महाभारत कथा
महर्षी व्यास रचित महाभारत भारतातील प्रमुख राजघराणी आणि त्यांच्या अनेक पिढ्यांचा इतिहास कथन करते. त्या कथानकांच्या अनुषंगाने समाज रचना, आर्थिक व्यवस्था, न्याय, नीती, चालीरीती इत्यादी संबंधी माहितीही मिळते. कथेमध्ये महत्त्वाच्या प्रसंगाचे वर्णन करताना समय (तिथी, ऋतू इ.), स्थान (भौगोलिक तपशील, दिशा इ.), राजकीय माहिती (राज्य, राज्यकर्ते आणि राजघराणी) तसेच धर्म, चाली, रीती, संस्कृती वगैरेंचे उल्लेख येतात जे बहुतांशी अचूक आहेत. महाभारत कथेचे स्वरूप हे अखिल भारतीय आहे. मुख्य कथानकामध्ये इतरत्र घडणाऱ्या घटना आणि प्रसंगांचे संदर्भ असतात. मुख्य कथानक जरी कौरव आणि पांडव त्यांच्या जीवनाचे चित्रण करीत असले तरीही भारतातील सर्व प्रमुख राज्ये आणि राज्यकर्ते यांचे योगदान त्यात आहे असे दिसते. काल्पनिक कथा, काव्य लिहिताना विविध प्रांत, तिथल्या चालीरीतींचे इतके संगतवार वर्णन करण्याचे कारण दिसत नाही. महाभारत कथा कुणा एका लेखकाच्या प्रतिभेचा आविष्कार नाही तर तो एक इतिहास आहे. अन्यथा या कथेमध्ये विविध प्रदेश, तिथल्या चालीरीती, तसेच आकाशस्थ ग्रह, तारे, नक्षत्रे यांची स्थिती, नैसर्गिक घटना इत्यादी वर्णने इतकी अचूक असणे असंभवच. प्राचीन काळात उपलब्ध असलेली अपुरी संचार आणि संपर्क साधने तसेच माहिती मिळविण्यासाठीची त्या काळात उपलब्ध असलेली अपुरी साधने इत्यादींच्या साहाय्याने एकाच व्यक्तीला समाज, इतिहास, भूगोल, वनस्पती, प्राणी, पक्षी, ग्रह, तारे, नक्षत्र इत्यादी सर्वांची अचूक वर्णने कथेमध्ये योग्य प्रकारे गुंफणे अवघड आहे. काही संदर्भ मिळत नाहीत, घटनांचे अर्थ किंवा तर्क लक्षात येत नाहीत, चमत्कारांची वर्णने कथेमध्ये येतात त्यामुळे त्या कथा काल्पनिक असाव्यात असे वाटते हे खरे. पण म्हणून तो इतिहास नसून लेखकाचा कल्पनाविलास आहे असे समजण्याचे कारण नाही. भारत देशामध्ये ठायी ठायी त्या महान आणि प्राचीन इतिहासाच्या खुणा आढळतात.
गंगा आणि शंतनू यांच्या कथेमध्ये अष्टवसूंचा उल्लेख येतो. गंगा स्वर्गलोकातून पृथ्वीकडे येत असताना अष्टवसू देखील पृथ्वीच्या दिशेने प्रवास करीत होते असा उल्लेख आहे. गंगेप्रमाणेच तेदेखील शापदग्ध आहेत. अष्टवसूंना गंगेला मिळालेल्या शापाबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती त्यांना काही मदत करू शकेल अशी आशा त्यांना वाटली असावी. त्यांनी तिला विनंती केली की पृथ्वीतलावरील जीवनापासून ती त्यांना मुक्ती देऊ शकेल का? अष्टवसूंना पृथ्वीवर सामान्य मानवरूपामध्ये जन्म घेणे क्रमप्राप्त होते. गंगा त्यांची जन्मदात्री होऊ शकली तर तीच त्यांना मुक्तीही देऊ शकणार होती. गंगेने त्यांना मदत करण्याचे मान्य केले. सात जणांना तिने जन्मतः जलसमाधी देऊन मुक्त केले आणि शेवटचा वसू (प्रभास) जीवित राहिला तो गंगापुत्र देवव्रत.
अष्टवसू कोण होते? त्यांना कोणी आणि का शाप दिला होता? त्याची कथा ---
वसू या शब्दाचा अर्थ तेजस्वी किंवा सामर्थ्यवान असा आहे. त्याचा एक अर्थ समृद्ध किंवा संपन्न असाही दिलेला आहे. अष्टवसू म्हणजे आठ सामर्थ्यशाली नैसर्गिक तत्त्वे किंवा शक्ती -
जल (जीवन), वायू (अनिल), अग्नी (आप), आकाश (प्रभास), पृथ्वी (धरा), नक्षत्रे (तारामंडल), सूर्य (रवी, तेज), चंद्र (सोम)
एकदिवस अष्टवसू त्यांच्या पत्नींसह गुरु वसिष्ठांच्या आश्रमात आले होते, त्यावेळी गुरुदेव आश्रमात नव्हते. खरेतर गुरुदेव आश्रमात नाहीत हे कळल्यावर अष्टवसूंनी लगोलग माघारी जाणे योग्य ठरले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही, ते तिथेच थांबले आणि संपूर्ण आश्रमात संचार करू लागले. वसिष्ठ ऋषी एक ज्ञानी आणि तपस्वी ऋषी होते, सर्वांसाठी आदरणीय होते. त्यांच्याकडे कडे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गाय होती तिचे नाव नंदिनी, ती त्या वेळेस आश्रमात होती. आश्रमामध्ये आलेल्या अतिथींपैकी काहींनी ती गाय (नंदिनी) पाहिली. वसिष्ठ ऋषी आणि त्यांच्या पत्नीने नंदिनीचा उत्तम प्रतिपाळ केलेला होता. अष्टवसूंपैकी एक प्रभास (आकाश) नावाचा वसू होता, त्याच्या पत्नीला ती गाय (नंदिनी) तिच्याकडे असावी असे वाटले. तिच्या सोबत असलेल्या इतर सातजणींनी सुद्धा तिला सहमती दर्शवली. पण वसिष्ठ ऋषी तर आश्रमात नव्हते, मग गाय नेण्याकरता त्यांची परवानगी कशी घ्यायची?
प्रभासने सुचवले ती गाय गुरुदेवांच्या परवानगी शिवायच घेऊन जायला हरकत नाही. आश्रमात अनेक गाई आहेत, त्यातील एक कुणी नेली तर गुरुदेव क्रोधित होणार नाहीत. बाकी सातजणांनी प्रथम त्याला विरोध केला कारण त्यांच्या मते साधी गाय असली तरी ती ज्यांच्या मालकीची आहे त्यांना सांगितल्याशिवाय, विचारल्याशिवाय घेऊन जाणे म्हणजे चोरी करणे आहे. चोरी करणे पाप आहे आणि पापक्षालन करण्यास खूप प्रयास करावे लागतील. त्याऐवजी गुरुदेव असताना परत येथे येऊन त्यांच्या अनुज्ञेने गाय न्यावी. पण अखेर प्रभासने सर्वांना त्याचे म्हणणे मान्य करायला भाग पाडले आणि वसिष्ठ ऋषींची अनुज्ञा न घेताच अष्टवसू नंदिनीला घेऊन तेथून निघून गेले.
वसिष्ठ ऋषी आश्रमात आल्यावर त्यांना अष्टवसू तिथे येऊन गेल्याचे कळले. त्यांच्या लक्षात आले की त्यांची गाय नंदिनी आश्रमात नाही. गुरुदेवांनी अंतर्ज्ञानाने सारे काही जाणले. अष्टवसूंच्या आगळिकीने ते संतप्त झाले होते. अष्टवसूंचे वर्तन त्यांच्या लौकिकाला शोभेसे नव्हते तर एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे होते. गुरुदेवांनी शाप दिला की अष्टवसूंना त्यांच्या दैवीशक्तींचा त्याग करून पृथ्वीवर सामान्य मानव रूपात जन्म घ्यावा लागेल. अष्टवसू घाबरले, गुरुदेवांची क्षमायाचना करू लागले, त्यांनी नंदिनीला आश्रमात आणले आणि वसिष्ठांकडे सुपूर्त केले. गुरु वसिष्ठांना त्यांची दया आली आणि त्यांची गाय देखील परत मिळाली होती. परंतु दिलेला शाप परत घेता येत नाही म्हणून त्या शापापासून मुक्ती मिळावी या हेतूने त्यांनी उ:शाप दिला की सात वसूंना जन्मानंतर लगेचच मुक्ती मिळविता येईल परंतु प्रभास, ज्याचा या चोरीत पुढाकार होता त्याला मात्र एक पूर्ण जन्म पृथ्वीवर व्यतीत करावा लागेल.
गंगेने ज्या सात अर्भकांना जन्मत: जलसमाधी दिली ते तिचे पुत्र म्हणजे सात वसू आणि आठवा पुत्र हाच आठवा वसू प्रभास म्हणजेच गंगापुत्र देवव्रत... पितामह भीष्म.
***