तज्ञ की तज्ज्ञ?

प्रशासकमहोदयांच्या सूचनेनुसार नवीन चर्चासूत्रात हे परत लिहीत आहे!


नमस्कार.


'त्या'च्या 'अंतरिम'संदर्भातील प्रतिसादावरून हे आठवले आहे. खरे तर पूर्वी हे अन्यत्र विचारले होते, परंतु तेव्हा त्याचे उत्तर मिळाले नव्हते. या चर्चासूत्रावर मिळेल अशी आशा आहे :


तज्ज्ञ आणि तज्ञ यांतील योग्य काय व का याचा खुलासा कराल काय? माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे, तज्ज्ञ हे बरोबर (तद् जानाति सः तज्ज्ञः)  आणि गणितज्ञ, शास्त्रज्ञ, मर्मज्ञ हे बरोबर. (शास्त्रम्/शास्त्रान् जानाति सः शास्त्रज्ञः किंवा गणितम् जानाति सः गणितज्ञ:)


(माझा आगाऊ शहाणपणा: संस्कृतमधील सर्व भौतिक गोष्टीही शेवटी 'तद्' शी नेवून ज़ोडण्याची खोड! ज़से की 'तत्त्वज्ञान'! फक्त त्यातील महान गोष्ट म्हणजे आपला तेव्हाचा ईश्वर हा तरी 'तद्' होता, 'सः' किंवा 'सा' नव्हता. (मला वाटते सामान्य लिंगाचे हे संस्कृतमधले एकच उदाहरण!) याइतका विचारीपणा पुढे कुठल्या धर्मांनी दाखवल्याचे ऐकले नाही.)


आणि तद् + ज्ञ = तज्ज्ञ होण्याचे (तज्ञ न होता) कारण म्हणजे, संस्कृतमध्ये ज्ञ या अक्षराची फोड होते ज् + न् + अ अशी, तर मराठीत द् + न् + य् + अ अशी. (आणि हिंदीत ग् + य् + अ अशी!) त्यामुळे तद् मधील 'द्' हा ज्ञ मधील 'ज्'च्या आधी आल्याने त्याचा 'ज्' बनतो आणि शब्द तज्ज्ञ असा तयार होतो.


यातील चुका दुरुस्त करून याविषयी अधिक मार्गदर्शन करावे.


धन्यवाद!


मराठा