किल्ली - ३

तीन

घरी परतताना समाद्दार काका म्हणाले, "काय मित्तर बाबू, रहस्याचा उलगडा होण्याची काही शक्यता दिसतेय का?"

फेलूदा म्हणाला. "मला विचार करायला थोडा वेळ पाहिजे. शिवाय तुमच्या काकांची जी कागदपत्रं मी बरोबर घेतली आहेत ती मला बारकाईनं वाचावी लागतील. त्यातून तुमच्या काकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडीफार माहिती मिळेल. मला संगीत आणि वाद्यं यांच्याबद्दलही थोडं वाचन करावं लागेल. ह्या सगळ्यासाठी मला दोन दिवसांचा तरी अवधी लागेल."

"हो. हो. लागू दे तेवढा वेळ. काहीच हरकत नाही."

"मला तुमच्याकडून तारखांसंबंधी थोडा खुलासा हवा आहे."

"बोला, काय हवंय?"

"राधारमण बाबूंचा मुलगा मुरलीधर याचा मृत्यू केव्हा झाला?"

"१९४५ मध्ये, जवळजवळ २८ वर्षांपूर्वी."

"त्याचा मुलगा तेव्हा किती वर्षांचा होता?"

"कोण धरणी? तो तेव्हा साधारण सात-आठ वर्षांचा असेल."

"तो नेहमी कलकत्त्यातच रहात होता का?"

"नाही. मुरलीधर बिहारमध्ये नोकरी करत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची बायको मुलाला घेऊन कलकत्त्याला आमच्याकडे रहायला आली. काही वर्षांनी तिचाही मृत्यू झाला. त्यावेळी धरणी कॉलेजमध्ये जात होता. तो अभ्यासात चांगला होता. पण आईच्या मृत्यूनंतर त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं. त्यानं कॉलेज सोडलं आणि एका नाटक कंपनीत गेला. एका वर्षांनंतर माझ्या काकांनी बामुनगुच्छीला घर बांधलं"
"१९५९ मध्ये. मी हे गेटवर लिहिलेलं पाहिलं आहे."
-------------
राधारमण समाद्दारांची कागदपत्रे म्हणजे काही पत्रे, काही पावत्या, औषधांची प्रिस्क्रिप्शन्स, स्पिग्लर नावाच्या एका जर्मन कंपनीने बनवलेल्या वाद्यांचा एक कॅटलॉग, वहीतून फाडून काढलेल्या कागदांवर लिहिलेली काही नोटेशने आणि वर्तमानपत्रात छापून आलेली काही नाटकांची परीक्षणे. त्या परीक्षणांमध्ये जिथे संजय लाहिरी नाव आलेलं होतं, त्या ओळी निळ्या पेन्सिलीने अधोरेखित केलेल्या होत्या.

"हम्म्म" फेलूदा नोटेशनांकडे बघत म्हणाला, "हे अक्षर सुरजित दासगुप्तांच्या पत्रातल्या हस्ताक्षरासारखंच आहे." मग त्याने कॅटलॉग नीट पाहिला आणि म्हणाला, "ह्यात मेलोकॉर्डचा अजिबात उल्लेख नाही." नाटकांची परीक्षणे वाचून तो म्हणाला. "मला तर वाटतं धरणीधर आणि संजय लाहिरी ह्या दोन व्यक्ती एकच असाव्यात. राधारमण बाबूंनी आपल्या नातवाचं नाव टाकलं होतं तरी ते त्याच्याबद्दलची माहिती जमा करून ठेवत होते. विशेषत: त्याच्या अभिनयाची प्रशंसा असलेली कात्रणं ते ठेवत होते."

फेलूदाने सगळी कागदपत्रे पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित ठेवली. त्यानंतर संजय लाहिरी कोणत्या नाटक कंपनीत काम करतो ती माहिती काढण्यासाठी त्याने ’मंचलोक’ ह्या रंगभूमीला वाहिलेल्या मासिकाच्या कचेरीत फोन केला. त्यांच्याकडून असे कळले की त्या कंपनीचे नाव ’मॉडर्न ऑपेरा’ असे आहे आणि संजय लाहिरी त्यांच्या नाटकांमध्ये नेहमी प्रमुख भूमिका करतो. हे कळल्यावर फेलूदाने ’मॉडर्न ऑपेरा’च्या कचेरीत फोन केला तर त्यांनी सांगितले की त्यांचा ग्रुप जालपाईगुडीला गेलेला आहे आणि साधारण आठवड्याभराने परत येईल.

जेवण झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. एका दिवसात इतक्या ठिकाणी मी कधीच गेलो नव्हतो! प्रथम आम्ही नॅशनल म्यूझियममध्ये गेलो. तिथे फेलूदाचे काय काम होते ते काही मला कळले नाही आणि मी पण ते विचारले नाही. तो गप्प गप्प होता आणि हाताची बोटे मोडत होता. तो खूप विचारात असल्याचे हे लक्षण होते हे मला अनुभवाने माहीत झाले होते. अशा वेळी त्याच्याशी कोणी बोलले, प्रश्न विचारले तर त्याला ते अजिबात खपत नाही हेही मला माहीत होते. आम्ही सरळ संगीताच्या विभागात गेलो. मला कल्पनाही नव्हती की म्यूझियममध्ये असा एखादा विभाग आहे. तो विभाग विविध प्रकारच्या वाद्यांनी खच्चून भरला होता. अगदी महाभारताच्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची वाद्ये तिथे होती. मात्र त्यापैकी कोणतेही वाद्य पाश्चिमात्य वाटत नव्हते.

तिथून आम्ही वाद्यांच्या दुकानांमध्ये गेलो. एक दुकान फ्री स्कूल स्ट्रीटवर होते आणि दुसरे लाल बझारमध्ये होते. पण कोणत्याही दुकानदाराने मेलोकॉर्ड हे नावही ऐकलेले नव्हते. लाल बझार मधल्या मोंडल ॲण्ड मोंडल कंपनीचे मोंडल म्हणाले, "राधारमण समाद्दार आमचे जुने आणि जाणते कस्टमर होते. पण तुम्ही म्हणता ते वाद्य आम्ही त्यांना विकल्याचं काही आठवत नाही. कसं असतं ते वाद्य?"

"ते साधारण हार्मोनियमसारखं असतं पण आकारानं बरंच लहान आणि त्याचा आवाज पियानो आणि सतार यांच्या मिश्र आवाजासारखा येतो."

"त्यात किती सप्तकं असतात?"

मला माहीत होते की सप्तक म्हणजे सा रे ग म प ध नी हे सात सूर. मोंडलांच्या दुकानातील एका मोठ्या हार्मोनियमला तीन सप्तके होती. जेव्हा फेलूदाने त्यांना सांगितले की मेलोकॉर्डला एकच सप्तक असते तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, "मला नाही वाटत माझ्याकडून तुम्हाला या बाबतीत काही मदत मिळेल. तुम्ही म्हणता ते वाद्य मला तर खेळण्यातलंच वाद्य वाटतंय. तुम्ही न्यू मार्केटमधल्या खेळण्यांच्या एखाद्या मोठ्या दुकानात चौकशी करा."

आम्ही मोंडल बाबूंचे आभार मानले आणि कॉलेज स्ट्रीटला गेलो. तिथे फेलूदाने संगीतावरची तीन पुस्तके विकत घेतली आणि मग आम्ही ’मंचलोक’ च्या कचेरीकडे निघालो. कचेरी लगेच सापडली पण संजय लाहिरीचा फोटो काही लवकर मिळाला नाही. शेवटी फेलूदाने एका गठ्ठ्याच्या तळातून एक चुरगाळलेला फोटो शोधून काढला आणि तो विकत घेण्यासाठी पैसे पुढे केले तर मासिकाचे संपादक हसून म्हणाले, "अहो, तुम्ही खुद्द फेलू मित्तर! तुमच्याकडून कसले पैसे घ्यायचे? उलट आम्ही तुमच्या थोडेसे तरी उपयोगी पडलो याचा आम्हाला आनंद आहे."

त्यानंतर एका उपाहारगृहात आम्ही लस्सी घेतली आणि घरी गेलो. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजले होते. वीजकपातीमुळे सगळीकडे अंधार होता. पण फेलूदावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने शांतपणे मेणबत्या लावल्या आणि त्यांच्या उजेडात संगीतावरील पुस्तके वाचायला सुरुवात केली. रात्री नवाच्या सुमारास वीज आल्यावर तो मला म्हणाला, "तोपशे, तुझा तो मित्र आहे नं, पोटलू, शेजारीच राहतो तो रे, त्याच्याकडून त्याची हार्मोनियम आजच्या रात्रीपुरती आपल्याला मिळतेय का बघ. "मी लगेचच पोटलूकडून हार्मोनियम घेऊन आलो. मी रात्री खूप उशीरा झोपलो पण फेलूदा त्यानंतरही पेटी वाजवत होता.

मला रात्री एक विचित्र स्वप्न पडलं. मी एका भल्या मोठ्या लोखंडी दरवाजापुढे उभा होतो. त्याला एक मोठे भोक होते. इतके मोठे की मी त्यातून सहज आत जाऊ शकलो असतो. पण तसं करण्याऐवजी मी, फेलूदा आणि समाद्दार काका एक खूप मोठी किल्ली त्या भोकात घालण्याचा प्रयत्न करत होतो. शेजारी सुरजित दासगुप्ता लांब झगा घालून नाचत होते आणि नाचता नाचता गातही होते: आठ दोऽऽऽऽन, नऊ, एऽऽऽऽऽक; आठ दोऽऽऽऽन, नऊ एऽऽऽऽऽक.

क्रमश: