महाभारत कथा (६)

महाभारत कथा (६)कुरुकुळामध्ये सुरुवातीच्या काळापासून अनेक थोर आणि पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. त्यांनी कुरूवंशाची कीर्ती दिगंतास नेली, संपूर्ण भारतवर्षामध्ये एक श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान राष्ट्र असा हस्तिनापूर साम्राज्याचा लौकिक   होता. महाराज शंतनू यांनी देखील राजधर्म उत्तमप्रकारे निभावला होता. देवी गंगा स्वर्गलोकी गेल्यानंतर त्यांनी विवाह केला नव्हता. त्या काळात त्यांची राजकीय कारकीर्द यशस्वी झालेली होती. योजनगंधा सत्यवतीला पाहिल्यानंतर त्यांना तिच्याशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली होती परंतु सत्यवतीच्या पित्याची अट त्यांना मान्य नव्हती. सत्यवतीचा पुत्र हस्तिनापूर राज्याचा सम्राट होऊ शकत नव्हता कारण सिंहासनावर प्रथम अधिकार जेष्ठपुत्राचा असतो. युवराज देवव्रताचा हक्क नाकारणे महाराजांना मान्य होणे अशक्य होते. 

सत्यवतीच्या पित्याची अट नाकारून महाराज शंतनू हस्तिनापुरामध्ये परत आले होते. महाराज शंतनू दु:खी होते, परंतु तरीही ते त्यांचे राजकर्तव्य निष्ठेने करीत होते. युवराज देवव्रताने महाराजांना त्यांच्या दु:खाचे कारण विचारले. महाराजांनी सत्यवती आणि तिचे पिता कोळीराजा यांच्याबद्दल सर्वकाही कथन केले. सर्व हकीकत समजल्यावर युवराज देवव्रताने निश्चय केला की महाराजांचे दु:ख निवारण करायचेच, त्याकरता कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी होती. 

त्यानंतर युवराज देवव्रत सत्यवतीच्या पित्याकडे विनंती करण्यासाठी गेले. त्यांनी ग्वाही दिली की सत्यवतीच्या पुत्रांवर कधीही अन्याय होणार नाही परंतु कोळीराजा त्याची अट मागे घेण्यास तयार नव्हता. अखेरीस युवराज देवव्रताने सांगितले की ते त्यांचा सिंहासनावर असलेल्या हक्काचा त्याग करतील, सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापुराचा सम्राट होईल. 

युवराजांनी वचन दिले होते पण कोळीराजाच्या मनात अजूनही शंका होतीच. युवराज त्यांचा हक्क सोडतील, पण त्यांचे पुत्र? त्यांचे वारस? त्यांनी सिंहासनावर अधिकार सांगितला तर? मग युवराजांनी प्रतिज्ञा केली की ते विवाह करणार नाहीत, आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतील.     

शंतनू आणि सत्यवतीचा विवाह संपन्न झाला आणि दोन सुपुत्रांचा जन्म झाला, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. महाराज शंतनूच्या पश्चात कुमार चित्रांगद सम्राट झाला होता. राजपुत्र देवव्रत, आता भीष्म या नावाने प्रसिद्ध होते ते सम्राट चित्रांगदाचे सल्लागार आणि सहाय्यक म्हणून कार्यरत होते. राजदरबारामधे त्यांच्या शब्दांना मान होता. राजमाता सत्यवती देखिल महाराज भीष्मांना आदर आणि सन्मान देत असे. सत्यवतीने तिच्या पुत्रांचा विवाह व्हावा अशी इच्छा भीष्मांसमोर व्यक्त केली. 

काशीराजाने त्याच्या तीन कन्यांचे स्वयंवर आयोजित केले होते. हस्तिनापूर दरबारामध्ये स्वयंवराचे निमंत्रण पोहोचले होते. 

स्वयंवर ही प्राचीन काळातली वैशिष्ट्यपूर्ण प्रथा होती. विवाहायोग्य राजे आणि राजपुत्रांना आमंत्रित केले जात असे. आमंत्रीत राजे आणि राजपुत्रांचा राजकुमारीला परिचय दिला जात असे. राजकुमारी ज्याच्या गळ्यात वरमाला घालेल त्याच्याशी तिचा विवाह केला जात असे, ही एक पद्धत. स्वयंवराची दुसरी पद्धत आव्हानात्मक अशी होती. त्या मध्ये एखादा "पण" लावला जात असे. "पण" म्हणजे एखादे आव्हानात्मक कार्य पूर्ण करायचे असे. ते आव्हान यशस्वी रीतीने पूर्ण करणाऱ्याच्या गळ्यामध्ये राजपुत्री वरमाला घालत असे.  रामायणामध्ये सीतेच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलून त्यावर बाण लावायचा "पण" होता, जो श्रीरामांनी पूर्ण केला होता.  द्रौपदी स्वयंवरामध्ये चक्राकार फिरणाऱ्या माशाची पाण्यामधली प्रतिमा पाहून त्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा असा "पण" होता,   जो अर्जुनाने जिंकला होता. 

काहीवेळा स्वयंवर स्थळावरून राजा किंवा राजपुत्र राजकन्येचे हरण (अपहरण) करीत असे. तिथे उपस्थित असलेले राजे त्यांना आव्हान देत असत. इतर सर्व राजे आणि अपहरणकर्ता यांच्यात युद्ध होई. त्यात जर अपहरणकर्ता जिंकला तर राजकन्या त्याची पत्नी होत असे. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण केले होते आणि अर्जुनाने सुभद्रेचे. 

तर स्वयंवराच्या अशा प्रथा. काशीराजाने स्वयंवरासाठी "पण" लावलेला नव्हता. त्याच्या तीन सुंदर कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका तिथे जमलेल्या राजपुत्रांमधून त्यांच्या पतीची निवड करणार होत्या.

स्वयंवरासाठी हस्तिनापूर सम्राटांना आमंत्रण होतेच परंतु स्वयंवरस्थळी भीष्म उपस्थित होते. सर्वांना आश्चर्य वाटले, आजन्म अविवाहित राहून ब्रम्हचर्यव्रताचे पालन करण्याची त्यांची प्रतिज्ञा सर्वांनाच माहिती होती. पण कुणी त्याबद्दल काही बोलले नाहीत कारण सामर्थ्यशाली आणि चारित्र्यसंपन्न भीष्मांबद्दल सर्वांनाच आदर वाटत असे.   

तिघी राजकन्या वरमाला घेऊन स्वयंवर मंडपात येतच होत्या तितक्यात एक रथ तिथे वायुवेगाने आला, काही क्षण थांबला आणि तितक्याच वेगाने पुढे गेला. तीनही राजकुमारींचे अपहरण झाले होते. रथ अर्थातच महाप्रतापी भीष्माचा होता. घनघोर संग्राम झाला पण भीष्म अजिंक्य होते.

काशीच्या राजकुमारींना घेऊन भीष्म हस्तिनापुरी आले.  राजकुमारींचा विवाह त्यांचे सावत्र बंधू चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या समवेत होणार होता भीष्माने राजकुमारींचे अपहरण त्यांच्या सावत्र बंधूंसाठी केले होते.

राजपुत्रींचे अपहरण करणे त्या काळी गैर समजले जात नसे. जो शूरवीर बलशाली असेल त्याने असे करणे भूषणास्पद समजले जाई.  जो सामर्थ्यवान आहे त्याच्या कृतीला आक्षेप कोण घेणार?

इथपर्यंत तर कथा सामान्य आहे, म्हणजे त्या काळी अस्तित्वात असलेल्या प्रथा आणि चालीरीतींशी सुसंगत आहे. पण आता त्यात एक पेच आला आहे. पुढे घडणाऱ्या महाभारताची पार्श्वभूमी तयार होत होती.

काशीराजाच्या सुंदर आणि सद्गुणी कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे महापराक्रमी भीष्माने अपहरण केले होते पण ते स्वतः करता नाही तर सावत्रबंधू चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्यासाठी. तिघींचा विवाह हस्तिनापूर सम्राट आणि त्यांचे बंधू यांच्याबरोबर बरोबर करण्याचे योजले होते, परंतु राजकुमारी अंबाला ते मान्य नव्हते. राजकुमारी अंबाने स्वयंवरापूर्वीच चेदीराज शाल्व याला पती म्हणून पसंत केले होते आणि शाल्वराजाची देखील तीच इच्छा होती. चेदीराज शाल्व स्वयंवर मंडपामध्ये उपस्थित होते.  राजकुमारी स्वयंवर मंडपामध्ये शाल्व राजाला रीतसर वरणार होती, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 

भीष्म तीन राजकन्यांना घेऊन हस्तिनापुरामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या विवाहाची लगबग सुरू झाली होती. राजकुमारी अंबाने भीष्मांना विनंती केली की तिला त्यांनी चेदीराजाकडे सुपूर्त करावे कारण तिने मनोमन शाल्व राजाला पती मानले आहे. आणि असे असताना अन्य कोणाशी विवाह करणे म्हणजे प्रतारणा होईल. भीष्माने तिची विनंती मान्य केली आणि मोठ्या सन्मानाने तिची पाठवणी केली. परंतु विधिलिखित काही वेगळेच होते.

शाल्वराजाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करण्याकरता त्याने कारणेही दिली. त्याने त्याच्या कृतीच्या समर्थनार्थ कारण सांगितले की -

-- अपहरण करताना भीष्माने राजकन्या अंबा हिला स्पर्श केला होता, म्हणजेच तिला परपुरुषाचा स्पर्श झाला होता. आता ती अपवित्र होती आणि म्हणून तो तिला त्याची पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही.   

-- ती काही काळ परगृही (पती किंवा पितृगृही नाही) राहिली होती, त्यामुळे तिचे चारित्र्य आता शुद्ध राहिले नव्हते. अशी  स्त्री एक राजाची पत्नी होऊ शकत नाही. 

-- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिचे अपहरण करणाऱ्या भीष्माबरोबर, इतर अनेक राजांप्रमाणे त्यानेही युद्ध केले होते ज्यात तो पराभूत झालेला होता. भीष्माने तिला जाण्याची अनुमती दिली असली तरी तिचा स्वीकार करणे म्हणजे भीष्माने दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करणे आहे जे एका क्षत्रियासाठी अवमानकारक आहे.  

अपमानित आणि दु:खी झालेली अंबा हस्तिनापुरामध्ये परतली कारण तिच्या पित्यानेही तिला आश्रय दिला नाही. स्वयंवर मंडपातून अपहरण झालेली कन्या ही अपहरणकर्त्याची जबाबदारी होती. भीष्माने उदार मनाने सांगितले, की तिने हस्तिनापूर सम्राटाबरोबर विवाह करावा किंवा ते स्वतः तिच्याकरता वर संशोधन करतील आणि तोवर तिने हस्तिनापुरामध्ये वास्तव्य करावे आणि ते तिचे रक्षण करतील.

परंतु राजकुमारी अंबाला दोन्ही पर्याय मान्य नव्हते. तिने सांगितले भीष्माने तिचे अपहरण केले म्हणून त्यांनीच तिला पत्नी म्हणून स्वीकारावे. भीष्माने अर्थातच नकार दिला, त्यांना त्यांच्या भीष्मप्रतिज्ञेचा भंग करायचा नव्हता.

सूडाच्या अग्नीमध्ये जळणारी, क्रोधित अंबा निबिड अरण्यात पोहोचली. तिथे भगवान परशुरामांसमोर तिने तिची व्यथा मांडली, परशुरामांनी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. (परशुरामांचा उल्लेख रामायणातसुद्धा येतो. सीता स्वयंवराच्या प्रसंगी उल्लेख असलेले शिवधनुष्य त्यांनीच जनक राजाला दिले होते. तसेच महाभारतामध्ये कर्ण ब्रह्मास्त्रविद्या मिळविण्याकरता परशुरामांकडे गेल्याचा उल्लेख आहे. आणि त्याहीआधी त्यांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली अशीही कथा आहे. या सर्व कालावधीमध्ये परशुराम आहेत कारण ते चिरंजीव आहेत अशी श्रद्धा आहे.) त्यांनी भीष्मांना द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. भीष्मांनी ते स्वीकारले.

दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले, कुणाचीच हार होईना. दोघेही तुल्यबळ होते, युद्ध संपण्याचे चिन्ह दिसेना, भीष्म इच्छामरणी होते आणि परशुराम चिरंजीवी. अखेर इंद्र आणि इतर देवांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, दोघांही वीरांनी ती विनंती मान्य केली. परशुरामांनी भीष्माला अनेक आशीर्वाद आणि अस्त्रे दिली आणि ते तपश्चर्येकरता दूरवरच्या आश्रमात निघून गेले.  

आता अंबासाठी कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तिने उग्र तप आरंभले, भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला की तिची इच्छा पूर्ण होईल. तिची एकमेव इच्छा होती ती म्हणजे तिच्यावर ओढवलेल्या दुर्दैवाचा जो कर्ता आहे म्हणजे भीष्म, त्याचा सूड घ्यायचा. भीष्मांना आव्हान देईल असा कुणीही शूरवीर नव्हता, भीष्मांचा सूड घेणे त्या जन्मात तिला शक्य होणार नव्हते. राजकुमारी अंबाने तिच्या तप:सामर्थ्याने अंतराग्नी निर्माण केला आणि त्यात तिच्या मर्त्य शरीराची जळून राख झाली.

पुढे काही काळानंतर तिने पांचाळदेशीच्या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला - तो म्हणजे शिखंडी. (काही कथा सांगतात तिने पांचाळ देशाच्या राजपुत्रीच्या रूपाने जन्म घेतला होता आणि तिचे नाव शिखंडीनी होते). शिखंडीची भगिनी म्हणजेच याज्ञसेनी द्रौपदी.

***