(नदीम-) श्रवणभक्ती

आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.

... अर्थात त्याचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!

साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा;  अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)

पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर- जयकिशनच्या रेकॉर्डस ग्रामोफोनवर लावायचे. ज्ये. बंधूंच्या काळात घरात रेकॉर्ड-प्लेअर आला. मग त्यावर आमचे बंधू आर. डी. च्या एल. पी. ज लावायला लागले. त्यांना एल. पी. पसंत नव्हते. आम्ही एल. पी. लावूया का असं हट्टानं म्हटलं तरी ते हटकून आर. डी. लावायचे. म्हणजे, आम्ही 'सावन का महिना' लावूया म्हणून शोर करायला लागलो की ते 'मेरे नैना सावन भादो' लावून आमच्या डोळ्यांत पाणी आणायचे.

वास्तविक, 'नदीम-श्रवण यांनी शंकर-जयकिशन किंवा आर. डी. यांचीच परंपरा पुढे चालवली' असं वाक्य सुरुवातीला टाकून एक वाद आपण सुरू करायला हरकत नसावी. तसा नव्वदीत 'परंपरा' नावाचा एक चित्रपटही आला होता; पण त्याचं संगीत शिवऱ्हरी यांचं होतं. त्यानंतर त्यांनी (अनुक्रमे) 'शिव शिव' आणि 'हरी हरी' करत 'आधी रात को' चित्रपट-संगीत-सन्यास घेतला. आपणच पूर्वी संगीतबद्ध केलेल्या 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' या गीताची प्रचीती त्यांना जवळ-जवळ वीस वर्षांनी आली! याचं श्रेय नदीम-श्रवण यांना प्रामुख्यानं द्यायला हवं.

'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं आणि रेशनचं किडकं धान्य यावर आमचं बालपण गेलं', असं एकदा शिरीष कणेकरांनी म्हटलंहोतं. त्यावर 'तुमचा शंकर-जयकिशनवरचा आकस यातून दिसून येतो', अशी  कुणीतरी टीका केली. त्याला कणेकरांनी असं उत्तर दिलं की 'आमचं सगळं बालपण वाईटच गेलं असं का तुम्हांला वाटतं? '

आमचं बालपण 'नदीम-श्रवणचं संगीत, ठाकऱ्यांची भाषणं आणि हॉस्टेलचं जेवण (याला विशेषण सापडत नाहीये)' यांवर गेलं. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं सांगून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ!

पण परंपरा कुठली? शंकर-जयकिशन आणि आर. डी. यांनी इतर भाषांमधलं संगीत भारतात आणलं (त्याला नक्कल म्हणू नका नाहीतर जुने आणि त्यापेक्षा जाणते लोक आमची पंचाईत करतील). 'कौन हे जो सपनों में' हे गाणं आलं म्हणून आम्हांला एल्विस प्रिस्टली कळला. आर. डीं. च्या 'मिल गया हम को साथी' या गाण्यामुळे 'आब्बा'चं सुगम संगीत आमच्यापर्यंत आलं. (आता हे आम्हांला तेव्हा माहिती नव्हतं हा काय आमचा दोष? ) नदीम-श्रवण यांनीही 'बॅचलर बॉय'चं 'ओ मेरे सपनों के सौदागर' करून आपला सौदा खरा केला आणि आपलं संगीत कसं अगदी पारंपरिक आहे हे सिद्ध केलं!

असो. हा असली-नकली वाद बॉलिवूडच्या बाबतीत दूरच ठेवायला हवा. संगीतकाराची प्रतिभा एकदा समजून घेतली आणि हा म्हणजे महानच हे शिक्कामोर्तब केलं की बाकी गाणी 'रतीब घालण्यासाठी असं करावं लागतं' या स्पष्टीकरणात दडपता येतात. आमच्या बारकाईच्या अभ्यासाचा हाच मुख्य विषय आहे.

'आशिकी' या पहिल्याच गाजलेल्या चित्रपटावरून आम्हांला त्यांच्या क्षमतेचा अंदाज आला. (त्या आधी ते अकरा वर्षं कार्यरत होते हे नंतर कळलं.... 'त्यांनी तेच कार्य का नाही चालू ठेवलं? ' असा आमच्या बंधूंचा प्रश्न आहे. ) त्या चित्रपटातली सगळीच गाणी आम्हांला आवडली आणि अपेक्षा अतिशय वाढल्या. 'अब तेरे बिन' हे गाणं आम्ही आधी ऐकलं नव्हतं. प्रत्यक्ष चित्रपट बघताना ते प्रथम कानी पडलं. असाच प्रसंग 'बाजीराव-मस्तानी'तली सगळी गाणी ऐकली आहेत असं वाटलं आणि आयत्या वेळी 'मल्हारी' 'याचि देही याचि डोळा' बघावं लागलं तेव्हाही आमच्यावर आला होता.  फरक इतकाच पहिल्यावेळी आम्ही थक्क झालो होतो, तर दुसऱ्या वेळी धक्का बसला होता! पण रात्री चित्रपट बघतानाही त्या अहिर भैरव या सकाळच्या रागातले सूर, अन् गिटार आणि व्हायोलिनचा वापर अंगावर रोमांच आणून गेले होते. ('नुसतं नदीम-श्रवण नाव काढलं की आमच्या अंगावर काटा येतो' हे आमच्या बंधूंच वाक्य उगाचच इथे आम्हांला आठवतंय.) 'सनम तोड दे, ता मुहब्ब्त के वादे' अशी शब्दांची तोड सोडली तर त्या गाण्यात काही नावं ठेवण्यासारखं आम्हांला वाटलं नाही. (पण तशी ही तोडफोडही परंपरागतच आहे - 'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. जाऊ द्या, पुन: आपण दुसऱ्यांशी तुलना करण्याचा मोह टाळू आणि 'वेगळेपणा' शोधू.

'दिल है के मानता नही' हे रात्रीच्या वेळी रात्रीच्याच रागातलं (झिंझोटी) गाणं (चित्रपट यायच्या आधीच) एकदा ऐकलं. त्यातली सुरावट, तिच्यात मूळ रागाच्या चलनापेक्षा (प ध सा रे ग म ग ऐवजी प नि सा रे ग म ग) केलेला परिणामकारक बदल आणि सतारीचे बोल हे खरंच (नदीम-)श्रवणीय वाटले बुवा.

नदीम-श्रवणचा कालखंड इथेच संपला असं म्हणायला आमची हरकत नाही. पण जसं संजय मांजरेकरबद्दल लिहिताना सुरुवातीचा वेस्ट-इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धचा तंत्रशुद्धपणा संपला की पुढची ओढाताण सांगणं भाग पडतं तसंच काहीसं इथे होईल. पूर्वीचा मांजरेकर कधी दिसेल असंच त्याचा खेळ बघताना सारखं वाटायचं, तसंच नदीम-श्रवणचं झालं. फक्त नदीम-श्रवणची वाटचाल 'कोंफिडंट' होती असं आमच्या एका गुजराथी मित्राचं मत आहे. (गुजराथी लोक खरे संगीतज्ञ! - जयकिशन गुजराथी होता, तसेच कल्याणजी- आनंदजी 'शहा'ही होते आणि अगदी हिमेश रेश... जाऊ द्या, आपण मूळ मुद्द्याकडे वळू.) मांजरेकर जसा प्रत्येक चेंडूवर स्वीप मारू लागला तसंच नदीम-श्रवण प्रत्येक गाण्याला तीच चाल देऊ लागले. (कुमार सानूंनाही याच सुमारास सर्दीची लागण झाली.)

मात्र 'साजन'चं संगीत 'कोंफिडंट' होतं यात शंकाच नाही. 'दोन ठोकळे आणि एक सुंदरी' असं त्या चित्रपटाचं वर्णन कमलाकर नाडकर्णींनी म. टा. त केलं होतं. पण नदीम-श्रवणनी त्या चित्रपटात काय काय केलं हे खरं बघण्यासारखं आहे. 'देखा है पहली बार' मध्ये अलका याज्ञिकला आणून अनुराधा पौडवालच्या गाण्यांची संख्या कमी केली हे काय कमी कौतुकास्पद आहे? (ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं कणेकरांनी म्हटल्याचं आठवतं.) एस. पी. बालसुब्रमण्यम सारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हेही त्यांनी दाखवून दिलं (उदा. 'पहली बार मिले हैं' किंवा 'देख के यूं मुझे तेरा'). मात्र त्यांचं खरं वेगळेपण दिसतं ते 'बहोत प्यार करते है तुमको सनम' या गाण्यातून. मुखडा शब्दांसकट 'बहोत खूबसूरत है मेरा सनम' या मेहदी हसनसाहेबांच्या गाण्याची आठवण करून देतो. फक्त मेहदी हसनसाहेबांच्या गाण्यात वापरलेला शुद्ध निषाद दरबारीत बसत नसल्यामुळे नदीम-श्रवणनी वगळला! केवढी ही जाणकारी! .... पण, थांबा. पुढे अंतरा ऐकताना तर - 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. अनुकरण करतानाही राग (मिश्र किरवाणीचा दरबारी) आणि ताल (दादऱ्याचा केरवा) दोन्ही कसे बदलता येतात याचा हा एक उत्तम धडा आहे असं आम्हांला वाटतं. शिवाय, शुद्ध गंधार वापरून 'आम्हांलाही मिश्र दरबारी करता येतो' हे त्यांनी दाखवून दिलं. केवढी ही प्रतिभा! केवढं हे वेगळेपण! आणि ह्या सगळ्यांच्या वरताण एकमेव 'ओरिजिनॅलिटी' - जी अभ्यास केल्याशिवाय सहजासहजी दिसत नाही ती - म्हणजे समीर यांच्या शब्दांतल्या अंतऱ्यांतल्या शेवटच्या ओळी 'के ये बेकरारी ना अब होगी कम'!

अर्थात, ही प्रतिभा त्यांनी 'तू मेरी जिंदगी है' या गाण्याच्या मुखड्यातही दाखवली होती. मूळ मेहदी हसनसाहेबांच्या याच गाण्यातला 'बंदगी' हा शब्द बदलून तिथे 'आशिकी' घालून त्यांनी पूर्ण गाण्याचा कायापालट केला.

आपलं कुणी अनुकरण करायला लागलं की आपण महान आहोत हे समजावं. अन्नू  मलिक यांना यांच गाण्यांमधून प्रेरणा मिळाली असावी. त्यांनी देशाची सीमा ओलांडण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आपल्याच जगजीतसिंग साहेबांची 'देर लगी आने में तुमको' ही गझल त्यांनी आपल्या गीतावळ्यात (अशा शब्द आहे की नाही माहिती नाही; पण ही आमची ओरिजिनॅलिटी आहे) समाविष्ट केली!

'तेरी उम्मीद तेरा इंतजार' मधला परमेश्वरी, 'सोचेंगे तुम्हे प्यार', मधला मारूबिहाग असे नंतर काही तुषार अंगावर आले खरे; पण तोपर्यंत कुमार सानूंची सर्दीही फारच वाढली होती आणि गाण्यांमधलं 'सामिर्य' देखील (हा साम्य आणि साधर्म्य यांच्यामधला शब्द आहे - पुनः एकदा आमची ओरिजिनॅलिटी). आमच्या बंधूंचं मत प्रत्ययकारी होऊ लागलं.

मग नदीम-श्रवण यांनी 'परदेस' हा प्रयोग केला. सोनू निगमसारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हे त्यांनी (पुनः एकदा) दाखवून दिलं. अर्थात, आमच्या मते या चित्रपटातलं एकच 'दो दिल' हे कुमार सानुनासिक (अभ्यासूंना हा समास सोडवायची संधी आहे) गीत वगळता बाकी संगीत हे घईंचं असावं. कारण त्यातून नदीम-श्रवणच दिसत नाहीत. याउलट 'तेरी पनाह में हमें रखना' या भजनातूनही ते कसे स्पष्ट दिसतात!

'साजन चले ससुराल' या चित्रपटातल्या 'दिल-जान-जिगर तुझपे निसार किया है' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. असंबद्धता (असा शब्द बहुधा मराठीत असावा) हा या गाण्याचा स्थायीभाव आहे. पण ते गोविंदावर चित्रित झाल्यामुळे सगळं कसं अगदी सुसंबद्ध वाटतं!

यानंतर काही काळ त्यांना उदित नारायण हा चांगला गायक आहे हा साक्षात्कार झाला असावा. कारण 'परदेसी' पासून ते 'धडकन' पर्यंत त्यांनी आपली प्रमुख गाणी उदित नारायण यांना दिली. श्री. नारायण हे रडू शकत नाहीत किंवा त्यांना सर्दीही फारशी होत नाही, हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं. मधल्या काळात त्यांनी विनोद राठोड (हे श्रवणचे बंधू) आणि अभिजीत यांनाही संधी दिली होती. तसंच, जरी प्रत्येक आल्बमवर स्वतःची छबी छापून घेत असले तरी, आशा भोसलेकडून 'चेहेरा क्या देखते हो' हे गाणंही गाऊन घेतलं होतं!

अलीकडेच नदीम यांनी 'इश्क फॉरेव्हर' या चित्रपटाला संगीत दिलं....कुणाचंच संगीत फॉरेव्हर राहत नाही हे यातून 'बिलकुल' सिद्ध होतं.

मात्र हल्लीच स्टॅफोर्डला (इंग्लंड) एका बांग्लादेशी इंडियन(!) रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. त्याचं नाव 'मेला'. जेवण चांगलं होतं आणि आम्ही अजून जिवंत आहोत हेही जाता जाता सांगायला हरकत नाही. त्यांनी बहुधा 'उदित नारायण सिंग्स फॉर नदीम श्रवण' अशी प्लेलिस्टच लावली असावी. वास्तविक 'मेला' या खाद्यगृहात अन्नू मलिकची गाणी जास्त शोभली असती. असो. पहिलंच गाणं 'दिल का रिश्ता बडा ही प्यारा है' हे 'दिल में इक लहर' आणून गेलं. (अक्षरशः - कारण चाल जवळ-जवळ तशीच होती. फक्त तिचं पूर्णतः नदीम-श्रवणायझेशन झालं होतं आणि शिवाय तिच्यावर समीरच्या शब्दांचे संस्कार झालेले होते.) 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ('मेला'मध्ये आलू भेंडी चांगली मिळते - तीच खात होतो.) मोक्ष मोक्ष म्हणजे तरी दुसरं काय असतं?

असाच समीर 'जो मेरी रुहको चैन दे प्यार दे' या गाण्यात 'मैने तनहा कभी जो लिखी थी वही शायरी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम' हे लिहून जातो... आपणच वाढवलेल्या आणि न पूर्ण झालेल्या अपेक्षांबद्दल आपल्यालाच वाईट वाटत राहतं...  जाऊ द्या.

नदीम-श्रवणच्या संगीतातलं थोडं संगीत 'श्रवणीय' आहे आणि बाकींत नुसताच 'नदीमी कावा' आहे असं आपण समजूया. आता त्यांच्या या गाण्यांनी चित्रपट-संगीतात एक वेगळा कालखंड तयार केला की त्याचा काल खंडित केला हे ज्याचं त्यानं ठरवावं! काय?

- कुमार जावडेक