रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

 D
अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी ।   (श्री ज्ञानेश्वर महाराज)

फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________

ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.  

मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.

या
अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर,
मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा
तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.

______________________________

पाहणं
आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर
आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा
प्रभाग दृक स्मृतींनी व्यापलेला आहे.

आपल्याला वाटतं  आपण सदैव
पाहतो तर आहोतच,   'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं  विशेष काय साधणार
आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण
सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.   त्यामुळे :

चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी । 

हा आपला अनुभव होत नाही.

आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते;   सर्वव्यापी 'निराकार '  आपल्याला दिसत नाही.
_______________________

ट्राय टू अंडरस्टँड धिस,

एखाद्या
निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा.
समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय
आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला
कळतं, 'सफरचंद'.   पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली
असते. मग सफरचंदावरनं ऍडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग
>  मग आपण सखी बरोबर गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या
समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं
सफरचंद दिसेनासं होतं.

थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे'
असं पाहत नाही.   आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि
हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला
विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!

________________________

झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची
ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे
समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा
प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये
संवाद सुरू होतो.   

साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण  बसलो तर
केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं.
त्या काही सेकंदभर आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.

'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे'  म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.

असे
निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता
येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण
प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.

_________________________________

देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।

त्या
निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय
आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला
लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा
तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला
लागेल.                                       

___________________________

अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।

असा
निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये
असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली
स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर,  निराकारावर, नजर स्थिर होईल.

ज्या
क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्‍या नजरेचं रिवर्सल
होईल. तुमची नजर दुहेरी होईल. ती  भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी एकावेळी
पाहू लागेल.

तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य  व्यापून आहे.

तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.   जग माया आहे म्हणजे ते नाही असं नाही.   तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.

__________________________

पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।

हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________

ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।

हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.

ओशो
म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल
लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध
होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र
महागीता) 

असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर
उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी
निरंतर पाहणे'  इतकंच करायचंय. तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही
त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत
प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.

__________________________

या
काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर
पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर
होणारा परिणाम आहे.   

'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत. त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.

'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव लिहीलेत की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.