किल्ली - ५

पाच

समाद्दार काकांचा ड्रायव्हर तसा म्हाताराच होता पण तरीही तो पंच्याऐंशीच्या वेगाने चालला होता. आम्ही व्ही.आय.पी. रोडपर्यंत छान आलो पण फेलूदाला वाटत होतं आपण आणखी लवकर यायला हवं होतं. पण आता तर रस्ता अरुंद आणि खराब असल्याने वेग बराच कमी झाला होता. आम्ही बामुनगुच्छीला पोहोचलो तेव्हा नुकताच अंधार पडायला लागला होता.

राधारमण बाबूंच्या घराच्या फाटकात कोणीही नव्हते. ते हवालदार येण्याची वेळ बहुधा झाली नसावी. साधन आपली बंदूक घेऊन बागेत खेळत होता. "काय साधन बाबू, अंधारात कुणाची शिकार करताय?" फेलूदाने गाडीतून उतरता उतरता विचारले.  "वटवाघळांची" साधन म्हणाला. खरेच, तिथल्या एका पिंपळाच्या झाडावर कित्येक वटवाघळे लटकत होती. गाडीचा आवाज ऐकून अनुकूल बाहेर आला. समाद्दार काकांनी त्याला कंदील लावून आणायला सांगितले आणि स्वत: जर्मन कुलूप उघडायला सुरुवात केली. कुलूप उघडता उघडता समाद्दार काका म्हणाले, "तुम्ही हे कोडं कसं सोडवलं हे ऐकायला मी अगदी उतावीळ झालो आहे."  फेलूदाने त्यांना गाडीत काहीच सांगितले नव्हते. माझीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.  फेलूदा मात्र गप्पच होता. कुलूप उघडताच तो राधारमण बाबूंच्या खोलीत शिरला आणि त्याने आपली प्रखर प्रकाशाची विजेरी लावली. प्रथम तिचा उजेड भिंतीवर पडला आणि मग टेबलावर असलेल्या मेलोकॉर्डवर. मेलोकॉर्डच्या पांढऱ्या पट्ट्या त्या उजेडात चमकत होत्या. मला तर वाटलं ते वाद्य आमच्याकडे पाहून, दात विचकून हसत आहे. फेलूदा हळूच म्हणाला, "पट्ट्या! त्या पट्ट्यांकडे पाहा. राधारमण बाबू जेव्हा ’किल्ली’ म्हणाले तेव्हा त्यांना कुलूप-किल्लीमधली किल्ली म्हणायचे नव्हते. त्यांना वाद्याच्या किल्ल्या (keys) असं म्हणायचं होतं. म्हणजे पियानो किंवा तशा प्रकारच्या वाद्यांना...."

फेलूदाला आपले वाक्य पुरे करता आले नाही. कारण त्यानंतर जे झाले तेव्हा मी तर श्वास रोखून धरला. आता हे लिहिताना त्याच्या आठवणीने देखील माझा हात थरथरत आहे. 

फेलूदाचे शब्द ऐकताच समाद्दार काकांनी एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे मेलोकॉर्डवर झडप घातली. मेलोकॉर्ड उचलून ते फेलूदाच्या डोक्यात मारले आणि मला ढकलून देऊन ते खोलीबाहेर सुसाट पळाले. फेलूदाने चपळाईने हात वर करून आपले डोके वाचवले. पण त्यात त्याच्या हाताला मात्र जोराचा फटका बसला, विजेरी त्याच्या हातून खाली पडली आणि तो कळवळून पलंगावर पडला. मी सावरून उभा राहिलो पण तेवढ्यात समाद्दार काकांनी दरवाजा बाहेरून बंद केला. फेलूदा हळूच मला म्हणाला, "बाथरूम! मग मी विजेरी घेतली आणि आम्ही दोघे बाथरूमच्या दारातून बाहेर पळालो. तेवढ्यात आम्हाला गाडी सुरू होत असल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. आम्ही जरा पुढे जातो तो आम्हाला गलका ऐकू आला. अनुकूल जोरात काहीतरी   बोलत होता आणि अवनी सेन त्यांच्या मुलाच्या अंगावर ओरडत होते. जेव्हा आम्ही पुढच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो तेव्हा गाडी निघून गेली होती आणि अंगणात कोणी तरी बसले होते.

अवनी बाबू पुन्हा त्यांच्या मुलाला रागावायला लागले. "साधन तू हे काय केलंस? का असं केलंस? हे तुझं वागणं अगदी चुकीचं आहे."  साधन त्याच्या बारीक आवाजात पण तरीही आवेशाने म्हणाला, "पण ते दादूंचं वाद्य घेऊन पळून जात होते. म्हणून मी असं केलं!"

फेलूदा म्हणाला, "मिस्टर सेन, तो म्हणतोय ते बरोबर आहे. खरं तर अपराध्याला जखमी करून त्यानं मोठंच काम केलं आहे. पण आता हे ठीक असलं तरी त्यानं आपली बंदूक काळजीपूर्वक वापरली पाहिजे. असो. आता तुम्ही घरी जाऊन पोलिसांना फोन करा. त्या ड्रायव्हरला असं सुटून जाऊ देता कामा नये. त्यांना सांगा, गाडीचा नंबर  WMA 6164 असा आहे."

मग तो अंगणातच बसलेल्या त्या माणसाजवळ गेला, त्याने आणि अनुकूलने मिळून त्या माणसाला उभे केले आणि ते त्याला हळूहळू घरात घेऊन गेले. साधनच्या बंदुकीतली गोळी त्याच्या कपाळाला लागली होती आणि कपाळाला लहानशी जखम झाली होती. अजूनही त्यातून रक्त ठिबकत होते.

मेलोकॉर्ड तिथेच शेजारी पडले होते. मी ते जपून उचलले आणि घरात घेऊन आलो.
----
फेलूदा, अवनी सेन आणि बारासात पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर दिनेश गुईन आणि मी राधारमण बाबूंच्या खोलीत चहा घेत बसलो होतो. एक हवालदार दरवाज्याजवळ उभा होता. आणखी एक माणूस खुर्चीवर बसला होता. तो माणूस म्हणजे आमचा अपराधी, समाद्दारकाका होते! त्यांच्या कपाळावरच्या जखमेला ड्रेसिंग केलेले होते. साधन पण खिडकीजवळ उभा राहून बाहेर बघत होता आणि टेबलावर मेलोकॉर्ड होते.

फेलूदाने घसा साफ करून बोलायला सुरुवात केली. त्याचे घड्याळ फुटले होते आणि हातालाही बरेच खरचटले होते पण त्याने बाथरूममधले डेटॉल घेऊन ते पुसून काढले होते आणि त्यावर रुमाल बांधला होता. त्याचा हात अजूनही दुखत असणार पण त्याने तसे काही दाखवले नाही.

फेलूदाने चहाचा कप खाली ठेवला आणि बोलायला सुरुवात केली. "मला समाद्दारांचा संशय आज दुपारी आला. त्यापूर्वी मला अशी शंका अजिबात आली नव्हती. पण आज आलेला माझा संशय खरा आहे हे सिद्ध करायला माझ्याजवळ काही भक्कम पुरावा नव्हता. त्यामुळे संशयिताने काही चूक केली असती तरच मी त्याला पकडू शकलो असतो. माझ्या सुदैवानं त्यानं ती केली आणि तो पकडला गेला. अर्थात तो सुटला असता तरी त्याला फार पुढे जाता आलं नसतं पण साधननं नकळत मला मोठीच मदत केली आणि त्याला लगेच पकडता आलं. समाद्दारांनी मला सांगितलं होतं की ते सोमवारी रात्री बऱ्याच उशीरापर्यंत प्रेसमध्ये काम करत होते. त्यावेळी मला त्याचं काही वाटलं नाही.  पण नंतर  मात्र ते मला जरा खटकलं. कारण माझा एक मित्र त्या भागात राहतो आणि तो नेहमी सांगतो की त्यांच्या भागात वीज कपात खूप वेळ असते. एकदा संध्याकाळी वीज गेली की ती रात्री खूप उशीरा येते. म्हणून मी युरेका प्रेसला फोन करून त्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की वीज कपातीमुळे त्यांना सोमवारी संध्याकाळी काहीच काम करता आलं नाही. मणीबाबू तर त्या दिवशी दुपारीच प्रेसमधून बाहेर पडले ते परत आलेच नाहीत. मग मात्र माझ्या मनात आलं की हा माणूस माझ्याशी एक खोटं नक्कीच बोलला आहे तर आणखीही काही खोटं बोलला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राधारमण बाबूंचे शेवटचे शब्द म्हणून त्यांनी जे सांगितले ते सुद्धा कदाचित पूर्ण खरं नसेल. मला हेही आठवलं की राधारमण बाबूंच्या शेवटच्या वेळी डॉ.चिंतामणी बोसही तिथे होते. मग मी त्यांनाच फोन करून ह्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले  धरणी... माझ्या नावात ... .. किल्ली... किल्ली असे त्यांचे शब्द होते. समाद्दारांनी जाणून बुजून धरणीचं नाव सांगितलं नव्हतं हेही माझ्या लक्षात आलं. धरणी हा राधारमण बाबूंचा एकुलता एक नातू होता आणि तो त्यांचा लाडकाही असावा. त्याच्या नाटकातल्या कामांबद्दल वर्तमानपत्रात आलेली परीक्षणं आणि त्याच्या कामाची प्रशंसा असलेल्या बातम्यांची कात्रणं ते जपून ठेवत होते. तेव्हा आपल्या पैशाबद्दल त्यांना आपल्या पुतण्यापेक्षा आपल्या नातवाला सांगावंसं वाटणं हे स्वाभाविकच होतं. मला तर वाटतं की त्यांनी आपल्या पुतण्याला ओळखलं तरी होतं की नाही कुणास ठाऊक? पण त्यांचे शेवटचे शब्द ऐकायला त्यांचा पुतण्या जवळ होता ही वस्तुस्थिती आहे. पुतण्याच्या हे लक्षात आलं की काका लपवून ठेवलेल्या पैशाबाबत बोलत आहेत. पण ते कुठे लपवलेत त्याची किल्ली काही पुतण्याला मिळाली नाही! म्हणून ते माझ्याकडे आले. माझ्याकडून किल्लीबद्दलचा उलगडा करून घ्यायचा आणि मग काकांचा सगळा पैसा गडप करायचा असा त्यांचा डाव होता. राधारमण बाबूंनी मृत्युपत्र केलं होतं की नाही याबद्दल कुणालाच काही माहीत नाही. मृत्युपत्र केलं नसेल तर राधारमण बाबूंची जी काही मालमत्ता असेल ती आपोआप धरणीला मिळणार हे उघडच होतं."

फेलूदा जरा थांबला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग फेलूदाच म्हणाला, "आता प्रश्न असा होता की मणीबाबूंनी मला ते सोमवारी प्रेसमध्ये उशीरापर्यंत काम करत होते असं खोटं का सांगितलं? सोमवारी रात्री ते दुसरीकडे कुठे तरी होते आणि ते त्या दुसऱ्या ठिकाणी होते हे मला कळू नये अशी त्यांची इच्छा होती की काय? राधारमण बाबूंच्या खोलीत सोमवारी रात्री चोर घुसला होता. तो चोर म्हणजे मणीबाबू स्वत:च तर नसतील? जो जो मी ह्याचा विचार करायला लागलो तो तो ते मला जास्तच पटायला लागलं. जर्मन कुलपाचं कॉम्बिनेशन फक्त त्यांनाच माहीत होतं. ते कुलूप उघडून, आत जाऊन मग बाथरूमच्या दरवाज्यातून बाहेर येऊन, बेडरूमचा मुख्य दरवाजा बाहेरून लावणं त्यांनाच शक्य होतं. बाथरूमचा दरवाजा आतून लावलेला होता हे मी त्या दिवशी सकाळी पाहिलेलं मला चांगलं आठवत होतं. मला अशी शंका येत आहे की मणीबाबूंना राधारमण बाबूंच्या ’किल्ली’ शब्दाचा थोडाफार अर्थ लागला होता. म्हणूनच ते मध्यरात्री मेलोकॉर्ड चोरण्याच्या उद्देशाने आले. बरोबर आहे ना?" असे म्हणून फेलूदाने समाद्दार काकांकडे पाहिले. त्यांनीही होकारार्थी मान हलवली.

फेलूदा पुढे म्हणाला, "मला खात्री आहे की मणीबाबू मेलोकॉर्ड हस्तगत करण्यात यशस्वी झाले असते तरी त्यांना राधारमण बाबू जे बोलले त्याचा संपूर्ण उलगडा करता आला नसता. मलाही तो उलगडा आज संध्याकाळी झाला आणि त्यासाठी मला साधनचे आभार मानले पाहिजेत."  आम्ही सगळेच आश्चर्यचकित होऊन साधनकडे बघायला लागलो. साधनही खिडकीतून बाहेर बघत होता पण हे ऐकून त्याने मान वळवून आश्चर्याने फेलूदाकडे पाहिले. फेलूदा म्हणाला, "साधन, संगीत आणि माणसांची नावं याबद्दल दादूंनी तुला काहीतरी सांगितलं होतं नं? ते आम्हाला पुन्हा एकदा  सांग बरं!" साधन म्हणाला, "ज्यांच्या नावात स्वरमाधुर्य असतं त्यांच्या आवाजातही ते बहुतेक वेळा असतं."

"थॅंक्यू साधन. राधारमण बाबूंच्या बुद्धिमत्तेचं हे एक छोटंसं उदाहरण आहे. आता हे पाहा.  साधनचं नाव ’साधन सेन’.  नावामधल्या स्वरांमध्ये -म्हणजे स्वर-व्यंजन ह्यातील स्वरांमध्ये- थोडासा बदल केला तर आपल्याला सप्तकातले स्वर मिळतील. सा-ध-नी-सा-नी. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. राधारमण बाबूंचे शेवटचे शब्द  माझं नाव ...किल्ली  असे होते. त्यांना असं तर म्हणायचं नसेल की माझं नाव आणि मेलोकॉर्डच्या किल्ल्या किंवा पट्ट्या ह्यात संबंध आहे? राधारमण: रे-ध-रे-म-नी. समाद्दार: सा-म-ध-ध-रे. धरणीधरही गायक होता. धरणीधर: ध-रे-नी-ध-रे. वा! काय शक्कल आहे! साधी पण एकदम डोकेबाज!  राधारमण बाबूंना यांत्रिक उपकरणांमध्ये रस होता. ह्या खोलीचं ते जर्मन कुलूप त्याचंच उदाहरण आहे. मेलोकॉर्डही स्पिग्लर नावाच्या जर्मन कंपनीनं बनवलेलं आहे. त्याचं डिझाइन नक्कीच राधारमण बाबूंनी दिलेलं असणार. कंपनीनं त्यानुसार मेलोकॉर्ड बनवलं. हे मेलोकॉर्ड म्हणजे त्यांची बॅंक! आपलं नशीब की सुरजित दासगुप्ताला ते नेता आलं नाही. अर्थात सुरजित दासगुप्ताला ते देण्यापूर्वी त्यांनी त्यातले पैसे नक्कीच काढून घेतले असते. त्यांना बहुतेक कल्पना आली असावी आता आपले फार दिवस राहिले नाहीत. आता आपल्याला ह्या बॅकेची जरूर पडणार नाही.

"ह्या सर्व प्रकारात मला आणखी दोन गोष्टी कळल्या. एक म्हणजे सुरजित दासगुप्ता हा संगीताचा आणि वाद्यांचा अगदी वेडा आहे आणि त्याला संगीताची चांगली जाणकारी आहे. मी गेल्या दोन दिवसात संगीतावरची काही पुस्तकं वाचली. त्यात दासगुप्ताच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख आहे. धरणीधरच त्याचा वेष घेऊन आला असावा असं मला जे वाटलं ते चूक होतं. धरणी जालपाईगुडीला गेला आहे ही माहिती शंभर टक्के बरोबर आहे. त्याला इकडे काय घडामोडी चालल्या आहेत याची काहीच कल्पना नाही. आता  आपल्याला हे बघायचंय की त्याच्यासाठी वारसाहक्कानं काही मालमत्ता शिल्लक आहे का नाही. ’मंचलोक’ मध्ये त्याची एक मुलाखत आली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं की त्याला स्वत:ची नाटककंपनी काढायची आहे. तेव्हा त्याला जर एकहाती मोठी रक्कम मिळाली तर ती त्याला निश्चितच उपयोगी पडेल. तोपशे, तो कंदील जरा इकडे आण बघू."

मी कंदील फेलूदाच्या जवळ नेला. मेलोकॉर्ड त्याच्या मांडीवर होते. तो म्हणाला, "आज हे वाद्य जरा धसमुसळेपणानं वापरलं गेलंय पण वाद्य तसं भक्कम आहे. मला नाही वाटत त्याची काही मोडतोड झाली असेल. चला, आता राधारमण बाबूंचा सुपीक मेंदू आणि जर्मन कारागिरी हे एकत्र आल्यावर  आपल्याला काय बघायला मिळतंय ते पाहू." असं बोलत बोलत त्याने राधारमण बाबूंच्या नावातील अक्षरांच्या पट्ट्या दाबायला सुरुवात केली.  रे-ध-र-म-नी-सा-म-ध-ध-रे. प्रत्येक पट्टी दाबल्यावर मंजुळ आवाज येत होता. शेवटची पट्टी दाबल्यासरशी उजवीकडची चौकट अलगद उघडली. आम्ही सगळे वाकून त्या वाद्याकडे बघायला लागलो. चौकटीच्या आत लाल मखमली अस्तर लावलेला एक  कप्पा होता आणि त्यात शंभराच्या नोटांची बंडलं ठासून भरली होती.

ते पाहून आम्ही सगळे अवाक झालो. फेलूदाने हळू हळू ती बंडले बाहेर काढायला सुरुवात केली आणि म्हणाला, "मला वाटतं हे पन्नास हजार तरी असतील. अवनी बाबू, इकडे या आणि मला पैसे मोजायला मदत करा!" अवनी बाबू उठले आणि फेलूदाच्या जवळ गेले. कंदिलाच्या प्रकाशात फेलूदाचे डोळे चमकत होते. पण ती चमक कठीण कोडे सोडवल्यामुळे मिळालेल्या बौद्धिक आनंदाची होती. त्यात पैशाच्या लोभाचा लवलेशही नव्हता!.

--समाप्त--