवते.मराठीला जसे "माणदेशी माणसं" होतं तसं इंग्रजीसाठी "Tono Bungay" हे   H.G.Wells या लेखकाचे पुस्तक होते.तसे ते लेखक खूप प्रसिद्ध आणि ते पुस्तकही.पण मला ते काही केल्या वाचवेना.आणि आमच्या मित्रापैकी पण कोणी वाचले असेल असे वाटत नाही कारण कोणीच त्याविषयी काही बोलत नसे.विद्यापीठाची परीक्षा असल्याने विद्यापीठाच्या नियमानुसार या दोन्ही पुस्तकांवर परीक्षेत प्रश्न येणार होते. त्यामुळे कमीतकमी एकदा ती वाचणे आवश्यक होते. .माणदेशी माणसं  मी दहा वेळा तरी वाचले असेल.पण टोनो बंगे दररोज इतर विषयांचा अभ्यास झाला की रात्री मी वाचायला घेत असे आणि एकादे दुसरे पान वाचून झाले की घोरायला लागत असे.ते पुस्तक न वाचायला आणखी एक कारण होते ते म्हणजे आधल्या वर्षी इंग्रजीच्या पुरवणी वाचनासाठी Silas Marner ही जॉर्ज एलियट ची कादंबरी होती व अशी वदंता होती की या एका वर्षासाठी तीच पुरवणी वाचन म्हणून ठेवणार.त्या कादंबरीचे साने गुरुजींनी केलेले गोड गोष्टीच्या भागात "मनूबाबा" हे रूपांतर मी पूर्वीच वाचले होते त्यामुळे त्यावर प्र्श्न आले तर आपण सहक उत्तरे देऊ असा आत्मविश्वास मला होता.पण तसे विद्यापीठाकडून जाहीर होत नव्हते त्यामुळे टोनो बंगे हे माझे रात्रीच्या झोपेचे औषध आवश्यकता नसून चालू होते.
    शेवटी या प्रश्नाचा निकाल लागायला मागील वर्षाच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्याआंदोलनात्मक पवित्र्याने लागला.त्यांच्यासाठी पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाची म्हणजे आम्हाला आवश्यक असणारी पी.डी.ची परीक्षा देणे आवश्यक होते आणि त्यानी  Silas Marner चा अभ्यास केला होता म्हणजे असे त्यांचे म्हणणे होते व ते विद्यापीठास मान्य होते त्यामुळे पुन्हा त्याना वेगळ्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागणे हा त्यांच्यावर अनावश्यक बोजा होणार होता.आता खरे पहाता मागील वर्षी महाविद्यालयाची परीक्षा असताना हे विद्यार्थी नापास कसे झाले हेच आश्चर्य.कारण आता विद्यापीठाच्या परीक्षेतही विद्यार्थी चुकूनच नापास होतात आणि झालेच तरी त्याना A.T.K.T. मिळतेच.काही का असेना त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठास  Silas Marner ला एक वर्षाची वाढ द्यावी लागली त्यामुळे "Tono Bungay वाचण्याचे माझ्यावरील संकट टळले. ते नंतरही वाचण्याचे माझे प्रयत्न अयशस्वी ठरले.  
   इकॉनॉमिक्स या दोनदा विषय बदलण्याची कसरत करून घेतलेल्या विषयाला.प्रा.श्रीमती नाडकर्णी व प्रा.बाळ गाडगीळ हे दोन प्राध्यापक होते.पण दोघेही विषय तितकाच कंटाळवाणा करून शिकवत.त्यात गाडगीळ तर विनोदी लेखक होते पण आपल्या विनोदाचा वारा चुकूनही आपल्या विषयाच्या शिकवण्यास ते लागू देत नसत कदाचित आपले विनोद असे वाया घालवण्याचे त्याना मान्य नसावे. त्यांचे तासही ऍम्फी थिएटरमधील वर्गात होत.त्याच वर्गात  गणिताचेही वर्ग होत.
   वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी तीन चार मेसेस होते.मी महाराष्ट्र मध्ये जेवत होतो.ते कॉन्ट्रॅक्टरकडून चालवले जात होते व त्याचा दर महिना ३५ रु.होता.इतर मेसेस क्लब टाइप व विद्यार्थ्यानी चालवलेले होते.तेथे महिन्याचे बिल ठराविक नसे.
       रविवारी फीस्ट व बुधवारी चेंज म्हणजे एकादा वेगळा पदार्थ उदा.बटाटेवडा ,दहिवडा,शिरा.फीस्टला पक्वन्न अमर्याद खाता येत असे  .ज्या मेसमध्ये विद्यार्थी जेवत असे तेथीलच एक कर्मचारी खोल्या झाडायला येत असे.
   बुधवार हा अतिशय आनंदाचा वार असे कारण त्यादिवशी संध्याकाळी चेंज असे व त्यानंतर बिनाका गीतमाला असे.त्यामुळे आठच्या आत जेवण आटोपून मनोरंजन कक्ष म्हणून जी एक खोली असे तेथे विद्यार्थ्यांची गर्दी होत असे,त्या कक्षात बुद्धिबळ व कॅरम खेळण्याचीही सोय होती.टेनिसचे कोर्ट पण कॉलेजच्या आवारात होते आणि टेबलटेनिसची एक खोली कॅन्टीनच्या जवळ होती तेथे चार आणे तास असे टेबल राखून ठेवावे लागे अर्थात आम्ही त्या फंदात पडत नव्हतो कारण त्यासाठी लागणारी रॅकेट व पुन्हा पुन्हा घ्यावे लागणारे चेंडू यांचा खर्च आपल्याला परवडणार नाही ही कल्पना.टेनिसच्या बाबतीत तर ती रॅकेट विकत घेणे तर राहिलेच पण हातात पकडणे तरी जमेल की नाही अशी देहयष्टी त्यावेळी माझी असल्याने तोही प्रश्न मिटला.
             .फिजिक्स प्रॅक्टिकलची पद्धत म्हणजे प्रयोगशाळेत गेल्यावर एक महाविद्यालयाचे नाव वगैरे लिहिलेला कोरा ताव मिळे त्यावर आपले नाव व रोल नंबर लिहायचे.प्रयोगाची माहिती डेमॉन्स्ट्रेटरकडून मिळे व त्यानंतर त्यानी सांगितलेल्या पद्धतीने प्रयोग करून निरीक्षणे व प्रयोगाचे वर्णन त्या कागदावर लिहून दाखवावयाची व ते बरोबर असल्यास त्यांची सही घेतल्यावर प्रयोग पूर्ण होई व एका फाइलला तो कागद लावावयाचा. ग्राफ काढावयाचे असल्यास ग्राफ पेपर पण मिळे व तो त्या कागदाबरोबरच फाइलला लावावा लागे.असे जर्नल तेथल्या तेथेच पूर्ण होई.केमिस्ट्रीला मात्र जर्नल म्हणजे एक लठ्ठ नोटबुक दिलेले होते.प्रथम वजनकाटा (केमिकल बॅलन्स)वापरणे, नंतर रसायनांचे काही प्रकार वापरून त्यांच्यावर काही प्रक्रिया करायच्या अश्या स्वरुपाचे प्रयोग असत.
         बॉयॉलॉजी मध्ये जीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र असे दोन विभाग त्यात काही प्राण्यांचे व काही वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांची माहिती लिहिणे अश्या स्वरुपाचे प्रयोग असत. जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेतील एक डेमॉन्स्ट्रेटर जरा खवटच होते.उंदराची किंवा सश्याची मृत शरीरे आमच्या समोर ठेऊन त्यांची माहिती ते देत होते.त्यांच्या माहितीतील anus हा शब्द मला समजला नाही म्हणून मी विचारल्यावर मजेदार दृष्टिक्षेप माझ्याकडे टाकत अगदी सगळ्या क्लासला ऐकू येईल अश्या खणखणीत आवाजात "एनस म्हणजे ढुंगण " तेसुद्धा ढु वर अगदी रेटून जोर देत म्हणाले त्याबरोबर सगळ्या वर्गात हशा पिकला आणि मला लाजल्यासारखे झाले. .
   आता बिनाकामुळे चित्रपटसंगीतात फारच रस निर्माण झाल्यामुळे व जोडीस तितकाच उत्साही  जोडीदारही मिळाल्यामुळे रेडिओ ऐकणे हा एक महत्वाचा कार्यक्रम झाला.बऱ्याच वेळा सकाळी हॉटेलमध्ये रेडिओ सिलोनवरील फरमाइश ऐकायला मिळे.पण दुपारची विविध भारतीवरील फरमाईश आमची अधिक आवडीची होती त्यावेळी केमिस्ट्रीचा तास बुडवणे काही अवघड वाटत नसे कारण तो विषय वाचून समजत असे.प्रा.घाणेकर यांचा परिचय एकदा डॉ.माईणकरांच्याकडे झाला होता पण एवढ्या मोठ्या १५० मुलांच्या वर्गात मी न आल्याचे त्याना कळणे शक्य नव्हते.आणखी बुडवण्यालायक तास इकॉनॉमिक्स चा त्याच वेळेस असे त्यामुळे आमची संगीतसाधना निर्विघ्नपणे चालू राहिती.त्याशिवाय स्वरविहारसारखी म्युझिक हाउसेस आमच्या सेवेस तयारच होती.
           होस्टेलमध्ये असताना चहा पिणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असे.मला सोडायला दादा आले त्यावेळी त्यानी कँटीनमध्ये येऊन मालक शेट्टीची गाठ घेऊन 'या मुलाला  कधी कधी पैसे नसले तर उधार देत जा' असे सांगून ठेवले होते.अर्थात त्यालाही आमचे किती लाड पुरवायचे यावर मर्यादा होती. कॅंटीनचा मालक मोठा स्मार्ट गृहस्थ होता तो क्वचितच असे पण दुसरा एक शेट्टी व जुगल असे दोघे गल्ल्यावर असत.चहा प्यायला दिवसातून अनेक वेळ गेल्याने मी ,दाढे यांची त्याना चांगलीच ओळख झाली होती.कॅंटिनमध्ये फक्त सकाळी वडा सांभार अगदी गरम गरम मिळे व त्यावेळी सिंगल घेतले तर दोन व डबल घेतले तर तीन आणे पडत त्यामुळे आम्ही शक्यतो डबलच घेत असू.संध्याकाळचा विशेष पदार्थ म्हणजे सुकी भेळ.हे दोन पदार्थ पुन्हा त्या चवीचे कोठे खायला मिळाले नाहीत. दुपारी बटाटेवडा असे.कॉलेजच्या मधल्या सुट्टीत तो खायला मिळे.पण त्यावेळी पैश्याची फारच तंगी असल्याने खाण्याची इच्छा दाबूनच ठेवावी लागे.
      आमच्या वसतीगृहाच्या खोलीतून मेस दिसे आणि त्याचजवळ स्नानगृह व शौंचालये होती.आमच्या ब्लॉकमध्ये स्वच्छतागृह होतेच पण तेथे अंघोळीची सोय नव्हती. या स्नानगृहात सकाळी मोठा बॉयलर पेटवलेला असे व त्यातून बादली, बादली गरम पाणी काढून तेथील कर्मचारी देत असे. अंघोळीसाठी  पत्र्याच्या भिंती उभ्या करून दहा बारा छॉटी बंद स्नानगृहे केलेली असत.त्यात बादली नेऊन त्या गरम पाण्याने अंघोळ करता येत असे
        फर्ग्युसनच्या वसतीगृहात असताना डॉ.माइणकरांकडे कधी कधी जात असे.त्यांचा बंगला आमच्या होस्टेल ब्लॉकच्या मागेच होता त्यामुळे मागील फाटकातून त्यांच्याकडे जाता येत असे.त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन काय बोलावे मला कळत नसे त्यामुळे त्यांना तोंड दाखवून येणे हा एक उपचारच असे.त्यानी त्यांच्याकडे आलेल्या प्रा.घाणेकरांची ओळख करून दिली.त्याचाही मी फारसा उपयोग करून घेतला नाही.
     मी पहिल्यांदा पुण्याच्या थिएटरमध्ये पिक्चर पाहिला तो मित्रांबरोबरच. त्यावेळी हिंदविजय व डेक्कन ही सिनेमागृहे डेक्कन जिमखान्यावर होती तेथपर्यंत चालतच जावे लागे. हिंदविजयला त्यादिवशी "परवरिश" हा राजकपूर, माला सिन्हा व महमूदचा पिक्चर लागला होता.त्यावेळी प्रथमच मी इतके चांगले सिनेमागृह पहात होतो.नंतर त्याचे नटराज झाले व आता तर ते नाहीच.त्यावेळपर्यंत चार किंवा पाच आणे दराने पिक्चर मी पाहिले होते आणि तसे हिंदविजयमध्येही प्रथम दर्जाचे तिकीट दहा बारा आणेच असेल पण ते उपलब्ध नव्हते आणि एकदम बाल्कनीचे सव्वा रु.चेच तिकीट काढताना माझा जीव बराच वरखाली झाला पण तसाच धीर करून तिकीट काढून बसलो.पिक्चर चांगला असला तरी सहाचा सिनेमा नऊ वाजता सुटल्यावर जेवायला मिळेल की नाही या भीतीने त्याची जेवढी घ्यायला हवी ह्प्ती तितकी मजा घेता आली नाही शेवटी सव्वानऊला मेसमध्ये आमची ताटे झाकून ठेवलेली पाहिली तेव्हां कोठे जीव भांड्यात पडला.
       त्यानंतर मग बरेच सिनेमे पाहिले त्यातल्यात्यात पॅरेमाउंट ला मॅटिनीला देव आनंदचे जुने पिक्चर लागत ते आम्ही हमखास बघत असू."बारीश","टॅक्सी ड्रायव्हर""आरपार" "जागते रहो"इ.जुने पिक्चर त्यात पाहिले.दादा पुण्याला आले असताना त्यांच्याबरोबर कधी नवे मराठी पिक्चरही पाहिले. "झनक झनक पायल बाजे"हा असाच त्या काळात बघितलेला व त्यानंतरही बरेच वेळ पाहिलेला चित्रपट.नाटके मात्र त्या कालात पाहिली नाहीत कारण त्यांचे तिकिटदर त्यामानाने जास्त असत.
      त्याच काळात बी.जे.मेडिकल कॉलेजच्या आर्ट सर्कलतर्फे जवळजवळ प्रत्येक वर्षी पंडित रविशंकर यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम होत असे पण त्याला हजेरी लावण्याची इच्छा कधी झाली नाही हे म्हणजे अगदी "अभाग्याचे घरी बाबा कामधेनु आली नाठाळ म्हणून त्याने हाकलुनिया दिधली " असा प्रकार झाला .
   नव्या विद्यार्थ्यांना अपरिचित वातावरणात रहाणे सुसह्य व्हावे म्हणून आमच्या महाविद्यालयाने "ट्युटोरियल क्लासेस"हा प्रकार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला.त्यात वीस वीस विद्यार्थ्यांच्या तुकडीस एक एक प्राध्यापकानी मार्गदर्शन करावे असा विचार होता.आठवड्यातून ते दोनदाएकत्र येत व त्यात आपल्या अडचणी विद्यार्थ्यांनी सांगून प्राध्यापकांनी त्याचे निवारण करावे किंवा सोडवण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी कल्पना होती.पण आम्हाला अडचणी मांडण्याचे धैर्य नव्हते व प्राध्यापकांना त्या सोडवण्यात रस नव्ह्ता असे म्हटले तरी चालेल.आणि तसेही आम्ही अडचणी सांगितल्याच नाहीत तर ते काय सोडवणार?आमच्या तुकडीस प्रा.वि.मा.बाचल मार्गदर्शक होते व त्यांचा वेळ त्यानी जेन ऑस्टिनची"प्राइड अंड प्रेज्युडाइस" कादंबरी वाचण्यासाठी (म्हणजे आमच्याकडून वाचून घेण्यासाठी)वापरला.आणि इतक्या थोड्या वेळात ती कादंबरी पूर्ण करणे शक्य नसल्याने तो प्रकल्पही अपुराच राहिला ती कादंबरी मी नंतर सेवानिवृत्त झाल्यावर वाचली.
   सुरवातीस महाविद्यालयाच्या "वाडिया"लायब्ररीत जाऊन पुस्तके घेण्याची बरीच चढाओढ असायची कारण त्यावेळी कोणाकडेच पुस्तके नसायची वाचनालय रात्री १० -११ वा.पर्यंत उघडे असे.रात्रीचे जेवण करून वाचनालयात जाण्यास सुरवात केली.सुरवातीस सर्वांनाच उत्साह असल्यामुळे वाचनालयात बरीच गर्दी व्हायची.वाचनालयात छान शिसवी खुर्च्या व टेबले होती.अर्थात टेबले स्वतंत्र नसून लाकडी लांब टेबलांना मध्ये पार्टिशन घालून स्वतंत्रपणे प्रत्येकास वाचन लेखन करता येईल अशी व्यवस्था होती आणि ती खरेच आदर्श होती.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र दिवाही असे.सुरवातीस गर्दी करून डी.एस.जोगांच्या फिजिक्सचा मोठा ठोकळा घेण्याची स्पर्धा असे आणि तो ठोकळा घेऊन वाचायला लागल्यावर थोड्याच वेळात झोप यायला लागे.मी इकॉनॉमिक्स घेतले असल्याने कधी कधी ऍडम्सचे पुस्तकही घेऊन बसत असे.
   नंतर काही विषयांची पुस्तके विकत घेतल्यावर वाचनालयात जाण्याचा कंटाळा येऊ लागला व  इतक्या चांगल्या वाचनालयाचा फारसा फायदा घेऊ शकलो नाही असे आता वाटते.वाचनालयाचा उपयोग करून घेणे हेही एक शास्त्रच आहे व त्यासंबंधी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकताच आहे असे आता  वाटते.माझ्या बाबतीत स्वतंत्र अभ्यास करण्याच्या संवयीमुळे अश्या समूहात अभ्यास करण्याचा सरावच मला झाला नाही.शाळेतही मी स्वतंत्रच अभ्यास करत असे.माझ्या मित्राना मी शिकवत असे किंवा त्यांच्या अडचणी सोडवतही असे,पण मला माझ्या अभ्यासाला स्वतंत्र अवकाश लागत असे त्याचाही परिणाम असेल .
   पहिले काही दिवस शिष्यवृत्ती मिळायला लागली नसल्याने घरून येणाऱ्या मनिऑर्डरीचीच वाट पहावी लागे.सर्वांचीच तशी परिस्थिती होती त्यामुळे वसती गृहाच्या व्हरांड्यात जमून प्रत्येकजणच आपली म.ऑ.केव्हां येणार याचा विचार करत असे. .
            दाढेसारखाच सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी झंवर परिचित तर झालाच पण एका वेगळ्या बाबतीत त्याने आमचे पुढारीपण केले.त्यावेळी महाविद्यालयात सकाळी पी.टी.असे. आता याचे आश्चर्यच वाटते कारण शाळेतसुद्धा जरी पी.टी.चा तास असला तरी पण दररोज सकाळी कवायत क्वचितच असे..त्यात कवायतीसाठी महाविद्यालयाचा पोषाक म्हणजे निळी अर्धी चड्डी व बनियन तो सुद्धा सॅंडो.असा ड्रेस निवडणाऱ्या महाविद्यालयीन प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण थंडीच्या दिवसात त्याचा अधिक त्रास वाटे अगदी हुडहुडी भरे.त्या ड्रेससाठी महाविद्यालयाने जी किंमत ठेवली होती त्यातील सॅंडो बनियनची किंमत बाहेर दुकानात मिळणाऱ्या तसल्या बनियनपेक्षा आठ बारा आणे अधिक होती असा झंवर या मारवाडी डोक्यातून निघालेला शोध.त्यामुळे आम्हाला तसे बनियन बाहेरून घ्यायची परवानगी द्यावी असा आग्रह त्याने धरला व त्याच्या पुढारीपणाखाली आम्ही काही जणांनी महाविद्यालयाचे बनियन घेण्याचे नाकारले व शेवटी महाविद्यालयाने आम्हास ते बाहेरून घेण्याची परवानगी दिली. काटकसरीचा महान विजय !
    त्यावेळी अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच विद्यार्थी बी ग्रूप घेत बाकी आम्ही सारे ए ग्रूप.त्यांना गणित जमत नाही म्हणूनच ते बी ग्रूपला गेले असे आम्ही त्याना चिडवत असू. आता परिस्थिती उलट झाली आहे.