बाबूजी !

      आज महिन्याची २५ तारीख असून रेडिओवर "खुष है जमाना आज पहेली तारीख है" हे गाणे वाजू लागल्यामुळे मी एकदम चक्रावून गेलो ‍री सेवानिवृत्त झालो तरी इतके काळाचे भान विसरलो यावर विश्वास बसेना पण तेवढ्यात  निवेदकाने आज बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा जन्मदिन(२५ जुलै) आहे म्हणून हे गाणे लावले असे सांगून माझी संशयनिवृत्ती केली. सन १९५४ मधील "पहली तारीख" याच नावाच्या चित्रपटातील हे गाणे !  रेडिओ सीलोनने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस हे गाणे लावण्याचा प्रघात कधी सोडला नाही आणि आता एफ एम चॅनेलनेही ती परंपरा चालवली आहे  आज त्रेसष्ठ वर्षानंतरही ते तितकेच आनंददायक वाटते,त्याला किशोरकुमारची शैली कारणीभूत आहे, तितकीच बाबूजींनी दिलेली मजेदार  चालही !
     अतिशय हलाकीत बालपण गेलेल्या बाबूजींनी संगीत हेच आपले ध्येय ठरवले होते हे निश्चित.कोल्हापूर या आपल्या जन्मस्थानी वामनराव पाध्ये यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.आणि वडील अचानक गेल्यामुळे घर सोडून अर्थप्राप्तीसाठी देशभरात अक्षरश: दारोदार फिरून आपली उपजीविका करण्याची पाळी त्यांच्यावर आली.तश्याही स्थितीत त्यांनी किती कठोर परिश्रम करून आपले स्वत्व राखले याची कहाणी त्यांच्याच शब्दात त्यांच्या "जगाच्या पाठीवर" या आत्मवृत्तपर पुस्तकात वाचायला मिळते.पण त्यांच्या निर्लेप वृत्तीमुळेच की काय या आत्मवृत्ताचा पुढील भाग ज्यात त्यांच्या कर्तृत्त्वाचा भाग वाचायला मिळाला असता तो त्यानी लिहिला नाही याबद्दल हळहळ वाटते.
     भावगीतगायक अशीच प्रसिद्धी मिळत असताना प्रभात कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरवात त्यांनी १९४६ या वर्षी निघालेल्या "गोकुल" या चित्रपटापासून केली.हिंदी चित्रपटसृष्टीतील मानापमानाचे प्रयोग त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीस मानवले नाहीत असे दिसते शिवाय मराठी चित्रपटसृष्टीत त्याना मानाचे पान मिळत असल्यामुळेही त्यानी तिकडे दुर्लक्ष केले असावे त्यामुळे त्यांनी संगीत दिलेल्या १०१ चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांची संख्या फक्त २१च आहे.
       भावगीत गायक ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली आणि बऱ्याचवेळा त्यांच्या इतर संगीतकारांच्या बरोबर केलेल्या गीतगायनाचीच जास्त आठवण आपल्याला होते. "डोळ्यामधले आसू पुसती" किंवा "कुठे शोधसी रामेश्वर" किंवा "तिन्ही लोक आनंदाने " अशी त्यांची भावगीते अतिशय कर्णमधुर झालेली आहेत.त्या गायनाच्या वेळी आपण संगीतकार नसून केवळ गायकच आहोत व संगीतकाराला अभिप्रेत भावच आपल्या गायनातून दिसायला हवा याविषयी ते किती दक्ष असत याविषयी संगीतकार यशवंत देव यांनी लिहूनही ठेवले आहे.    
     बाबूजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना चाल फारच चटकन सुचत असे .त्याविषयी त्यांया गीतरामयणातील पहिल्याच गीताची आठवण सांगण्यासारखी आहे. .हे गीत तयार करून आपण बाबूजीना दिले असा गदिमांचा समज तर ते आपल्याला मिळाले नाही असा बाबूजींचा दावा (आणि बाबूजीच्या व्यवस्थितपणाचा विचार केल्यास तो खराही असणार) आता आपण पुन्हा गीत करणार नाही असा अण्णां(गदिमां)चा हट्ट पण  आकाशवाणीचे काम त्यामुळे अडलेले ! कारण गीत आकाशवाणीवर प्रसारण करण्याचे वेळापत्रक जाहीर झालेले ! ते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशवाणीवर प्रसारण व्हायचे ठरलेले व ध्वनिमुद्रणासाठी आधल्या दिवशी रात्री सर्व कलाकार जमलेले असताना उद्भवलेला हा वाद.
      शेवटी आकाशवाणीचे पु.मं.लाड यांनी अण्णांना एक खोलीत अक्षरश: कोंडून आता गीत तयार झाल्यावरच दार उघडण्यात येईल असे सांगितले.मधून मधून चहाचे कप पाठवण्यात येतील एवढाच दिलासा देण्यात आला.पण कविराजही असे बहाद्दर की त्यांनी "स्वये श्रीरामप्रभू ऐकती " हे अतिशय प्रसन्न गीत एका बैठकीत आणि तेही एकटाकी मुळीच खाडाखोड न करता लिहून खाली ग.दि.माडगूळकर अशी लफ्फेदार सही करून लाडांच्या पुढ्यात टाकून त्यांची चिंता दूर केली आणि बाबूजींनी तेथल्यातेथे त्या काव्यावर संगीतसाज चढवून स्वरबद्ध करून तितक्याच बहारदार पद्धतीने सादर केले. धन्य ते कविराज आणि धन्य ते संगीतकार. गीतरामायणातील "पराधीन आहे जगती" या गाण्याविषयी प्रथम तयार केलेली चाल आयत्या वेळी बदलून ते गाणे म्हटल्याचा स्वतः बाबूजींनीच एका ठिकाणी उल्लेख केलेला आढळतो.    
           अशाच एका प्रसंगाविषयी संगीतदिग्दर्शक कोशल इनामदार यांनी सांगितलेला किस्सा नमूद करण्यासारखा आहे. बाबूजी आणि गदिमा या दोन दिग्गजांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले."गीतरामायण" सारखी युगपरिवर्तनीय  निर्मिती त्यांनी केली परंतु त्यांच्या राजकीय मतप्रणाली अगदी दोन विरुद्ध टोकाच्य़ा ! बाबूजी हाडाचे संघस्वयंसेवक तर गदिमा स्वातंत्र्यलढ्यापासून कॉंग्रेसचे पक्के पाईक. या दोन दिग्गजांना घेऊन चित्रपटक्षेत्रातील आणखी एक दिग्गज राजा परांजपे "लाखाची गोष्ट" या चित्रपटाची निर्मिती  करत होते त्यावेळची गोष्ट.सहज सुरू केलेल्या संभाषणाची गाडी कशावरून तरी राजकारणाकडे वळली आणि अगदी तिखट चर्चेत त्याचे रूपांतर होऊ लागले. शेवटी राजाभाऊंनी "तुमच्या राजकारणात माझ्या पिक्चरचा जीव चाललाय " असा बाण सोडल्यावर एकदम गदिमांनी "असे का ?" म्हणत पेन उचलले आणि विचारले "सांगा बर गीताची पार्श्वभूमी काय ते ?" आणि राजाभाऊंनी गाण्याची भूमिका वर्णन करून सांगितल्यावर दहा मिनिटात गाणे तयार करून गदिमा कागद राजाभाऊंच्या पुढ्यात सरकवत म्हणाले."हे घ्या गाणं चाललो मी " असे म्हणून ते उठले व तरातरा निघाले.अजून ते बाबूजींच्याबरोबर झालेला वाद विसरले नव्हते . ते दारापर्यंत पोचतात तोच त्यांच्या कानावर बाबूजींची हाक आली,"अहो अण्णा,निघण्यापूर्वी गाण्याची चाल ऐकून जाणार नाही का? " आणि लगेच त्यांनी ते गाणे त्यांना ऐकवलेही.ते गाणं होतं "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे "
      बाबूजींच्या संगीत कारकीर्दीचा विचार करताना त्यांच्या इतकेच हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शनात अतिशय मोठे कर्तृत्व गाजवणाऱ्या 
 एका "दादा" व्यक्तिमत्वाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ते व्यक्तिमत्व म्हणजे सचिनदेव बर्मन. सचिनदा आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्यातील तीन महत्वाची साम्यस्थळे लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यातील पहिले म्हणजे दोघांनाही सर्वमान्यता मिळाली ती प्रथम उत्कृष्ट गायक म्हणून व त्यानंतर संगीत दिग्दर्शनाकडे ते वळले. अतिशय आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांच्या क्षेत्रात त्यांचा मान राखला गेला. आपल्या शालीन वर्तनाने त्यांनी आपल्याविषयीचा इतरांचा आदर दिवसेंदिवस वृद्धिंगत केला.दोघेही स्वत: उत्कृष्ट गायक होते किंबहुना आपली सांगीतिक कारकीर्द दोघांनीही गायक म्हणूनच सुरू केली. सुधीर फडके यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या सचिनदांच्या गाण्यांपेक्षा खूपच अधिक आहे तरीही सचिनदांविषयी अगदी किशोरकुमार आणि लताजींनीही "गीताची चाल जशी सचिनदा म्हणून दाखवत तसे व  
त्यांच्यासारखे गाणे आपल्याला जमत नाही " अशी कबुली दिली होती तर बाबूजीच्या विषयी सुद्धा तसेच म्हणता आले असते यात मुळीच संशय नाही. 
      दोघांचीही संगीतकारकीर्द अगदी दीर्घ म्हणावी अशीच होती आणि आयुष्याचा अखेरचा श्वास घेईपर्यंत  उत्कृष्ट संगीत देण्याचा आपला वसा त्यां दोघांनी कायम राखला.काळानुसार आपले संगीत अगदी नवनूतन राहील अशी दक्षता त्या दोघांनीही घेतली आणि त्यामुळे त्यांचा जमाना संपला असे उद्गार काही इतर संगीतकारांचे शेवटच्या काळातले संगीत ऐकल्यावर काढले गेले तसे त्यांच्या बाबतीत झाले नाही. उलट त्यांचे संगीत शेवटपर्यंत अधिकच समृद्ध होत गेले.
    दुसरे महत्त्वाचे साम्यस्थळ म्हणजे सचिनदा याच्या पत्नी मीरा व बाबूजीच्या पत्नी ललिता दोघीही उत्कृष्ट गायिका होत्या.पण त्याचबरोबर जरा खटकणारे साम्य म्हणजे दोघींनाही स्वत:च्या संगीतरचनेत फारच कमी स्थान त्या दोघांनीही दिले.ललिताबाईंनी लग्नापूर्वी व नंतरही काही दिवस त्या काळातील  अनेक दिग्गज संगीतकारांकडे गाणी म्हटली होती.त्यात सचिनदा,सी रामचंद्र,गुलाम हैदर यांचा समावेश होतो परंतु बाबूजींच्या संगीतदिग्दर्शनाखाली "सुहासिनी "या चित्रपटात एक गीत तेही शास्त्रीय संगीतावर आधारित चीज या स्वरूपाचे व "गीतरामायण" आकाशवाणीवर सादर होताना त्यातील कौसल्येची गाणी येवढाच त्यांचा सहभाग दिसतो.सचिनदांच्य़ा संगीतरचना करण्यात मीरादीनी त्यांना महत्वाचा हातभार लावला पण त्यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेले गीत मात्र आढळत नाही. मात्र त्यांनी बंगालीमध्ये अनेक कविता लिहिल्या व त्यांच संगीत सचिनदांनी केले व त्या मीरादींनी  गायल्याही. 
    या दोन संगीतदिग्दर्शकांच्या बाबतीत तिसरे महत्त्वाचे साम्यस्थळ म्हणजे दोघांच्याही पुत्रांनी आपल्या पित्याचा वारसा पुढे चालवला.राहुलदेव यांच्या बाबतीत ही गोष्ट अधिकच ठळकपणे नमूद करण्यासारखी असली तरी श्रीधर फडके यांचेही संगीतक्षेत्रातील योगदान दुर्लक्षिण्यासारखे नाही.
            सार्वजनिक जीवनात सचिनदा अगदी एकलकोंडे होते.अगदी चित्रपटकलावंतांच्या असोसिएशनची वर्गणी घ्यायला येणाऱ्या माणसाला सुद्धा भेटायचे त्यांच्या जिवावर यायचे त्यामुळे त्याला प्रत्यक्ष न भेटता वर्गणीची रक्कम ते आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरून सरळ खाली फेकून देत.बाबूजीचा खाक्या मात्र अगदी याच्या उलट होता.म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच आपल्या संगीत कारकीर्दीवर पाणी सोडून गोवा मुक्तीसंग्राम सारख्या चळवळीत त्यानी भाग घेतला.सावरकरांवर चित्रपट काढण्यासाठी जिवाचे रान केले व अखेरीस आपला बेत तडीस नेला
        बाबूजींच्या ९८ व्या जन्मदिनी त्यांना ही आदरांजली !