महाभारत कथा (३)

महाभारत कथा (३) देवयानीचे दुःखं पाहून तिचे पिता शुक्राचार्य क्रोधित झाले होते आणि त्यांनी ययातीला शाप दिला, त्याला अकाली वार्धक्य येईल, पण नंतर देवयानीच्याच विनंतीवरून त्यांनी उ:शाप दिला होता. शर्मिष्ठेचा पुत्र पुरू याने पित्याच्या वार्धक्याचा स्वीकार करून ययातीला तारुण्य बहाल केले. ययातीने पुढे काही काळ उत्तम रितीने राज्य केले आणि नंतर हस्तिनापुराचे राज्य पुत्र पुरू याच्या स्वाधीन केले आणि वार्धक्यही स्वीकारले. ययाती-देवयानी आणि शर्मिष्ठेची कथा इथे संपत नाही तर भविष्यात घडणाऱ्या महाभारताची ती सुरवात आहे.

ययाती-देवयानी यांचे दोन पुत्र होते यदु आणि तुर्वसू. त्यांची एक कन्या होती जिचे नाव माधवी होते. माधवीची जीवनकथा आगळी वेगळी आहे. माधवी महाराज ययाती आणि देवयानीची कन्या होती, रूपसुंदर आणि गुणवती. वेगवेगळ्या सामर्थ्यशाली साम्राज्यांच्या प्रमुखांशी सलोख्याचे संबंध स्थापन व्हावे या हेतूने ययातीने त्याच्या कन्येचे चार विवाह घडवून आणले होते. माधवीचे चारही पती सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली राजे होते. त्यांच्याशी असलेल्या नात्यामुळे हस्तिनापूरच्या साम्राज्याला संरक्षण आणि सामर्थ्य प्राप्त झालेले होते. विश्वामित्र ऋषी माधवीचे पती होते. तप:श्चर्या करण्यासाठी त्यांनी राज्यत्याग करून वनवासी आयुष्य पत्करले होते. चारही विवाह संबंधातून माधवीने चार पुत्रांना जन्म दिला जे भविष्यात बलशाली आणि पराक्रमी राज्यकर्ते झाले होते.

ययाती-शर्मिष्ठेचे पुत्र धृह्यु, अनु आणि पुरू. महाराज ययातींनी कनिष्ठ पुत्र यांस हस्तिनापुराचे साम्राज्य बहाल केलेले होते. त्याच्याच वंशामध्ये कुरू नावाचा एक महाप्रतापी राजा झाला होता ज्याने साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्याच नावाने ते राजघराणे कुरुकुळ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. महाभारतामधील सर्व प्रमुख पात्रे याच कुरुकुळातील आहेत.

ययाती-देवयानी आणि ययाती-शर्मिष्ठा यांच्या पाच पुत्रांनी निरनिराळी राज्ये स्थापन केली. गांधारदेशा पर्यंत त्यांनी राज्य विस्तार केला होता. नवीन राजघराणी उदयाला आली होती. महाभारत कथेमध्ये या सर्व पाच राजपुत्रांच्या कुळातील अनेक पिढ्यांचा इतिहास देखील वर्णन केलेला आहे. असे दिसते की ययाती-देवयानी आणि शर्मिष्ठेचे पुत्र आणि देवयानीच्या कन्या माधवीचे पुत्र या सर्वांनी मिळून निरनिराळी राज्ये स्थापन केली, त्यांच्याच नावांनी त्यांची कुळे प्रसिद्धीस आली आणि आणि साम्राज्याचा विस्तार होत गेला.

ययातीच्या पाचही पुत्रांनी राज्यविस्तार केला आणि त्यांचा वंश विस्तार देखील झाला. कुरुवंशामध्ये अनेक पराक्रमी आणि महान राजे होऊन गेले ज्यांनी कुरू साम्राज्याला वैभव प्राप्त करून दिले. कुरू साम्राज्य भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचे राज्य होते. त्या वंशातील कित्येक पिढ्यांचा इतिहास कथेमध्ये वर्णन केलेला आहे आणि तो इतिहास आता येऊन पोहचतो कुरुकुळाचा वंशज आणि पराक्रमी राजा शंतनू पर्यंत. शंतनू उत्तम शासक आणि प्रजाहितदक्ष राजा होता. महाराज शंतनूचा लौकिक असा की स्वर्गलोकीचा राजा इंद्र त्याला युद्ध सहाय्याकरता पाचारण करीत असे. राजा शंतनूने हस्तिनापूर साम्राज्याचा विस्तार केला होता. तो कुशल प्रशासक सुद्धा होता आणि त्याच्या छत्रछायेखाली प्रजा सुखी होती.

एक दिवस महाराज शंतनू मृगयेसाठी जंगलामध्ये आलेले असताना शिकारीच्या शोधात दूर घनदाट अरण्यामध्ये पोहोचले, त्यांचे सोबती, सेवक मागेच राहिले होते. नदीतीरावर विहार करीत असताना एक सुंदर स्त्री त्यांनी पाहिली, ती होती देवी गंगा. गंगेचे वास्तव्य स्वर्गात असे परंतु कुणा ऋषींच्या शापामुळे तिला पृथ्वीतलावर काही काळासाठी वास्तव्य करायचे होते. महाराज शंतनू तिच्या सौंदर्याने मोहीत झालेले होते, महाराज शंतनूने गंगेबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. गंगेने महाराजांबरोबर विवाह करणे मान्य केले पण तिची एक अट होती. महाराज शंतनू कडून तिला एक वचन हवे होते. विवाहापश्चात तिचे स्वातंत्र्य अबाधित राहील. तिच्या कोणत्याही कृतीला महाराज विरोध करणार नाहीत अथवा कारणही विचारणार नाहीत. जेव्हा महाराजांकडून या वचनाचा भंग होईल त्या वेळेस ती स्वर्गलोकात निघून जाईल, कधीही परत न येण्यासाठी. तिची अट मान्य असेल तरच ती विवाहास संमती देईल. महाराज शंतनूने तिला वचन दिले आणि त्यांचा विवाह संपन्न झाला.

गंगेची सुद्धा एक वेगळीच कथा आहे. गंगेचे वास्तव्य स्वर्गलोकी असे. तिथे कुण्या एका ऋषीने तिला काही कारणाने शाप दिलेला होता (अनवधानाने त्यांच्यासमोर तिचे उत्तरीय ढळले म्हणून ... ती आणखी एक वेगळी कथा आहे) त्या मुळे तिला थोड्या काळासाठी पृथ्वीवर वास्तव्य करणे प्राप्त होते. देवी गंगा जेव्हा स्वर्गलोकातून पृथ्वीवर येत होती तेव्हा तिला शापग्रस्त अष्टवसु (त्यांचीही एक वेगळी कथा आहे) दिसले, ते सुद्धा पृथ्वीच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यांनी गंगेला विनंती केली की तिने पृथ्वीतलावर त्यांची जन्मदात्री व्हावे आणि त्यांना इहलोकामध्ये वास्तव्य करण्यापासून मुक्ती मिळवून द्यावी. गंगेने त्यांची विनवणी मान्य केली.

गंगेने राजा शंतनूचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला आणि आता ती हस्तिनापुराची महाराणी होती. सुखात, आनंदात कालक्रमणा चालली होती. गंगेला पुत्रजन्माची चाहूल लागली, आणि सर्वत्र आनंदी वातावरण होते. महाराजांना पुत्रलाभ झाला तर तो सिंहासनाचा वारस असणार होता. यथावकाश पुत्रजन्म झाला पण दुर्दैवाने काही दिवसातच नवजात पुत्राच्या निधनाची वार्ता मिळाली. महाराज शंतनू दुःखी झाले, परंतु त्यांनी त्यांच्या पत्नीला धीर दिला. असे अनेकवेळा झाले दरवेळी पुत्रजन्माची वार्ता येई आणि लगेच त्याच्या निधनाचे वृत्त मिळे, कुणाला समजेना काय कारण असावे? राजवाड्यातील एका अनुभवी आणि विश्वासू दासीने महाराजांना सांगितले की त्यांच्या पुत्रांचा मृत्यू नैसर्गिक नाही.

महाराज शंतनू चिंताग्रस्त झाले, घडणाऱ्या त्या अघटितांचे कारण जाणून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. आणखी एक पुत्रजन्माची वार्ता आली. या वेळेस महाराज शंतनू राजद्वाराजवळ थांबलेले होते. त्यांनी पाहिले नवजात पुत्राला घेऊन त्यांची पत्नी गंगा, नदीपात्राच्या दिशेने चालली होती. महाराजदेखील नदीच्या दिशेने चालत होते, अर्थात गंगेच्या दृष्टीआड राहूनच. नदीतीरावर पोहोचल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिले ते महाभयंकरच होते. महाराज पाहत होते, त्यांच्या पत्नीने तिच्या हातातील नवजात बालकाला जलसमाधी दिली होती. महाराज शंतनूच्या दुःखाला आणि क्रोधाला सीमा राहिली नव्हती. परंतु गंगेला थांबविण्यास ते असमर्थ होते, गंगेने तशी अटच घातलेली होती. महाराजांनी तिला प्रतिरोध केला असता किंवा तिच्या कृत्याचे कारण विचारले असते तर गंगा त्यांना सोडून स्वर्गलोकी निघून जाणार होती. महाराज शंतनूंनी संयम बाळगला, पत्नीला गमावण्याची कल्पना त्यांच्याकरता असह्य होती. परंतु याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली एक दोन वेळा नाही तर एकूण सात वेळा. आता मात्र महाराज शंतनूचा संयम संपला होता. गंगा जेव्हा आठव्या पुत्राला घेऊन नदीतीरावर आली त्यावेळी महाराज शंतनूने तिला अडवले, तिच्या अनाकलनीय कृत्याचे कारण विचारले.

गंगेने तिला मिळालेल्या शापाविषयी सांगितले आणि अष्टवसूंना तिने दिलेल्या वचनाबद्दल सांगितले. ती म्हणाली की राजाने तिच्या अटीचा भंग केला आहे त्यामुळे ती शापमुक्त झाली आहे. तिने सांगितले, ती तिच्या पुत्राला (जो आठवा वसू होता) घेऊन देवलोकात जाणार आहे. योग्यसमयी ती महाराजांकडे त्यांचा पुत्र सुपूर्द करेल. गंगेने सांगितले, तिचा पुत्र महान योद्धा आणि आदर्श पुत्र असेल जो अनेक पिढ्यांना वंदनीय होईल. भविष्यात घडणाऱ्या इतिहासाची ती नांदीच होती.

अशीच अनेक वर्षे गेली आणि एकदिवस गंगा पुन्हा एकदा पृथ्वीवर प्रकट झाली. तिच्यासमवेत एक तेजस्वी कुमार होता तो म्हणजेच शंतनूचा पुत्र देवव्रत, जो हस्तिनापूर राज्याचा युवराज होता.

***