महाभारत कथा (१)

महाभारत कथा (१) "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, आणि त्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे ...."

शाळेत असताना राष्ट्रगीतानंतर रोज आम्ही सर्व विद्यार्थिनी अशा प्रतिज्ञेचा उच्चार करत असू. इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांच्या पाठ्यपुस्तकांवर ती छापलेली होती. त्या प्रतिज्ञेचे गांभीर्य मात्र काही काळानंतरच कळायला लागले होते.

खरोखरच अभिमान वाटावा असाच भारत देश आहे. विविधतेमध्ये साधलेली एकता, समृद्ध परंपरांचा वारसा, वेगवेगळ्या असूनही एकजीव भासणाऱ्या संस्कृती हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे आणि फार प्राचीन सुद्धा आहे. भाषा, गणित, तत्वज्ञान, धर्म, अर्थ, राजकारण, औषध आणि उपचार, वनस्पती शास्त्र, भौगोलिक स्थिती आणि घटना, ग्रह, तारे, नक्षत्र, ज्योतिष अशा विविध विषयांवर भारतीय विद्वानांनी संशोधन आणि लेखन केले आहे. नृत्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांचा विकास आणि त्यांचे संवर्धन पुरातन काळापासून होताना दिसते.

इथे अनेक जातीजमाती, धर्म, पंथ सुखाने नांदत आहेत. हिंदू धर्मीय जरी बहुसंख्य असले तरी इतर धर्मांना देखील इथे तितकाच मानसन्मान दिला जातो, संरक्षण दिले जाते. हिंदुधर्म सहिष्णुतेची शिकवणूक देतो. स्वधर्माचा अभिमान जरूर असावा पण परधर्माबद्दल तिरस्कार नसावा असेच आम्हाला शिकवले जाते. काहीवेळा कर्मकांडांना अतिमहत्त्व दिले गेल्याने धर्माची खरी शिकवणूक दृष्टीआड होते. भारत देशाच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचे उल्लेख नेहमीच ऐकायला मिळतात, परंतु संस्कृती आणि परंपरा म्हणजे धर्म नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता धर्मांतरे कधीच करण्यात आली नाहीत, जबरदस्तीने तर नाहीच नाही, हिंदुधर्मीयांची ती पद्धत नाही.

भारताच्या इतिहासाबद्दल कुतूहल असेल, संस्कृती आणि परंपरा समजून घ्यायच्या असतील तर इथली समाज पद्धती आणि मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. शतकानुशतके भारतीय समाजाची रचना मूल्याधारित विचारसरणीनुसार घडलेली आहे. धर्म, चारित्र्य, आणि नैतिकता या त्रिसूत्रीला प्रमाण मानून अनेक पिढ्या इथे जगत आलेल्या आहेत. काळानुसार चालीरीती बदललेल्या असल्या तरी त्यांचा मूलाधार मात्र अजूनही तसाच आहे. धर्म आणि कर्म वेगवेगळे नाहीत तर परस्परांवर आधारलेले आहेत. कर्तव्याचे पालन करणे हाच धर्म आहे अशी शिकवणूक दिली जाते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिक्षेत्रावर आधारित अनेक व्यवसाय इथे विकसित झालेले आहेत. जगण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री निर्माण करणारे आणि आवश्यक सेवा पुरविणारे जे व्यावसायिक होते त्यांना बलुतेदार असे संबोधले जात असे. एकूण बारा बलुतेदार असत - गुरव (पुजारी), चांभार, कुंभार, लोहार, सुतार, न्हावी, परीट, तेली, पाटील, शिंपी, माळी, महार-मांग. हे सर्व बलुतेदार त्या गावातील नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा पुरवीत असत.

समाज म्हणजे एक मानव अशी कल्पना केली तर त्याचे मस्तक, भुजा, उदर आणि पाय म्हणजे समाजाचे चार विभाग अशी कल्पना केली गेली होती. त्या विभागांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे संबोधले. खरेतर मूळ जाती व्यवस्था कर्माधारित होती, परंतु कालौघात त्याचे स्वरूप बदलत गेले. आता जात ही जन्मजात असते. कधीही जात नाही ती जात असे काहीवेळा उपरोधाने बोलले जाते आणि ते खरेही आहे. धर्म आणि जात जन्मजात असतात अगदी नकळत्या वयात देखील ती सामोरी येतात .

१) मस्तक म्हणजे ब्राह्मण जात - अध्ययन, ज्ञानदान, धार्मिक कर्मे जसे की पूजा, यज्ञ इत्यादींचे पौरोहित्य करणे अशा स्वरूपाची कार्ये ब्राह्मण समाज करीत असे. समाजाची बुद्धिमत्ता, दृष्टी, श्रवणशक्ती,आणि वाणी म्हणजेच ब्राह्मण. देव, धर्म, न्याय आणि नीतिमूल्ये यांचे सर्वाधिकार ब्राह्मण समाजाकडे असत. म्हणून त्यांना परमेश्वराचे प्रतिनिधी समजण्यात येई.

ब्राह्मण समाजातील स्त्रियांवर खूप बंधने असत. ब्राह्मण स्त्रिया कधीही घराबाहेर जात नसत. कष्ट करून धन, संपत्ती मिळवणे शक्यच नाही, बालविवाहाची प्रथा होती. विद्याध्ययनास परवानगी नव्हतीच आणि धार्मिक अथवा कौटुंबिक कार्यामध्ये पतीची सावली इतकेच तिचे स्थान होते. ब्राह्मण स्त्रीसाठी पती हाच परमेश्वर त्यामुळे त्याच्या शब्दाबाहेर जाणे अशक्यच. आर्थिक स्वातंत्र्य नव्हतेच. माहेरच्या अथवा सासरच्या संपत्तीमध्ये हक्क सुद्धा नसे. पतीच्या मृत्यूपश्चात स्त्रीचे जगणे म्हणजे नरकच असे. त्यातही ती निपुत्रिक असेल तर काही विचारायलाच नको. विधवा ब्राह्मण स्त्रीचे केशवपन केले जाई. आयुष्यभर लाल रंगाचे वस्त्र नेसावे लागे त्याला आलवण म्हणतात. तिचे दर्शन, अस्तित्व इतकेच काय तिची सावलीसुद्धा अशुभ मानली जाई. शुभकार्य प्रसंगी तिला घरात वावरण्यास मज्जाव असे. सतीची प्रथा होती. पतीच्या चितेवर स्त्रिया मृत्यूला कवटाळत असत, कधी स्वेच्छेने तर कधी जबरदस्तीने.

असे सारे असले तरी ब्राम्हण समाज सर्वांच्या आदरास पात्र होता. ब्राह्मणांमुखी देव बोलतो अशी श्रद्धा होती. ब्राह्मण म्हणजे परमेश्वराचा दूत असाही समज होता.

२) भुजा म्हणजे क्षत्रिय जात -- शूर, वीर, पराक्रमी, योद्धे हे या विभागाचे घटक होते. समाजाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी क्षत्रिय समाजाकडे होती. राजे, महाराजे, सैनिक या सर्वांना क्षत्रिय असे संबोधले जाई. फक्त युद्ध काळातच नाही तर शांततेच्या काळातही गुन्हेगार आणि समाजकंटकांपासून नागरिकांचे रक्षण करण्याचे कार्य क्षत्रिय समाज करीत असे.

क्षत्रिय समाजातील स्त्रियांवर ब्राह्मण स्त्री इतकी बंधने नसावीत. त्या पतीसमवेत सिंहासनावर आरूढ होत असत. कधी शिकारीला आणि युद्धामध्येही स्त्रिया सहभागी असल्याची वर्णने आहेत. पण तरीही स्त्री म्हणजे संपत्ती किंवा मालकीची वस्तू असेच समजले जात असे. म्हणूनच धर्मराजाने द्रौपदीला द्युतामध्ये पणाला लावले तेव्हा कुणीही आक्षेप घेतलाच नाही.

३)उदर म्हणजे वैश्य जात - समाज घटकांच्या भौतिक गरजा (अन्न, वस्त्र, निवारा) पूर्ण करण्याचे कार्य जो समाज करीत असे त्यांना वैश्य असे संबोधले जात असे. वैश्य समाज म्हणजेच व्यापार आणि इतर आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी असलेला.

४) पाय म्हणजे शूद्र समाज - समाजाला गती आणि प्रगती प्रदान करणारी ही जात. समाजाचे रहाटगाडगे चालू राहण्याकरता शूद्र समाज महत्त्वाचे योगदान देत असे. सर्व प्रकारची कष्टाची कामे करणारे लोक शूद्र समाजाचे घटक. शूद्र म्हणजे समाजाचा पाया .. ज्याच्या आधारावरच इतर तीन जातींचे कार्य सुरळीत चालते.

या प्रमुख जाती आहे त्यातही अनेक उपजाती, संवर्ग वगैरे आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या जातिव्यवस्थेत उच्च, नीच असा कोणताच भेद खरे तर नाही. तुम्ही जे कर्म कराल तीच तुमची जात परंतु पुढे ही कर्मे (व्यवसाय) ही पिढीजात झाली म्हणजे ब्राह्मणपुत्र विद्यादान करेल तो शेती करणार नाही आणि कुंभाराचा मुलगा मडकी घडवेल तो मंदिरात पूजा करणार नाही. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे व्यावसायिक कौशल्यांचे हस्तांतरण होत गेले आणि वडिलांचा व्यवसाय मुलांकडे आणि त्यानंतर त्यांच्या नव्या पिढीकडे जात राहिला आणि मग व्यवसायाधारित ठरवून दिलेली जात, जन्मजात झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही जाती एकसमान महत्वाच्या होत्या. त्यापैकी कोणतीही जात दुर्बळ किंवा अकार्यक्षम असेल तर समाजाचा समतोल बिघडतो आणि तो समाज प्रगती करू शकत नाही.

असा आहे भारतीय समाज आणि त्या समाजाची व्यवस्था. पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक व्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.

भारताला निसर्गाचे वरदान लाभलेले असल्याने अन्नधान्याची समृद्धी तर होतीच पण त्याबरोबरच मूल्यवान धातू, रत्ने, मोती, रेशीम आणि मसाले यांचा व्यापार देखील चालत असे. उर्वरित जगासाठी भारत "सोने की चिडियॉ" होता, देशोदेशींचे व्यापारी भारतात येण्यास उत्सुक असत.

अशा संपन्न आणि समृद्ध भारताचा इतिहास गौरवशाली आहे. शूरवीरांबद्दल इथे सर्वांना आदर आहे. प्राचीन काळापासूनचा भारताचा इतिहास पाहिला तर अनेक शूर राजे, विद्वान धर्मवेत्ते आणि तपस्वी ऋषिमुनींच्या कथा सांगितल्या जातात. नीतिमत्ता आणि धर्माचारण हे सद्गुण समजण्याची प्रथा होती. शुद्ध चारित्र्य, सेवा, औदार्य याचबरोबर वचननिष्ठा म्हणजे दिलेल्या शब्दाचे पालन करणे अशी उत्तम मनुष्याची लक्षणे समजली जात होती. सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली होती आणि स्वप्नात दिलेले वचन खरे करण्याकरता राजा हरिश्चंद्राने राज्यावर पाणी सोडले होते या आणि अशा अनेक कथा आहेत, परंतु त्यांची सत्यता सिद्ध करता येत नाही.

महाभारत कथासुद्धा पौराणिक कथा म्हणता येईल पण या कथेचे वैशिष्ट्य आहे की त्यात अनेक पिढ्यांचा इतिहास वर्णन केला आहे. कथेमध्ये उल्लेख केलेली स्थळे भारतामध्ये वर्तमानकाळात देखील आढळतात आणि त्यांची कथेमध्ये केलेली वर्णने अचूक असल्याचे दिसते. अनेक चित्रातून आणि शिल्पातून या कथेचे प्रभावी चित्रण दिसते. महाभारत कथेवर आधारित अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. महाभारतामध्ये अनेक पिढ्याच उल्लेख आहेच परंतु त्यातील घटनांचे कथन करताना भौगोलिक स्थिती, ऋतू , दिशा तसेच आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रे इत्यादींची समर्पक वर्णने आढळतात. समाज, चाली रीती, श्रद्धा आणि समजुती इत्यादीची सुसंगत वर्णने केलेली दिसतात. महाभारत कथेचा आवाका प्रचंड आहे, त्यातील विविध घटकांची आणि घटनांची तपशीलवार वर्णने वाचताना त्यातील सत्यतेचा अंश नक्कीच दृग्गोचर होत राहतो. कितीही ज्ञानी आणि प्रतिभासंपन्न असला तरी कुणा एका व्यक्तीला इतक्या विविध विषयांचे ज्ञान असणे आणि त्यांनीच अनेकोनेक पिढयांचा तपशीलवार इतिहास केवळ कल्पना करून लिहिणे हे अशक्य वाटते. लेखकाला प्रभावी नाट्य अथवा रसाळ, रंजक साहित्याची निर्मिती करायची असती तर इतका तपशील देण्याची जरूरच नाही. या कथेमध्ये उल्लेख करण्यात आलेली स्थळे, भौगोलिक स्थाने, नैसर्गिक परिस्थिती, आकाशातील ग्रह, नक्षत्रे, तारे, तिथी इत्यादींचे संगतवार वर्णन या सर्वांचे महाभारताच्या अभ्यासकांनी परीक्षण केले आहे. आणि त्यावरून महाभारत एक काल्पनिक कथानक नसून सत्यकथा आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. कथेमध्ये उल्लेख असलेली स्थळ, काल, दिशा, ग्रह, नक्षत्रे तपासून महाभारताची कालनिश्चिती देखील केलेली आहे.

अतिप्राचीन काळामध्ये लिहिणे, वाचणे बहुसंख्यांना अवगत नव्हते. भूर्जपत्रावर मोरपीस किंवा तशाच कुठल्या साधनांनी लेखन केले जात होते पण त्या लेखनाच्या अनेक प्रति असणे असंभवच. ग्रंथबद्ध साहित्य वाचणारे कमीच. माहिती आणि ज्ञान यांच्या प्रचार, प्रसाराची साधने दृक - श्राव्य होती. कुणीतरी कथा सांगायचे आणि बाकीच्यांनी ती ऐकायची, श्रोत्यांनी तीच कथा आणखी कुणाला ऐकवायची. अशा कथाकथनांमधून काहीवेळा चुकीची माहिती, संदर्भ प्रसारित केले जातात कधी गैरसमजुतीने किंवा कधी मुद्दाम -- कथेची रंजकता वाढविण्यासाठी. अशा पद्धतीने ऐकलेली/संगितलेली कथा संपूर्ण सत्य असेलच असे नाही. परंतु महाभारताबद्दल विपुल ग्रंथसंपदा आढळते ही एक जमेची बाजू आहे, त्याचा उपयोग सत्य संशोधनासाठी प्रभावीपणे करणे शक्य होते.

महर्षी व्यास लिखित महाभारत एक महाकाव्य आहे, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. कौरव आणि पांडव याच्यामध्ये कुरुक्षेत्रावर १८ दिवस युद्ध झाले, ते म्हणजे महाभारत असे काहीजण समजतात पण ते तेव्हढेच मर्यादित नाही. महाभारत अनेक पिढ्यांचा इतिहास आहे. एखाद्या सामान्य वाटणाऱ्या घटनेमुळे अनेक असामान्य घटना घडत जातात -- याला इंग्लिश भाषेमध्ये "Domino's effect किंवा Butterfly effect" अशी संज्ञा आहे. पत्त्यांच्या बंगल्यातला कुठलाही एक पत्ता काढून घेतला तर सारा डोलारा कोसळतो ... तसेच काहीसे. महाभारत अनेक घटना प्रसंगांची अखंड मालिका आहे. त्यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे कारण त्याचा परिणाम भविष्यातील कुठल्या ना कुठल्या प्रसंगी होणार आहे. महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग, अशा घटना आढळतात. मग लक्षात येते महाभारत म्हणजे फक्त पाच पांडव आणि शंभर कौरव यांची कथा नाही.

कुरुक्षेत्रावर युद्ध झाले त्यामागची कारणे काय असावीत याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. काहीजणांच्या मते द्रौपदीचा कुरुसभेत अपमान झाला म्हणून युद्ध झाले. त्याचे खंडन करणारे म्हणतात द्रौपदीने कौरवांना 'मयसभे' मध्ये अपमानित केले, त्याचा सूड म्हणून कौरवांनी तिचे भरसभेमध्ये वस्त्रहरण केले. पण मग कौरवांनी अश्वमेध यज्ञ प्रसंगी तिला लज्जित करण्यासाठी प्रयत्न केले जे श्रीकृष्णाच्या प्रसंगावधानाने फसले, त्याचे काय? तसेही कौरव पांडवांचे वैर द्रौपदीच्या विवाहापूर्वीपासूनच होते -- मग द्रौपदीला दोष का म्हणून द्यायचा? असा प्रश्न उद्भवतो.

खरे म्हणजे महाभारत घडण्याकरता एकच एक कारण सांगता येत नाही. अनेक प्रसंगांची मालिका आहे ज्या सर्वांचा परिपाक म्हणून महायुद्ध घडले. कुणी विद्वान म्हणतात श्रीकृष्ण महाभारताचा कर्ता, करविता आहे. तो एक द्रष्टा युगपुरुष आहे आणि काही विशिष्ट हेतू बाळगून त्यांनीच महाभारत घडवले. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली होती त्यावेळी त्यांनी सांगितलेच होते की अधर्माचा नाश करण्यासाठी मी पुनःपुन्हा अवतार घेईन. त्यांनी अश्वासन दिले होते की जेव्हा अधर्माचा प्रभाव वाढेल तेव्हा त्यापासून मुक्ती देण्यासाठी स्वत: श्री नारायण या पृथ्वीतलावर अवतार घेतील.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

कलियुगामध्ये अधर्माचा अतिरेक झाला होता म्हणून त्याचा विनाश करण्याकरता श्रीकृष्णांनी महाभारत घडवले असे म्हणता येईल कदाचित. महाभारत कथा संपूर्ण जाणून घेण्यासाठी त्यातील सर्व प्रसंग आणि घटना शृंखलांची माहिती असणे आवश्यक आहे, त्यासाठी अनेक पिढ्यांचा इतिहास समजून घेणे जरुरीचे ठरते... अगदी ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठेच्या काळापासून.

***