किल्ली - २

दोन

आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी समाद्दारा काकांच्या गाडीतून बामुनगुच्छीला निघालो होतो. आम्ही जेसूर रोडला लागलो आणि त्यानंतर बारासातनंतर उजवीकडे वळलो. तो रस्ता सरळ बामुनगुच्छीला जात होता. समाद्दारांनी गाडी थांबवली आणि तिथे जिलबी आणि चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. बामुनगुच्छीला राधारमण समाद्दरांच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हा आठ वाजून गेले होते. 

घर म्हणजे एक बंगलाच होता. भोवताली बरीच मोकळी जागा होती आणि त्याच्या भोवती गुलाबी रंगाची भिंत होती. भिंतीला लागून निलगिरीची झाडे होती. एका माणसाने गाडीसाठी फाटक उघडले. तो बहुतेक माळी असावा कारण त्याच्या हातात एक टोपली होती. आम्ही सरळ घराच्या दरवाजापर्यंत गेलो. वाटेत आम्हाला गॅरेज आणि त्यात उभी असलेली ऑस्टिन दिसली.

गाडीतून उतरत असताना मला बागेतून कसलातरी आवाज ऐकू आला म्हणून मी वळून पाहिले तर एक साधारण दहा वर्षाचा मुलगा खेळातली बंदूक घेऊन उभा होता.

समाद्दार काकांनी त्याला विचारलं, "बाबा घरी आहेत का? असतील तर त्यांना सांग मणीबाबू आले आहेत आणि त्यांनी भेटायला बोलावलंय."  तो मुलगा बंदुकीत गोळ्या भरत भरत घरी गेला.

"हा शेजाऱ्यांचा मुलगा का?" फेलूदाने विचारले.

"हो. त्याचे वडील अवनी सेन यांचं कलकत्त्यात न्यू मार्केटमध्ये फुलांचं दुकान आहे. ते शेजारीच रहातात. त्यांची नर्सरी आहे. ते मधूनमधून इथे येतात आणि आपल्या कुटुंबासमवेत काही दिवस घालवतात."

तेवढ्यात एक म्हातारा माणूस घरातून बाहेर आला. समाद्दार काका म्हणाले, "हा अनुकूल. हा गेली तीस वर्षं काकांकडे काम करतोय. ह्या घराबद्दल निर्णय होईपर्यंत तरी हा इथेच राहील."

घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे एक हॉल होता. त्याला हॉल म्हणणे जरा चुकीचेच होते. त्यात मध्यभागी एक गोल टेबल होते आणि भिंतीवर एक फाटके, जुने कॅलेंडर होते. भिंतींवर दिव्यांची बटणे वगैरे नव्हती कारण त्या भागात वीज पोहोचलेली नव्हती. ह्या हॉलला एक दरवाजा होता. त्या दरवाजाजवळ जाऊन समाद्दार काका म्हणाले, "मी तुम्हाला सांगितलं ते हे कॉम्बिनेशन लॉक. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी कलकत्त्यात अशी कुलपं मिळायची. कॉम्बिनेशन आहे: आठ-दोन-नऊ-एक"

कुलूप वर्तुळाकार होते आणि त्यात किल्ली घालायला जागाच नव्हती. त्यावर चार वर्तुळाकार खोबणी होत्या. प्रत्येक खोबणीत १ ते ९ आकडे लिहिलेले होते आणि खोबणीवर खिळ्यासारखा एक छोटासा हूक होता. हा हूक संपूर्ण खोबणीवर फिरू शकत होता आणि तो एखाद्या विशिष्ट आकड्याशेजारी आणूनही ठेवता येत होता. ते चार हूक नेमक्या कोणत्या आकड्यांशेजारी आणून ठेवायचे आहेत हे माहीत असल्याशिवाय कुलूप उघडता येणे अशक्य होते.

समाद्दार काकांनी एक एक करून ते हूक आठ, दोन, नऊ, एक ह्या आकड्यांशेजारी आणून ठेवले. एक बारीकसा खट असा आवाज झाला आणि कुलूप उघडले. मला तर ते एखाद्या जादूसारखेच वाटले! समाद्दार काका म्हणाले, "कुलूप लावणं आणखी सोपं आहे. कोणता तरी हूक चुकीच्या आकड्याशेजारी आणून ठेवायचा!"

अशा रीतीने कुलूप उघडून आम्ही राधारमण समाद्दारांच्या बेडरूममध्ये गेलो. ही खोली मोठी होती आणि समाद्दार काकांनी सांगितलेले सर्व फर्निचर त्यात होतेच पण ती खोली नाना तऱ्हेच्या वाद्यांनी गच्च भरलेली होती. काही वाद्ये फडताळांमध्ये होती, काही टेबलावर तर काही भिंतीवर टांगलेली होती.

फेलूदा खोलीच्या मध्यभागी थांबला आणि त्याने चारी बाजूला नजर टाकली. मग त्याने कपाट आणि पेटी उघडून त्यात काय सामान आहे ते पाहिले. पलंगाखाली पण एक छोटी पेटी होती पण त्यात काही जुने, फाटके कपडे आणि बुटांची एक जुनी जोडी याव्यतिरिक्त काही नव्हते. मग त्याने सगळी वाद्ये तपासून पाहिली. हातात घेऊन प्रत्येकाच्या वजनाचा अंदाज घेतला, ते उलटसुलट करून किल्लीने उघडण्याची काही सोय आहे का ते पाहिले. पलंगावरची गादी उचलून पाहिली. जमिनीवर पाय आपटून ती कुठे पोकळ आहे का तेही तपासले. पण तसे काही नव्हते. मग बेडरूमला लागून असलेल्या बाथरूममध्येही पाहिले पण तिथेही काही मिळाले नाही. शेवटी त्याने माळ्याला बोलावून तिथल्या दोन्ही मोठ्या फुलदाण्या रिकाम्या करायला लावल्या पण त्यातही काही नव्हते. फेलूदाने मग माळ्याला त्या फुलदाण्या पुन्हा भरायला सांगितल्या.

मधल्या वेळात अनुकूलने टेबल आणि चार खुर्च्या खोलीत आणून ठेवल्या होत्या. पाठोपाठ तो  सरबताचे चार पेले टेबलावर ठेवून गेला.  समाद्दार काकांनी आम्हाला दोन पेले दिले आणि स्वत: एक हातात घेत म्हणाले, "मग, मि.मित्तर हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं?"  फेलूदाने आपली मान हताशपणे हलवली आणि म्हणाला, "ही इतकी वाद्यं इथे नसती तर एखाद्याचा असा समज झाला असता की इथे रहाणारा माणूस अगदी बेताच्या आर्थिक परिस्थितीतला असणार."

"बरोब्बर. म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. इतका बुचकळ्यात मी कधीच पडलो नव्हतो." समाद्दार काका सरबताचा घोट घेत म्हणाले.

मी त्या वाद्यांकडे पुन्हा पाहिले. मला त्यातली फक्त सतार, सरोद, तानपुरा, तबला आणि बासरी एवढीच वाद्ये ओळखता आली. इतर वाद्ये मी पूर्वी कधीच पाहिली नव्हती. मला वाटतं फेलूदाला सुद्धा ती माहीत नसावीत. तो समाद्दार काकांना म्हणाला, "तुम्हाला यांची नावं माहीत आहेत का? ते समोरच्या भिंतीवर हुकाला अडकवून ठेवलं आहे त्या तंतुवाद्याचं नाव काय?" समाद्दार काका थोडेसे ओशाळे होऊन हसत म्हणाले, "सॉरी सर, मला संगीतातलं ओ म्हणता ठो कळत नाही. त्या वाद्यांची नावं किंवा ती कुठून आली आहेत याबद्दल मला काही माहीत नाही."

तेवढ्यात बाहेर पावलांचा आवाज आला आणि पाठोपाठ एक चाळीशीचे गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा खेळण्यातली बंदूक घेऊन आला. ते गृहस्थ म्हणजे शेजारी रहाणारे अवनी सेन. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा साधन होता. सेन फेलूदाकडे पाहात म्हणाले, "तुम्ही प्रदोष मित्तर? मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय." फेलूदाने यावर नुसतेच स्मितहास्य केले. सेन रिकाम्या खुर्चीवर बसले आणि पुढे केलेला सरबताचा पेला त्यांनी हातात घेतला. सरबताचा घोट घेत ते म्हणाले, "मि.समाद्दार, तुमच्या काकांना एखादं वाद्य विकायचं होतं हे तुम्हाला माहीत आहे का?" समाद्दार काकांना खूपच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "नाही, पण तुम्ही हे का विचारताय?"

"कारण काल एक गृहस्थ आले होते. तुमच्या घरात कुणी नव्हतं म्हणून ते आमच्याकडे आले होते. त्यांचं नाव सुरजित दासगुप्ता. त्यांना पण तुमच्या काकांसारखाच वाद्यं जमा करण्याचा छंद आहे. त्यांनी मला राधारमण बाबूंचं पत्रही दाखवलं. शिवाय ते असंही म्हणाले की ते यापूर्वी एकदा इथे आले होते आणि राधारमण बाबूंशी त्यांची गाठभेट, बोलणं झालं होतं. अनुकूलही म्हणाला की ते गृहस्थ पूर्वी एकदा इथे येऊन गेले आहेत.  मी त्यांना आज इथे यायला सांगितलं आहे."

"मी सुद्धा त्यांना पाहिलं आहे."  साधन म्हणाला. तो तिथल्या एका वाद्याशी खेळत होता. ते वाद्य साधारण हार्मोनियमसारखे होते आणि त्यातून मंजुळ स्वर येत होते. साधनचे वडील हसून म्हणाले, "साधन बहुतेक वेळ ह्याच घरात किंवा घराच्या आवारात असायचा. तो आणि दादू(आजोबा) चांगले दोस्त होते."

"तुला दादू आवडायचे?" फेलूदाने विचारले.

"हो. खूप आवडायचे पण कधी कधी मला त्यांचा थोडा रागही यायचा."

"का बरं?"

"कारण ते मला सरगम म्हणायला सांगायचे."

"आणि तुला ते आवडायचं नाही! हो ना?"

"हो. पण मला गाता येतं हं."

अवनी सेन हसून म्हणाले, "पण फक्त हिंदी सिनेमातली गाणी!"

"दादूंना माहीत होतं, तू गातोस ते?" फेलूदाने विचारले.

"हो."

"त्यांनी तुला कधी गाताना ऐकलं होतं का?"

"नाही."

"मग तुला असं का वाटतं की त्यांना माहीत होतं?"

"कारण दादू नेहमी म्हणायचे की ज्यांच्या नावात स्वरमाधुर्य असतं त्यांचा आवाजही मधुर असतो."

आम्हाला हे जरा विचित्रच वाटले आणि मी आणि फेलूदाने एकमेकांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. फेलूदा साधनला म्हणाला, "याचा अर्थ काय?"

क्रमशः