किल्ली - १

प्रस्तावनाः

सत्यजित रे यांच्या ’समाद्दारेर चाबी’ ह्या बंगाली कथेच्या गोपा मजुमदार यांनी  The Key ह्या नावाने केलेल्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न.

सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटसृष्टीला दिलेल्या अनेकानेक अजोड कलाकृतींमुळे ते आपल्याला परिचित आहेत पण त्यांची लेखणीही तितकीच प्रभावी होती हे बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यांच्या आजोबांनी मुलांसाठी आणि किशोरांसाठी सुरू केलेल्या ’संदेश’ ह्या मासिकात ते नियमितपणे लिहीत. त्या मुख्यत्वे विज्ञानकथा आणि गुप्तहेरकथा असत.  खाजगी गुप्तहेर  ’प्रदोष मित्तर’ उर्फ फेलूदा हा सत्यजित रे यांचा मानसपुत्र. फेलूदाचा १३-१४ वर्षाचा चुलत भाऊ तपेश (फेलूदा त्याला तोपशे म्हणतो.) हा नेहमी फेलूदाबरोबर असतो. फेलूदाच्या सर्व कथा तपेशने सांगितल्या आहेत. शेरलॉक होम्स आणि वॉटसन अशीच ही जोडजोळी आहे. 

ही कथा १९७३ साली लिहिलेली आहे. कथा वाचताना  ती कोणत्या काळात घडते ह्याचे भान ठेवले तर वाचनाचा अधिक आनंद मिळेल.


------------
एक

"तुला माहीत आहे ही हिरवीगार झाडं, हिरवीगार शेतं पाहाणं आपल्या डोळ्याला इतकं सुखावह का वाटतं?" फेलूदानं विचारलं आणि मग स्वत:च त्याचं उत्तर दिलं. "कारण अगदी प्राचीन काळापासून माणूस अशा झाडाझुडपांच्या, वृक्षवल्लींच्या सहवासातच राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी माणसाचं एक निकोप नातं जडलेलं आहे. अर्थात आताच्या काळात मोठ्या शहरात झाडं बघायला मिळणंही कठीण झालंय. म्हणूनच आपण शहरापासून दूर जायला लागलो की डोळ्यांना शांत वाटतं आणि आपलं मन पण सुखावतं. तुझ्या लक्षात आलं असेल की शहरातल्या लोकांमध्ये डोळ्याचे विकार जास्त दिसून येतात. खेडेगावातल्या किंवा एखाद्या हिल-स्टेशनवर रहाणाऱ्या लोकांना क्वचितच चष्मा लागलेला आढळून येतो."

फेलूदाची स्वत:ची नजर अगदी तीक्ष्ण होती. त्याला चष्मा नव्हता आणि एखाद्या गोष्टीकडे तो तीन मिनिटे आणि १५ सेकंदे पापणी सुद्धा न हलवता बघू शकत असे हे मी अनेकदा पाहिलेले आहे. तो स्वतः कधीच खेड्यात राहिलेला नव्हता तरी हे असे कसे असे मला अनेकदा विचारावेसे वाटले पण माझे धाडस झाले नाही. कारण विचारले असते तर माझी कंबक्तीच निघाली असती!

आम्ही मणिमोहन समाद्दार नावाच्या एका गृहस्थांच्या बरोबर प्रवास करत होतो. त्यांना चष्मा होता (ते शहरात रहाणारेच होते!) आणि ते साधारण पन्नाशीचे होते. त्यांचे केस कानाजवळ पांढरे व्हायला लागले होते. त्यांच्याच फियाटमधून आम्ही कलकत्त्याच्या एका उपनगरात- बामुनगुच्छी इथे चाललो होतो. मणीबाबूंची आणि आमची कालच ओळख झाली होती. म्हणजे त्याचे असे झाले...

काल दुपारी एक अनोळखी गृहस्थ अचानक आमच्याकडे आले. मी आणि फेलूदा वाचत बसलो होतो. फेलूदा न्युमरॉलॉजीवरचे डॉ.मॅट्रिक्स ह्यांचे एक पुस्तक वाचत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मला कळत होतं की त्याला ते पुस्तक वाचताना खूप मजा येत आहे. मी त्याच्याकडे पहातोय हे त्याच्या लक्षात आल्यावर तो  जरासा हसला आणि म्हणाला, "आकड्यांचे सामर्थ्य आणि डॉ.मॅट्रिक्स सारख्यांच्या आयुष्यातील त्यांची भूमिका ह्याबद्दल तुला कळलं तर तू आश्चर्यचकित होशील. हे बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक. डॉ.मॅट्रिक्स यांनी हे शोधून काढलं होतं. अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांचा खून झाला होता. त्यांची नावं तुला माहीत आहेत का?"

"हो. लिंकन आणि केनडी."

"बरोबर. मग आता प्रत्येकाच्या नावात किती अक्षरं आहेत ते सांग बघू."

"एल-आय-एन-सी-एल-ओ-एन. सात. के-इ-एन-एन-इ-डी-वाय. सात."

"हं. आता ऐक. लिंकनची हत्या १८६५ मध्ये झाली आणि केनडींची १९६३ मध्ये. म्हणजे जवळजवळ १०० वर्षांनी. दोघांचाही मृत्यू शुक्रवारी झाला. दोघांच्याही बायका त्यावेळी त्यांच्याजवळ होत्या. लिंकनची हत्या फोर्ड थिएटरमध्ये झाली. केनडींना गोळ्या घातल्या तेव्हा ते ज्या गाडीत होते तिचं नाव लिंकन होतं आणि ती फोर्ड कंपनीने बनवलेली होती. लिंकनच्या नंतर जो राष्ट्राध्यक्ष झाला त्याचं नाव ॲंड्र्यू जॉन्सन होतं आणि केनडींच्या नंतरचा राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन. पहिल्या जॉन्सनचा जन्म १८०८ मधला दुसऱ्याचा १९०८ मधला. लिंकनचा खून कुणी केला माहीत आहे?"

"हो. पण आता नाव आठवत नाहीये."

"त्याचं नाव होतं जॉ विल्किस बूथ आणि जन्म १८३९ चा तर केनडींची हत्या करणाऱ्याचं नाव होतं ली हार्वे ओस्वाल्ड आणि जन्म १९३९ मधला. आता दोघांच्या नावांमधली अक्षरं मोज बघू."

"अरे!! दोन्ही नावात पंधराच अक्षरं आहेत!"

खरे तर फेलूदा मला डॉ.मॅट्रिक्स यांच्या आणखी काही निरीक्षणांबद्दल सांगायच्या मूडमध्ये होता. पण तेवढ्यात श्री.समाद्दार आले. त्यांनी फेलूदाला भेटण्यासाठी वेळ ठरवून घेतली नव्हती. ते अचानकच आले होते. मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली आणि म्हणाले, मी इथे जवळच ’लेक प्लेस’ मध्ये रहातो.
"असं होय! बरं." फेलूदा म्हणाला.

"अं.. तुम्हाला माझे काका कदाचित ऐकून माहीत असतील. राधारमण समाद्दार."

"हो. हो. त्यांचा नुकताच मृत्यू झाला ना? त्यांना संगीतात खूप रस होता असं मी ऐकलंय."

"हो. बरोबर."

"मी वर्तमानपत्रात, त्यांच्या शोकसंदेशांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलं. त्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मला वाटतं त्यांचं वयही बरंच होतं, नाही का?"

"हो. ते गेले तेव्हा ते ऐंशी वर्षांचे होते. तुम्हाला त्यांच्याबद्दल आधी काही माहीत नव्हतं याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण त्यांनी संगीत सोडून दिलं तेव्हा तुम्ही वयानं अगदी लहान असणार. पंधरा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी बामुनगुच्छीला घर बांधलं. ते शेवटपर्यंत -अगदी एकांतवासातच म्हणाना- तिथेच राहिले. १८ सप्टेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आले आणि त्या रात्रीच ते गेले."

"असं होय!"

समाद्दार खाकरले आणि जरा बिचकतच म्हणाले, "तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला न कळवता तुमच्या घरी येऊन तुम्हाला हे सगळं का सांगतोय. पण मला वाटलं की माझ्या पुढच्या प्रश्नाची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगावी."

"हो. हो. काही हरकत नाही."

समाद्दर काकांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. "माझे काका जरा वेगळेच होते. ते वकील होते आणि त्यांनी भरपूर पैसा मिळवला होता. पण पन्नाशीनंतर त्यांनी वकिली बंद केली आणि ते पूर्णपणे संगीताकडे वळले. त्यांना गाता तर येत होतंच पण ते सात-आठ वाद्यंही उत्तम वाजवायचे. त्यात काही पाश्चात्य वाद्यंही होती. मी स्वत: त्यांना सतार, व्हायलिन, पियानो, हार्मोनियम, बासरी आणि तबला वाजवताना ऐकलं आहे. खेरीज त्यांना वाद्यं जमा करण्याचा पण छंद होता. छंद कसला, ते एक प्रकारचं वेडच होतं!  त्यांच घर म्हणजे वाद्यांचं छोटसं संग्रहालयच होतं."

"कोणतं घर म्हणताय तुम्ही?"

"ते कलकत्त्यात असतानाच त्यांनी वाद्यं जमा करायला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी आपला सगळा संग्रह बामुनगुच्छीला हलवला. वेगवेगळी वाद्यं मिळवण्यासाठी ते खूप फिरले आहेत. एकदा त्यांनी मुंबईत एका इटालियन माणसाकडून व्हायलिन विकत घेतलं होतं. काही महिन्यांनी त्यांनी ते कलकत्त्यात तीस हजाराला विकलं."

फेलूदाने मला सांगितले होते की तीनशे वर्षांपूर्वी इटलीमध्ये उत्तम व्हायलिनं बनवणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. तशा व्हायलिनांची किंमत आता लाखाहूनही जास्त होईल.

समाद्दार काका पुढे म्हणाले, "माझ्या काकांच्या अंगात खूप गुण होते पण त्यांच्यामध्ये काही दोषही होते. त्यामुळेच त्यांच्यावर शेवटी एकट्याने रहायची वेळ आली. ते खूप तापट होते. त्यामुळे बहुतेक नातलगांनी त्यांना भेटणंच बंद केलं. पण काकांना त्याचं काही वाटलं नाही. कारण त्यांनाही नातलगांशी संबंध ठेवण्यात रस नव्हता."

"त्यांना कोण कोण नातलग होते?"

"फारसे नव्हतेच. तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्या बहिणी आणि दोन भाऊ आता हयात नाहीत. तिसऱ्या भावानं तीस वर्षांपूर्वी घर सोडलं. तो जिवंत आहे की नाही हेही कुणाला ठाऊक नाही. राधारमण काकांची बायको आणि एकुलता एक मुलगा मुरलीधर हे दोघेही आता हयात नाहीत. मुरलीधरला एक मुलगा आहे. त्याचं नाव धरणीधर. हा नातू राधारमण काकांचा अगदी लाडका होता. पण त्यानं कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलं आणि तो नाटक कंपनीत गेला. हे कळल्यावर काकांनी त्याचं नावच टाकलं. मला वाटतं त्यानंतर तो काकांना कधी भेटला नाही."

"तुमचं आणि त्यांचं नेमकं नातं काय होतं?"

"माझे वडील त्यांच्या थोरल्या भावांपैकी एक. वडिलांचं निधन होऊन बरीच वर्षं झाली."

"अच्छा, आणि धरणीधर अजून जिवंत आहे?"

"हो, पण नंतर तो दुसऱ्या नाटक कंपनीत गेला. आता तो ’जात्रा’ करतो. काका गेल्यावर मी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो सध्या कलकत्त्यात नाहीये आणि जवळच्या लहानलहान गावात दौरा करतोय असं कळलं. नाटकाच्या क्षेत्रात त्यानं चांगलं नाव मिळवलंय. त्याला संगीताचं पण चांगलं अंग आहे. म्हणूनच तो काकांचा लाडका होता."

समाद्दार काका थोडं थांबले आणि म्हणाले, "मी काकांना क्वचितच भेटायला जायचो, साधारण दोनेक महिन्यांतून एकदा. हल्ली तर माझ्या कामामुळे मला तेही जमत नव्हतं. माझी प्रिंटिंग प्रेस आहे, युरेका प्रेस नावाची. हल्ली त्या भागात लोड शेडिंग फार वेळा होतं. त्यामुळे ऑर्डरी पूर्ण करणं कठीण जातं. तर ते असो. त्यादिवशी काकांचे शेजारी अवनीबाबू यांनी मला फोन करून काकांना हार्ट ॲटॅक आल्याचं कळवलं. मी ताबडतोब आमच्या जवळच रहाणारे हार्ट स्पेशालिस्ट चिंतामणी बोस यांना घेऊन निघालो. आम्ही बामुनगुच्छीला पोहोचलो तेव्हा काका बेशुद्धच होते पण काही वेळाने त्यांनी डोळे उघडले. त्यांनी बहुतेक मला ओळखलं, ते चार शब्द बोलले पण. पण लगेच सगळं संपलंच!"

"काय म्हणाले?" फेलूदा एकदम खुर्चीतून पुढे झुकून म्हणाला.

"ते म्हणाले, ’माझं .... नाव....’ त्यानंतर ते बोलायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना ते शक्य होत नव्हतं. थोड्या वेळानं त्यांनी कसाबसा एक शब्द उच्चारला: ’किल्ली’ आणि खेळ आटोपला! "

फेलूदाने समाद्दार काकांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले आणि म्हणाला. "ह्या शब्दांचा अर्थ काय असावा ह्याची तुम्हाला काही कल्पना आहे का?"

"प्रथम मला वाटलं की त्यांना आपलं नाव, प्रतिष्ठा याची काळजी वाटत असावी. शेवटी शेवटी त्यांच्या लक्षात आलं असावं की लोक त्यांना ’कंजूस’ म्हणतात. पण किल्ली हा शब्द का उच्चारला ते मात्र कळत नाहीये. त्यांना किल्लीबद्दल काही तरी सांगायचं असावं असं मला वाटतंय. पण कुठली किल्ली कुणास ठाऊक? त्यांच्या खोलीत एक कपाट आणि एक पेटी आहे. पण त्या दोन्हीच्या किल्ल्या एका टेबलाच्या खणात असतात आणि ते टेबल त्यांच्या पलंगाजवळच आहे. घरात फक्त तीनच खोल्या आहेत आणि बाथरूम त्यांच्या बेडरूमला जोडूनच आहे. घरात फर्निचर नसल्यातच जमा आहे आणि आहे त्यालाही किल्लीची जरूर पडणार नाही. मुख्य दरवाजाला जे कुलूप आहे त्याला किल्ली लागत नाही, ते जर्मन कॉम्बिनेशन लॉक आहे."

"त्या कपाटात आणि पेटीत ते काय ठेवत असत?"

"विशेष काही नाही. कपाटात थोडेफार कपडे आणि काही कागदपत्रं आणि पेटी तर जवळजवळ रिकामीच आहे."

"कुठे काही पैसे आढळले?"

"टेबलाच्या खणात थोडे सुटे पैसे आणि पाचाच्या आणि दोनाच्या काही नोटा. एवढंच. त्यांच्या उशीखाली एक पैशाचं पाकीट होतं पण त्यात फारच थोडे पैसे होते. ते रोजच्या खर्चाला लागणारे पैसे त्या पाकिटात ठेवत असत. त्यांचा म्हातारा नोकर अनुकूल यानं मला हे सांगितलं."

"पण त्या पाकिटातले किंवा टेबलाच्या खणातले पैसे संपले की ते काय करायचे? नक्कीच ते दुसरीकडे कुठे तरी पैसे ठेवत असणार, नाही का?"

"हो, बहुतेक तसंच काही तरी असेल."

"असं का म्हणता तुम्ही? त्यांचं बॅंकेत खातंबितं असेल की."

समाद्दार काका हसत म्हणाले, "त्यांचं कोणत्याही बॅंकेत खातं नव्हतं. असतं तरच नवल! खूप पूर्वी त्यांचं बॅंकेत खातं होतं पण ती बॅंक बुडाली आणि त्यांचे सगळे पैसे गेले. त्यानंतर त्यांनी बॅंकेत पैसे ठेवायचे नाहीत असंच ठरवलं." समाद्दार काका जरा दबल्या आवाजात म्हणाले, "पण त्यांच्याकडे भरपूर पैसा असणार, नाही तर इतकी दुर्मीळ आणि महाग वाद्यं विकत घेणं कसं शक्य झालं असतं? शिवाय ते स्वत:वर पण बराच खर्च करत. त्यांना खाण्याची आवड होती. त्यांचे कपडे त्यांच्या खास शिंप्याकडून शिवून घेतलेले असत. घराभोवती मोठी बाग होती आणि त्यांनी एक सेकंडहॅंड ऑस्टिनही घेतली होती. त्या गाडीतून ते मधूनमधून कलकत्त्याला येत असत. तेव्हा..."

फेलूदाने एक चारमिनार शिलगावली, दुसरी समाद्दार काकांपुढे केली. त्यांनी ती शिलगावून लांब झुरका घेतला आणि म्हणाले, "आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुमच्याकडे का आलो? ती किल्ली कशाची आहे? काकांनी सगळे पैसे कुठे ठेवले आहेत? ती किल्ली कोणत्या कुलुपाची आहे हे कळल्यावर आपल्याला पैसे सापडतील की आणखी काही सापडेल? त्यांनी मृत्युपत्र केलं आहे का? असेल तर ते सापडायला पाहिजे. नसेल तर सगळं त्यांच्या नातवाला मिळेल पण सगळं म्हणजे काय ते तर कळायला पाहिजे. तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि तपास करण्याच्या कौशल्याबद्दल मी खूप ऐकून आहे. मि.मित्तर, प्लीज मला मदत करा."

फेलूदाने त्यांची विनंती स्वीकारली आणि असे ठरले की समाद्दार काका दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आमच्या घरी येतील आणि त्यांच्या गाडीतून आम्ही सगळे बामुनगुच्छीला त्यांच्या काकांच्या घरी जाऊ. फेलूदाच्या चेहऱ्यावरून मला कळलं की ह्या वेगळ्या प्रकारच्या रहस्यामध्ये त्याला रस वाटायला लागला आहे. माझ्या मते हे रहस्यापेक्षाही एक कोडे होते पण नंतर कळले की हे प्रकरण कोड्यापेक्षा बरेच गुंतागुंतीचे होते.

क्रमश: