किल्ली - ४

चार

समाद्दार काका म्हणाले होते की ते बुधवारी आम्हाला फोन करतील पण त्यांनी मंगळवारीच सकाळी सात वाजता फोन केला. फोन मीच घेतला आणि म्हणालो, "जरा थांबा, मी फेलूदाला बोलावतो." त्यावर ते म्हणाले, "तुझ्या दादाला बोलवायला नको, फक्त त्यांना एवढंच सांग की मी थोड्याच वेळात तुमच्या घरी येतोय. जरा तातडीचं काम आहे."

पंधरा मिनिटांत समाद्दार काका आमच्या घरी आले आणि म्हणाले, "अवनी सेनांचा आताच फोन आला होता. काल रात्री काकांच्या खोलीत कोणीतरी घुसलं होतं."

"ते जर्मन कुलूप कसं उघडायचं हे कुणाकुणाला माहीत होतं?" फेलूदाने विचारले.

"मला वाटतं धरणीला माहीत होतं. अवनी बाबूंना माहीत असेल कदाचित... पण नाही, त्यांना नसेल माहीत. पण जो कोणी आला तो पुढच्या दरवाजानं आलाच नाही. तो बाथरूमच्या लहान दरवाजानं आला. ते दार सफाईवाल्यांसाठी आहे. तुम्हाला माहीत आहे ते दार."

"हो. पण त्या दाराला तर आतून कडी लावलेली होती. मी स्वत: हे पाहिलं होतं."

"कदाचित आपण इकडे आल्यानंतर कोणीतरी ते उघडलं असेल. पण एक चांगली गोष्ट म्हणजे त्या खोलीतून एकही वस्तू गेली नाही. तो माणूस आत शिरल्यावर लगेचच अनुकूलने आरडाओरडा केला. तेवढ्यात तो माणूस पळून गेला. असो. मला असं विचारायचं आहे की तुम्हाला आता लगेच माझ्याबरोबर बामुनगुच्छीला येता येईल का?"

"हो, नक्की येऊ. पण मला एक सांगा, तुमच्या काकांचा नातू धरणीधर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याला ओळखू शकाल का?"

समाद्दार काका जरा विचारात पडले. मग म्हणाले, "मी त्याला कित्येक वर्षांत पहिलेलं नाही. पण तरीही मी त्याला ओळखू शकेन असं वाटतंय."

फेलूदा संजय लाहिरीचा फोटो घेऊन आला आणि त्याने तो समाद्दार काकांना दिला. मी डोकावून पाहिलं तर फेलूदाने संजयच्या चेहऱ्यावर लांब लांब मिशा काढल्या होत्या आणि डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा चढवला होता. फोटो पाहून समाद्दार काका एकदम चमकलेच. "अरे हा तर... सुरजित दासगुप्ता! ह्याचं नाक जरा वेगळं आहे पण दोघांमध्ये बरंच साम्य आहे हे नक्की."

"हा फोटो तुमच्या चुलतभावाच्या, मुरलीधरच्या मुलाचा आहे. मी फक्त त्याच्या चेहऱ्यावर २-३ गोष्टी चढवल्या आहेत."

"विलक्षणच आहे हे. काल दासगुप्ता घरी आला तेव्हा मला जराशी शंका आली होती. मी तुम्हाला रात्री फोनही करणार होतो पण मला प्रेसमधून घरी यायलाच खूप उशीर झाला. शिवाय मला खात्री पण नव्हती. मी धरणीला पाहिलं होतं त्याला पंधरा वर्षं झाली. एवढ्या वर्षांत मी त्याला नाटकांतही पाहिलं नाही. कारण मला नाटकाबिटकात फारसा रस नाही. पण तुम्हाला जे वाटतंय ते खरं असेल तर..."

फेलूदाने त्यांना मध्येच अडवले आणि म्हणाला, "मला जे वाटतंय ते खरं असेल तर आपल्याला दोन गोष्टी सिद्ध करायला पाहिजेत. एक म्हणजे सुरजित दासगुप्ता या नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नाही. आणि दुसरं म्हणजे तुमच्या काकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस संजय लाहिरीनं नाटक कंपनी सोडली आणि तो कलकत्त्याला आला. तोपशे, मिनर्व्हा हॉटेलचा नंबर शोधून काढ बघू पटकन."

हॉटेलला फोन केल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की सुरजित दासगुप्ता नावाचे एक गृहस्थ त्यांच्या हॉटेलमध्ये रहात होते आणि त्यांनी परवाच्या दिवशी हॉटेल सोडलं. मॉडर्न ऑपेराला फोन करायचे काही कारणच नव्हते कारण त्यांनी आधीच सांगितले होते की संजय लाहिरी त्यांच्या कंपनीबरोबर परगावी गेलेले आहेत.

बामुनगुच्छीला पोहोचल्यावर फेलूदाने घराला बाहेरून एक फेरी मारली. घराच्या कंपाऊंड जवळ बरीच झाडे होती. त्यामुळे झाडावर चढून कंपाऊंडच्या भिंतीवरून आत सहज उडी मारता आली असती. अर्थात जमीन अगदी कोरडी असल्याने त्यावर पावलांचे ठसे मिळणे अशक्यच होते. जो कोणी आला होता त्याने आपली गाडी लांब कुठे तरी उभी केली असणार आणि तिथून घरापर्यंत चालत आला असणार.

फेलूदा मग अनुकूलला शोधायला गेला. अनुकूलची तब्बेत बरी नसल्याने तो त्याच्या खोलीत जरा आराम करत होता. तो म्हणाला, "काल रात्री डास खूप चावत होते आणि माझं डोकंही जरा दुखत होतं त्यामुळे मी बराच वेळ जागाच होतो. माझ्या खोलीतून मोठ्या बाबूंच्या खोलीतली खिडकी दिसते. रात्री एकदम मला त्या खोलीत उजेड दिसला म्हणून मी कोण आहे, कोण आहे असं ओरडत खोलीकडे निघालो. पण मी तिथे पोहोचायच्या आधीच तो बाथरूमच्या दरवाजातून पळून गेला. मग मी बाबूंच्या खोलीतच जमिनीवर आडवा झालो."

"तू त्या माणसाला ओळखू शकशील का?" समाद्दार काकांनी विचारले.

"नाही बाबू. आता मला वयामुळे नीट दिसतही नाही आणि काल चांदणं पण नव्हतं. सगळा अंधार होता."

राधारमण समाद्दारांची खोली मात्र जशीच्या तशी होती. तिथल्या एकाही वस्तूला हात लावलेला दिसत नव्हता. पण फेलूदाचा चेहरा एकदम गंभीर झाला. तो समाद्दार काकांना म्हणाला, "तुम्ही पोलिसांना फोन करा आणि आजपासून ह्या घरावर पहारा ठेवायला सांगा. काल आलेला माणूस पुन्हा येण्याची शक्यता आहे. सुरजित दासगुप्ता हा संजय लाहिरी नसला तरी तोच आपला मुख्य संशयित आहे. वस्तू जमा करण्याचा छंद असलेली माणसं फार जिद्दीची असतात. त्यांना हवी ती वस्तू मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकतात."

"ठीक आहे. मी अवनी बाबूंच्याकडून फोन करतो." असे म्हणत ते बाहेर पडले. फेलूदाने मेलोकॉर्ड उचलून पुन्हा त्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. ते वाद्य लहान असले तरी चांगले भक्कम वाटत होते. त्यावर दोन चौकटी होत्या आणि दोन्हीवर नाजुक नक्षीकाम केलेले होते. फेलूदाला त्यावर ’स्पिग्लर’ असे नाव दिसले. "हे वाद्य जर्मन आहे, सुरजित दासगुप्ता म्हणाला हे इंग्लिश आहे पण तसं नाही." असे म्हणत त्याने ते वाजवायला सुरुवात केली. फेलूदा काही वादक नाही तरीही त्याने जे वाजवले ते कानाला चांगले वाटले. फेलूदा म्हणाला, "मला हे उघडता आलं असतं तर फार बरं झालं असतं पण असं करणं बरोबर नाही. कदाचित असंही होईल की त्यात काही मिळणार नाही, वाद्याची मोडतोड मात्र होईल. वाद्य महागातलं आहे! दासगुप्ता ह्यासाठी एक हजार द्यायला तयार झाला होता."  

अनुकूलची तब्बेत बरी नव्हती तरी तो आमच्यासाठी सरबत घेऊन आला. आम्ही सरबत घ्यायला सुरुवातच केली होती तेवढ्यात समाद्दारकाका आले आणि म्हणाले, "पोलिसांना फोन केला. आज रात्रीपासून दोन हवालदार इथे पहारा देतील. अवनीबाबू घरी नव्हते. ते आणि साधन आज कलकत्त्याला गेले आहेत."

"बरं. बरं. आता हे सांगा मणीबाबू, तुमच्या काकांना पैसे कुठे तरी दडवून ठेवायची सवय आहे हे तुमच्याव्यतिरिक्त आणखी कुणाला माहीत होतं?"

"खरं सांगू मिस्टर मित्तर, काकांनी पैसे लपवून ठेवले असणार हे त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या लक्षात आलं. अवनी बाबूंना हे माहीत आहे की आपण काकांचे पैसे शोधतोय पण त्यांना हे पैसे किती असतील याचा अजिबात अंदाज नाही याची मला खात्री आहे. पण त्या दिवशी सुरजित दासगुप्ताच्या वेषात धरणीच आला असेल तर त्याला तेव्हा याचा काही तरी सुगावा लागला असेल. माझी तर खात्रीच आहे की तो काकांना पैसे मागायलाच आला असणार. त्यावरून काकांचं आणि त्याचं जोराचं भांडण झालं असेल आणि  ..."

फेलूदा मध्येच म्हणाला, "..आणि त्या भाडणाचं पर्यावसन काकांना हृदयविकाराचा झटका येण्यात झालं असेल. पण धरणी तेवढ्यावर थांबला नाही. त्याने खोलीत शोधाशोध केली आणि तो निघून गेला. असंच तुम्हाला सुचवायचं आहे ना?"

"हो. पण त्याला पैसे मिळाले नाहीत."

"त्याला पैसे मिळाले असते तर तो पुन्हा सुरजित दासगुप्ता बनून आला नसता. बरोबर?"

"बरोब्बर. कशामुळे तरी त्याचा असा समज झाला की ह्या दोन्हीपैकी एका वाद्यात पैसे लपवून ठेवलेले आहेत."

"मेलोकॉर्ड!"

समाद्दार काकांनी चमकून फेलूदाकडे पाहिले आणि ते म्हणाले, "तुम्हाला तसं वाटतंय का?"

"हो. माझी अंत:प्रेरणा मला तसं सांगत आहे. पण मी अर्धवट माहितीवरून निष्कर्ष काढत नाही. शिवाय त्यांचे ते शेवटचे शब्दही आहेत ज्यात किल्लीचा उल्लेख आहे. तुमची खात्री आहे का की तेच त्यांचे शेवटचे शब्द होते?"

समाद्दार काकांना आता तेवढी खात्री वाटत नव्हती.  ते म्हणाले, "कुणास ठाऊक? पण मला तरी ते तसे वाटले. पण कदाचित त्यांना भ्रम झाला असेल आणि त्या भ्रमात ते काही तरी बोलले असतील. त्या किल्ली शब्दाला फारसं महत्त्व नसेलही."

हे ऐकल्यावर मी जरा हिरमुसला झालो पण फेलूदा अगदी अविचल होता. तो म्हणाला, "ते भ्रमात होते किंवा नव्हते हा प्रश्न तसा गौण आहे पण ह्या खोलीत पैसे आहेत हे नक्की! किल्ली शोधत बसण्यापेक्षा आपण पैसे शोधून काढले पाहिजेत."

"मग आपण काय करावं असं तुम्हाला वाटतंय?"

"हे पहा, आता आम्ही घरी परत जाऊ. अनुकूलला सांगा की काही काळजी करू नकोस. दिवसाउजेडी काहीही होणार नाही. फक्त त्यानं एक गोष्ट करायची. कुणा अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. संध्याकाळपासून ते हवालदार असतीलच. मला मात्र घरी जाऊन एकाग्र चित्तानं विचार करायला पाहिजे. आशेचा अंधुक किरण मला दिसतोय पण तो चांगला स्पष्ट  दिसल्याशिवाय मला काही करता येणार नाही. बरं, आज रात्री मी इथे राहिलो तर चालेल का?"

समाद्दार काकांना जरा आश्चर्य वाटलं पण ते म्हणाले, "हो. काहीच हरकत नाही. मी रात्री आठ वाजता तुम्हाला न्यायला येऊ का?"

"ठीक आहे. या आठ वाजता."
-----

फेलूदा त्याच्या खोलीत पलंगावर बसला होता. मी त्याच्यासमोरच खुर्ची घेऊन बसलो होतो. माझ्या मांडीवर एक वही आणि हातात पेन होतं. फेलूदा म्हणाला, "मृत व्यक्तीचं नाव लिही बघू."
मी वहीत लिहिलं "राधारमण समाद्दार"
"त्यांच्या नातवाचं नाव?"
"धरणीधर समाद्दार"
"नाट्यजगतात तो कोणत्या नावानं ओळखला जातो?"
"संजय लाहिरी"
"डेहराडूनला राहणाऱ्या आणि वाद्यं जमा करणाऱ्या माणसाचं नाव काय?"
"सुरजित दासगुप्ता"
"राधारमण बाबूंचे शेजारी कोण?"
"अवनी सेन"
"त्यांचा मुलगा?"
"साधन सेन"
"राधारमण बाबूंचे शेवटचे शब्द काय होते?"
"माझं नाव....किल्ली...किल्ली"
"सप्तकातले सात सूर कोणते?"
"सा रे ग म प ध नी"
"छान. जा, आता पळ आणि मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. मला आता काम करायचं आहे. जाताना दरवाजा लावून जा."

मी बाहेरच्या खोलीत जाऊन माझे आवडते पुस्तक वाचत बसलो. असा एक तासभर झाला असेल. तेव्हा  फेलूदा त्याच्या खोलीतून कुणाला तरी फोन करत होता हे हे माझ्या लक्षात आले. मला ते बोलणे ऐकण्याचा मोह आवरला नाही. मी खोलीच्या दरवाज्याला कान लावून ऐकायला लागलो. फेलूदा डॉ.चिंतामणी बोस यांना फोन करत होता. चिंतामणी बोस म्हणजे राधारमणबाबूंना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा समाद्दार काका ज्यांना बामुनगुच्छीला घेऊन गेले ते डॉक्टर. दहा मिनिटांनी पुन्हा फोन करण्याचा आवाज आला. मी पुन्हा दरवाजाला कान लावून उभा राहिलो. "युरेका प्रेस? कोण बोलतंय?" फेलूदाने समाद्दार काकांच्या प्रेसला फोन केला होता. त्या फोनमध्ये मला काही रस नव्हता. मी पुन्हा पुस्तकात डोके घातले. 

चार वाजता श्रीनाथ चहा घेऊन आला तरीही फेलूदा त्याच्याच खोलीत होता. मी चहा घेतला आणि आणखी थोडे वाचले तेव्हा साडेचार वाजले होते. माझ्या डोक्यातला गोंधळ आता वाढला होता. फेलूदाने माझ्याकडून ती नावे लिहून घेतली होती त्याचे तो काय करणार होता? त्याला ती सर्व नावे माहीत होती की.

मी असा विचार करत होतो तेवढ्यात फेलूदा दार उघडून आला. हातात चारमिनार होतीच. तो म्हणाला, "तोपशे, माझं डोकं अगदी चक्रावून गेलंय. मृत्यूशय्येवर असलेल्या एका माणसाच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचा अर्थ लावायला मला एवढा वेळ लागेल असं वाटलं नव्हतं!" मला तो थोडा उत्तेजित झाल्यासारखा वाटला. मी आपला नुसताच  शुंभासारखा त्याच्याकडे बघत बसलो. त्याच्या बोलण्याचा अर्थ मला अजिबात कळला नाही. फक्त एवढंच माझ्या लक्षात आलं की आधी त्याला जो अंधुक प्रकाश दिसत होता तो आता चांगलाच प्रखर झाला आहे.

"सा ध नी सा नी, सप्तकातले सूर. काही कळतंय का तुला?"
"नाही रे फेलूदा. तू काय बोलतोयस ते मला काही कळत नाहीये."
"ठीक आहे. मला जे कळलंय ते तुलाही कळलं असतं तर तुझी बौद्धिक पातळी फेलू मित्तरच्या बौद्धिक पातळीएवढी झाली असती."

माझी पातळी फेलूदाच्या इतकी नाही याचे मला मुळीच दु:ख नव्हते. फेलूदाचा ’उपग्रह’ असण्यामध्येच मला आनंद होता. फेलूदाने सिगरेट विझवली आणि पुन्हा एकदा फोन हातात घेतला. "हॅलो, मिस्टर समाद्दार, तुम्ही आता लगेच आमच्या घरी येऊ शकाल का? हो, हो. आपल्याला ताबडतोब बामुनगुच्छीला जायला पाहिजे. मला वाटतंय मला कोडं सुटलंय!--- हो, हो. मेलोकॉर्ड -- हो. ते महत्त्वाचं आहे." फेलूदाने फोन खाली ठेवला आणि गंभीरपणे म्हणाला, "तोपशे, यात थोडी जोखीम आहे पण ती घ्यायलाच पाहिजे. दुसरा काही मार्गच नाही."

क्रमश: