स्वैपाकघरातील उमेदवारी
स्वैपाकघरात वावरताना पदार्थांचे प्रमाण नि भांड्यांचा आकार हा मुद्दा अनेकदा अडचणीचा ठरतो. अमूक इतक्या भाजीला किती तेल, मीठ तिखट लागेल, तमूक तितकी भाजी करण्यासाठी किती मोठे पातेले लागेल, कढईभर पिठले काढून ठेवण्यासाठी किती मोठे भांडे लागेल याचा नीट अंदाज येणे हा सवयीचा भाग आहे.
आधी पदार्थांचे प्रमाण याबद्दल पाहू.
मीठ नि तिखट हा कळीचा मुद्दा. भाजी करताना या गोष्टी किती प्रमाणात घालायच्या हे ठरवण्यासाठी त्या भाजीचे शिजल्यानंतर होणारे वस्तुमान लक्षात घेणे गरजेचे आहे. पालेभाज्या नि ढोबळी मिरची या फसव्या असतात. पेंडीभर मेथी शिजल्यावर अर्धी-पाऊण वाटी होते. ढोबळी मिरचीमध्ये सुमारे नव्वद टक्के पाणी असते. त्यामुळे यांत मीठ घालताना अति सावध रहावे लागते. सगळी भाजी झाल्यावरच मीठ घालणे हा एक उपाय आहे. पण भाजी शिजताना मीठ घातले तर ते भाजीतले पाणी बाहेर खेचण्यास मदत करते नि भाजी नीट शिजते. त्यामुळे मीठ नि तिखट घालण्याचा नीट अंदाज येण्यासाठी दोनपाच वेळेस धडपडण्याची तयारीठेवावी. पदार्थाचा खारटपणा/तिखटपणा कमी करायचा असेल तर उकडलेला बटाटा, मऊलाल टॉमेटो, लिंबाचा रस कामी येतात.
तसेच तेलाचेही. कच्च्या भाजीचे वस्तुमान पाहून तेल घातले नि भाजी फार तेलकट झाली असे बऱ्याचदा होते. तेलाबाबतीत सुरुवातीलाच हात आखडता घेणे योग्य.
भांडे/कढईत फोडणीला तेल घातले आणि ते नीट तापवले की भांडे/कढई गावी/चिमट्याने पकडून गोल हलवून ते तेल भांडे/कढईच्या बुडापासून मध्यापर्यंत शक्य तितके पसरवून घेणे गरजेचे आहे. तापलेल्या भांड्याच्या तेल न लागलेल्या भागावर फोडणीतील पदार्थ (विशेषतः हळद, हिंग, लाल तिखट आदि) पडले तर जळतात. तसेच कच्ची भाजीही तेल न लागलेल्या पृष्ठभागावर चिकटते नि जळते.
भांड्यांच्या आकाराचा अंदाज येण्यासाठी तीन कप पाणी उकळण्यासाठी किती मोठे भांडे लागेल इथपासून सुरुवात करून कढईभर पाणी काढण्यासाठी किती मोठे पातेले लागेल असे सरावसत्र केले तर नीट अंदाज यायला मदत होते.
तेलाच्या घनफळाचा अंदाज सुरुवातीला हुकू शकतो. त्यासाठी एक पळी पाणी कढईत, पातेल्यात, फ्राय पॅनमध्ये अशा स्वैपाकाच्या वेगळाल्या भांड्यांत ओतून ते ओतल्यावर किती दिसते याचा अंदाज घ्यावा. तेलाचा अंदाज घेताना पदार्थाकडे पाहून घ्यावा, भांड्याकडे नव्हे. फ्राय पॅनमध्ये सपाट बूड असल्याने एक पळी तेलही खूप होते. आणि मोठ्या भांड्यात वा कढईत एक पळी तेल खूप कमी वाटते.
फ्रायपॅनमध्ये तेल घालण्यासाठी पळी न वापरता चमचा (टीस्पून) वापरणे ही पद्धत मला उपयोगी ठरते.
स्वैपाकाची वेगवेगळ्या धातूंची वेगवेगळी भांडी कधी वापरायची आणि त्यांची उस्तवार कशी करायचीहे नीट उमजून घेणे ही पहिली पायरी.
स्टेनलेस स्टीलची पातेली चहा, कॉफी नि दूध या पदार्थांसाठी योग्य. स्टीलची भांडी पट्कन तापतात नि निवतात. त्यात फोडणी करायचा प्रयत्न केल्यास ती बहुतांश वेळी जळते. तसेच मोठ्या ज्योतीवर दूध तापवले तर दूध भांड्याला चिकटून जळते.
लोखंडी भांडी - तवा नि कढई - पदार्थांना एक खमंग चव देतात. तव्यावरचे थालिपीठ/परोठा आणि कढईतले पिठले या पदार्थांमध्ये ते विशेष जाणवते. फक्त लोखंडी भांड्यांची निगा राखणे हे मन लावून करावे लागते. पदार्थ करून झाला की तो कढईत ठेवू नये. दुसऱ्या (बिनलोखंडी) पातेलीत काढून घ्यावा. कढई थंड झाल्यावर तारेच्या घासणीने नीट घासून घ्यावी. तीनचार वेळेस वापरून झाली की लोखंडी भांडी चिंचेने वा लिंबाच्या सालीने घासावीत. मोहक निळसर झाक दिसेपर्यंत. मग पूर्ण कोरडी करून गॅसवर मंद ज्योतीवर पंचवीस ते तीस सेकंद ठेवावीत. अनेकदा आपल्याला कोरड्या वाटणाऱ्या भांड्याला ओलसरपणा चिकटून राहिलेला असतो. तो काढण्यासाठी हा उद्योग. लोखंडी भांडे + ओलसरपणा + हवा = गंज.
ऍल्युमिनमची भांडी आता फारशी वापरात राहिलेली नाहीत. हिंडालिअम वा तत्सम धातूची डेगचीसदृश जाड भांडी वापरात असतात. भाज्या, उसळी, मसालेभात आदि पदार्थांसाठी उत्तम. जाड असल्याने एक समान तापतात. आणि उष्णता धरून ठेवतात. ही भांडी वापरून झाल्यावर तारेच्या घासणीने नीट घासून कोरडी करून ठेवावीत. ही भांडी गंजत नाहीत, पण कधीकधी पाण्याचे (जिथे जड पाणी असेल तिथे वा पावसाळ्यातल्या गढूळ पाण्याचे) डाग पडू शकतात.
नॉनस्टिक भांड्यांमध्ये हल्ली अनेक प्रकार आले आहेत. मला माहीत असलेले दोन - टेफ्लॉन कोटेड आणि ट्राय-प्लाय/ट्रिपल कोटेड. दुसऱ्या प्रकारच्या भांड्यांचा पृष्ठभाग जाळीदार खडबडीत दिसतो.
नॉनस्टिक भांडी वापरणे आरोग्याला घातक अशी एक विचारधारा हल्ली रुजू पाहते आहे. त्याबद्दल थोडे.
टेफ्लॉनही रासायनिक संज्ञा नाही, नाममुद्रा आहे. झेरॉक्स,बिस्लरी यांच्यासारखी. रासायनिक नांव ‘पॉली टेट्रा फ्ल्यूरो इथिलीन’ (PTFE)
टेफ्लॉनचा थर दिलेली भांडी उत्पादन करताना ‘पर फ्ल्यूरो ऑक्टनॉइक ऍसिड’ (PFOA) हे रसायन वापरले जाई. ते रसायन उत्पादनप्रक्रिया पूर्ण होईस्तोवर उत्पादनप्रक्रियेतल्या उष्णतेने नष्ट होते असे उत्पादकांचे म्हणणे होते. ते संपूर्ण सत्य नव्हते. त्यामुळे हे रसायन वापरण्यावर बंदी आली. भारतात ही बंदी २०१२ सालापासून अंमलात आहे.
वापराने आणि/वा घासण्याने टेफ्लॉनचा थर हळूहळू निघू लागतो. काही वेळा त्या थराचे बारीक तुकडे त्या भांड्यात केलेल्या अन्नपदार्थात मिसळतात. परंतू त्याने आरोग्याला काहीही धोका पोहचत नाही.
टेफ्लॉनकोटेड नॉनस्टिक भांडे जर ३०० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्ती तापवले तर त्यातून घातक वाफा बाहेर पडतात. त्यामुळे नुसते भांडे कधीही फार तापवू नये. फोडणीसाठी/परतण्यासाठी जे तेल/तूप घालायचे आहे ते शक्य तितक्या लौकर घालावे.
टीप - भांडे नीट कोरडे नसताना (भांड्याला थोडा ओलावा/आर्द्रता चिकटलेली असताना) जर तेल घातले नि तापवायला सुरुवात केली तर उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होताना ते तडतडते. तेल पाण्यापेक्षा हलके असल्याने पाणी भांड्याला चिकटलेलेच राहते. आणि बाष्प झाल्यावर वरच्या तेलाला ढकलून हवेत जाते. थोडक्यात, नॉन-स्टिक वा इतर कुठलेही भांडे ओलसर असताना त्यात तेल/तूप घालू नये.
एवढे पथ्य - नॉन-स्टिकचे भांडे नुसते फार न तापवण्याचे - पाळले तर इतर कुठलाही घातक परिणाम या भांड्यांत नाही.
यानिमित्ताने वेगळाली तेले किती तापमानाला धुरावतात ते पाहू.
Oil Type | Smoke Point |
Peanut (refined) | 450°F (232°C) |
Safflower | 450°F (232°C) |
Soybean | 450°F (232°C) |
Grapeseed | 421°F (216°C) |
Canola | 435°F (224°C) |
Sunflower | 410°F (210°C) |
Butter (clarified) | 482°F (250°C) |
Cottonseed | 428–446 °F |
rice bran | 450°F (232°C) |
Coconut (unrefined) | 350°F (177°C) |
Sesame (unrefined) | 350°F (177°C) |
Peanut, unrefined | 320°F (160°C) |
Butter | 302°F (150°C) |
Sunflower (unrefined) | 225°F (107°C) |
ही माहिती इथून घेतली आहे.
स्वैपाकाच्या तेलाबद्दल चाललेच आहे तर एक अंकगणिती गंमतही पाहू.
कच्चे शेंगदाणे सुमारे शंभर रुपये किलो दराने मिळतात. शेंगदाण्यांमध्ये ३५ ते ५० टक्केतेल असते. पन्नास टक्के धरू. म्हणजे दोन किलो शेंगदाण्यांपासून एक किलो तेल निघेल.
शेंगदाणा तेलाची घनता साधारण ०.९ असते. एक किलो तेल म्हणजे १.११ लिटर. म्हणजे फक्त कच्च्या मालाची किंमत बघितली तर २०० रुपयांना १.११ लिटर तेल, म्हणजेच एक लिटर तेलासाठी साधारण १८१ रुपयांचे शेंगदाणे लागतील.
प्रक्रिया उद्योगात कच्च्या मालाची किंमत उत्पादित मालाच्या विक्री किंमतीच्या निम्म्याहून जास्ती नसावी असा साधारण दंडक आहे. उरलेल्या निम्म्या किंमतीत उत्पादन, वाहतूक, मार्केटिंग आदि खर्च बसवावे लागतात. इथे ‘निम्मे’ हेही खूप जास्ती आहे. शंभर रुपयांचे शेंगदाणे भाजले नि खारवले की त्यांची विक्री किंमत ४०० रुपये किलो होते.
म्हणजे, १८१ रुपयांचे शेंगदाणे पिळून काढलेले एक लिटर तेल कमीत कमी ३६२ रुपये लिटर असे विकले गेले पाहिजे. बाजारातली शेंगदाणा तेलाची किंमत बघितली तर ‘शुद्धतेची खात्री’ देणारा एक ब्रॅंड २०० रुपये लिटर या दराने शेंगदाणा तेल विकतो.
नॉन-स्टिक भांड्यांचा दुसरा प्रकार म्हणजे ट्राय-प्लाय/ट्रिपल कोटेड.
या भांड्यांचा पृष्ठभाग दिसायला जाळीदार खडबडीत दिसतो. अशा भांड्यात स्टेनलेस स्टील, ऍल्युमिनम, स्टेनलेस स्टील, नॉन-स्टिक कोटिंग असे थर (ज्योतीपासून पदार्थापर्यंत)असतात. जाळीदार खडबडीत पृष्ठभागामुळे पदार्थ खरपूस परतणे सोपे होते.
नॉन-स्टिक भांडी घासताना प्लास्टिकचा स्क्रबर आणि लिक्विड सोप हे वापरले तर कोटिंग टिकून राहते. कोमट पाण्याने धुतले तर अधिक चांगले. सुमारे दहा-पंधरा वेळा वापरून झाल्यावर नॉन-स्टिक भांडे साध्या पाण्याने भरावे आणि झाकण ठेवून गॅसवर ठेवावे. ज्योत मध्यम. पाणी खळाखळा उकळू लागले की खाली उतरवून पाणी टाकून द्यावे.
नॉन-स्टिक भांड्यांबद्दल महत्वाचे म्हणजे सर्वप्रथम वापरताना उत्पादकाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. घाईघाईत मोठ्या ज्योतीवर ते भांडे ठेवून पाककौशल्याचे प्रदर्शन करायला सुरुवात केली तर पदार्थ नि भांडे खराब होण्याची शक्यता खात्रीकडे झुकते.
नॉन-स्टिक भांड्यांचा फायदा म्हणजे नेहमीपेक्षा बरेच कमी तेल घालून पदार्थ करता येतात. वय, वजन नि विकार या त्रिशत्रूंशी लढताना अनेकदा स्वैपाकातील तेलाच्या वापरावर बंधने आणावी लागतात. तेव्हां ही भांडी उपयोगी येतात.
नॉन-स्टिक भांडी घासताना धातूची घासणी वापरली जात नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. काही घासण्या धातू नि सेल्युलोजसदृश पदार्थ यांच्या मिश्रणाच्या असतात.
नॉन-स्टिकची भांडी, एअर फ्रायर, इंडक्शन स्टोव्ह आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलेल्या इतर तत्सम वस्तू वापरणे आरोग्याला घातक असल्याचे कुठेही सिद्ध झालेले नाही. तरीही शंका असेल तर आपली आपण माहिती गोळा करावी. व्हॉट्सऍप विद्यापीठातल्या संशोधकांवर विश्वास ठेवू नये.
कुठलीही भांडी घासण्यासाठी भांडी घासायची पावडर/बार वा लिक्विड सोप यातील काय वापरावे हे आपापल्या सोयीनुसार ठरवावे. फक्त भांडी घासल्यावर स्वच्छ पाण्याने पूर्णपणे विसळून घेतली आहेत ना खात्री करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेकदा ताट/प्लेट यांच्यावर साबणाचे अवशेष दिसतात. भांडी घासण्याच्या साबणाने कुठल्याच पदार्थाची चव सुधारत नाही.
भांडी आणि तत्सम पात्रे वापरल्यावर धुताना अदरेखून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे गंध.
धातू, काच आणि प्लास्टिक.
धातूच्या भांड्यात केलेल्या पदार्थाचा वास बऱ्याचदा भांड्याला चिकटून राहतो. विशेषतः अंडी आणि मासे यांचा वास. वर लिहिलेली उकळत्या पाण्याची ट्रीटमेंट एकदोनदा दिली की हा वास निघून जातो. अंडी आणि मासे यांचा वास घालवण्याची हमखास युक्ती म्हणजे भांडी धुण्याच्या साबणाने धुऊन झाली की मग परत एकदा आंघोळीच्या साबणाने (हमाम, डेटॉल वा तत्सम ‘हार्ड’साबण; पिअर्स सदृश नको) मन लावून धुवावीत.
काचेच्या भांड्यांना वास फारसा चिकटत नाही. साबणाने नीट धुतली आणि पुसून घेतली की झाले. फार झाले तर आंघोळीचा साबण आहेच.
प्लास्टिकच्या बाटल्यांना वास खूप काळ चिकटून राहतो. बाटल्या परत वापरात आणायला त्या लिक्विड सोपने स्वच्छ धुवाव्यात. आणि लिक्विड सोपचे पाणी त्यात भरून दोन-तीन दिवस तशाच ठेवाव्यात. शक्यतो कडक उन्हात. मग स्वच्छ पाण्यात खळबळवून घ्याव्यात आणि रिकाम्या करून दिवसभर कडकडीत उन्हात ठेवाव्यात. वास गेला नसेल तर हे सत्र परत एकदा.
प्लास्टिकच्या डब्यांसाठीही हेच करावे. मुळात प्लास्टिकच्या डब्यांत पदार्थ ठेवताना तो मध्यमगंध/तीव्रगंध नाही ना हे पहावे. मंदगंध पदार्थ ठेवायला हरकत नाही.
प्लास्टिक या गुणी पदार्थाला बरेच बदनाम करण्यात आले आहे. प्लास्टिकचे सहजी विघटन होत नाही हा त्याचा गुण आहे. आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करता येत नाही हा मानवजातीचा अवगुण. प्लास्टिकबंदी म्हणजे गणितात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्याने गणित शिकण्याऐवजी गणित विषयच अभ्यासक्रमातून काढून टाकावा तसे आहे.
आणि गणित अभ्यासक्रमातून काढून टाकले तरी आयुष्यातून काढून टाकता येत नाही तसे प्लास्टिकही पूर्णतया आयुष्यातून काढून टाकता येत नाही.
वाहने, सेलफोन, क्रेडिट कार्ड्स, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, चष्मे, बूट-चपला.... कशात प्लास्टिक नाही हेच शोधावे लागेल. मग पिशव्यांसारख्या फुटकळ वस्तूंवर बंदी आणून स्वतःची समजूत घालून घेण्याची शहामृगी मानसिकता बोकाळते.
प्लास्टिक किती उपयोगी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण झोडपण्यासाठी एक खलनायक मिळाला की प्रश्न सुटतो असे मानणाऱ्यांसाठी ही ते उपयोगी ठरते!
आपल्यापुरते बघायचे झाले तर प्लास्टिकच्या वस्तू शक्य तितक्या पुनःपुन्हा वापरणे एवढे आपल्याला करता येईल.