महाभारत कथा
महाभारत कथा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास कथन करतात. त्या काळातली नीतिमूल्ये, चालीरीती, प्रथा वर्तमान काळात अनाकलनीय वाटतात. महाभारतातील कथा भारताचा गौरवपूर्ण इतिहास आहे. आजही त्या श्रद्धेने आवडीने वाचल्या जातात, कथन आणि श्रवण केल्या जातात. परंतु त्या काळातील चारित्र्य, नैतिकता इत्यादी विषयीच्या काही संकल्पना मात्र नव्या युगात त्याज्य ठरलेल्या आहेत, त्यांना वर्तमान भारतामध्ये समाजमान्यता नाही. पुनर्विवाह, विधवा विवाह, संतती, वारसा इत्यादीविषयीचे त्या काळातले नियम आता मान्य होत नाहीत. हा बदल का? आणि कसा? घडला असावा हे समजून घेणे रोचक असेल.
महाराज शंतनू आणि गंगेच्या विवाहाची कथा आपण वाचली. देवी गंगा स्वर्गलोकीची रहिवासी होती आणि शापमुक्त झाल्यांनतर ती स्वगृही परत गेली. तिने शंतनूचा आठवा पुत्र देवव्रत याचे पालन, पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती आणि ती तिने उत्तम रीतीने पूर्ण केली. योग्य समय पाहून गंगा पुन्हा एकदा पृथ्वीतलावर अवतीर्ण झाली आणि तिच्याबरोबर तिचा कुमारवयीन पुत्र देवव्रत होता. तिने तिच्या पुत्राला महाराज शंतनू यांच्या स्वाधीन केले, स्वपुत्राला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. तिने तिच्या पुत्राला इच्छामरणाचे अनोखे वरदान दिले होते. जोवर युवराज देवव्रत मरणाची इच्छा करणार नाही तोवर त्याचे प्राणोत्क्रमण होणार नव्हते. तिने शंतनू महाराजांना सांगितले, त्यांचा पुत्र अद्वितीय वीर, आणि लोकोत्तर नेता होईल.
गंगा स्वर्गलोकी परत गेली आणि महाराज शंतनूंनी पुत्र देवव्रताला युवराज पदाचा अभिषेक केला. युवराज देवव्रत कुरुसाम्राज्याचा भावी सम्राट होता, परंतु नियतीने त्याच्यासाठी काही वेगळेच भवितव्य निश्चित केलेले होते.
सत्यवतीची कथा --
सत्यवती महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. सत्यवतीमुळे कुरुकुळाचे भवितव्य बदलले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सत्यवती आणि शंतनूचा विवाह हा भविष्यातील महाभारताचे एक कारण होते असेही म्हणता येईल कदाचित.
सत्यवती यमुनेच्या तीरावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कोळ्याची कन्या. तिचे विवाहापूर्वीचे नाव मत्स्यगंधा होते. मत्स्यगंधा असामान्य सौंदर्यवती होती मात्र तिच्याभोवती नेहमीच माशांचा गंध दरवळत असे. मत्स्यगंधा तिच्या पित्याला मासेमारीच्या व्यवसायात मदतही करत असे. नदीपात्रातून कौशल्याने नाव वल्हवत नेणे तिला चांगले अवगत होते.
एक दिवस तिथे महर्षी पराशर आले, त्यांना नदीपार करून पैलतीरी जायचे होते आणि त्याकरता एका नौकेची जरुरी होती. नौकेबरोबरच कुशल नावाडी असणे आवश्यक होतेच. कोळी राजाने त्यांच्यासाठी नौकेची व्यवस्था तर केली परंतु नावाडी उपलब्ध नव्हता. सर्वजण मासेमारी करण्याकरता दूरवर गेलेले होते. कोळीराजाने त्याची कन्या मत्स्यगंधेवर ती जबाबदारी सोपवली.
मत्स्यगंधा नौका वल्हवीत होती. तिच्या सौंदर्यावर ते तपस्वी ऋषी लुब्ध झाले होते.
(या पुढील कथेचा भाग म्हणजे चमत्कार, मंत्रसामर्थ्य किंवा जादू म्हणता येईल. त्याचे कारण म्हणजे तेव्हा नक्की काय घडले हे कुणाला माहिती नसल्याने त्याचे वर्णन चमत्कार म्हणून केले असावे. )
त्या तपस्वी ऋषींनी त्यांच्या तप:सामर्थ्याने नौकेभोवती तेजस्वी वलय निर्माण केले ज्यायोगे ती नौका मानवी दृष्टीस दिसेनाशी झाली. नौका पैलतिरी पोहोचली तेव्हा खूप मोठा काळ व्यतीत झालेला होता. मत्स्यगंधेने एका पुत्रास जन्म दिला होता आणि तो पुत्र आता एक तेजस्वी तपस्वी युवक होता.
(आणखी एका कथेत असे वर्णन आहे की त्यांच्या मार्गावरील एका द्वीपावर ऋषी आणि मत्स्यगंधेने वास्तव्य केले. तिथेच तिने एका पुत्रास जन्म दिला त्याचे नाव होते कृष्णद्वैपायन.)
नौका पैलतीरी पोहोचली आणि पराशर ऋषी त्यांच्या पुत्राला समवेत घेऊन हिमालय पर्वतराजीच्या दिशेने निघाले. त्यांचा आणि मत्स्यगंधेचा पुत्र म्हणजेच महाभारत कथेचे लेखक महर्षी व्यास. व्यासांनी त्याच्या मातेला वचन दिले की संकटकाळी तिने त्यांचे स्मरण केल्यास ते लगोलग तिच्या मदतीसाठी उपस्थित होतील (म्हणजे हे telepathy चे उदाहरण असेल का ? )
ही कथा वाचताना अनेक प्रश्न मनात येतात. इतका मोठा काळ लोटला आणि तोही सगळ्यांच्या नकळत? त्याचे उत्तर कथालेखकाने दिले आहे की ऋषींनी त्यांच्या योगसामर्थ्याने काळ थांबवला होता. असो ...
(मला असे वाटते की जे घडले ते कसे?आणि का ? हे सांगणे लेखकाला फारसे महत्वाचे वाटले नसावे .. फक्त घडले त्याचा उल्लेख असणे जरुरीचे आहे म्हणून चमत्कार या स्वरूपात वर्णन केले असावे. काळाबरोबर त्यातील मूळ दुवे नाहीसे झाले असतील.)
मत्स्यगंधेला ऋषींनी वर दिला होता. आता तिचा मत्स्यगंध नाहीसा होऊन तिच्या भोवती दैवी कस्तुरीचा सुगंध दरवळत होता. मत्स्यगंधा असेल तिथपासून एक योजन (साधारण ५ मैल) अंतरापर्यंत तो कस्तुरी गंध दरवळत असे. तिचे मत्स्यगंधा नाव बदलून आता तिला योजनगंधा असे नवीन संबोधन मिळाले होते. पराशर ऋषी त्यांच्या पुत्राला घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले. त्या तेजस्वी युवकाचे नाव आहे व्यास .. वर्षानुवर्षे तपश्चर्या करून त्यांनी महर्षी पद प्राप्त केले. तेच महाभारताचे लेखक आणि निर्मातेसुद्धा आहेत.
या सर्व कथानकामध्ये जे प्रसंग, घटना घडतात त्याचे दैवी चमत्कार, तप:सामर्थ्य, मंत्रशक्ती अशा स्वरूपामध्ये वर्णन केलेले आहे. परंतु ते नक्की का?आणि कसे? घडले असावेत याचा उल्लेख येत नाही. ते संदर्भ कदाचित कालप्रवाहात नष्ट झाले असतील किंवा कथालेखकाने ते स्पष्टीकरण दिलेच नसेल .. कथेचा ओघ खंडित होऊ नये म्हणून.
पराशरांच्या वरदानाने मत्स्यगंधाचे रूपांतर होऊन ती योजनगंधा झालेली होती. अजूनही एका कोळ्याच्या कन्येचे आयुष्य जसे असावे तसेच तिचेही होते. परंतु एक दिवस काही अक्रीतच घडले. तिचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले आणि इतिहासालादेखील नवी दिशा मिळाली होती.
यमुना तीरावर आलेल्या महाराज शंतनूने तिला पाहिले, तिच्या योजनगंधाने ते मोहून गेले होते, तिच्या सौंदर्यावर लुब्ध झालेले होते. महाराज शंतनूंनी तिच्या पित्याकडे, कोळीराजाकडे रीतसर त्याच्या कन्येबरोबर विवाहाकरिता संमती मिळावी अशी मागणी केली. कन्येच्या वैभवशाली भविष्याच्या कल्पनेने कोळीराजा भारावला परंतु व्यवहार विसरला नाही. त्याने अट घातली की विवाहापश्चात तिचेच पुत्र हस्तिनापूर साम्राज्याचे वारस असले पाहिजेत.
महाराज शंतनूंनी अर्थातच ती अट मान्य केली नाही. युवराज देवव्रताचा सिंहासनावर असलेला हक्क नाकारणे त्यांना शक्य नव्हते. महाराज स्वगृही परतले परंतु अत्यंत दुःखी झाले होते. एक दिवस युवराज देवव्रताने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. महाराजांनी सर्वकाही कथन केले.
पित्याचे दुःख युवराजांना पाहवेना, ते स्वतः कोळीराजाकडे आले. त्यांनी कोळ्याला आश्वासन दिले की त्याचे पौत्र हस्तिनापुराचे सम्राट होतील, युवराज त्यांच्या हक्काचा त्याग करण्यास तयार आहेत. पण कोळ्याचे समाधान काही होईना. तो म्हणाला तुम्ही राज्यत्याग कराल पण तुमचे पुत्र, वारस ते कसे मान्य करतील? युवराज देवव्रताने क्षणाचाही विलंब न करता प्रतिज्ञा घेतली की ते कधीच विवाह करणार नाहीत, आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतील.
या प्रसंगाचे वर्णन अनेक प्रकारांनी केले गेले आहे. देवव्रताने प्रतिज्ञा उच्चारली त्या क्षणी स्वर्गातील देवी, देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि अनेक शुभ आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे देवव्रताची जन्मकथा देवांनाही ज्ञात असणारच. कुमारवयात येईपर्यंत त्याचे वास्तव्य स्वर्गलोकातच होते. आणि गंगामातेने त्याला इच्छामरणाचे वरदान दिले होते. आता त्याचे भीष्म असे नामकरण झालेले होते. (आजही काही अवघड प्रण केल्यास अथवा प्रतिज्ञा घेतल्यास आणि त्याचा भंग न करता शेवटपर्यंत निभावल्यास "भीष्मप्रतिज्ञा " असे संबोधले जाते.)
हा क्षण अनोखा आहे, दिव्य आहे आणि भविष्यात घडणाऱ्या महाभारताची नांदीच आहे. कोळ्याची लेक मत्स्यगंधा जी योजनगंधा झाली, ती आता हस्तिनापुराची सम्राज्ञी सत्यवती होती... विधिलिखित अटळ होते, नियतीने खेळ मांडला होता.
***