स्वैपाकघरातील उमेदवारी ६ - आवरासावर

स्वैपाकघरात प्रत्यक्ष स्वैपाक करणे ही सर्जनशीलतेला आव्हान देणारी आणि सुखावणारी प्रक्रिया आहे. नंतरची आवरासावर ही त्याहून जास्ती कंटाळवाणी प्रक्रिया आहे. पण केल्यावाचून गत्यंतर नाही.

मी स्वैपाकात प्रत्यक्ष ढवळाढवळ करायला सुरुवात केली तेव्हा मातोश्रींनी एक शिस्त घालून दिली जी आजही कामी येते आहे. स्वैपाकघरात काय करायचे ते कर. सगळे करून झाले की स्वच्छ धुऊन पुसून, आधी होते तसे स्वैपाकघर परत कर.

तेव्हां कुरकूर केली, पण नंतर लक्षात आले की अनेक पुरुष स्वैपाकघरात गूर्मे शेफ (gourmet chef) असल्याच्या थाटात वावरतात, तेल-मसाल्यांची मुक्त उधळण करून शाही काजू पनीर’ अथवा चिकन चेट्टीनाड’ अश्या नावांचे पदार्थ करतात, आणि नंतर स्वयंपाकघराची उध्वस्त धर्मशाळा परत शाकारताना घरातल्या स्त्रीच्या कमरेचा काटा ढिला होतो.

चहासुद्धा करता येत नाही, केलाच तर त्यात हळद घालतात की हिंग हेही माहीत नाही’ असे पुरुष आणि स्वैपाकघराचा विस्कोट करून ठेवणारे पुरुष यातले कोण परवडले हा भारतीय स्त्रीला पडलेला विष की फाशी’ श्रेणीतला प्रश्न; खऱ्या अर्थाने dilemma.

मातोश्रींच्या शिस्तीमुळे असेल, मी स्वैपाकघराशी कायमच आदराने वागत आलो आहे.

आवरासावर सोपी करायची असेल तर ती पहिल्यापासूनच करायला घ्यावी.

कांदा बटाटा रस्सा करायचा असेल तर कांदे-बटाटे चिरले की ते ताटलीत काढून कटिंग बोर्ड नि सुरी धुऊन ठेवायची. नंतर तासाभराने जेवणासोबत देण्यासाठी काकडी वा मुळा कापायचा असेल तर तेव्हां परत बोर्ड कट्ट्यावर घ्यायचा. तोवर नेहमीच्या जागी. कट्टा मोकळा राहतो.

मिक्सर वापरला की त्यातला पदार्थ काढून भांडे लगेच धुऊन पुसून मिक्सर होता तसा ठेवावा.

असे शक्य तितक्या जलदीने वापरलेली वस्तू धुऊन पुसून ठेवायची सवय लावून घेतली तर साफसफाई ही बॅच प्रॉसेस न होता कंटिन्यूअस प्रॉसेस होते.

कट्टा मोकळा करून धुऊन कोरड्या फडक्याने पुसून ठेवणे ही शेवटली पायरी. कट्ट्यावर बऱ्याचदा सांडलवंड झालेली असते. विशेषतः गॅस शेगडीच्या खाली. कट्टा शक्य तितका मोकळा करून गॅस शेगडी वर उचलून खाली सांडलेले ओल्या फडक्याने नीट पुसून घ्यावे.

प्राथमिक मालकी तुमची असेल तर दोन कामे अजून वाढतात. पंधरवड्यातून एकदा गॅसची शेगडी साफ करणे आणि दोन तीन महिन्यांतून एकदा गॅस शेगडीमागली भिंत साफ करणे.

गॅस शेगडी साफ करण्यासाठी बर्नरच्या चौबाजूला असलेली धातूची चौकट, बर्नरखाली असलेली गोल खोलगट रिंग हे काढून वेगळे धुवावे. बऱ्याचदा त्यावर बसलेली पुटे लिक्विड सोपने निघत नाहीत. त्यामुळे सरळ तारेची घासणी आणि रिन वा तत्सम धुण्याचा डिटर्जंट सोप वापरावा. बर्नरची वरची रिंग निघते. ती काढून त्यातल्या भोकांत काही अडकलेले नाही ना हे पहावे. असल्यास ती रिंग ओली करावी आणि लिक्विड सोप जुन्या टूथब्रशने त्या रिंगवर घासून साफ करावी. मग व्हॅक्यूम क्लीनरच्या ब्लोअरमधून हवेचा झोत सोडून साफ करावे. व्हॅक्यूम क्लीनर नसल्यास वा वापरायचा नसल्यास कपड्याने कोरडी करावी आणि पिन/टाचणी वापरून सगळी भोके मोकळी झाली आहेत ना हे पहावे. रिंग पूर्ण कोरडी झाल्याखेरीज परत बर्नरवर ठेवू नये. ही साफसफाई दिवसा दुपारी केली तर रिंग सरळ उन्हात ठेवावी. पावसाळ्यात कोरडे फडके वापरून खसखसून पुसावे.

गॅस शेगडीच्या मागल्या भिंतीवर (भिंतींवर टाईल्स आहेत हे गृहित धरलेले आहे) स्वैपाकातील फोडणीचे तेल अल्पप्रमाणात उडून साचत जाते. ते किटाळ काढण्यासाठीही डिटर्जंट साबण लागेल. कट्टा शक्य तितका मोकळा करून घ्यावा. शेगडी मोकळी करून काढून ठेवता आली तर उत्तम. मग मागल्या टाईल्स नि अख्खा कट्टा साबणपाण्याने घासून घ्यावा. कदाचित साबणपाण्याची दोन आवर्तने करावी लागतील. मग कोरड्या फडक्याने पुसून फॅन चालू करावा.

कडाप्प्याचा कट्टा छानसुंदर दिसायला हवा असेल तर एका कोरड्या फडक्यावर एकदीड टीस्पून तेल घ्यावे (तेल कुठलेही चालेल) आणि ते फडके स्वच्छ धुऊन कोरड्या केलेल्या कट्ट्यावर दाब देऊन घासावे. पॉलिश केल्यासारखे. कट्टा उत्तम काळाभोर चमकू लागेल.

फ्रिज महिन्यातून एकदा बाहेरून साफ करावा. त्यासाठी डिटर्जंट वा तत्सम तीव्र साबण वापरू नये. कॉलिन्स वा तत्सम स्प्रे आणि त्यासाठीचे असणारे फडके वापरावे. फ्रिजचे दार लावल्यावर आतील भाग पक्का हवाबंद व्हावा यासाठी दाराच्या चारही कडांना रबरी घड्याघड्यांची चौकट असते. त्या चौकटीतल्या फटींत धूळ/घाण अडकते. त्या फटी ओल्या फडक्याने साफ कराव्यात. आतमध्ये सांडलवंड झालेली असेल तर तीही ओल्या फडक्याने साफ करावी. डीप फ्रीजरमधले आईस क्यूबचे ट्रे मोकळे करून स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करावेत. शक्य झाले तर उन्हात तासभर ठेवावेत.

मिक्सरची भांडी वापरल्यावर लगेच धुऊन ठेवावीत हे तर झालेच. पण त्यात कुठला पदार्थ घातला होता त्याप्रमाणे धुणेही गरजेचे आहे. कांद्याची पेस्ट केल्यावर भांडे घाईने साध्या पाण्याने विसळून त्यात लगेच मिल्कशेक केला नि पश्चात्ताप झाला हा स्वानुभव.

टोस्टर आठवड्याभराने एकदा उलटा करून जोरजोरात हलवावा. थोडा आपटा-थोपटावा. ब्रेडचे कण खाली पडतील. टोस्टर वापरात नसताना अंगभर फडक्याने झाकून ठेवावा. झुरळांची कॉलनी होण्याआधीच सावध असलेले बरे.

किसणी वापरून झाल्यावर साबण लावून जुन्या टूथब्रशने घासून साफ करावी. विशेषतः चीज किसून घेतले असेल तर अगदी आठवणीने हे करावे.

खलबत्त्यात घातलेल्या पदार्थाप्रमाणे तो धुवावा. लसूण ठेचण्यासाठी वापरलेला बत्ता वेलदोडे कुटायला लगेच वापरला तर घोळ होईल.

स्वैपाकाच्या सुरेल मैफलीची सांगता करायला भैरवीही सुरेलच हवी.


स्वैपाकघरात वावरताना कुतूहलशक्ती आणि प्रयोगशीलता जागृत ठेवली तर एरवी सरळसोट वाटणारी पाककृतीही कलानिर्मितीचा आनंद देऊन जाते. प्रत्येक वेळेस.

हा आनंद भोगू इच्छिणाऱ्या सर्वांस हे लेखन अर्पण.