महाभारत कथा (२)

महाभारत कथा (२) महाभारताचा काळ अर्थातच अतिप्राचीन आहे. त्यात वर्णन केलेल्या रीती, पद्धती ह्या त्या काळातल्या जीवनपद्धतीला सुसंगत असणार. महाभारत कथेमध्ये वेळोवेळी आढळणाऱ्या वर्णनांवरून त्या विषयी काही कल्पना करणे शक्य आहे. कर्म आणि कर्तव्य आधारित समाजरचना दिसून येते. ब्राम्हण. क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी विभागणी दिसून येते.  राजे, महाराजे, सरदार, जमीनदार इत्यादी धनवानांचे राहणीमान आणि सामान्यांचे राहणीमान यात फरक असणारच. समाज व्यवस्था उत्तम जीवनपद्धतीसाठी सुयोग्य अशीच होती. परंतु कालपरत्वे पूर्वापार चालत आलेल्या न्याय, नीती आणि चारित्र्याचे निकष बदललेले आहेत. सांस्कृतिक वारसा म्हणून आपण ज्या कथा आवडीने वाचतो, श्रवण करतो त्यातील काही संकल्पना वर्तमान काळात त्याज्य समजल्या जातात. महाभारतातल्या कथांमध्ये असलेल्या सर्व चालीरीती वर्तमान काळात आचरणात आणणे असंभवच. परंतु तरीही महाभारत कथेमध्ये भारतीय समाजाचे सुयोग्य चित्रण दिसते. महाभारत कथेमध्ये देवी, देवतांचे उल्लेख येतात आणि तरीही ही कथा पूर्णपणे मानवी गुण, अवगुण प्रतिबिंबित करते. कथेमध्ये सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीची माणसे आहेत आणि काही प्रसंगी त्यांची निराळी स्वभाव वैशिष्ट्ये दिसून येतात. माणूस, फक्त चांगला किंवा फक्त वाईट कधीच नसतो. काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये अनेक रंगछटा मिसळलेल्या दिसतात हे त्रिकालाबाधित सत्य पुन्हा एकवार प्रत्ययास येते.  

कुंती, द्रौपदी, कृष्ण, अर्जुन, कर्ण, दुर्योधन अशी काही महाभरतामधील प्रमुख पात्रे आहेत. त्यांच्याभोवती अनेक घटना घडताना दिसतात. कथेच्या  वेगवेगळ्या वळणावर त्यांचे वर्तन, त्यांचे निर्णय निर्णायक ठरतात. यातील प्रत्येकाच्या जन्मकथा, त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा इतिहास हे सर्व विस्मयकारी आहे, पण ते सत्य आहे.  महाभारतामध्ये काही कथानके, प्रसंग इत्यादी उपरे वाटतात हे खरे आहे. इतिहास सांगणाऱ्यांनी त्यात स्वतःच्या काही कथा, उपकथा (कदाचित लोकरंजनाकरता) जोडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रसंगांची संगती लागत नाही. म्हणजे एखादा प्रसंग घडला असा उल्लेख येतो पण त्याची कारणमीमांसा देता येत नाही. असे प्रसंग चमत्काराच्या स्वरूपात वर्णन केलेले असण्याचीही शक्यता आहे. पण अशी सर्व कथानके, उपकथानके काळजीपूर्वक दूर केल्यानंतर दैदीप्यमान असा इतिहासच समोरा येतो. 

महाभारत कथेमधील प्रमुख पात्रे मुख्यत्वे कुरु कुळातील आहेत किंवा कुरुकुळाशी संबंधित आहेत. कुरूकुळाचे वारस असणारे शंभर कौरव आणि पाच पांडव यांच्यामध्ये जो कलह निर्माण झाला होता तो राज्यविभागणी, वारसाहक्क आणि वर्चस्वासाठी होता. अपमान, द्वेष, असूया, लालसा इत्यादींची उपकथानके त्यात जोडली गेली होती.           

महाभारताची कथा घडते ती हस्तिनापूरमध्ये. हस्तिनापूर हे कुरु साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. कुरूकुळातील श्रेष्ठ सम्राट भरत राज्यकर्ते असताना त्यांनी ते शहर राजधानीसाठी निवडले अशी मान्यता आहे. भारतातील उत्तरप्रदेश राज्यातील मीरत शहराजवळ हस्तिनापूर वसलेले आहे. गंगानदीच्या तीराजवळ या शहराचे स्थान आहे. आजही तिथे कर्णघाट, द्रौपदीघाट आहेत, कर्णमंदिर आहे जे शिवमंदिर आहे आणि त्यातील पिंडीची स्थापना सूर्यपुत्र कर्णाने स्वतः केली होती अशी समजूत आहे.       

हस्तिनापूर एक वैभवशाली आणि सामर्थ्यवान साम्राज्य होते. तेथील राज्यकर्ते कुरुकुळाचे वंशज म्हणवले जातात. तर प्रथम या कुरूकुळाचा इतिहास जाणून घेणे जरुरीचे आहे.

कुरुकुळाचा उगम --

महाभारत कथेमध्ये कुरु (कौरव), यदु (यादव) इत्यादी कुळातील अनेक पिढ्या आणि त्यातील प्रमुख पात्रांचा उल्लेख नेहमी येतो. कुणाला काल्पनिक कथा, काव्य, नाटक लिहायचे असेल तर तो इतकी सखोल माहिती का लिहील? नाही का?

देवांचा राजा इंद्र असे उल्लेख सर्व पौराणिक कथांमध्ये येतात. परंतु इंद्र हा एकमेव व्यक्ती नाही/नसावी. कदाचित ते पदनाम असेल किंवा कुळाचे संबोधन असेल. तर अशा एका इंद्राची कन्या जयंती जी दैत्यगुरू शुक्राचार्य यांची पत्नी आहे आणि देवयानी त्यांची कन्या .. रूप आणि गुणांची पुतळीच जणू. फक्त एकच दोष, तो म्हणजे पराकोटीचा हट्टी आणि गर्विष्ठ स्वभाव.  

शुक्राचार्य दैत्यगुरू होते आणि दैत्यराज ऋषपर्वा त्यांना नेहमीच यथोचित मानसन्मान देत असे. शुक्राचार्यांना दैत्य दरबारी अतिशय महत्त्व होते आणि त्याला कारणही तसेच होते. संजीवनी  म्हणजे मृत शरीरामध्ये चेतना निर्माण करणारी विद्या. आणि अशी अनमोल विद्या अवगत असलेले शुक्राचार्य हे पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्ती होते. देवलोक किंवा मनुष्यलोकातील कुणालाही ते दिव्यज्ञान प्राप्त नव्हते. आणि म्हणूनच शुक्राचार्यांना अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त झाले होते. दुर्दैवाने त्यांनी दैत्यराज ऋषपर्वाला साथ दिली होती. त्यामुळे देवसेनेसाठी दैत्य अपराजित होते. शुक्राचार्यांना गुरुस्थानी मानणारा दैत्यराज ऋषपर्वा याचे पिता होते महान ऋषी कश्यप ...     

देव आणि दानवांमध्ये होणाऱ्या युद्धांमध्ये दानवसेना नेहमीच अपराजित राहत असे आणि त्याचे कारण होते त्यांना असलेले संजीवनी विद्येचे पाठबळ. बृहस्पती (देवांचे गुरु) पुत्र कच याने संजीवनी विद्या मिळविण्याचा निश्चय केला होता. त्याने शुक्राचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले. शुक्राचार्यांचा देखील विनम्र, आज्ञाधारक आणि बुद्धिमान कचावर विशेष लोभ होता, पण तरीही त्यांनी त्याला संजीवनी विद्या दिली नाहीच.

विद्या प्राप्त करण्यासाठी कचाने आता भलताच मार्ग स्वीकारला, त्याने गुरू शुक्राचार्य यांची एकुलती एक कन्या देवयानी बरोबर प्रेमाचे नाटक सुरू केले. देवयानीचा प्रत्येक हट्ट तिचे पिता शुक्राचार्य पुरवीत असत पण कचाला संजीवनी देण्याचा तिचा हट्ट मात्र त्यांनी नाकारला. मग कचाने स्वतःवर मृत्यू ओढवून घेतला आणि त्याच्या मृतदेहाची रक्षा शुक्राचार्यांना त्यांच्या मद्याच्या पेल्यातून देण्यास देवयानीला सांगितले. कचाच्या मृत्यूने देवयानीच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. देवयानीने शुक्राचार्यांना विनंती केली, कचाला पुनर्जीवित करावे अस हट्ट धरला. कन्येचे दुःख दूर व्हावे म्हणून शुक्राचार्यांनी संजीवनीचा प्रयोग करण्याचे मान्य केले आणि कच जिवंत झाला होता. देवयानीला हर्ष झाला होता आणि आता तिने विवाहाचा प्रस्ताव मांडला परंतु कचाने नकारच दिला. तो आता तो देवयानीचा सहोदर, बंधू आहे असे सांगून त्याने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. संजीवनी विद्या प्राप्त करून कच स्वर्गलोकात परतला तरी देवयानीची कथा इथेच संपत नाही.        

दैत्यराज ऋषपर्वाची पुत्री शर्मिष्ठा, देवयानीची जिवलग सखी. एक दिवस दोघीजणी आणि अन्य दासी जलक्रीडा करत असताना खूप वेगाने वारा वाहू लागला आणि काठावर ठेवलेली वस्त्रे इतस्तत: झाली. दासींनी ती गोळा करून आणली पण चुकून शर्मिष्ठेचे उत्तरीय देवयानीने घेतले. ते पाहून शर्मिष्ठा चेष्टेने तिला म्हणाली, "तू तर रानावनात राहणाऱ्या भिक्षुकाची मुलगी आणि तरीही एका राजकन्येचे वस्त्र परिधान करतेस?" बरोबर असलेल्या सर्वजणी हसल्या, देवयानीला भयंकर संताप आला. दोघींचे भांडण सुरू झाले आणि शर्मिष्ठेने तिला एका विहिरीत ढकलले. पण ते प्रारब्धच असावे कारण त्याचवेळी हस्तिनापूर नरेश ययाती तिथे आलेला होता.    

देवयानीने घडलेला प्रसंग शुक्राचार्यांना कथन केला. देवयानीच्या रूपसौदर्यावर लुब्ध झालेल्या ययातीने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. ययाती आणि देवयानीच्या विवाहाला शुक्राचार्यांनी संमती दिली. विवाह संपन्न झाला पण शर्मिष्ठेने तिची केलेली चेष्टा देवयानी विसरलेली नव्हती, तिच्या मनात राग तसाच धुमसत होता. शर्मिष्ठेने दासी म्हणून तिच्यासोबत यावे असे तिने सांगितले. महाराज ऋषपर्वाचा नाइलाज होता, शुक्राचार्यांची नाराजी दैत्यकुळाच्या नाशाला कारणीभूत झाली असती. ययाती-देवयानी सोबत राजकन्या शर्मिष्ठा हस्तिनापुरामध्ये दाखल झाली होती ... देवयानीची दासी म्हणून. 

हे सुद्धा विधिलिखितच असावे.

देवयानीचा स्वभाव अतिशय तापट, हट्टी आणि गर्विष्ठ होता. शुक्राचार्याची ती एकुलती एक लाडकी कन्या होती, तिचा प्रत्येक हट्ट ते पुरवीत असत. नकार ऐकण्याची तिच्यावर कधीही वेळ आलेली नव्हती. महाराज ययाती बरोबर तिची पाठवणी करताना शुक्राचार्यांनी सांगितले होते की देवयानीला दुखावलेले त्यांना सहन होणार नाही. आणि शुक्राचार्याचा क्रोध ओढवून घेण्याचे धारिष्ट्य कुणाकडेच नव्हते. राजकुमारी असूनही शर्मिष्ठा लाडावलेली नव्हती, समजूतदार होती. शांत, सुस्वभावी शर्मिष्ठेच्या सहवासात ययातीला सुख लाभत होते .. पण सारे जगाच्या नजरेआडच . देवयानीचा कधीही त्याग करणार नाही असे वचन राजाने शुक्राचार्यांना दिले होते, त्यांना नाराज करणे शक्यच नव्हते.

काही काळानंतर देवयानीला ययाती आणि शर्मिष्ठेच्या विवाहाचे गुपित समजले.ययाती आणि शर्मिष्ठेच्या तीन पुत्रांबद्दलसुद्धा कळले. पतीने केलेल्या वंचनेचे दुःख देवयानीला सहन झाले नाही. दु:ख आणि क्रोधाने तिने ययातीला सांगितले की ती तिच्या पित्याच्या घरी जाणार आहे. ययातीने केलेल्या अपराधाची योग्य ती शिक्षा त्याला नक्कीच मिळेल. 

देवयानी शुक्राचार्यांकडे गेल्याचे कळल्यावर ययाती तिच्या पाठोपाठ त्यांच्या आश्रमात दाखल झाला. त्याने देवयानीची क्षमायाचना केली, तिने परत हस्तिनापुरामध्ये यावे अशी विनवणी केली पण देवयानीचा राग शांत होत नव्हता. शुक्राचार्यांना देवयानीचे दुःख पाहवत नव्हते आणि तिच्या दुःखाचे कारण ययाती त्यांच्या समोर होता. शुक्राचार्यांनी त्याला शाप दिला, "यौवनाच्या धुंदीमध्ये तू माझ्या कन्येची फसवणूक केलीस म्हणून ते यौवन तुझ्यापासून हिरावले जाईल."   

क्षणार्धात तरुण ययातीने रूपांतर जख्खं वृद्ध व्यक्तीमध्ये झाले. ययातीची ती दुर्धर अवस्था पाहून देवयानीला वाईट वाटले, तिचा क्रोथही निवळला होता. तिने शाप मागे घेण्याची शुक्राचार्यांना विनंती केली. दिलेला शाप परत घेता येणार नव्हता म्हणून त्यांनी उःशाप दिला, अन्य कुणी तुझे वृद्धत्व घेतले तर तुझे तारुण्य तुला परत मिळेल.

देवयानीचे दोन पुत्र होते आणि शर्मिष्ठेचे तीन पुत्र होते. ययातीचे वृद्धत्व स्वीकारून त्याला तारुण्य प्रदान करणे त्या पाचही युवकांना कसे मान्य होणार? परंतु शर्मिष्ठेचा पुत्र पुरूने मात्र पित्याच्या वृद्धत्वाचा स्वीकार केला, ययातीला त्याचे तारुण्य परत मिळाले. काही काळ सुखासमाधानाने राज्य केल्यानंतर त्याने त्याच्या पुत्राला त्याचे तारुण्य परत दिले. ययातीने त्याच्या कर्तव्यनिष्ठ पुत्राला हस्तिनापूरच्या साम्राज्यही बहाल केले. याच पुरुराजाच्या कुळात कुरु नावाचा महान राजा झाला आणि त्याचे कूळ हे कुरुकुळ म्हणवले जाऊ लागले. देवयानीचा ज्येष्ठ पुत्र यदु आणि त्याचे वंशज यादव म्हणून ओळखले जाऊ लागले. यादव वंशात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि ते द्वारकाधीश होते. देवयानी आणि शर्मिष्ठेच्या अन्य राजपुत्रांचा वंश देखील संपूर्ण भारतवर्षामध्ये विस्तारला होता.     

***