चौतीस तास

दोन वर्षांपूर्वीची २६ जुलै, या वर्षीची ३० जून आणि तत्सम कोसळपावसाचे अनुभव वाचून मला अठरा वर्षांपूर्वी (१९८९ साली) चौतीस तास खर्चून केलेला मुंबई-पुणे प्रवास आठवतो. त्याचा हा वृत्तांत.

आता मी चाळिशीची (अदृश्य) भिंत पार केलेली आहे. त्या वेळी मी ऐन तेविशीत होतो. माझ्या वयाचा या निवेदनाशी काही संबंध नाही. म्हणूनच हा उल्लेख.

बुद्धीन मिश्रा (उर्फ 'केला') या मानवाने अर्थशास्त्रातील एम. फिल. ही पदवी प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी (एकदाच्या) पूर्ण केल्या होत्या आणि तो परत आपल्या गावी शिबसागरला (आसामात), जायला निघाला होता. तो माझा वर्गबंधू नसला तरी पेलाबंधू होता. त्यामुळे त्याला निरोप देण्याचा क्षण पुण्याच्या घाणेरड्या फलाटावर साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या घाणेरड्या फलाटावर साजरा करावा असे मनात आले. मिश्राचे कनिष्ठ अध्यायी आणि एक सहाध्यायी यांच्याही मनात तसेच आले. कदाचित मिश्रा खरेच आसामच्या गाडीत बसला याची खात्री करावी हादेखील त्यांचा हेतू असण्याची शक्यता आहे.

मिश्राचे टोपणनाव 'केला' होते. 'केला' हा आसामी भाषेतील एक शब्द आहे, आणि मिश्राला तो प्रत्येक वाक्याच्या अखेरीस वापरण्याची खोड होती ('ये क्या है, केला?', 'क्या बोल रहा था वो, केला?'). या शब्दाचा अर्थ खूप अश्लील आहे असे सांगण्यात आले होते. मला आसामी येत नाही त्यामुळे माहीत नाही.

आम्ही पुण्यातून संध्याकाळी इंद्रायणी एक्सप्रेसने निघालो.

थोडक्यात पात्रपरिचय:

बुद्धीन मिश्रा - उंची जेमतेम पाच फूट. शिबसागर येथील मुलींच्या महाविद्यालयात अध्यापक. पण हा कथानकाची सुरुवात करण्यापुरताच होता. मुख्य पात्रे खालीलप्रमाणे.

अशोक - आडनाव हेगडे. सहा फूट, गोरा, घारा, माथ्यावर (बाविसाव्या वर्षीच) चांद तळपू लागलेला. टोपणनाव 'सम्राट' (सम्राट अशोक). त्या टोपणनावाला जागण्याचा सतत आटोकाट प्रयत्न. कुणालाही, कधीही, कुठेही उचकवण्याची क्षमता.

राजीव - आडनाव डोग्रा, जे नावापेक्षा खूपच जास्त प्रचलित होते. साडेपाच फूट. वाढत्या वयात हॉकी खेळाडू. एकंदर दणकट बांधा. मिश्राचा सहाध्यायी. धर्मशाला (दलाई लामांचे भारतातले निवासगाव) येथील रहिवासी.

रमणकुमार - आडनाव दत्त. पावणेसहा फूट. गव्हाळ वर्ण. आंध्र प्रदेशीय, पण मूळचा कर्नाटकातील असल्याचे प्रतिपादन. त्याच्या पुष्ट्यर्थ काही कन्नड शब्दांचे सर्वांसमोर (कानडी माणसे सोडून) सदैव उच्चारण. मिश्राचा कनिष्ठ अध्यायी.

संदर्श कुमार / सॅंडी - आडनाव यशस्विरीत्या लपवलेले. पाच फूट आणि नगण्य इंच. तुडतुड्या. मूलस्थान कर्नाटकातील शिमोगा. एरवी शांत. पण 'सम्राट' असला की दोघांचा कानडीत कडकडाट. त्यात सँडीचा सहभाग जास्त करून खिदळण्याचा. रमणकुमारचा सहाध्यायी.

शिवकुमार - आडनाव नाही असे जाहीर. रमणकुमारच्या उंचीचा, वर्णाचा आणि त्याचा सहाध्यायी. सडसडीत. मद्रास (आता चेन्नई) येथील. पिढीतील अंतर (generation gap) हे त्याच्या कुटुंबात भावंडांमध्येच होते. शिव वीस वर्षांचा, त्याहून मोठा भाऊ तीस वर्षांचा आणि सगळ्यात ज्येष्ठ चाळीस वर्षांचा. वर्गातील सहाध्यायिनीबरोबर धडाडते 'प्रकरण' (शिवकुमारचे. त्याच्या भावांचे नव्हे), जे या घटनेनंतर वर्षभरातच विझले.

शेवटी,

मी - या सर्वांपैकी मुंबईत स्वतःहून हिंडण्याइतके ज्ञान असणारा एकमेव मानव. बाकी सगळे (डोग्रा आणि मिश्रा गाड्या बदलण्यापुरते मुंबईचे फलाट पाहून आले होते) अगदीच अनभिज्ञ.

तर आम्ही इंद्रायणी एक्सप्रेसने निघालो. गाडीत हिंडणाऱ्या फेरीवाल्यांया नकला, कर्जतचे वडे आदी नेहमीचे टप्पे पार करत व्हीटी (आता सी एस टी) येथे पोचलो. मिश्राला निरोप देण्याचा कार्यक्रम मरीन ड्राइव्हवर साजरा केला आणि व्हीटीला (त्यावेळी ते नाव प्रचलित होते म्हणून वापरत आहे. शिवाय टंकित करायला 'सी एस टी' पेक्षा 'व्हीटी' सोपे आहे) आलो.

माणसांचा महासागर फलाटांवर, तिकिट खिडकीसमोर, जिथे जिथे सपाट जागा मिळेल तिथे, उतू जात होता. सर्व सपाट पृष्ठभाग राड झालेले होते. रात्र कशी काढावी या प्रश्नावर चर्चा सुरू झाली नाही. कारण मुंबईचा 'विशेषज्ञ' मी असल्याने या प्रश्नाची शब्दरचना 'मुंबईत रात्र कशी काढावी' अशी करून तो प्रश्न माझ्या गळ्यात मारण्यात आला. 'स्क्रीन' नावाचे नियतकालिक कमी पैशात भरपूर पाने  देते हे माझे सामान्यज्ञान कामी आले. एका 'स्क्रीन'मध्ये आम्ही सातजण बूड व्यवस्थित टेकून बसलो. सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटे या वेळेपर्यंतचाच तर प्रश्न होता. कारण एकदा मिश्राची गीतांजली एक्सप्रेस निघाली की आम्ही सव्वासहाच्या (किंवा सहा वीस असेल) 'इंद्रायणी'ने परत जायला मोकळे होतो.

गीतांजली एक्सप्रेस वेळेत फलाटावर लागली आणि वेळेत सुटली. ती फार पुढे गेलीच नाही हे आम्हाला खूप नंतर कळले.

मिश्रा दिसेनासा होईपर्यंत आम्ही हात खांद्यातून निखळून येऊ शकतील काय याची परीक्षा घेण्यासाठी हालवले. मग आळसावलेल्या (झोप कुणाचीच झालेली नव्हती) टोळक्याला एकत्र करून मी तिकिट खिडकीवर कूच केले.

पहिली घंटा तिथे वाजली. पुण्याला जाणाऱ्या गाड्या चालू आहेत की नाहीत याबद्दल खिडकीवरच्या कारकुनाने घोर अज्ञान व्यक्त केले आणि तिकिट काढून पैसे गुंतवण्यापेक्षा 'थांबा आणि बघा' धोरण स्वीकारावे असा (चक्क) योग्य सल्ला दिला.

तासभर आम्ही शांत बसलो. नव्हे, शांत राहण्याचा प्रयत्न करीत बसलो. कारण 'सम्राट' अशोकाने पहिला यशस्वी हल्ला चढवला. झाले असे - आम्ही संपूर्ण शुकशुकाट असलेल्या फलाटावर (या एका गोष्टीनेच माझ्या मनात भयसूचक घंटा वाजायला हवी होती. सकाळी सहाला व्हीटीच्या फलाटावर शुकशुकाट? पण नाही वाजली) एका बाकड्यावर बसलो होतो. धूम्रपान करणारे धूम्रपान करत होते. धूम्रपान न करणारे धूम्रपान करत नव्हते. (त्या काळी रेल्वेत वा फलाटावर धूम्रपानाला बंदी नव्हती). सर्वजण 'वेळ जाता जात नाही' हा अनुभव किती कडाडून जांभया आणतो त्याची प्रचीती घेत बसलो होतो.

सम्राटाच्या हातावर घड्याळ होते. त्याला धातूचा पट्टा होता. त्या पट्ट्याचा खटका उघडून बंद करणे हा (टिकीक टिक) खेळ त्याने अतीव नियमितपणे चालवला होता. शिवकुमारचा संयम सर्वात आधी सुटला. कदाचित रात्रीची झालेली बिअर आणि न झालेली झोप असेल. "तो @#*#@ आवाज थांबव", शिव गरजला.

"तुझे आजोबा (संवादाची भाषा इंग्रजी होती. इंग्रजी उच्चार 'ग्रांडफादर') दिवाळे काढायला निघाले होते. माझ्या आजोबांना दया आली आणि त्यांनी तुझ्या आजोबांना शंभर रुपये दिले. त्याबदल्यात तुझ्या आजोबांनी हे घड्याळ माझ्या आजोबांना दिले. तू ते पैसे आणी व्याज परत कर आणि हे घड्याळ घेऊन टाक" क्षणाचीही विश्रांती न घेता सम्राटाने उत्तर दिले.

शिवकुमारला फेफरे यायची पाळी आली. रमण, डोग्रा आणि मी मिळून (सॅंडी खिदळत होता) त्याला सावरले.

एव्हाना मला एक गोष्ट जाणवू लागली होती. या सर्वांमध्ये मुंबईचा भूगोल माहिती असणारा मी एकटाच होतो. बाकी सर्वांची अवस्था उत्तर ध्रुवावर पोचलेल्या उंटांसारखी निर्नायकी होती. (दक्षिण ध्रुवावर म्हटले तरी चालेल).

नऊ वाजण्याच्या आसपास मी सर्वांना बाहेर काढले. 'बेस्ट'च्या बसने (पाऊस कोसळत होता, पण 'बेस्ट'च्या बसेस चालू होत्या) दादरला जायचे आणि तिथून एशियाड बसने पुण्याला असा कार्यक्रम ठरवला. ("जणू काही याला परत जाण्याचा रस्ता माहीत आहे" असे सम्राट गुरगुरला, पण मी ते कानाआड केले).

बाहेर महापालिकेच्या बाजूच्या बस थांब्यावर अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर एक बस दिसली. मुंबईच्या भूगोलाचे माझे ज्ञान (अजूनही) बरेचसे 'अंदाजपंचे दाहोदरशे' असे आहे. म्हणजे, बसच्या गंतव्य स्थानाचे नाव वाचून मला साधारण कळते की ती बस मला पाहिजे त्या स्थानाच्या जवळपास जाते की नाही. तशी साधारण दादरच्या पलीकडे जाणारी एक डबलडेकर बस आली. आम्ही तळमजल्यावरच चालकाच्या मागे बसलो.

पाऊस कोसळतच होता. आम्ही खिडक्या बंद केल्या.

बस कुठेतरी भायखळा आणि परळच्या दरम्यान पोचली. आता रस्ता पाण्यात दिसेनासा झाला होता. आणि बसचे एक चाक खड्ड्यात अडकले. चालकाने ऍक्सलरेटर वाढवून बस मोकळी करण्याचा प्रयत्न केला. पण क्लच आणि ऍक्सलरेटर च्या पावट्यांचा भोकातून पाणी भसाभस आत येऊ लागल्यावर परिस्थिती गंभीर असल्याचे त्याने तारस्वरात जाहीर केले. आम्ही सगळे (अर्थातच सम्राटाखेरीज) धक्का देण्यासाठी खाली उतरू लागलो आणि जाणवले की पाणी जवळजवळ चार फूट खोल होते. पण पुरेसे मानवी देह त्या पाण्यात तरंगत बसला धक्का देण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्यात आम्ही यशस्वीही झालो. आनखशिखांत चिप्प भिजून आम्ही परत आत शिरलो.

आम्ही दादरच्या जवळ पोचलो आणि माझ्या लक्षात आले की माझे मुंबईचे भौगोलिक ज्ञान परिपूर्ण नव्हते. बस आम्हाला दादरला घेऊन गेली, पण दादर टीटी च्या ऐवजी शिवाजी पार्कला. रस्त्यावर पाणी होतेच. आमची तुकडी घेऊन मी प्लाझाच्या पुलाकडे चालू लागलो. अचानक कडाडकाड असा आवाज झाला आणि आमच्या समोरच एक झाड गोव्यात सरकार पडते तसे पडले. दोन मोटारींचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने मोटारींत कोणी नव्हते. आम्ही एव्हाना बधिरायला लागलो होतो. फारसे काही वेगळे न घडल्यासारखे आम्ही त्या घटनेकडे पाहिले आणि चालू पडलो.

अखेर एशियाडच्या स्थानकावर पोचलो. तिथे वाहतूक नियंत्रक गर्जत होता "मी काय बस खिशात घेऊन फिरतो काय? पुण्याहून बस आली की मी लगेच सोडेन. मला काय करायचे आहे बस इथे ठेवून? काल रात्रीपासून एकही बस पुण्याहून आली नाहीये".

"तरी मी म्हणत होतो..." सम्राट गुरगुरला. वाक्य पूर्ण झाले नाही, कारण वाक्य पूर्ण करण्याकरता त्याच्याकडेही काही नव्हते.

या टोळक्याला घेऊन मुंबईत काही तास काढता येतील अशी एकही जागा मला सुचत नव्हती. एशियाडच्या स्थानकावर चिखलराड आणि माणसांची गर्दी एकमेकांशी स्पर्धा करीत होते. मी समोर बघितले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक एष्टीचा लाल डबा 'नवी मुंबई' अशी पाटी लावून उभा होता. मुंबईतून बाहेर तर पडावे, म्हणून त्या बसकडे मी टोळक्याला वळवले. अर्थातच सम्राटाने जोरदार विरोध केला. त्याचे मुंबईचे भौगोलिक ज्ञान शून्य होते. पण एकंदर आविर्भाव असा होता की मी जणू त्यांना मुंबई ते पुणे मॉस्को मार्गे नेत होतो.

सुदैवाने मला मुंबईची (त्यातल्यात्यात) माहिती होती हे इतर सर्वांनी मान्य केले आणि आम्ही त्या लाल डब्यातल्या कोरड्या (अहाहा!) बाकांवर स्थानापन्न झालो.

तीनच्या आसपास बस सुटली. शर्यतच लावली असती तर सव्वाशे वर्षांच्या संधिवाती म्हाताऱ्यानेसुद्धा आम्हाला हरवले असते. अडीच तास खर्चून आम्ही चेंबूरला पोचलो. आम्ही चालत लौकर पोचलो असतो. पण मग सम्राटाने आम्हाला सर्वांना पुण्याऐवजी ठाण्याला जायची पाळी आणली असती.

अर्थात आम्ही हा वेळही वाया घालवला नाही. सायनजवळ मला एक रत्नागिरीला जाणारी बस दिसली. एव्हाना नव्या मुंबईची तिकिटे काढून झाली होती. पण तरीही हे टोळके मी त्या बसमध्ये घुसवले आणि पनवेलची तिकिटे काढली. "असल्या अनुत्पादक खर्चांमुळे भारताचे अंदाजपत्रक कोसळते" असा सम्राटाने शेरा मारला. ते सर्वजण अर्थशास्त्रातच एम. फिल. करत होते. त्यामुळे हे विधान कुणीही गंभीरपणे घेतले नाही.

संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही पनवेलीस पोचलो. गाडीतून उतरून जरा अंग मोकळे करतो तोच "मुंबई सेंट्रल - सांगली" असा फलक मिरवणारी बस स्थानकात शिरली. ती म्हणे सकाळी सातला निघाली होती. थोडीशीही उसंत न देता मी आमचे टोळके त्यात घुसवले आणि खोपोलीची तिकिटे काढली.

ती बस जर पुण्यातूनच पुढे जाणार होती, तर आम्ही पुण्याची तिकिटे न काढता खोपोलीचे तिकिटे का काढली या प्रश्नाचे उत्तर मला आजही सापडलेले नाही. डोके भिजल्याने कदाचित मेंदूच्या काही भागात पाणी जाऊन बिघाड झाला असेल.

आठच्या सुमारास आम्ही खोपोलीला पोचलो. संपूर्ण गाव अंधारात बुडाले होते. पाऊस कोसळतच होता. तिथला एक पाडा पुरात वाहून गेला होता (हे आम्हाला नंतर समजले). बसस्थानकावरच्या उपाहारगृहात चहा आणि काही रामायणकालीन भजी एवढेच मिळत होते.

'आपण आतापर्यंत खूपच शहाण्यासारखे वागलो, झाले ते पुरे झाले' असा विचार करून सम्राट पुढे झाला. घट्ट कानडी वळणाच्या हिंदीत त्याने स्थानकावरील उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाला साद घातली, "बैय्या, आपके पास गुलाबजामुन है क्या?". फिरकी गोलंदाज करतो तशी हाताची हालचाल करून त्याने गुलाबजाम गोल पाहिजेत, उगाच चौकोनी वगैरे नकोत हेही स्पष्ट केले.

मी घाईघाईत सर्वांना रस्ता ओलांडायला लावला आणि दुसऱ्या एका उपाहारगृहासम ठिकाणी घुसलो. त्या ठिकाणी जेवणासदृश काही पदार्थ मिळत होते. आम्ही ते मागवले आणि खाऊ लागलो.

तिथले एकंदर वातावरण अगदी तिसऱ्या दर्जाच्या हिंदी भयपटात असते तसे होते. मिणमिणत्या मेणबत्त्या, भिंतीवर हालणाऱ्या सावल्या, अंधारात अस्पष्ट उमटणारे चेहरे, एका कोपऱ्यातून मांजराचे म्यावम्याव...

आणि तो आवाज उमटू लागला. "बैय्या, पानी बैय्या.... बैय्या, पानी बैय्या". टक्क शांतता पसरली. गल्ल्यावर बसलेला माणूस रामरक्षा आठवण्याचा प्रयत्न करताना जाणवू लागला. बोक्याच्या घशातून गुरगूर व्हावी तसा तो आवाज हळूहळू वरच्या पट्टीत जाऊ लागला.

अगदी बरोबर ओळखलेत. सम्राट. त्या जेवणासदृश पदार्थांत त्याला नेमकी मिरची लागली. आणि पाणी मागण्यासाठी कानडीत बोलून चालणार नाही हे कळल्याने त्याने राष्ट्रभाषेवर भिस्त ठेवली.

ताटातले जे काय (दिसत) होते ते संपवून आम्ही बाहेर अंधारात आलो.

आतापर्यंत घडलेल्या सर्व घटनांनंतरही आम्ही (खरेतर मी; बाकी सगळ्यांची अवस्था 'दोन आंधळे, एक दिसेचिना' अशी होती) खोपोलीला पोचल्यावर पुण्यापासून शंभर किलोमीटरच्या आत पोचलो म्हणून हुश्श झालो होतो. आता काय घाट चढलो की लोणावळा. म्हणजे पुण्यालाच पोचलो.

त्यामुळे, पुढचा बेत आखताना थोडा (खरेतर बराचसा) आळस जाणवत होता. त्यामुळे आधी ब्रँडी किंवा तत्सम ज्वलनशील द्रव्य मिळवावे असा विचार केला. कारण सकाळपासून भिजून भिजून अंगाला मोड यायची पाळी आली होती. ब्रँडीने मोड नाहीसे झाले नसते, पण त्यांची जाणीव तरी कमी झाली असती.

स्थानकासमोरच्या रमाकांत बारमध्ये शिरून आम्ही व्रँडीची मागणी केली आणि तिथला व्यवस्थापक उसळलाच. 'हिते पाडे व्हाऊन चाल्लेत, आनि यांना दारू पाहिजे ढोसायला". एक पाडा पुरात वाहून गेला होता हे आम्हाला असे कळले.

अर्थात अनुभवाने हेही माहीत होते, की पूर येतो आणि जातो, पण पैसा कायम टिकतो. थोडक्यात, जरा जास्त पैसे घेऊन आम्हाला दारू द्यायला कोणीतरी नक्की तयार होणार. तसा त्या बारमधला एक वेटर आम्ही बाहेर पडल्याबरोबर आमच्या मागे आला आणि दहा रुपये जास्तीचे घेऊन आम्हाला दोन चपट्या (क्वार्टर) देऊन गेला.

सम्राट (आणि त्यामुळे सँडी) नाक वर करून बाजूला गेले (सम्राट दारू न पिताच कुणालाही झीट आणू शकत असे). आम्ही बस स्थानकाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून एक चपटी उघडली.

एक पोलिस बसस्थानकात रेंगाळत होता. आमच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याने आमच्याकडे मोर्चा वळवला. शिवकुमारला पोलिसांचा वास लगेच येत असे. (कदाचित मद्रासहून पुण्याला शिकायला येण्यामागे बिगर-शैक्षणिक कारणेही असतील) त्याने तत्परतेने निर्णय घेतला आणि आम्हा सगळ्यांना इशारा करून त्याने स्थानकाच्या मागच्या भिंतीकडे मोर्चा वळवला. 'आम्ही शंभर आणि पाच, पण इतरांपुढे एकशेपाच' या न्यायाने सम्राट आणि सँडीही आम्हाला सामील झाले. एका ओळीत खांद्याला खांदा भिडवून सहा पुरुष जगाकडे पाठ वळवून उभे राहिले तर ते कशासाठी हे त्या पोलिसाला माहीत होते. त्यामुळे नाक मुरडून (हा आपला अंदाज; अंधारात काही दिसले नाही) तो चालता झाला.

एक चपटी ढकलून आम्ही बाहेर मोर्चा वळवला. एक मिनी-ट्रकवाला आम्हाला लोणावळ्यापर्यंत न्यायला तयार झाला. (मी अजूनही अशाच विचारात होतो की लोणावळ्याला पोचले की झालेच. मग लोकल घ्यायची आणि पुणे गाठायचे). तो मिनी-ट्रक पुण्याहून सकाळी भाजीपाला घेऊन नवी मुंबईपर्यंत जाऊन आला होता. आता मागचा माल ठेवण्याचा भाग रिकामा होता. किंवा, जवळपास रिकामा होता. कोबीची पाने, एखाददोन फ्लॉवरचे दांडके, आणि भणभणणारा कुजक्या भाजीपाल्याचा वास एवढे सोडता. पण हा वास आम्हा मर्त्य मानवांसाठी असह्य होता. सम्राट चालकाच्या हौद्याला पाठ लावून, पाय सरळ ताणून, उलट्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडे टक लावून बघत बसला होता. एकंदर आविर्भाव असा, की बुद्धाचा पुढचा अवतार कोण याबद्दल कोणालाही शंका राहू नये.

लवकरच आमचे वाहन थांबले आणि पैसे गोळा करण्यासाठी पुसक (cleaner) मागे आला. एवढी घाई का, म्हणून मला शंका आली. पुढे पाहिले तर नजर पोचेल तिथपर्यंत वाहतूक तुंबलेली.

काय करावे याबद्दल आम्ही कुजबूज सुरू केली. अर्ध्या तासानंतरही आमच्या वाहनाची काहीच हालचाल न झाल्याने कुजबुजीचे रूपांतर चर्चेत झाले. तसेच बसून राहावे की चालत लोणावळा गाठावे असा चर्चेचा सूर होता. अजूनही लोणावळा गाठले म्हणजे पुण्याला पोचलो हे गृहीतक होतेच. शेवटी चालत लोणावळा गाठावे असे ठरले.

अर्थातच सम्राटाने कडाडून विरोध केला. एव्हाना त्याने बैठक पक्की केली होती. त्याच्या डोक्याभोवती तेजोवलय तळपू लागल्याचा भास (त्याला) होऊ लागला होता. त्याने आमचे तर्कशुद्ध मत विचारात घ्यायला साफ नकार दिला. आमचे मत तर्कशुद्ध नाही हे आम्ही मान्य करून पाहिले, पण तरीही त्याने ते मान्य करायला नकार दिला. अखेर रमण, शिव, डोग्रा आणि मी मिळून त्याचा बाप्पा मोरया केला. सँडी खिदळत होता.

हे उच्चाटन आम्हाला चांगलेच महागात पडले. पुढच्या प्रवासात जेव्हाजेव्हा अडचणी आल्या (आणि त्या आल्याच) तेव्हातेव्हा सम्राटाने "तरी मी म्हणत होतो की त्या ट्रकमधून उतरायला नको" हे न चुकता ऐकवले.

आमची पदयात्रा सुरू झाली. जे काही थोडेसे आगपाणी (चौघात मिळून एक चपटी!) पोटात गेले होते तेवढ्यावर रमणचे 'काम' झाले. वरून पाऊस वाहत होता (दुसरा शब्द नाही). खाली त्याची राष्ट्रभक्ती उफाळून आली. "सियाचेनमध्ये आपले बहादूर सैनिक आपल्या रक्षणासाठी लढतायत आणि आपण एवढेसे फालतू अंतर चालू शकत नाही? चला...एक, दो, एक, दो...".

सियाचेनचा काय संबंध हे आम्हाला समजले नाही. (कदाचित सियाचेनला चालत जायचे असे त्याचे स्वप्न त्याच्या नेणीवेत दडले असेल आणि ते आत्ता प्रकटले असेल)पण 'चलते रहो' हा संदेश समजला. (सम्राट वगळता) इतर कुणाचा त्याला आक्षेपही नव्हता.

पडता पाऊस, पोटातले अपुरे अन्न आणि पुरेसे आगपाणी, नसलेली झोप, भिजके अंग, या सर्वांनी मिळून हल्ला केला. लोणावळा रेल्वे स्थानकात शिरलो तेव्हा आम्ही जवळजवळ झोपेतच चालत होतो.

पण आत बघितल्यावर माझे डोळे खाडकन उघडले. किमान तीन लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकात उभ्या होत्या. आणि एकंदर दृश्य पाहता त्या बऱ्याच काळापासून उभ्या असाव्यात. कामशेतपाशी रेल्वेचे रूळ वाहून गेले होते (किंवा रुळांखालचा भराव वाहून गेला होता असे काहीतरी) आणि घाटामध्ये दरड कोसळली होती. त्यामुळे त्या गाड्या 'ना यत्रौ ना तत्रौ' अशा मध्येच त्रिशंकू उभ्या होत्या.

फलाटांवर लोक आणि चिखल पसरला होता. प्रतीक्षागृहात तर पाऊल बुडेल एवढा चिखल होता आणि माणसांनी न व्यापलेली कोरडी जागा नावालाही नव्हती. सम्राट आणि सँडीने एका टेबलावर काही चौरस इंच जागा मिळवली. आम्ही बाकीचे बाहेर घोळामेळाने उकिडवे बसलो.

मधून मधून मी प्रतीक्षागृहात चक्कर मारून परिस्थितीचा अंदाज घेत होतो. एका खेपेला सम्राटाने फूटभर जागा व्यापल्याचे दिसले. पुढच्या फेरीत त्याने व्याप्ती अजून वाढवली. मग आरामखुर्चीत बसलेल्या एका वयस्कर माणसाने स्वच्छतागृहात जाण्यासाठी उठण्याची चूक केली. सम्राटाने तत्परतेने ती जागा हडपली आणि तो मूळ वहिवाटदार परत येईस्तोवर घोरायला सुरुवात केली. परत आल्यावर त्या माणसाने सम्राटाला ढोसण्याची खूप खटपट केली. पण व्यर्थ. त्याच्याकडे पराणी किंवा अंकुश असता तरच जमले असते.

बाहेर परिस्थिती गंभीर होत चालली होती. डोग्राला हुडहुडी भरू लागली. उपाशीपोटी आणि बिनझोपेची ब्रँडी पिण्यात अर्थ नव्हता, पण त्यापासून मिळणारी (तथाकथित) ऊब हवीशी वाटत होती. अखेर एक चमचा ब्रँडी प्यायची आणि एक चमचा हातापायाला चोळायची असा उपक्रम सुरू केला. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे हे त्यावेळेला चांगलेच जाणवले.

सुदैवाने लवकरच पहाट झाली. सूर्य जरी प्रत्यक्ष दिसला नाही तरी वाढत्या उजेडाने ऊब वाटू लागली. एका उद्योगी माणसाने चहा विकायला आणला. तीन रुपयाला एक कप (गोष्ट ८९ सालची आहे) या हिशेबाने आमचे रिकामे होत आलेले खिसे आणखीनच हलके झाले. सम्राट बरोबर चहापानाला हजर झाला. अर्थात हेही नमूद करतो की त्याला चहा देण्याला शिवकुमारने कडाडून विरोध केला. ("हा @#% रात्रभर %#@ वर करून घोरत होता").

मग आम्ही परिस्थितीचा साकल्याने विचार केला. एवढ्या खर्चाची कल्पना नसल्याने फारसे पैसे बरोबर घेतले नव्हते. जे होते ते आतापर्यंत पुरले हेच नशीब. आता फारसे काही उरले नव्हते. पुण्याला चालत जाणे शक्य नव्हते. शेवटी पुण्याला फोन करून माझ्या तीर्थरूपांना साकडे घालावे असे ठरवले. ते बँकेत नोकरीला होते. त्यांच्या बँकेची लोणावळ्यात शाखा होती. त्या शाखेच्या व्यवस्थापकाला आम्हाला वित्तपुरवठा करायला सांगावे, आणि आम्ही एखादे स्वस्तसे उतारूगृह पाहून एखाद-दोन दिवस मुक्काम करावा असा एकंदर विचार ठरला.

बस स्थानकासमोरच्या फोनकडे मोर्चा वळवला. बस स्थानक वाटेतच होते म्हणून तिथल्या वाहतूक नियंत्रकाला विचारले, "पुण्याला जायला बस आहे का?". उत्तर अपेक्षित नव्हते. सकारात्मक उत्तर तर अजिबातच अपेक्षित नव्हते. पण तो अवचित वदता झाला, "ही बस सोडतोय आत्ता. पण पुण्याला कधी पोचेल विचारू नका". आम्ही घाईघाईत पैसे मोजले. जेमतेम तिकिटापुरते होते. तातडीने गाडीत घुसलो आणि पाठीला आधार मिळताच बहुतेकांचे डोळे मिटले.

मध्येच डोळे उघडले तेव्हा बस कामशेतजवळ होती आणि सूर्य (ढगांआड) माथ्यावर आला होता. बस देहूरोडला पोचली तेव्हा तो ढळला होता. अखेर शिवाजीनगरला आम्ही चार वाजता पोचलो.

रिक्षा करून गोखले अर्थशास्त्र संस्थेचे वसतिगृह गाठले (सर्व टोळके तिथले होते). चौतीस तास प्रवासात घालवल्यानंतर किमान चौतीस तास झोपावे अशी घनघोर इच्छा प्रत्येकाच्या मनात रुंजी घालू लागली.

सम्राट अर्थातच अपवाद होता. त्याने गरम पाण्याने अंघोळ केली, टकलावर तेल थापले, आणि तो चित्रपट पाहायला चालता झाला.