किल्ली - २ (पुढे चालू)

दोन (पुढे चालू)

"मला नाही माहीत!"

"तू त्यांना कधी गाताना ऐकलं आहेस?"

"नाही. पण त्यांना एक वाद्य वाजवताना ऐकलं आहे."

"क-क-काय?" समाद्दार काका एकदम उडालेच.

"नक्की तू ऐकलंयस? मला तर वाटलं होतं त्यांनी वाद्य वाजवणं सोडून दिलंय. त्यांनी तुझ्यासमोर कधी वाजवलं होतं का?"

"नाही, नाही. मी बागेत होतो. माझ्या बंदुकीनं नारळ पाडत होतो. तेव्हा ऐकलं."

"दुसरं कोणी तरी वाजवत असेल रे."

"नाही. कारण घरात दादूंशिवाय दुसरं कोणी नव्हतं."

"ते किती वेळ वाजवत होते?"

"अगदी थोडा वेळ."

फेलूदा समाद्दार काकांना म्हणाला, "जरा अनुकूलला बोलावता का?"

थोड्याच वेळात अनुकूल आला. फेलूदाने त्याला विचारले, "तू मोठ्या बाबूंना ह्याच्यातलं एखादं वाद्य वाजवताना कधी ऐकलं होतंस का?"

अनुकूल जरा अडखळत म्हणाला, "बाबू सगळा वेळ त्यांच्या खोलीतच असायचे. त्यांना कोणी मध्येच जाऊन त्रास दिलेला चालायचा नाही. त्यामुळे ते वाद्य वाजवत होते की नाही हे मला सांगता येणार नाही."

"अच्छा, असं आहे होय! म्हणजे तुझ्यासमोर त्यांनी कधीच वाद्य वाजवलं नाही. नाही का?"

"हो ना, बाबू."

"पण घराच्या बाहेरून किंवा घराच्या दुसऱ्या खोलीतून कधी काही ऐकलंस का?"

"अं.. हो... कधी कधी. पण बाबू, मला ऐकायला जरा कमीच येतं."

"ते गेले त्याच्या आधी एक अनोळखी माणूस आला होता ना? तो माणूस काल पण आला होता का?"

"हो. तो माणूस मोठ्या बाबूंशी त्यांच्या खोलीत बोलत होता."

"तो पहिल्यांदा केव्हा आला होता?"

"बाबू गेले त्याच दिवशी."

"काय? त्याच दिवशी?" समाद्दार काकांनी आश्चर्याने विचारले.

"हो बाबू." अनुकूलच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यानं खांद्यावरच्या पंचानं डोळे पुसले आणि गहिवरल्या आवाजात तो म्हणाला, "ते गृहस्थ गेल्यावर मी ह्या खोलीत आलो. बाबूंच्या अंघोळीसाठी गरम पाणी तयार आहे हे सांगायला मी आलो पण बाबूंना झोप लागली होती. म्हणजे मला तरी तसं वाटलं. पण मी हाका मारूनही ते उठले नाहीत तेव्हा मी सेनबाबूंच्या घरी गेलो आणि त्यांना हे सांगितलं."

"बरोबर आहे." अवनी सेन म्हणाले. "मी मि.समाद्दारांना लगेच फोन केला आणि डॉक्टरांना घेऊन यायला सांगितलं. अर्थात डॉक्टरांचा फारसा उपयोग होणार नाही याची मला थोडी कल्पना होती."

तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. अनुकूल कोण आलेय ते बघायला गेला आणि त्याच्या पाठोपाठ एक गृहस्थ आत आले. त्यांनी आपले नाव सुरजित दासगुप्ता असे सांगितले. त्यांच्या मिशा लांब आणि खाली वळलेल्या होत्या. चांगले मोठे कल्ले होते आणि डोक्यावरचे केस दाट आणि विस्कटलेले होते. त्यांनी जाड फ्रेमचा चष्मा घातला होता. अवनी सेन समाद्दार काकांकडे बोट दाखवून म्हणाले, "मिस्टर दासगुप्ता, तुम्ही त्यांच्याशी बोला. ते राधारमण बाबूंचे पुतणे आहेत."

"अच्छा. तुमच्या काकांनी मला पत्र लिहिलं होतं म्हणून मी त्यांना भेटायला..."

त्यांचं वाक्य अर्धवट तोडून समाद्दार काका म्हणाले, "ते पत्र मला दाखवता का?"

सुरजित दासगुप्तांनी आपल्या कोटाच्या खिशातून एक पोस्टकार्ड काढले आणि ते समाद्दार काकांना दिले. त्यांनी झरकन त्यावरून नजर फिरवली आणि ते फेलूदाकडे दिले. मी फेलूदाच्या जवळच बसलो होतो. मी जरा वाकून ते पत्र वाचले.  कृपया १८ सप्टेंबरला सकाळी ९ ते १० या वेळात मला भेटायला या. माझी सर्व वाद्ये माझ्या घरीच आहेत. तुम्ही आलात की तुम्हाला ती पहायला मिळतील.  फेलूदाने पत्र उलटून त्यावरचा पत्ता पाहिला. तो होता, मिनर्व्हा हॉटेल, सेंट्रल ॲव्हेन्यू, कलकता-१३. त्यानंतर त्याने टेबलावरच्या निळ्या काळ्या शाईच्या दौतीकडे पाहिले. त्याच शाईने ते पत्र लिहिलेले होते. दासगुप्ता थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात समाद्दार काकांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, "त्या दिवशी तुमचं आणि माझ्या काकांचं काय बोलणं झालं?"

"संगीतप्रेमींसाठी असलेल्या एका मासिकात मी राधारमण समाद्दारांचा एक लेख वाचला आणि मला त्यांना भेटावसं वाटलं. मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे १८ तारखेला इथे आलो. त्यांच्या संग्रहातील दोन वाद्यं मी विकत घेण्यासाठी निवडली. त्यांच्या किमतींबद्दल आमचं बोलणं झालं. मी दोन हजार देईन असं सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. मी लगेच चेक लिहून द्यायला लागलो पण त्यांना चेक नको होता, कॅश हवी होती. माझ्याजवळ तेव्हा तेवढे पैसे नव्हते. तर ते म्हणाले, तुम्ही बुधवारी पैसे घेऊन या. पण मंगळवारी मी वर्तमानपत्रात त्यांच्या मृत्यूबद्दल वाचलं. त्यानंतर मला लगेच डेहराडूनला जायला लागलं. परवा मी तिथून परत आलो."

समाद्दार काका म्हणाले, "त्या दिवशी सकाळी तुम्ही त्यांच्याशी बोललात तेव्हा त्यांची तब्बेत तुम्हाला कशी वाटली?"

"छान वाटली, मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांच्या बोलण्यातून आता आपले फार दिवस राहिले नाहीत असं त्यांना जाणवत असावं असं वाटलं."

"तुमची आणि त्यांची काही वादावादी झाली का?"

दासगुप्ता थोडा वेळ गप्प बसले आणि मग एकदम जरा कठोर स्वरात म्हणाले, "तुमच्या काकांच्या हार्ट ॲटॅकसाठी तुम्ही मला जबाबदार धरत आहात की काय?"

"छे, छे. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही मुद्दाम काही केलं. पण एवढं मात्र खरं की तुम्ही इथून बाहेर पडलात आणि त्यांची तब्बेत बिघडली."

"हे पहा मिस्टर समाद्दार, मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो की मी ह्या खोलीतून बाहेर पडलो तेव्हा तुमच्या काकांची तब्बेत उत्तम होती. तर ते असो. आता तुम्हाला माझ्या प्रस्तावाचा विचार करायला हरकत नाही. मी पैसे घेऊन आलो आहे. हे घ्या दोन हजार रुपये. मला वाटतं मी आताच ती दोन वाद्यं घेऊन गेलो तर तुमची काही हरकत नसावी. मला उद्या डेहराडूनला परत जायला पाहिजे. मी तिथेच रहातो आणि माझं संगीताच्या संशोधनाचं काम करतो."

"कोणती दोन वाद्यं तुम्ही म्हणताय?"

दासगुप्ता उठले आणि समोरच्या भिंतीवर लावलेलं एक वाद्य घेऊन म्हणाले, "हे. ह्याला खामंचे म्हणतात. हे वाद्य इराणी आहे. मी ह्याबद्दल ऐकलं होतं पण पाहिलं मात्र कधीच नव्हतं, हे खूप जुनं वाद्य आहे. आणि दुसरं म्हणजे..." असं म्हणत दासगुप्ता खोलीच्या दुसऱ्या टोकाला गेले आणि साधन जे वाद्य वाजवत होता ते हातात घेऊन म्हणाले, "हे पण मला पाहिजे. ह्याला मेलोकॉर्ड (melocord) म्हणतात. हे वाद्य इंग्लिश आहे. मला वाटतं हे बनवणाऱ्यांनी फार थोडे पीसेस बनवले आणि नंतर काही कारणानं त्यांनी अशी वाद्यं बनवणं बंदच केलं असावं. हे मी पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं आणि हे दुसरीकडे कुठे मिळणारही नाही म्हणून मी तुमच्या काकांना ह्याचे हजार रुपये देऊ केले होते. ते सुद्धा त्या किमतीत हे मला विकायला तयार झाले होते."

"सॉरी मिस्टर दासगुप्ता. तुम्ही ती वाद्यं नेऊ शकत नाही." फेलूदा एकदम कडक स्वरात म्हणाला.

दासगुप्ता गर्रकन वळले आणि तीक्ष्ण नजरेने फेलूदाकडे पाहात म्हणाले, "आपण कोण?"

समाद्दार काका म्हणाले, "ते माझे मित्र आहेत आणि ते म्हणताहेत ते बरोबर आहे. आम्ही तुम्हाला ह्याच्यातलं काहीच देऊ शकत नाही. कारण अगदी सरळ आहे. तुमचं आणि काकांचं वाद्यांच्या किमतीसंबंधी काही बोलणं झालं होतं याचा काहीच पुरावा तुमच्याजवळ नाही."

मिस्टर दासगुप्ता क्षणभर एखाद्या पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले आणि दुसऱ्याच क्षणाला काहीही शब्द न बोलता खोलीबाहेर पडले.

फेलूदा पण उठला आणि दासगुप्तांनी ज्याचा ’खामंचे’ असा उल्लेख केला होता ते वाद्य त्याने हातात घेतले. दासगुप्ता असे एकदम निघून गेले त्याचा फेलूदावर काही परिणाम झाला नव्हता. ते वाद्य छोट्या व्हायलिनसारखं दिसत होतं. अशी व्हायलिने रस्त्यावर लहान मुलांसाठी विकायला बसलेली असतात. अर्थात हे त्याच्याहून बरेच मोठे होते आणि त्याच्या गोल भागावर सुंदर कलाकुसर केलेली होती. मग फेलूदाने मेलोकॉर्ड हातात घेतले आणि त्याच्यावरच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्या दाबल्या. त्याबरोबर त्यातून काही सूर ऐकू आले. तो आवाज पियानो आणि सतार यांच्या मिश्र आवाजासारखा वाटत होता.

"दादू हे वाद्य वाजवायचे का रे?"  फेलूदाने साधनला विचारले.

"असेल!" साधन जरा गप्प गप्प आणि गंभीर वाटत होता. फेलूदाही त्याला काही म्हणाला नाही. त्याने कपाट उघडले आणि खणातून काही कागदपत्रे काढली. ती हातात घेऊन तो समाद्दार काकांना म्हणाला, "मी ही घरी नेली तर चालेल का? मला ती जरा स्वस्थपणे वाचावी लागतील."

"हो. हो. अवश्य. आणखी काही हवंय?"

"नको. सध्या इतकंच. धन्यवाद."

आम्ही खोलीतून बाहेर पडलो तेव्हा साधन खिडकीतून बाहेर बघत होता आणि काही तरी गुणगुणत होता. पण त्याचा चेहरा मात्र गंभीर होता आणि तो जे गुणगुणत होता ते हिंदी सिनेमातले गाणे नव्हते.

क्रमश: